Author : Sunjoy Joshi

Published on Aug 31, 2019 Commentaries 6 Hours ago

इंटरनेट हा या जगाचा आरासा आहे. जे सुरू आहे त्याचेच ते प्रतिबिंब दाखवते. म्हणूनच हा द्वेष पसरवणाऱ्यांना रोखायला हवे. माध्यमांना नाही.

सोशल मीडिया दाबून द्वेष कसा संपेल?

भारताने अत्यंत कुशलतेने कलम ३७० हटवले आणि त्यानंतर अशा अफवांचे पीक आले की, देशभरातल्या उत्पादन क्षेत्रात केवळ काश्मीरमध्ये नुसती दुहेरीच नाही तर तिहीरी आकडी विकास साधण्याची मोठी क्षमता आहे. प्रत्येकजण काश्मीरच्या विकासाबद्दल त्यांना काय वाटते, हे सांगण्यात कुठेही कमी पडताना दिसत नाही. इतकेच नाही तर द्वेषाच्या लढाईत आता समाजमाध्यमांचे (सोशल मीडियाचे) व्यासपीठ एक नवी युद्धभूमी म्हणूनच आकाराला येऊ लागले आहे. हा ट्रेण्ड जागतिक पातळीवर सर्वत्रच सारखाच असल्याचे दिसतो आहे.

अमेरिकेतील अल पासो येथे झालेल्या गोळीबारानंतर अखेर, ऑनलाईन माध्यमांतून पसरत असलेल्या द्वेषाने किती टोक गाठले आहे, या वास्तवाचे काहीसे भान ट्रम्प प्रशासनाला आले. या घटनेनंतर आठवडाभरातच व्हाईट हाऊसने एका तातडीच्या बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत गुगल, फेसबुक, आणि ट्विटरसारख्या समाजमाध्यमांवर अशी काही प्रक्रिया अवलंबली जावू शकते का, की ज्यातून यापुढे कोण गोळीबार करणार आहे हे ओळखता येऊ शकेल, आणि मोठ्या हल्ल्याचा अंदाजही बांधता येऊ शकेल. यातून एवढेच दिसते की, अशा सरकारांच्या मनातली भिती जितकी भाभडी आहे, तिकाच त्यांचा तंत्रज्ञानावरचा विश्वासही भाभडा आहे.

समाजमाध्यमांसारख्या व्यासपीठांवर कठोर टीका करणे किंवा त्यांना दोष देणे आणि या माध्यमांवर टाकल्या जाणाऱ्या आशयाच्या अधिकाधिक नियमनाची मागणी करणे हे तसे फारच सोपे आहे. मात्र समाजमाध्यमांवरून द्वेष पसरवण्याचा सुरु असलेल्या उद्योगाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आणि त्याच्या परिणांमांची व्याप्ती समजून घेणे ही आजची खरी गरज आहे.

ख्राईस्टचर्चवर झालेल्या हल्ल्यानंतर केलेल्या कृतीप्रमाणेच अल पासो इथला हल्ला झाल्यानंतर चिंतातूर झालेल्या प्रशासनाने एट चॅन (8chan), रेड्डीट (Reddit) यांसारख्या मॅसेंजिगच्या सेवांवर कारवाईचा निर्णय घेतला. अल पासो इथल्या हल्ल्यानंतर एट चॅनवर प्रत्यक्ष कारवाई झाल्याचे पाहायला मिळाले. एट चॅनला सायबर हल्ल्यापासून सुरक्षा पुरवणाऱ्या क्लाऊडफेअर (Cloudfare) या सिलिकॉन व्हिलीतल्या कंपनीने त्यांच्यासोबतचे संबंध संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतल्यामुळेच ही कारवाई शक्य झाली.

मात्र राजकारण्यांची माध्यमांविरोधातली बाष्कळ आणि निर्थक बडबड, वक्तव्ये खऱ्या विषयापासून भरकटवत आहेत. खरे तर एखाद्या विशिष्ट माध्यमाचे व्यासपीठ किंवा मॅसेंजिग सेवा पुरठादाराचाच तसा फारसा संबंध उरलेला नाही. याचे साधे कारण असे की, ही समस्या त्या व्यासपीठाशी नाही तर त्या ही पलिकडच्या घडामोडींशी निगडीत आहे. खरे कारण हे आपल्या आसपासच्या अशा सामाजिक परिस्थितीत दडले आहे, जिथे द्वेष पसरवणाऱ्या भाषणांच्या माध्यातून समाजात फूट पाडली जाते, आणि त्यानंतरच दहशवादी हल्ले रचले जातात.

नवे जग हे फेक न्यूजचे म्हणजे खोट्या बातम्यांचे साहसी युग आहे का?

ऑनलाईन माध्यमातून पसरणारे एखादे खोटे वृत्त वा बातमी असो किंवा वाढती बंडखोर विचारसरणी असो, ही बाब आपण आपल्याला दैनंदिन जगण्यात येणाऱ्या अनुभवांतून नक्कीच समजून घेऊ शकतो.

