Author : Niranjan Sahoo

Published on Aug 10, 2023 Commentaries 0 Hours ago

ब्राझीलच्या निवडणुकीच्या निकालाने जगभरातील उजव्या विचारांच्या लोकशाहीच्या वेगाने धावणाऱ्या वारूला वेसण बसू शकेल.

जागतिक लोकशाहीसाठी ब्राझीलमधील निकाल महत्त्वपूर्ण

ब्राझीलमध्ये ३० ऑक्टोबर रोजी झालेल्या अत्यंत सनसनाटी आणि चुरशीच्या निवडणुकीत मतदारांनी अध्यक्ष जईर बोल्सोनारो यांना पदच्युत करून यापूर्वी दोनदा अध्यक्षपद भूषवलेले लुईस इनास्यू लुला दा सिल्व्हा यांच्या गळ्यात विजयाची माळ घातली. ते आपल्या समर्थकांमध्ये लुला या नावाने लोकप्रिय आहेत. पूर्णपणे विरोधी विचारसरणीच्या आणि वेगळी ओळख असलेल्या दोन उमेदवारांच्या समर्थकांमध्ये झालेल्या अभूतपूर्व तुंबळ हाणामारीमुळे ही निवडणूक गेल्या काही दशकांमधील काँटे की टक्कर ठरली. कारण विजयी आणि पराभूत उमेदवारांमधील अंतर दोन टक्क्पेक्षाही कमी होते.

बोल्सोनारो यांना पहिल्या फेरीत ४३ टक्के (लुला यांना ४८ टक्के) मते मिळाली होती. त्यामुळे लुला सहजगत्या विजय मिळवतील, असा विश्वास मतदात्यांना वाटत होता. मात्र बोल्सोनारो यांनी अत्य़ंत आक्रमक आणि उत्साही प्रचारमोहीम राबवली आणि दुसऱ्या फेरीत जवळजवळ विजयश्री खेचून घेण्याचा प्रयत्न केला. अर्थात इतका कमी फरक असूनही बोल्सोनारो यांना पराभवच पत्करावा लागला. त्यांच्या गेल्या चार वर्षांच्या विभाजनवादी राजकारणाचा हा परिपाक होता; तसेच कोरोना साथरोगाच्या काळात त्यांच्या गैरव्यवस्थापनाने ब्राझीलमधील सुमारे सात लाख नागरिकांना प्राण गमवावे लागले होते, तेही मतदार विसरले नव्हते. असे असले, तरी ही निवडणूक म्हणजे सबकुछ लुला होती आणि भ्रष्टाचाराच्या आरोपावरून चालविण्यात आलेल्या वादग्रस्त खटल्यानंतर ५८० दिवस तुरुंगात काढून आल्यानंतर त्यांच्या सनसनाटी पुनरागमनाची होती. बोल्सोनारोंच्या दृष्टीने पाहिले, तर ब्राझीलच्या ३४ वर्षांच्या लोकशाही व्यवस्थेत फेरनिवडणुकीत पराभव पत्करावा लागणारे ते पहिले विद्यमान अध्यक्ष होते.

अर्थात इतका कमी फरक असूनही बोल्सोनारो यांना पराभवच पत्करावा लागला. त्यांच्या गेल्या चार वर्षांच्या विभाजनवादी राजकारणाचा हा परिपाक होता; तसेच कोरोना साथरोगाच्या काळात त्यांच्या गैरव्यवस्थापनाने ब्राझीलमधील सुमारे सात लाख नागरिकांना प्राण गमवावे लागले होते, तेही मतदार विसरले नव्हते.

