Author : Harsh V. Pant

Published on May 22, 2020 Commentaries 0 Hours ago

भारतीय लष्करप्रमुखांनी चीनसंदर्भात नुकतं केलेलं विधान भारतीय सैन्याच्या दृष्टीने संवेदनशील आणि काहीसे मनोधैर्यावर परिणाम करणारे होते.

जबाबदार व्यक्तींची वक्तव्ये जबाबदार हवी

जगातील सर्वांत मोठ्या भूदलाचे प्रमुख जेंव्हा एखादं विधान करतात, तेव्हा संपूर्ण जगाचे लक्ष त्याकडे वेधले जाते. विशेषत: सर्व बाजूंनी तणावग्रस्त शेजार असलेल्या  देशांनी वेढलेला असूनही आपली जबाबदार देश असल्याची प्रतिमा जपणाऱ्या भारतासारख्या देशाच्या लष्करप्रमुखांनी तर आपले शब्द आणि शब्दरचना अत्यंत काळजीपूर्वक निवडायला हवी. लष्करप्रमुखांच्या वक्तव्यातून ध्वनित होणाऱ्या आशयाचा अदमास लावत अतिशय चलाखीने मित्रराष्ट्रे, विरोधक आणि तटस्थ राष्ट्रेदेखील आपली धोरणे आखत असतात. त्यामुळे लष्कराची किंवा त्याच्या प्रमुखांची प्रतिष्ठादेखील त्यांनी केलेल्या जबाबदार वक्तव्यांवरूनच होत राखली जात असते.सध्याच्या माहितीयुगात तर माहिती आणि त्या माहितीवरून केलेली मांडणी आणि संरचना यांवरून लष्कराचे आणि पर्यायाने संबंधित राष्ट्राचे यशापयश व एकूण भवितव्य अवलंबून असते.

या पृष्ठभूमीवर भारत-चीनसीमेवर घडलेल्या घडामोडींवर भारतीय लष्करप्रमुखांनी केलेलं विधान काहीसं अस्वस्थकारक वाटू शकतं. गेल्या आठवड्यात भारत आणि चीन दरम्यानच्या प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवर दोन्ही सैन्यामध्ये संघर्ष झाला. यापैकी एक लढाई सिक्कीममधील ‘नाकु ला’ या तणावग्रस्त प्रदेशात तर, दुसरी लडाखमधील ‘पँगोंग त्सो’ या तलावानजीकच्या प्रदेशात घडून आली. ३,४८८ किमी लांबीची सिनो-भारत सीमा ही जगातील सर्वात मोठी अशी आंतरराष्ट्रीय सीमा आहे. या सीमेवर नेहमीच तणावग्रस्त स्थिती असते. या सीमावर्ती भागात उभय देशांच्या सैनिकांमध्ये लढाई होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही, व यापुढेही अशा छोट्या-मोठ्या चकमकी तिथे होत राहातील. या दोन्ही देशांतील राजकीय संबंध पाहता दोन्ही देशाच्या सैन्यादरम्यान अधूनमधून ‘तत्कालिक तणावाची स्थिती’ निर्माण होणे ही सामान्य बाब आहे. जसजशी सीमेवर भारतीय बाजूने पायाभूत सुविधांची संख्या आणि त्यांची क्षमता सुधारत जाईल व भारतीय सैन्याची गस्त अधिकाधिक सक्षम व प्रभावी ठरेल तसतसे अशा चकमकी ही अगदी सामान्य व नित्याची बाब होईल.

एक देश म्हणून आपण अशा छोट्या-मोठ्या चकमकींना चीनसोबतच्या करारात महत्त्वाचे स्थान  देत नाही हे योग्यच आहे. चीनला हाताळणे हे रणनीतीच्या दृष्टीने भारतासाठी एक मोठे आव्हानच ठरत आले आहे आणि त्यामुळे या चकमकींना मध्ये न आणता या संबंधांतून आपले हित साधत राहाणे आपल्यासाठी अत्यावश्यक आहे. या साऱ्यासाठी दक्ष आणि चाणाक्ष अशी नीती अवलंबणे आवश्यक आहे. हे सारं लक्षात घेऊनच २०१७मध्ये सिक्कीममधील सीमेवरच्या डोकलाम भागातील ७३ दिवसांच्या तणावपूर्ण परिस्थितीतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वूहान परिषदेत पुढाकार घेऊन हे संबंध स्थिर करण्याचा प्रयत्न केला.

एक देश म्हणून आपण अशा छोट्या-मोठ्या चकमकींना चीनसोबत धोरणात्मक व्यवहारा करताना मध्ये आणत नाही ही बाब सयुक्तिक असली, तरीही अटीतटीच्यावेळी सीमेवरील समस्या लष्करी सामर्थ्याच्या आणि रणनीतीच्या जोरावर कुशलपणे हाताळणे हा हाच प्राधान्यक्रम असायला हवा. त्यादृष्टीने आपल्या सैन्याची प्रतिकारक्षमता विरोधी राष्ट्रांना तोडीस तोड अशी वाढवणे, व देशाचे नागरिक आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणारे आपले प्रवक्ते व राजनीतिज्ञ यांनाही चीनच्या खोडसाळपणाला खणखणीत प्रत्युत्तर देण्याच्या आपल्या क्षमतेची जाणीव करून देणे हे देखील सैन्याचे काम आहे.