२१ जुलै २०१९ रोजी संपूर्ण जग नील आर्मस्ट्राँगने चंद्रावर पहिले पाऊल ठेवण्याच्या घटनेचा ५० वा स्मृतिदिन साजरा करत होते. तर त्याचवेळी इंग्लंडमधल्या चेस्टर इथे, स्वतःला चेस्टर फ्लॅट अर्थर्स असे म्हणवून घेणारा एक गट, माणसाने चंद्रावर पाऊल ठेवल्याची घटना म्हणजे एकप्रकारची लबाडी आहे, अशा प्रकारचा आशय असलेली पत्रके वाटण्यात व्यस्त होता.

आपण इंटरनेटवर शोध घेतला तर स्वतःला ‘फ्लॅट अर्थर्स’ म्हणवून घेणाऱ्यांचा समुदाय कसा फोफावतो आहे ते दिसून येईल. त्यांची स्वतःची संकेतस्थळे आणि ब्लॉग्ज आहेत. फेसबुकसारख्या माध्यमांवर त्यांचे समुदाय दिवसेंदिवस वाढतच आहेत.

‘लाईव्ह सायन्स’ने मागच्या वर्षी प्रसिद्ध केलेल्या एका अहवालानुसार, पृथ्वी गोल आहे, या विधानावर विश्वास असणाऱ्या १८ ते २४ वयोगटातल्यांचे प्रमाण केवळ ६६ इतकेच होते. अर्थात उरलेल्या इतरांना पृथ्वी सपाट आहे हे पटलेच असेल असे नाही, मात्र शंभरापैकी ४० हून अधिक जणांना असा विरोधी दावा करण्याऱ्यांकडेही पुरावे असतील असे वाटत होते. याचाच अर्थ असा की, फ्लॅट अर्थर्स विचारसरणी असलेल्यांकडे त्यांच्या विचारांना खतपणा घालणारी जी काही भूपृष्ठीय माहिती आहे, ती निश्चितच शुल्लक समजता येण्यासारखी नाही.

महत्वाचे म्हणजे फ्लॅट अर्थर्स ही विचारसरणी किंवा जमात हे समाजमाध्यमांचे अपत्य नाहीच. उलट ही विचारसरणी आधापासूनच अस्तित्वात होती. गॅलेलिओला जेव्हा इतरांनी बंडखोर ठरवले होते, त्यांनंतर त्याला आरोपी ठरवणारे कॅथलिक चर्चच होते. फरक इतकाच आहे की आजच्या विकसित तंत्रज्ञानाने, सामाजिक समुहांना मर्यादामुक्त किंवा सीमामुक्त केले आहे. त्यामुळे कोणत्याही सीमेवर असलेला एखादा गट त्याचा स्वतःचा ‘फ्लॅट अर्थर्स’ समर्थक जागतिक समुदाय निर्माण करू शकतो. यात ते कुणाचेही लक्ष वेधण्यात यशस्वी झाले, तर त्यातूनच ते त्यांच्या संभाव्य सदस्याची किंवा समर्थकाची निवड करू शकतात.

याच अनुषंगाने पाहिले तर असे दिसते की, दहशतवादाच्या विचारसरणीतदेखील एखाद्याला आपल्याकडे आकृष्ट करण्याची, आपल्याकडे लक्ष वेधून घेण्याचीच प्रवृत्तीचाच दिसून येते. खरे तर हे एखादे नाटकच आहे. त्यासाठीचे व्यासपीठ महत्वाचे असते. अशावेळी कोणतीही सार्वजनिक जागा तशी फायद्याची ठरत असते. इथे पिडीत हा तसा दोन भूमिकेत वावरू लागतो. तो या नाकटकातले एक पात्रही असतो आणि पाशवी अनुभवांमध्ये तल्लीन झालेला श्रोताही असतो. त्यांच्यात मरणारेही असतात आणि दहशतीच्या कथा सांगण्यासाठी जिवंत राहणारेही असतात.

११ सप्टेंबरच्याच म्हणजे ९/११ च्या हल्ल्यानंतर सरकारपुरस्कृत कारवाईमध्ये मोठ्या प्रमाणात विकसित तंत्रज्ञानाचा वापर होऊ लागला. त्याचवेळी दहशतवाद्यांनीही धक्का देत दरारा निर्माण करण्याचे तंत्र आत्मसात केले. एका अर्थाने दोघांनीही एकमेकांपासून मोठेच धडे घेतले. छोट्या पडद्यावरच्या एखाद्या रॉक संगिताच्या कार्यक्रमासाठी, जिथे सर्वात मोठा प्रक्षेकवर्ग आकर्षित करायचा असतो, त्यासाठी ज्याप्रमाणे शिस्तबद्ध आणि आकारबद्ध असावे लागते, तसेच हे दोघेही झाले आहेत असे निश्चित म्हणता येईल.

ऑनलाईन जगतातल्या द्वेष संस्कृतीचे पाईक असलेल्यांना आपल्याकडे वळवण्यासाठी त्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी ख्राईस्टचर्च हल्ल्यातल्या हल्लेखोराने, त्या हल्ल्याचा कट रचला होता. त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात हॅशटॅगचा वापर केला, आणि ब्रेनटन टॅरेंटचे संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न केला.