निवडणुकीत ध्रुवीकरण

सन २०२२ मध्ये झालेली ही निवडणूक ब्राझीलमधील कदाचित सर्वाधिक ध्रुवीकरण झालेली पहिली निवडणूक होती. हे जगाविषयी असलेल्या पूर्णपणे वेगळ्या दृष्टिकोनांमधील युद्ध होते. बोल्सोनारो हे प्रतिगामी, अतीराष्ट्रवादी आणि भांडवली व्यवस्थेचे प्रतिनिधी आहेत. याउलट सशक्त डाव्या विचारांचा पाया असलेल्या लुला यांच्या ‘वर्कर्स पार्टी’ने समाजवादी, गरीबकेंद्री आणि शाश्वत विकासाचा पुरस्कार केला. बोल्सोनारो यांच्या प्रतिगामी कार्यकर्त्यांनी अधिकाधिक खासगीकरण आणि नियंत्रणमुक्तीसाठी जोरदार आग्रह धरला, तर लुला यांच्या वर्कर्स पार्टीने गरिबांसाठी आर्थिक पुनर्वितरण, अन्न व घरे या मुद्द्यांवर मते मागितली. अर्थातच उभयतांमधील वेगळेपण हे केवळ राजकीय किंवा आर्थिक मुद्द्यांपुरतेच मर्यादित नव्हते. दक्षिण अमेरिकेतील या सर्वांत मोठ्या निवडणुकीत संपूर्ण ब्राझील दोन गटांमध्ये विभागलेले दिसून आले. ते गट म्हणजे, बोल्सोनारोवादी आणि लुलावादी. बोल्सोनारोवाद्यांनी लुला यांना डावे भ्रष्टाचारी चोर असे संबोधले, तर लुलावाद्यांनी बोल्सोनारो यांना वर्णद्वेषी आणि कट्टरवादी हुकुमशहा असे संबोधले. थोडक्यात सांगायचे तर, या निवडणुकीने या पूर्वी कधीही झाले नव्हते, असे एकमेकांविरोधात कडवे आव्हान ब्राझीलवासीयांनी उभे केले. वैचारिक विभाजनाच्या पलीकडे ही आजवरची सर्वांत मोठी प्रचारमोहीमही ठरली. उदाहरणार्थ, डोनाल्ड ट्रम्प यांच्या वर्तणुकीचे अनुकरण करून बोल्सोनारो आणि त्यांच्या लाखो कट्टर पाठीराख्यांनी प्रसारमाध्यमे, निवडणूक प्रक्रिया विशेषतः इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणाली आणि ‘सुपीरिअर इलेक्टोरल कोर्ट’ यांना धुडकावले. एवढेच नव्हे, तर लष्कराचा वापर करण्याच्या धमक्याही दिल्या. ट्रम्प यांच्याप्रमाणेच बोल्सोनारो यांनीही निवडणुकीचा निकाल न स्वीकारण्याचा उघड इशारा दिला. अगदी पराभवानंतरही ते आपल्या म्हणण्याला चिकटून बसले होते. सत्तेचे हस्तांतर करण्यासाठी त्यांनी एक दिवसापेक्षाही अधिक वेळ लावला असला, तरी लुला यांचा विजय मान्य करण्यास त्यांचा विरोध अद्याप कायम आहे.

पुढची वाट बिकट

लुला यांचा विजय अत्यंत कमी मतांच्या फरकाने झाला असला, तरी लॅटिन अमेरिकेतील गुलाबी लाट (काही विश्लेषक याला गुलाबी लाट २.० असे संबोधतात.) विस्तारण्याच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वपूर्ण विजय मानला जात आहे. इतिहासात प्रथमच सहा सर्वाधिक लोकसंख्येच्या आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या देशांमध्ये (मेक्सिको, पेरू, चिली, अर्जेंटिना, कोलंबिया आणि आता ब्राझील) डाव्या विचारसरणीचे अध्यक्ष विराजमान झाले आहेत. हे युरोप आणि पश्चिमेकडील उजव्या विचारसरणीच्या लोकानुनयवादी सरकारांच्या प्रवाहाच्या अगदी उलट आहे. लुला यांचा विजय हा लॅटिन अमेरिकेतील ‘ग्रीन लेफ्टीझम’ (डाव्या विचारसरणी)चा विजय म्हणून पाहिले जात आहे आणि ‘ॲमेझॉन रेनफॉरेस्ट’च्या हानीबद्दलचे त्यांचे वक्त्व्य हे त्याचीच साक्ष देणारे आहे.

एवढेच नव्हे, तर बोल्सोनारो यांच्या ‘एलजीबीटी’विरोधी आणि ‘ॲमेझॉन रेनफॉरेस्ट’ नष्ट करण्यासह त्यांच्या पर्यावरणविरोधी धोरणांना त्यांच्या कट्टर प्रतिगामी समर्थकांनी पाठिंबा दिला होता.

तरीही अशा सर्वच गोष्टी पूर्णत्वास नेणे तितकेसे सोपे नाही. लुला यांच्या या नव्या कार्यकाळातील आव्हानांची तीव्रता खूपच जास्त आहे. मुळातच सातत्याने ढासळत असलेल्या अर्थव्यवस्थेला कोरोना साथरोग आणि जागतिक आर्थिक मंदीचा फटका बसला आहे. त्यांच्या आधीच्या कार्यकाळात (२००३-२०१०) विक्रमी दोन कोटी ५० लाख नागरिकांना दारिद्र्याच्या गर्तेतून बाहेर काढण्यात आले होते. त्या वेळी गतिमान अर्थव्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील उच्च आर्थिक वाढीमुळे त्यांना मोठ्या प्रमाणात निधीचा पुरवठा करणे शक्य झाले होते. आता मात्र सध्याच्या अर्थव्यवस्था वाढीचा दर एक टक्क्यापेक्षाही कमी (आर्थिक सहकार्य व विकास संघटनेने केलेल्या अंदाजानुसार ०.६ टक्के) असण्याची शक्यता आहे.