लष्करप्रमुख एम. एम. नरवणे यांनी दोन लक्षणीय मुद्दे आपल्या वक्तव्यांतून मांडले. पहिला मुद्दा दोन्ही सैन्यातील लढाईशी संबंधित आहे. नुकत्याच झालेल्या चकमकींमागे दोन्ही ‘सैन्यांचा आक्रमक पवित्रा’ कारणीभूत असून त्यामुळे भारतीय बाजुलाही अनेक सैनिक जखमी झाले हा त्यांनी मांडलेला पहिला मुद्दा. या चकमकींवर भाष्य करताना त्यांनी मांडलेला दुसरा मुद्दा असा की, भारत आणि चीन दरम्यानच्या या चकमकींचा ‘कोणत्याही जागतिक किंवा स्थानिक घडामोडींशी काहीही संबंध नाही.’

भारतीय लष्करप्रमुखांनी पत्करलेलं हे बचावात्मक विधान अनेक अर्थानी लक्षणीय आहे. एकतर यावरून असा अर्थ निघतो की, प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवर चीनचे जे आक्रमक धोरण आहे, त्याबद्दल आपण त्यांना काहीच दोष दिलेला नाही. ‘दोन्ही बाजूंची आक्रमकता’ असा लष्करप्रमुखांनी केलेल्या उल्लेखातून ‘या तणावाच्या निर्मितीमागे आपले सैनिकही जबाबदार आहेत’, असा अर्थ काढायची संधी नकळत दिल्याची शक्यता निर्माण होते. समजा, यात तथ्य असले तरी, भारतीय लष्कराच्याप्रमुखांनी असे शब्द जाहीर वक्तव्यात वापरणे गरजेचे होते काय?

यात महत्त्वाची विचार करण्यासारखी बाब ही की, आपल्याला चीनच्या बाजूने/चीनला नकळत फायदा होईल अशी विधाने करायची इतकी खुमखुमी का असते? खुद्द लष्करप्रमुखच जेव्हा नकळत का होईना, पण खुद्द लष्करप्रमुखच जेव्हा, ‘या लढाईचे जागतिक घडामोडींशी काही देणेघेणे नाही’ असे सुचवतात, तेव्हा भारतीय लष्करप्रमुखांना ‘चीनच्या आक्रमक धोरणांबद्दल नक्की माहिती आहे नं?’ असा प्रश्न उपस्थित करावा लागतो. दक्षिण-चीनी समुद्र ते तैवान व जपानपर्यंत गेल्या दोन महिन्यात चीनने ज्या काही आक्रमक लष्करी हालचाली केल्या त्या जागतिक स्तरावरील चिंतेचा विषय ठरल्या आहेत. अशावेळी भारतीय लष्करप्रमुखांना ‘भारत-चीन सीमेवर जो काही संघर्ष झाला त्याचा चीनच्या या वाढत्या लष्करी पावित्र्याशी काहीही संबंध नाही’ अशी खात्री वाटणे आश्चर्यकारक आहे. कदाचित भारत-चीन सीमेवर जो काही संघर्ष उद्भवला आहे, त्यामागे काही वेगळी कारणे असू शकतीलही. पण चीनच्या कुरापतखोरीला आपल्या लष्कराने दिलेल्या प्रत्युत्तराविषयी आपल्याच नागरिकांना स्पष्टीकरण देत बसणे हे काम भारतीय लष्करप्रमुखांचे खचितच नाही.

या चकमकींविषयीची चीनची प्रतिक्रिया फार बोलकी आहे. चीनने म्हटले आहे, “कोणतेही आक्रमक पाउल उचलण्यापासून भारताने स्वतःला परावृत्त करावे.” चीनच्या या सुस्पष्ट वक्तव्यातून योग्य तो अर्थ सर्वांना लावता येऊ शकतो. मात्र तरीही, आम्ही मात्र भारताच्या जनतेसमोर आपल्या सैनिकांना काहीसा दोष लावत, नकळत चीनच्या कृत्यांचेच समर्थन करण्याचा प्रयत्न करतो! अर्थात, आपण लष्करप्रमुखांच्या या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला असेही कुणी म्हणू शकेल. या वक्तव्याचे थोडे अधिक समर्थनात्मक मूल्यमापन करायचेच झाल्यास, ‘या चकमकींचा जागतिक किंवा स्थानिक घडामोडींशी काहीही संबंध नाही’ या विधानातून , कदाचित हे विधान कोव्हीड-१९ ची महामारी आणि त्यासंबंधाने जागतिक स्तरावर जी परिस्थिती निर्माण झाली आहे, तिच्याकडे निर्देश होतो असे कुणी म्हणेल. पण असे असेल तर, लष्करप्रमुखांच्या तोंडून गेलेलं हे विधान अतिशय चुकीच्या वाक्यरचनेचा नमुना म्हणावे लागेल, कारण त्या वाक्यातून जणू भारतीय लष्कर बेजबाबदारच आहे असा अर्थ ध्वनित होतो. इथेच खरी मेख आहे. कारण, जर चीन बेजबाबदार कुरापतखोर धोरण अवलंबत भारतीय लष्करालाच बेजबाबदार ठरवू पाहात असेल, तर भारतीय सैन्यप्रमुखांकडून येणारी अशी विधाने त्यांच्या पथ्यावरच पडू शकतात.

म्हणूनच, भारतीय लष्करप्रमुखांच्या वक्तव्यातील वाक्यांची-शब्दांची योजना बेजबाबदार असून त्याकडे गंभीरपणे लक्ष द्यायची गरज आहे. त्यापदावरील माणसाच्या वक्तव्यातून आपल्यासमोर सर्वात मोठ्या सामरिक आव्हान उभे करणाऱ्या चीनला सामोरे जाण्याचा भारताचा दृढ निर्धार व्यक्त व्हायला. अर्थात, आपल्या विद्यमान लष्करप्रमुखांची गौरवशाली कारकीर्द पाहाता त्यांच्याकडून भारताला खूप अपेक्षा आहेत व त्या रास्तच आहेत यात शंका नाही.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.