लोकांनी आपली धोरणे स्वीकारावीत किंवा त्याप्रमाणे त्यांनी वागावे, यासाठी अल पासोतल्या पॅट्रिक क्रुसिअस आणि टॅरेंट या दोघांनीही ‘एट चॅन’ या मॅसेंजिग सेवेवर आपला संपर्कही दिला होता. टॅरेंट त्याच्या फेसबूक खात्यावरून तसेच त्याने त्याच्या धोरणे ज्या मॅसेंजिग सेवेवर पोस्ट केली होती तिथे त्याचा कार्यक्रम थेट दाखवत होता.

यानंतर मात्र अर्ध्या तासातच त्याने फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून त्याच्या भीषण रुपाचे दर्शन द्यायला सुरुवात केली. इथे नोंद घेण्यासारखी महत्वाची बाब अशी की, जे कोणी सगळे अशा समाजमाध्यमांवर गुन्हा होण्यापूर्वीच तो पकडण्यासाठीच्या तंत्रज्ञानाच्या वापराची भलामण करत आहेत, त्यांनी हे फेसबुक लाईव्ह बंद पाडण्यापूर्वी, ते सुमारे १७ मिनिटांपर्यंत सुरुच होते.

आणि असेही नाही की हे फेसबूक लाईव्ह बंद पाडल्यामुळे त्याचा प्रचार प्रसार व्हायचा थांबला. उलट, युट्युब, ट्विटर, रेड्डीट अशा माध्यमांतून हा फेसबुक लाईव्हचा व्हिडिओ पसरतच राहिला. हल्ल्यानंतरच्या पहिल्या २४ तासांमध्येच फेसबुकने या हल्ल्याचे सुनारे १.५ दशलक्ष व्हिडिओ डिलीट केले होते. मात्र तरीही या संदेश देवाणघेवाणीच्या इतर व्यासपीठांवर टाकलेल्या या व्हिडिओच्या प्रति सातत्याने येतच राहिल्या. केवळ टी.आर.पी.चीच भूक असलेल्या मुख्य वृत्त वाहिन्यांनी या व्हिडिओचे छोटे छोटे तुकडे बरोबर हेरले आणि आपल्या माध्यमातून ते जगभरात प्रसारीत केले.

द्वेष पसरवणारी भाषणे किंवा वक्तव्ये आणि दहशदवादाला परस्परांपासून वेगळे करून का पाहता येणार नाही. स्थलांतरणाविषयी तसंच लोकसंख्यावाढीच्या मंदावलेल्या वेगाविषयी (sub replacement fertility)” चा मोठा रोष दिसतो. “ही स्थिती किंवा हा प्रकार म्हणजे युरोपीय नागरिकांवरचा हल्ला आहे” असे मत या जाहीरनाम्यात दिसते. टॅरेंटला त्याने ज्याप्रमाणे हल्ला केला, अगदी तसेच हल्ले इतरांनी स्थलांतरितांवर करत राहावेत अशीच टॅरेंटची इच्छा होती.

या हल्ल्याच्या १९ मिनिटेआधी पॅट्रिक क्रुसिअसने २३०० शब्दांचा त्याचा जाहीरनामा पोस्ट केला होता, तसेच स्थलांतरितांविरोधातली त्याची तक्रारही मांडली होती. जर आपण यातल्या काहीएक लोकांपासून आपली सुटका करून घेऊ शकलो तरच आपला शाश्वत जगण्याचा मार्ग काहीएक प्रमाणात प्रशस्त होऊ शकेल. इथे स्पष्ट दिसते की, त्याच्या भरकटलेल्या मनात अशा प्रकारचे द्वंद सुरु होते, ज्यात शाश्वत जगण्याची संकल्पना ही देशात स्थलांतरितांचीच संख्या अधिकाधिक वाढत जाईल या माल्थुस सिद्धांताशी जोडली गेली होती.

जगभरातले बंडखोर ज्यांचा प्रत्यक्षात काही कृतीशील करण्याशी दुरान्वयेही संबंध नसतो, जे कोणतेही काम करत नाहीत, कोणतीही सर्जनशिलता दाखवत नाहीत, केवळ शब्दछल करत राहतात त्या सगळ्याशी या जाहीरनाम्यात साम्य दिसते हीच वस्तुस्थिती आहे. असे दिसते की या जाहीरनाम्यातल्या शब्द ते उताऱ्यांपर्यंत अगदी सगळे काही, जे मुख्य माध्यमांवर म्हणजे वृत्तवाहिन्यांवर दाखवले जाते, ते जसेच्या तसे उचलले आहे. आणि मग ते तसेच आपल्या आसपासच्या, आपल्या विचारांशी साधर्म्य साधणाऱ्या गटांपर्यंत पोहोचवले आहे.