दुसरे म्हणजे, आता ते अत्यंत निराळ्या ब्राझीलवर राज्य करणार आहेत. त्यांच्या आधीच्या कार्यकाळात म्हणजे २००३ आणि २०१० या दरम्यान ब्राझीलचा समाज आणि राजकारण आताएवढे विभाजित नव्हते. त्यामुळे बोस्ला फॅमिलिआ (सशर्त रोख रक्कम हस्तांतरण कार्यक्रम)सारख्या अनेक वेगळ्या सामाजिक धोरणांचा अवलंब करण्यासाठी या सामाजिक स्थितीची त्यांना मदतच झाली. मात्र बोल्सोनारो यांच्या नेतृत्वाखाली अतीउजव्या गटांमध्ये मोठी वाढ झाली असून ब्राझीलमधील सुमारे निम्मे नागरिक लुला यांचे विरोधक बनले आहेत. ते लुला आणि त्यांच्या गरीब समर्थक ‘वर्कर्स पार्टी’च्या सर्वच धोरणांना विरोध करतात. एवढेच नव्हे, तर बोल्सोनारो यांच्या ‘एलजीबीटी’विरोधी आणि ‘ॲमेझॉन रेनफॉरेस्ट’ नष्ट करण्यासह त्यांच्या पर्यावरणविरोधी धोरणांना त्यांच्या कट्टर प्रतिगामी समर्थकांनी पाठिंबा दिला होता. गेल्या काही वर्षांमध्ये ‘बीफ, बायबल आणि बुलेट्स’ हा महत्त्वाचा प्रतिगामी कार्यक्रम म्हणून उदयास आला होता. या कार्यक्रमाला ब्राझीलमधील मोठ्या लोकसंख्येचा भक्कम पाठिंबा लाभला आहे. खरे तर, बोल्सोनारो यांचा चार वर्षांच्या कार्यकाळात लुला यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेल्या अनेक प्रमुख सामाजिक उपक्रमांना कात्री लावण्यात आली होती किंवा काही योजनांना निधीचा पुरवठा अल्प करण्यात आला होता. यामुळे आपल्या तिसऱ्या कार्यकाळात लुला सर्वांना एकत्र आणून युती करण्याचे कौशल्य कसे दाखवतात, याची चाचणी घेणारा होणार आहे.

अखेरीस लुला यांच्यासाठी सर्वांत गंभीर आव्हान हे बोल्सोनारो आणि त्यांच्या प्रतिगामी युतीचेच आहे. बोल्सोनारो यांनी अध्यक्षपद गमावले असले, तरी त्यांच्या प्रतिगामी युतीने अनेक राज्यांमध्ये आपला झेंडा फडकावला आहे आणि काँग्रेसवरही त्यांचेच वर्चस्व आहे. त्यामुळे बोल्सोनारो यांचे सरकारमधील व बाहेरील कट्टर समर्थक गरीबानुकूल डाव्या धोरणांची व्याप्ती वाढवण्यास मोठा विरोधच करतील आणि प्रतिगामी धोरणे उलथून टाकण्याचा प्रयत्न झाला, तर तोही हाणून पाडण्यासाठी आक्रमक होतील. लुला यांचा वरदहस्त लाभलेल्या अध्यक्षा डिल्मा रौसेफ यांना प्रचंड रोषाला सामोरे जावे लागले होते आणि २०१६ मध्ये त्यांच्यावर महाभियोगही चालवण्यात आला होता, हे विसरून चालणार नाही.

गेल्या काही वर्षांमध्ये ‘बीफ, बायबल आणि बुलेट्स’ हा महत्त्वाचा प्रतिगामी कार्यक्रम म्हणून उदयास आला होता. या कार्यक्रमाला ब्राझीलमधील मोठ्या लोकसंख्येचा भक्कम पाठिंबा लाभला आहे.

अर्थातच, लुला हे डिल्मा रौसेफ नाहीत. धातूकाम करणाऱ्या या कामगाराने दारिद्र्याच्या गर्तेतून बाहेर पडण्यासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत दिलेल्या लढ्यापासून ते त्यांच्या राजकीय उदयापर्यंतचा प्रवास ज्यांनी पाहिला आहे, त्यांना आघाड्यांमध्ये पूल बांधण्याच्या त्यांच्या क्षमतेचीही जाणीव आहे. ते बहुविध कामगार आघाड्या आणि डाव्या विचारसरणीच्या संघटनांचे नेतृत्व करतातच, शिवाय त्यांनी त्यांच्या आधीच्या कार्यकाळात मध्यमवर्गाचा समावेश असलेली व्यापक आघाडीही केली होती. या आघाडीने परिवर्तनवादी आणि गरीबानुकूल समाजिक धोरणांना पाठिंबा दिला होता. या वेळी लुला यांना अन्य एका गोष्टींमधूनही आणखी बळ मिळणार आहे. ती म्हणजे, या टापूतील प्रमुख डावी सरकारे. ही सरकारे त्यांना वैचारिक समर्थन आणि आर्थिक सहकार्य करण्याच्या दृष्टीने मदतगार ठरू शकतात. मात्र ब्राझील आणि एकूणच लॅटिन अमेरिकेतील पुढील काळ कसा असेल, हे सांगणे एवढ्यात शक्य नाही. असे असले, तरी ब्राझीलच्या निवडणुकीच्या निकालाने जगभरातील उजव्या विचारांच्या लोकशाहीच्या वारूला आणि वाढत्या हुकुमशाहीला वेसण बसू शकेल, हे निश्चित.

हे लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.