Author : Cahyo Prihadi

Published on Mar 05, 2019 Commentaries 0 Hours ago

ट्रम्प स्वतःला करार करण्यात उस्ताद मानतात. पण, उत्तर कोरियाबाबतचा इतिहास पाहता करार कसा करू नये, याचेच उदाहरण म्हणून जग ट्रम्प यांच्याकडे पाहू लागलेय.

ट्रम्प-किम चर्चेचे फलित काय?

बुधवार २७ फेब्रुवारी रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प विएतनामची राजधानी हनोईत पोहचले. पोहचल्यावर दोनेक तास त्यांनी उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जाँग उन यांच्याशी गप्पा केल्या. संध्याकाळी जेवणाआधी ट्रम्पनी फोटोग्राफरना बोलावले आणि किम यांच्याबरोबर पोज दिली. ट्रम्प म्हणाले “बाबांनो, आमचे जरा चांगले फोटो काढा. उद्या उपयोगी पडावेत असे.” संध्याकाळी माध्यमांना सांगण्यात आले की, गुरुवारी दुपारच्या जेवणाच्या वेळी पत्रकार परिषदेत करार प्रसिद्ध केला जाईल, करारावर दोघे सह्या करतील.

गुरुवारी जेवणाचे टेबल सजले. ट्रम्प यांना आवडता केक आणि पुडिंग बशांमधे तयार ठेवण्यात आले. पत्रकार ताटकळत वाट पहात होते. पण, दोघेही आलेच नाहीत. नंतर असे जाहीर करण्यात आले की, ट्रम्प अमेरिकेला परत जाणार आहेत, करार-बिरार होणार नाही. नंतर ट्रम्प यांनी पत्रकार परिषद घेतली. कोणताही करार झालेला नाही, पण आम्ही चांगले मित्र आहोत. एकमेकांच्या प्रेमात आहोत. लवकरच पुन्हा भेटून करार करू असे सांगितले.

पत्रकारांनी विचारले, तुमची बोलणी अपयशी ठरली का? ट्रम्प म्हणाले, तसे झालेले नाही. बोलणी यशस्वी झाली. अयोग्य करार करण्याऐवजी करार झालाच नाही, हे सांगण्यात यश मानायला हवे. जगभरच्या पत्रकारांसमोर ट्रम्पनी आपले देशांतर्गतचे रडगाणे ऐकवले. आपली बोलणी अयशस्वी ठरली, कारण तिकडे अमेरिकेत काँग्रेसमधे उघडपणे कोहेन यांची मुलाखत झाली आणि त्या खोटारड्या माणसाने माझ्यावर खोटे आरोप केल्यामुळे इथले वातावरण बिघडले, असे त्यांनी सांगितले.

ट्रम्प स्वतःला करार करण्यात उस्ताद मानतात. आपण डील करण्यात कसे ग्रेट आहोत हे सांगणारे एक पुस्तक त्यांच्या नावावर प्रसिद्द आहे. पण, उत्तर कोरियाबाबतचा इतिहास पहाता करार कसा करू नये, याचेच उदाहरण म्हणून जग ट्रम्प यांच्याकडे पाहू लागलेय.

कोरियाने अमेरिकेवर बाँब फेकू शकतील अशा पल्ल्याची रॉकेट तयार करून २०१७ मधे ती रॉकेट गाजावाजा करून उडवली. त्यानंतर किम आणि ट्रम्प यांच्यात शाब्दीक रॉकेटांची फेकाफेक झाली. किम म्हणाले मी एक बटन दाबले तर अमेरिका उध्वस्थ करू शकतो. ट्रम्प म्हणाले की, किम यानी बटन दाबायच्या आधीच मी कोरिया उद्धवस्थ करू शकतो. ट्रम्पनी किम यांची खूप टिंगल केली पण तरीही आपल्याला तो आवडतो असं ट्वीट केले. जगाची, देशातल्या लोकांची, कोणाचीही पर्वा न करता बेधडक किम हे राज्य चालवतात याचे ट्रम्पना फार कौतुक.