ख्राईस्टचर्च हल्ल्याची घटना आणि घटनाक्रमाचा विचार केला तर असे ठळकपणे दिसते की, केवळ जाहीरनाम्यामागचे स्त्रोतच नाहीत, तर कट्टर मतप्रवाहामागची प्रेरणादेखील कुठूतरी उचललेलीच आहे. कट्टर उजव्या विचारसरणीचे राजकारणी आणि सिनेटचे सदस्य यांनी असे म्हटले होते की, “न्यूझीलंडने त्यांच्या स्थलांतरीतांबद्दलच्या धोरणांतर्गत मुस्लीम कट्टरवाद्यांना देशात स्थलांतरीत होण्याची परवानगी दिली, त्यामुळेच न्यूझीलंडच्या रस्त्यावर आज रक्तपाताची घटना घडली आहे.” खरे तर २०१७ पासून अमेरिकेत हिस्पानिक म्हणजेच लॅटिन अमेरिकन नागिरांविरुद्ध, राजकीय नेते बेताल आणि जहाल वक्तवे करत असल्याचे प्रमाणही वाढलेले आहे. आणि त्याचाही हेट स्पीचेस म्हणजे द्वेष पसरवणाऱ्या भाषणे आणि वक्तव्यांमध्ये समावेश व्हायला हवा.

आता याच अनुषंगाने भारतातल्या परिस्थितीचा विचार केला, तर या यादीत हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर खट्टर यांच्या एका वक्तव्यानंतर ट्विटरवर माजलेला गहजबही या यादीत जोडण्यासारखा आहे. कलम ३७० हटवण्याचा निर्णय आणि संबंधित सर्व घडामोडींचे समर्थन करणाऱ्या, अशी कृती म्हणजे काश्मीरींना दिलेली योग्य शिक्षा किंवा बहुतमाच्या जोरावर घेतलेला बदल असे मत असणाऱ्या खट्टर यांचे विधान गंभीर आहे. त्यांनी म्हटले होते की, “आता काश्मीरसाठीचा मार्ग मोकळा झाला असून, आता आपण काश्मीरी मुलीही आपल्याकडे आणू शकतो”. त्यांचे हे वक्तव्य कोणत्याही संदर्भाने केले असले तरी, या वक्तव्यानंतर ऑनलाईन जगतात आणि समाजमाध्यमांमध्ये विजयी उन्मादाच्या भावनेने लोकांच्या आलेल्या प्रचंड प्रतिक्रिया गांभीर्याने विचारात घेण्यासारख्या होत्या. या प्रतिक्रिया कलम ३७० हटवण्यामाच्या उद्देशाबाबत भारताचे पंतप्रधान आणि गृहमंत्री यांनी दिलेल्या स्पष्टीकरणाच्या अगदी उलट आणि विरोधाभासीच होत्या. कारण कलम ३७० बाबत घेतलेली निर्णयात्मक कृती म्हणजे भारताची एकात्मता कायम ठेवत काश्मीरला भारताच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न असल्याचे या दोघांनीही म्हटले होते.

थोडक्यात हा सर्व प्रकार म्हणजे, जसे ट्रम्प यांनी अल पासोच्या हल्लेखारांचा निषेध करणारं निवेदन केले असले, तरीही त्यांनी ट्विटरवरच्या आपल्या संदेशांमधून जो द्वेष पसरवला आहे त्याचे निराकरण करता येणार नाही, अगदी त्यातलाच हा प्रकार आहे. कारण कलम ३७० हटवणे म्हणजे बहुसंख्यकांनी घेतलेला बदला आहे हा दिसून येणारा समज खोटा ठरवण्याची संपूर्ण जबाबदारी खरे तर केवळ आणि केवश केंद्र सरकारचीच आहे. त्याचप्रमाणे केवळ तंत्रज्ञानातल्या दिग्गजांसोबत व्हाईट हाऊसमध्ये प्रार्थना केल्याने काहीच फरक पडणार नाही. कारण केवळ ऑनलाईन व्यासपीठे ही मूळ समस्या नाहीच.

जर अशातऱ्हेने ऑनलाईन व्यासपीठाबाबतची उपाययोजना करून द्वेष पसरवणाऱ्या वक्तव्ये आणि भाषणांविरोधात खरा लढा द्यायचा असेल तर त्यासाठी, या सगळ्या व्यासपीठांना सर्वात आधी जगभरातल्या अनेक महत्वाच्या राजकीय व्यक्तींवर रोख धरून कारवाई करायला सुरुवात करावी लागेल. त्यांना अनेक राज्यांच्या, संसदीय व्यवस्थांच्या प्रमुखांना “दहशतवाद संशयीत” (terrorism watch list) म्हणून देखरेखीखाली आणावे लागेल, अशा व्यक्तिंच्या पोस्ट काढून टाकाव्या लागतील, त्यांचा जनसमुदायासोबत होणारा संवाद थांबवावा लागेल. स्पष्टच बोलायचे झाले तर हे असे काही करणे कोणत्याही ऑललाईन व्यासापीठाला शक्यच होणारे नाही.

द्वेष व्यक्त करणारी भाषणे आणि वक्तव्ये सामाजिक वातावरण गढूळ करतात, ते दहशतवादाला खतपाणी मिळेल अशी स्थिती निर्माण करतात. जसे की फ्लॅट अर्थर्स विचारसरणीचा समुदायाने आपली कट्टर विचारसरणी केवळ ऑनलाईन पटलावरच नाही तर आपल्या संसदीय व्यवस्थांमध्ये तसेच घराघरापर्यंतही पोहोचवली आहे. या सगळ्यांचे अस्तित्व नाही असे म्हणत त्याकडे डोळेझाक करण्यापेक्षा, या सगळ्याशी सामना करण्याची खरी जबाबदारी, ही आपण निवडून दिलेल्या सरकारची आहे.

