कोव्हिड-१९ या अतिसूक्ष्म विषाणूमुळे जगभरात झालेल्या या उलथापालथीचे हादरे येती काही वर्षे जाणवणार आहेत. अर्थतज्ज्ञांनी आधीच जागतिक मंदीचा अंदाज वर्तविला आहे. तसेच जागतिकीकरणाची स्थितीही नाजूक आहे. खुल्या झालेल्या जगाच्या सीमा या कोरोना संकटाने पुन्हा बंद होण्याच्या शक्यता वाढल्या आहेत. उद्या या विषाणूला रोखण्यात यश येईल. आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी अनेक उपाय योजले जातील. पण या एकंदरीत आणिबाणीला हातळण्यासाठी समाज म्हणून आपण जी बंधने आपण स्वीकारली, ती भविष्यकाळात सर्वमान्य स्वरूप तर धारण करणार नाहीत ना?
सर्वसामान्यतेची नवी परिभाषा
हे समजून घेण्यासाठी आपण २००६ मधली एक घटना पाहू. ही घटना आपल्यातील अनेकांना आज आठवतही नसेल. अब्दुल्ला अहमद अली आणि तन्वीर हुसेन हे दोघे लंडनवासी अटलांटिक महासागरावरून जाणाऱ्या काही विमानांमध्ये आत्मघातकी हल्ल्यांचे नियोजन करत होते. त्यासाठी शीतपेयांच्या बाटल्यांमधून हायड्रोजन पॅरॉक्साइडची तस्करी करण्याची त्यांची योजना होती. ही माहिती त्यांच्यावर पाळत ठेवून असणाऱ्या, एमआय5 च्या एजंटना ३ ऑगस्ट २००६ रोजी मिळली. याचा तात्काळ परिणाम असा झाला की, ऑक्टोबर २००६ पर्यंत युरोपीय संघ आणि अमेरिका यांनी प्रवाशांना विमानातून द्रव पदार्थ आणि अन्य सामान नेण्यावर मर्यादा आणल्या.
त्याआधी विमानतळावरील सुरक्षा तपासणीतून खुशाल पाण्याच्या बाटल्या घेऊन जात होते. मात्र मर्यादित काळासाठी असलेले हे नवे निर्बंध विमान कंपन्यांनी कायम ठेवले. आज १४ वर्षांनंतर विमान प्रवाशांची संख्या दुप्पट झाली आहे. तरीही आपण आजही प्रवासात मर्यादित द्रव पदार्थच तेही लहानशा पारदर्शक बॅगेतून नेऊ शकतो आहोत. एखादे बंधन भविष्यात सर्वमान्य अट बनून बसते ती अशी.
दुसरे असे बंधन म्हणजे विमानतळावर होणाऱ्या अंगझडतीचे. अनेक प्रवाशांना आता तो काळ आठवतही नसेल, जेव्हा फारच थोड्यांना हेही आठवत असेल की, विमानतळावरील सुरक्षा कर्मचारी थेट शरीराच्या सर्व भागांची झाडाझडती घेत नव्हते. पण आज अशी तपासणी करणे हे गरजेचे आहे, हे आपण सर्वांनीच मान्य केले आहे. त्यासाठी आपण स्वतःमध्ये बदलही घडवून आणला आहे.
कोरोनासंदर्भात हे सारे पुन्हा एकदा तपासून पाहायलाच हवे. ६ एप्रिल २०२० ला जगभरात कोविड१९ चे सुमारे १२ लाख ८६ हजार रुग्ण होते आणि जवळपास सर्वच देशांनी त्यांच्या सीमा पूर्णतः किंवा अंशतः बंद केल्या आहेत. वेगाने पसरणाऱ्या या आजारामुळे निर्माण झालेली भीती समाज माध्यमांमुळे आणखी वाढत आहे. बिजिंगमध्ये फेरफटका मारणाऱ्या एका चीनी-ऑस्ट्रेलियन महिलेची चित्रफित काढून चीनी नेटकऱ्यांनी तिला इंटरनेटवरून इतके बदनाम केले की, अखेरीस तिला कामावरून काढून टाकून देश सोडण्यास भाग पाडण्यात आले.
तैवानमध्ये कंपनीपासून आपल्या प्रवासाची माहिती दडवणाऱ्याची वैयक्तिक माहिती नेटकऱ्यांनी सार्वजनिक केली. लंडनहून परत आल्यानंतर आठवडाभराने गायिका कनिका कपूर हिला कोविड१९ ची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. यानंतर भारतात तिचा समाज माध्यमांतून छळ करण्यात आला. ट्विटरवर जगभरातून अशा अनेकांची वैयक्तिक छायाचित्रे आणि चित्रफिती टाकण्यात येत आहेत, तर #COVIDIOT या हॅशटॅगने काही जण खालच्या पातळीवरही जात आहेत.