शाब्दिक रॉकेटांची फेकाफेक झाल्यावर ट्रम्पना कोणी तरी सांगितली कोरियाचा अणुकार्यक्रम ट्रम्पनी थांबवला, मोडीत काढला तर त्याना शांततेचं नोबेल मिळेल. ट्रम्प आणि किमनी रॉकेटांवरचे बोट उचलले आणि सिंगापूरमधे जाऊन शांतता करार करायचे ठरवले. केवढा तरी गाजावाजा. ट्रम्पवर त्यांच्या आततायी वागण्याबद्दल अमेरिकेत खूप टीका होत असल्याने, त्यांची चौकशी होण्याची शक्यता असल्याने करार बिरार करून लोकप्रियता मिळवण्याचा त्यांचा डाव होता.

पण, सिंगापूरला निघण्यापूर्वी त्यानी अभ्यास केला नाही. अणुबाँब आपल्याकडं आहे याचा धाक देशातल्या आणि बाहेरच्या जनतेला दाखवतच किम यांचे वडील आणि आजोबा जगले होते. क्लिंटन, बुश, ओबामा यांनी कोरियाचा अणुकार्यक्रम थांबवण्याचा प्रयत्न केला होता. मेडलीन आलब्राईट परदेश मंत्री असताना कित्येक दिवस दुरून आणि प्रत्यक्ष कोरियात जाऊन वाटाघाटी करत होत्या. पण त्याचा तसूभरही परिणाम झाला नव्हता. हे वास्तव लक्षात घेऊन कोरियावरचे निर्बंध अजिबात कमी न करता कोरियावर दबाव आणणे हे अमेरिकेचे विचारपूर्वक तयार झालेले धोरण होते. ट्रम्पना वाचन आणि अभ्यासाची सवय नसल्याने त्यांनी मागच्या अध्यक्षांनी बाद ठरवून टाकले. आपण करार करण्यात उस्ताद आहोत, आपण किमला वळणावर आणून शांतता प्रस्थापित करू असे कोणाशीही न बोलता जाहीर करून टाकले.

सिंगापूरमधे काहीही झाले नाही. किम म्हणाले की आपण शस्त्र निर्मिती थांबवू. पण किमकडून काहीच वेळापत्रक नाही, तपासणी यंत्रणा कशी असेल याचा पत्ता नाही. गळ्यात गळे घालून, फोटोंची सरबत्ती करून ट्रम्प परतले. त्यानंतर वर्षभर किमनी एकही अण्वस्त्र निर्मिती केंद्र बंद केले नाही, उलट केंद्रे अधिक सक्षम केली. हे सारे अहवाल परदेश मंत्री टिलरसन ट्रम्पना देत होते. तर ट्रम्पनी त्यांनाच काही कळत नाही, असे म्हणत काढून टाकले. त्यांच्या जागी पाँपियो याना आणले. पाँपियो कोरियात जाऊन आले, त्यानीही सांगितले की, किम फसवाफसवी करत आहेत, त्यांनी क्षेपणास्त्रं आणि अणुबाँब केंद्रं कमी केली नसून उलट वाढवण्याचा प्रयत्न चाललाय. ट्रम्पनी पाँपियोंकडंच दुर्लक्ष करायला सुरुवात केली.

अमेरिकेच्या परदेश नीती विभागातल्या स्टीफन बीगन यांनी कोरियाबरोबरच्या वाटाघाटींची पूर्व तयारी केली होती. आंतरराष्ट्रीय आणि कोरियन वाटाघाटी हा त्यांचा खास विषय होता. त्यांना वगळून ट्रम्पनी मिक मलवेनी यांना बरोबर घेतले. मलवेनी हे व्हाईट हाऊसमधे चीफ ऑफ स्टाफ आहेत, त्यांना धोरण या विषयातले काही कळत नाही. हनोईला कोणी जायचे असा विषय व्हाईट हाऊसमधे निघाला तेव्हा ट्रम्प म्हणाले की मीच एकमेव महत्वाचा आहे, आय एम ओनली वन हू मॅटर्स.