नव राष्ट्रवाद

आपल्या हातातल्या तंत्रज्ञानात एखाद्या गोष्टीचा प्रचार प्रसार आणि प्रसारण करण्याची किती अफाट क्षमता आहे, खरे तर याची आपल्याला कल्पनाही नाही, एका अर्थाने ते आपल्या आकलनापलिकडेचेच आहे. खरे तर आपण कोणतीही खात्रीशीर नसलेली माहिती एकदाच ऑनलाईन टाकून सार्वजनिक करतो, पण ती असंख्य आवृत्या होऊन जगभर पसरत असते.

महत्वाचे म्हणजे या तंत्रज्ञानाला गुप्ततेसारख्या मोठ्या ताकदीचीही जोड मिळालेली आहे. ज्याप्रणाने एखादा विदुषक म्हणतो की, “अंधाऱ्या रात्रीत एखाद्या माणसाला मुखवटा द्या, मग तो मुखवटा चढवला की तो स्वतःच्या खऱ्या व्यक्तिमत्वाचे दर्शन घडवतो.” गुप्ततेसारखे शस्त्र लाभल्यामुळेच, गुप्ततेच्या आड राहून ट्रोलधाडांची उंदरांची टोळी त्यांच्यातल्या पायड पायपरचेच (खोटी वचने देणारे एक पात्र) दर्शन देत वावरत असते. एखाद्या आदिम जमातीप्रमाणे ते एकसंध असल्याचे दाखवतात, त्यांच्या खोटेपणाला उघड करणाऱ्या एकेक गोष्टी निवडून ते त्यामागे हाथ धूवून लागतात. ते जणू काही त्यांच्यापैकी सर्वात मजेशीर, वाईट किंवा मूर्ख कोण आहे हे सिद्ध करण्यासाठी एखाद्या महान योद्ध्याचा आव आणत लढत असतात. खरे तर आपल्याला असे वाटू लागते की आपण अशा जगात आहोत जिथे जमातवाद उखडून टाकण्याऐवजी त्याला खतपाणी घातले जात आहे. एका अर्थाने या अशा प्रकारच्या विविधतेत आपल्यातले वेगळेपण एकटे असल्यासारखे उठून दिसू लागते.

जगभरात सध्या राष्ट्रवाद म्हणून जी संकल्पना पुढे येत आहे ती खरे तर राष्ट्रवाद नाहीच. त्याउलट राष्ट्रवादाच्या बुरख्याआड जमातवादच शिरकाव करत आहे. हे दोन्ही विचार एखादा खडू आणि चीजमध्ये जितका फरक आहे, तितकेच परस्परांपासून भिन्न आहेत. खरे तर राष्ट्रवादाची संकल्पना ही राज्यघटनेने मांडलेले नियम, मूल्य आणि विचारांनी निर्माण झालेली आहे. म्हणजेच संस्था, यंत्रणा कायद्याच्या माध्यमातून समाजिक एकात्मता टिकवून ठेवण्याचा विचार राष्ट्र या संकल्पनेभोवती गुंफलेला आहे.

जमातवादात मात्र कशाचेही देणेघेणे नाही. तो फक्त निष्ठेच्या संकल्पनेशी जोडलेला आहे. या जमातवादचे सध्या दिसणारे जे स्वरुप आहे, त्यात राष्ट्र हे एका विशिष्ट समुहाचे, जमातेचे किंवा एका अशा व्यक्तीचे जी राष्ट्र आणि  इतरांपेक्षाही मोठी असल्यासारखी म्हणून उदयाला आली आहे,  त्यांचेच राष्ट्र ही विचार रुजलेला आहे. इथे राष्ट्र म्हणून जे काही व्यवस्था किंवा संघटनात्क रचना आहे त्याप्रती आपली निष्ठा दाखण्याऐवजी एखाद्या विशिष्ट समुदायाप्रती आपली निष्ठा दाखवावी अशी अपेक्षा केली जाते. अशाप्रकारच्या निष्ठेसाठी प्रसंगी आजवर ज्या संस्थात्मक, संघटनात्मक, मूल्यात्मक आणि घटनात्मक संरचनेने हे राष्ट्र घडवले आहे, ती संपूर्ण रचना मोडकळीला आणावी लागली तरी चालेल अशीच धारणा असते.

अशा प्रकारच्या जहाल बंडखोर विचारसरणींवर कसे नियंत्रण मिळवले जाऊ शकते हा खरा प्रश्न आहे. मात्र त्यासाठी अशा एखाद्या व्यक्तीने ऑनलाईन माध्यमांमध्ये काय काय शोधले, पाहिले, काय पोस्ट केले याचा आधार घेऊन, ते पडकले जातील अशा रितीने त्यांच्या नकळत त्यांना एखाद्या संकेतस्थळावर वळवणे यांसारख्या छोट्या उपाययोजना मात्र इथे फारशा कामी येणार नाहीत. मूळात अशा प्रकारची उपाययोजना फ्लॅट अर्थर्स विचारसरणीच्या व्यक्तिंबाबतही कामी आलेली नव्हती. तेव्हा ती जिहादींसारख्या कट्टरवाद्यांबाबत कशी काय उपयोगाची ठरू शकते हे ही आपण समजून घ्यायला पाहिजे.