कोरोनाच्या उद्रेकानंतर ‘थर्मल स्क्रिनिंग’ हा जगभरातील अनेक विमानतळे आणि औद्योगिक आस्थापनांमध्ये महत्त्वाचा भाग बनून गेला आहे. भारतातील विमानतळांवर तर कोविड१९ साठी तपासणी होत नाही, तोवर प्रवाशाचे पासपोर्टच काढून घेण्याची भलतीच पद्धत सुरू करण्यात आली. भविष्यात अशा आरोग्य तपासण्या या कायमचीच गोष्ट बनतील का? अशी एक शक्यता आता दिसू लागली आहे.
कोरोनाच्या भीतीचा लाभ घेत अनेक औद्योगिक आस्थापनांनी आधीच लोकांच्या व्यक्तिगततेवर घाला घालण्याचे विविध मार्ग शोधून काढले आहेत. बिल गेट्स यांनी रेड्डीट या संकेतस्थळावरील ‘आस्क मी एनिथिंग’ प्रश्न मंजुषेअंतर्गत ‘डिजिटल प्रमाणपत्रां’ची संकल्पना मांडली होती. ज्यामुळे औद्योगिक आस्थापने आणि सरकारला हे कळेल की, कोण बरे झाले आहे आणि कुणाची नुकतीच चाचणी घेण्यात आली आहे? किंवा कोणती लस कुणी घेतली आहे?
पुन्हा बंधनांच्या दिशेने?
कोविड१९ चा परिणाम म्हणून युद्धपातळीवर टोकाची पावले उचलली जात आहेत. भारत सरकारने १८९७ सालचा साथीचे रोग प्रतिबंधक कायदा लागू केला आहे. प्लेगची साथ हाताळण्याच्या सरकारच्या पद्धतीवर वर्तमानपत्रातून टीका केल्याबद्दल, याच कायद्याअंतर्गत लोकमान्य टिळकांना तुरुंगात डांबण्यात आले होते. दुसरीकडे अमेरिकेनेही कोरिअन युद्धाच्या वेळचा संरक्षण उत्पादन कायदा पुन्हा लागू केला आहे.
कोणत्याही समस्येवर सुरक्षिततेच्या दृष्टीने लादण्यात येणाऱ्या बंधनांमुळे सर्वसामान्य जीवनाच्या नव्या संकल्पना तयार होतात. पुढे भविष्यात या संकल्पना इतक्या रुजतात की ती बंधने कायमचीच राहतात. ओले व्हायव्हर यांनी अशा सुरक्षात्मक बंधनांची व्याख्या करताना म्हटले आहे की, ‘विशिष्ट विकास, विशिष्ट क्षेत्राकडे वळविण्याची आणि वाटेल तो मार्ग अनुसरून तो अडविण्याचा आणि विशेष अधिकार मिळवण्याची ही क्रिया आहे.’ त्यामुळे सत्ताधाऱ्यांचे समस्येवर तर नियंत्रण येतेच; पण त्याबरोबरच ती कशी मांडायची आणि त्याला प्रतिसाद कसा द्यायचा यावरही नियंत्रण येते.
कोरोनाविरुद्ध जगभर सुरू असलेला संघर्ष हे महायुद्धापेक्षा कमी नाही, असे अनेकांनी महटले आहे. त्यामुळे याकाळात काही असामान्य धाडसी पावले उचलली जाणे, स्वाभाविक आहे. पण खरी गोष्ट ही आहे की, या ‘असामान्य’ गोष्टी भविष्यात जेव्हा हळूहळू ‘सामान्य’ होऊ लागतात, तेव्हा पुढे काय होईल? ही जीवघेणी साथ आटोक्यात येईल, तेव्हा बदललेल्या गोष्टी पुन्हा सुरळीत होतील का?
कदाचित आपण एका अशा जगाच्या दिशेने जाऊ जिथे अधिक आक्रमक आरोग्य तपासणी करणे हे अगदी ‘सामान्य’ असेल. जिथे नोकरी देणारे तुमचा संपूर्ण आरोग्य इतिहास ‘आधार’सारख्या एखाद्या डिजिटल यंत्रणेद्वारे तपासू शकतील. ज्यावर एखाद्या व्यक्तीचे नियंत्रण नाही, अशा आजाराबाबतची वैयक्तिक माहिती उघड होणे आणि अशा दुर्बल नागरिकावर सरकार किंवा नागरिकांनी आक्रमक कारवाई करणेही समाजमान्य होऊन बसेल.
हू यंग हा चीनी विचारवंत एके ठिकाणी म्हणतो की, ‘सरकारकडे पाळत ठेवण्याचे साधन असल्यास त्याचा योग्य आणि काळजीपूर्वक वापर केला गेला, असे इतिहासात कधी दिसले आहे का?’ आपण आता हळूहळू या चक्राच्या दिशेने चाललो आहोत. अशा वेळी आपण स्वतःला विचारत राहायला हवे की, आपण पाळत ठेवण्याचे आणि दडपशाहीचे हे नवे साधन स्वीकारणार आहोत का?
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.