किम यांचा प्रस्ताव होता की, याँगब्यॉनमधली व्यवस्था बंद करू, त्या बदल्यात अमेरिकेने निर्बंध मागे घ्यावेत. त्यावर किम यांचे म्हणणे असे होते की, त्यांनी सर्व नव्हे पण काही निर्बंध तरी मागे घ्यायला हवे होते. ट्रम्प म्हणत होते की, कोरियाने सर्वच अणुव्यवस्था बंद केली तरच निर्बंध मागे घेतले जातील. याँगब्यॉनमधली व्यवस्था एक तर जुनाट आणि जवळजवळ निरुपयोगीच होती. ती बंद करणे म्हणजे फसवणे होते.

यात आणखीही एक घोळ आहे. किम यांचे म्हणणे होते की, अमेरिकेने पूर्ण कोरिया अण्वस्त्ररहीत करायला हवा, म्हणजेच द.कोरियातली अमेरिकेची अण्वस्त्रेही अमेरिकेने मोडीत काढायला हवीत. अमेरिका त्याला तयार नाही, केव्हांच नव्हती. त्यामुळं सिगापूरला झालेल्या किवा हनोईत झालेल्या वाटाघाटी मुळातच निष्फळ होत्या.

कोरियाच्या काय अटी होत्या ते अमेरिकेला माहित नव्हतं काय? अमेरिकेची काय तयारी आहे ते कोरियाला माहित नव्हतं काय? कोणतीही बोलणी होतात तेव्हां दोन्ही बाजूच्या मुत्सद्द्यानी आधीच भेटून अटी काय आहेत आणि कोणत्या वाटा निघतात याची चाचपणी करायची असते. ट्रम्प आणि किम यांनी ती चाचपणी केली नव्हती काय? १९९४ पासून अमेरिका आणि उ. कोरिया यांच्यात वाटाघाटी चालल्या आहेत, त्या कधीच यशस्वी झालेल्या नाहीत. काही प्रमाणात कोरियाच्या कार्यक्रमाची गती कमी झाली येवढेच.

ट्रम्प आणि किम दोघेही चमको आहेत. दोघानाही चमकायचे असते. त्यांचे व्यक्तिमत्वच तसे आहे आणि आपापल्या देशातल्या लोकांना चकमकाटात गुंतवून ठेवणे ही त्यांची राजकीय गरज आहे. उ. कोरियाची आर्थिक स्थिती फार वाईट आहे. सतत दुष्काळ असतो. लोकांना जीवनावश्यक वस्तू मिळेनाशा झाल्या आहेत. अमेरिकेच्या निर्बंधांमुळे कोरिया जेरीस आला आहे. तुटवड्यामुळे झालेला त्रास किम जनतेवर सरकवतात. अन्न, पेट्रोल या गोष्टी आधी किम यांच्याकडे, सैन्याकडे, पोलिसांकडे, किम यांच्या जवळच्या लोकांकडे जातात. त्यानंतर उरेल ते जनतेकडे जाते. अमेरिकेचे निर्बंध वाढतील, टंचाई वाढत जाईल. किम माणसांना मारत रहातील, थेट त्यांचे कुटुंब टिकेपर्यंत.

किम हा माणूस अत्यंत क्रूर आहे. ओट्टो वार्मबियर या अमेरिकन विद्यार्थ्याला कोरियाने तुरुंगात डांबले आणि छळ करून मारले. साऱ्या जगाला हे माहीत आहे. ट्रम्प त्या विषयी किम यांना झापायला तयार नाहीत, किमच्या सरकारला काही शिक्षा द्यायला तयार नाहीत. किम हा माणूस आणखी बराच काळ अण्वस्त्रे करत राहील, कोणाचेही ऐकणार नाही. अशा परिस्थितीत निर्बंध वाढवत नेऊन वाटाघाटींचा उपचार पार पाडण्याला पर्याय दिसत नाही.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.