त्यामुळेच जर एकाचवेळी जहाल बंडखोरवादी विचारसरणी आणि द्वेष परवणारी भाषणे आणि वक्तव्यांशी लढा द्यायचा असेल तर त्यासाठी आधी, कोण कसे व्यक्त झाल्याने पडणाऱ्या प्रभावाची क्षमता समजून घेणे, हे सर्वात महत्वाचे आहे.

या सगळ्यांना एकत्र बांधून ठेवणारी गोष्ट

इथे तंत्रज्ञानाच्या वापरावरून भांडत बसण्याऐवजी, अशा विचारसरणींच्या व्यक्तींनी, आपण बहिष्कृत असल्यासारखे झालो आहोत हा विचार इतर व्यक्ती आणि गटांमध्ये भिनला जावा यासाठी करण्यासाठी कोणकोणत्या संज्ञांचा, साधनांचा खूबीने वापर केला आहे. (विशेषतः द्वेष पसरवण्यारी वक्तवे आणि भाषणे यांबाबत), आणि त्यानंतर त्यांनी एखाद्याच्या मनातल्या हिंसेला चालना देण्याच्या बाबतीत (दहशतवादाबाबत) काय आणि कशाप्रकारची प्रगती साधली आहे हे आपण समजून घ्यायला पाहिजे. महत्वाचे म्हणजे फेसबुक आणि ट्विटरसारखी समाजमाध्यमे अस्तित्वात येण्यापूर्वीही अशा तऱ्हेची साधने उपलब्ध होती हे लक्षात घेतले. तर जेव्हापासून मानवजात अस्तित्वात आहेत, तेव्हापासूनच द्वेष पसरवण्यासाठी वापरली जाणारी साधनेही अस्तित्वात आहेत हे समजून घ्यायला हवे.

अशा साधनांमध्ये एखाद्यावर विशिष्ट अर्थ किंवा विचारसरणीचा शिक्का मारणे, सर्व मार्ग बंद झाले आहेत असे भासवणे, आणि  स्वतःला आपल्या समुदायाने मांडलेल्या विचारांच्या तटबंदीतच अडकवून ठेवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साधनांचा समावेश आहे. कारण त्यामुळे नंतर त्यांना त्यांच्या धर्म, समुदाय किंवा राष्ट्राने सांगितल्या प्रमाणे, दुसऱ्या बाजुच्या व्यक्ती किंवा समुह शत्रू आहेत असे सहजरित्या ठरवता येते.

इथे आपला विचार इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरले जाणारे तंत्रज्ञान समजून घ्यायला तसे फारसे कठीण नाही. खरे तर कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीला योजनाबद्ध किंवा संघटीत हिंसाचाराचे लक्ष बनवणे तसे नेहमीच सोपे असते. आपल्या समुदायातल्या एखाद्या क्रूर वाटू शकणाऱ्या व्यक्तीला शोधा. आपल्या सर्व समस्यांना कारण एखादी विशिष्ट व्यक्ती किंवा समुहच कारण आहे असे म्हणत राहा. ज्याला लक्ष करायचे आहे त्या व्यक्तीशी अमानवीय व्यवहार करा, म्हणजे त्या व्यक्तीसोबतच्या वागण्यातून नियम, मुल्ये, नितिमत्ता अशी सगळी तत्वे आपोआपच बाद होऊन जातात. आणि यानंतर त्या व्यक्तीला एखाद्या वधस्तंभाला बांधल्यासारखे जाळून टाका. अशा तऱ्हेच्या हिंसा आणि क्रुरतेला आपोआपच मान्यताही मिळते. आता अशावेळी जर का एखादी एकाकी पडलेली व्यक्ती अशा हिंसेच्या घटनेत बळी पडली तर त्याला, एखाद्या मोठ्या उद्देशासाठी झालेले “अनुषंगिक नुकसान” असे म्हणा.

याबाबतीत क्रेसवेल आणि हायकेल असे म्हणतात, की जिहाद किंवा गोऱ्यांच्या वर्चस्ववादाशी लढा देणे तसे सोपे नाही. त्यांसे आवाहन सामर्थ्य आणि सहनशीलता समजून घेणे अवघड आहे. तसेच त्यामुळे दीर्घकालीन सामाजिक-सांस्कृतिक परिघात, सभोवतालची सामाजिक स्थितीत कशा प्रकारचे मोठे बदल होणार आहेत, हेही कळणे मुश्किल आहे. कोणतेही म्हणणे किंवा विचार एखाद्याला आकर्षित करून वश करण्याच्यादृष्टीने खऱ्याचा आभास निर्माण करणारे किंवा तर्कसुसंगत अशा कथा रचल्या जातात. त्यातून ते विचार किंवा म्हणणे अधिक भिनते. खरे तर ही एक अशाप्रकारची सांस्कृतिक सामाजिक स्थिती असते, की ज्यामुळे हिंसक चळवळींचे भरण पोषण होते तसेच अशा हिंसक चळवळींची दिशाही ठरते.

अँड्र्यु ग्लॅझार्डने म्हटल्याप्रमाणे कट्टरवादी संघटनांकडे उपलब्ध असलेली सांस्कृतिक साधनसामग्रीच त्यांना एकत्र बांधून ठेवत असते. खरे तर या चळवळी टिकण्यासाठी आर्थिक सहकार्य किंवा शस्त्रसाठ्यापेक्षाही अशाप्रकारचा सांस्कृतिक संदर्भच अधिक महत्वाचा ठरत असतो. जिहादींचे विचार मूळ धरतात कारण ते आपल्या सदस्यांना हे जग, त्यांचे जगणे आणि त्यांचे वंचित असणे यासंदर्भातली अर्थपूर्ण वाटू शकतील अशी उत्तरे आणि स्पष्टीकरणे देतात. जिहादी आपल्या विचारांतून त्यांच्या सदस्यांच्या जाणिवांमध्ये खोलवर रुतलेली भिती आणि एक समूह म्हणून आपण अपूरे असल्याची भावना अधिक बळकट करतात.

महत्वाचे म्हणजे इतर सर्वच विचारधारांप्रमाणेच जिहादी आणि श्वेतवर्णीय वर्चस्वाचे समर्थन करण्यांच्या विचारधारेतही अविश्वास दाखवला जावू नये हीच अपेक्षा असते. अशा विचारधारांचे पाईक असलेल्या अनुयायांनी आपण हे केले पाहिजे किंवा नाही, याबाबत अशा काही नियमांच्या मर्यादेत स्वतःला इतक्या भाबडेपणाने अडकवून ठेवतात. खरे तर ही संपूर्ण स्थिती समजून घेणे हे त्या विचारधारेपलिकडच्या व्यक्तीला फारच कठीण जात असते. आता अशा स्थितीत फ्लॅट अर्थर्स समुदायाचे सदस्य, जे इतर वेळी खूपच तर्कशुद्ध आणि नितिमत्तेनेने वागणारे आहेत असे वाटते, त्यांचे आकलन आणि विचार करण्याची क्षमता ही खरे तर बायबलसारख्या धर्मशास्त्राच्या तर्कांतच बंदिस्त झालेली असते किंवा त्यांच्या इशाऱ्यावरच चालत असते.

तर अशावेळी जर का दहशतवादाशी संबंधित मजकूर किंवा व्हिडीओच्या प्रसारावर मर्यादा आणली जाऊ शकते असे गृहीत धरून, आपल्या बाजुनेच मॅसेज पाठवण्यासारखी उपाययोजना केली, तसेच आणि तथ्ये तपासणाऱ्या व्यक्ती किंवा यंत्रणेनेच ती खोटी आहेत असा शिक्का त्या मॅसेजेवर मारला तर या धोरण किंवा उपाययोजनेची परिणामकारकता फारच कमी असेल.

आपण हे लक्षात घेतले पाहीजे की, सामाजिक संस्था जितक्या जुन्या आहेत, तितकीच अफवा ही संकल्पानाही जुनीच आहे. आदिमानवाच्या काळात जेव्हा आपण आज काय शिकार केली याविषयी चर्चा करण्यासाठी माणसे जेव्हा शेकोटीजवळ एकत्र बसत असत, त्याचवेळी खरे तर अफवा या संकल्पनेचा पहिल्यांदा उमग झाला. त्या वेळेपासूनच काही व्यक्ती, जागा, आणि वस्तू निषिद्ध मानल्या जाऊ लागल्या. अशाप्रकारची निषिद्धता आणि निर्बंधच समुदायांमध्ये एकता निर्माण करत असते.

रॉबर्ट क्नॅप यांचे “सायकॉलॉजी ऑफ रुमर्स” हे पुस्तक १९४४ साली प्रकाशित झाले. या पुस्तकात त्यांनी अफवांचे एक महत्वाचे वैशिष्ट्य सांगितले आहे. ते म्हणतात की, समाजात खूप खोलवर रुतलेल्या आणि कधी कधी व्यक्त करता येऊ शकत नाहीत अशा प्रकारच्या सामाजाच्या भावनिक गरजाच अफवांमधून व्यक्त होत असतात, आणि त्यामुळेच खरे तर त्या अफवा असूनही कधी कधी त्यांचा प्रसार अगदी झपाट्याने होत असतो. त्या एकदमच चूकीच्या, तथ्यहीन असू शकतात. मात्र तरीही त्या अगदी छोट्या स्वरुपात, रुपक किंवा प्रतिकात्मक स्वरुपात अशा काही रितीने व्यक्त होतात की त्यातून काही समुदायांना ते जगाकडे ज्या दृष्टीने पाहात आहेत त्याचीच संवेदनशील सत्य वाटणारी अभिव्यक्ती वाटू लागते.

याचाच अर्थ असा की अशा परिस्थितीविरुद्ध लढण्यासाठीच्या धोरणे किंवा उपाययोजनांमध्ये केवळ तथ्यांकडे लक्ष देऊन चालणार नाही, तर त्या ही पलिकडे आपल्या या विशाल जगातल्या घडामोडींसाठी, जे खोटे आणि असत्य स्पष्टीकरण किंवा दाखले दिले जाते त्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. खरे तर अशा खोट्या आणि असत्य स्पष्टीकरणांमुळेच कट्टरवाद्यांना ते खूप शक्तीशाली आहेत असे भासवता येते. आणि त्यामुळेच त्यांचे अनुयायी अतिरंजित असेलेल्या आणि एखाद्या षडयंत्राप्रमाणे रचलेल्या गोष्टी वा सिद्धांतांवर विश्वास ठेवतात. यांच्यापैकी अनेक सिद्धांत तर अगदी भयावह किंवा विचित्र आहेत… त्यातही मात्र फ्लॅट अर्थर्सने मांडलेले सिद्धांत सर्वाधिक भयावह किंवा विचित्र आहेत असे मात्र निश्चितच म्हणता येईल.

त्यामुळेच सामाजिक स्तरावर होत असलेले ध्रुवीकरण रोखणे महत्वाचे आहे. भेदभाव, मतमतांतरे, माथी बसणारे शिक्के, वर्गवारी अशा स्वरुपात जहाल बंडखोर परस्परस्परांपासून भिन्न असणारी जी व्यवस्था उभारू पाहात असतात त्या सगळ्यांना सामावून घेऊ इच्छिणारी एक प्रभावी पर्यायी सांस्कृतिक व्यवस्था उभारावी लागेल.

न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा ऑर्डन यांनी अशाच तत्वाने दहशतवादाविरोधातले युद्ध जिंकले असे निश्चित म्हणता येईल. मात्र ११ सप्टेंबर म्हणजेच ९/११ च्या हल्ल्यानंतर अमेरिकेने ज्या रितीने प्रतिक्रिया दिली, त्यामुळे खरे तर जागतिक दहशतवादाची समस्या अधिक उग्र झाली.

न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा ऑर्डन यांनी ज्या तऱ्हेची प्रतिक्रिया दिली, त्यामुळे खरेतर मनातला राग वा द्वेष निवळला. त्यांनी शोक, संवेदना आणि आणि प्रेमाच्या साध्यासरळ संदेशाचीच निवड केली. कोणत्याही नागरी व्यवस्थेने देश, पंथ आणि धर्मापलीकडे जात ज्या मुल्यांच्या पुरस्कार करायला हवा त्यावरच त्यांनी भर दिला. त्यांनी खऱ्या अर्थाने संपूर्ण जगालाच आवाहन केले.

या सर्व पार्श्वभूमीवर ख्राईस्टचर्च इथे गोळीबार झाल्यानंतर जेसिंडा ऑर्डन यांनी ज्या प्रकारे परिस्थिती हाताळली त्यापासून बोध घेत, आपल्या केंद्र सरकारनेही काश्मीरबाबत घेतलेल्या निर्णयानंतर, बहुंख्यकांकडून अगदी किळसवाणा वाटावा अशा तऱ्हेचा जो विजयोन्माद सुरु आहे त्याला खतपाणी दिल्याची तसेच त्यात भर टाकल्याची जबाबदारी स्विकारायला हवी. अशी कृती करण्याची क्षमता किंवा सामर्थ्य त्यांच्यापाशी आहे किंवा नाही, यावरच त्यांच्या निर्णयातले पावित्र्य आणि प्रामाणिकपणा, तसेच भविष्यातले त्यांचे स्वतःचे यशही अवलंबून असेल.

निष्कर्ष

आता सरतेशेवटी एका महत्वाच्या प्रश्नाच्या उत्तराकडे वळुयात… तो म्हणजे नवी माध्यमे समाजात फूट पाडत आहेत का? अर्थात याचे अगदीच छोटे उत्तर द्यायचे तर उत्तर नाही असे आहे. आता हे जग जर का खरोखरच एक मोठे आनंददायी ठिकाण असते, तर इंटरनेटवरी तसाच आनंद दिसला असता. खरे तर इंटरनेट हा या जगाचा आरासा आहे, इंटरनेट तुमचे प्रतिबिंब दाखवते मात्र ते, निर्मिती करत नाही.  खरे तर आजच्या स्थितीत समाजातले ध्रुवीकरण हे समाजमाध्यमांवरच्या उद्रेकातून दिसून येते. हेच जर का कुठल्यातरी आधीच्या काळात आणि इतर वेगळ्याठिकाणी झाले असते तर कदाचित धर्मयुद्धच पेटले असते.

तसेही पन्नास वर्षांपूर्वी जर का त्याना गटेनबर्ग हा अडथळा वाटत असता, तर ते आपल्या कॉफी हाऊस किंवा पबमध्ये खितपत पडलेले असते, आणि आपल्या छोट्या छोट्या छुप्या संघटनांची स्थापन करत बसले असते. मात्र त्यांनी प्रत्येक घडामोड, चर्च, आणि राजावर नेहमीच आणि अनिर्बंध प्रभाव टाकला हे इथे लक्षात घ्यायला हवे.

द्वेष आणि दहशवादाचा प्रसार ही एकसारखीच गोष्ट आहे. या दोन्हींमध्ये हृदयातला खोटेपणा, द्वेष आणि कठोरता हेच गुण दिसतात. महत्वाचे म्हणजे हे सगळे गुण आपण जे माध्यम वापरतो त्यात नसतात, तर हे गुण खरे तर आपल्यामध्येच असतात… हे आपण समजून घ्यायला हवे.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.