Author : Shruti Jain

Published on Dec 09, 2020 Commentaries 0 Hours ago

एकूण जगाच्या फक्त १३% लोकसंख्या असलेल्या श्रीमंत राष्ट्रांकडे कोविड लसीचा अर्ध्याहून अधिक साठा आहे. त्यामुळे, सर्वांपर्यत लस पोहोचवणे हे आव्हान असणार आहे.

कोरोनाची लस ते लसीकरण : एक आव्हान

नुकतीच कोविडची पहिली लस ब्रिटनमध्ये एका ९० वर्षाच्या आजींना देण्यात आली. पण ही नुसती एक सुरुवात आहे. संपूर्ण जगामध्ये कोविड १९चा प्रसार रोखण्यासाठी लसीची उपलब्धता आणि वितरण यासाठी प्रयत्न चालू आहेत. २०२१ मध्ये ही वैश्विक महामारी थांबवणे हे संपूर्ण जगासमोरील मोठे आव्हान असणार आहे. लस टोचून घेतलेल्या माणसाला जसा लसीचा फायदा होतो, त्याचप्रमाणे लसीमुळे रोगप्रसार मंदावल्याने, ती न घेतलेल्यांनासुद्धा लसीचे अप्रत्यक्ष फायदे मिळतात. याच कारणास्तव कोरोनासारख्या रोगावरील लस ही मानवतेच्या हिताची आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या १७ शाश्वत ध्येयांपैकी आरोग्यपूर्ण आयुष्य, गरिबी निवारण, असमता निर्मूलन, शाश्वत आणि सर्वसमावेशक आर्थिक वाढ अशा १४ ध्येयांची पूर्तता करण्यासाठी हे धोरण महत्वाचे ठरत आहे. जगभरातील विविध देशांना ही लस वाजवी किमतीत उपलब्ध करून देण्यासोबतच सर्वाधिक लोकांनी लस टोचून घ्यावी, यासाठी लसीबाबत लोकांच्या मनात विश्वास निर्माण करणे गरजेचे आहे. लसीबाबतची उदासिनता हे जगातील आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे आव्हान आहे, असे मत २०१९ साली  जागतिक आरोग्य संघटनेने नोंदवले आहे. रोगप्रतिबंधक लस टोचून घेण्यासाठी लोकांना तयार करणे, हे याहूनही मोठे आव्हान असणार आहे.

२०१९ मध्ये वर्ल्ड इकनॉमिक फोरम आणि आयपीएसओएस यांनी केलेल्या संयुक्त सर्वेक्षणात असे दिसून आले की, विविध देशांमध्ये कोविड वरील लस घेण्यासाठी उत्सुक किंवा तयार असलेल्या लोकांची संख्या देशसापेक्ष बदलते आहे. म्हणजेच ज्यावेळेस ही लस उपलब्ध होईल त्यावेळेस ८७% भारतीय, ५४%फ्रेंच, ६४% अमेरिकन आणि ६८% दक्षिण आफ्रिकेतील लोकं लस टोचून घेण्यासाठी उत्सुक असतील, असे सांगितले गेले आहे.

अर्थात काही देशांमध्ये लस टोचून घेण्याबाबत अधिक सक्रियता दिसून येते आहे. परंतु कोविड१९ सारख्या वैश्विक महामारीचा एका देशातून दुसर्‍या देशात संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने संपूर्ण जगातील नागरिकांनी ही लस टोचून घेणे परिणामकारक आहे. यासाठी प्रत्येक देशाने प्रभावी नियोजन करून भविष्यात उद्भवणार्‍या आव्हानांना सामोरे जाणे गरजेचे आहे.

पोलिओ, गोवर, देवी सारख्या रोगांमध्ये लसीकरण प्रभावी ठरल्याची उदाहरणे आपल्याला इतिहासात दिसून येतात. लसीकरणामुळे लस घेणार्‍याचा रोगापासून बचाव होतोच पण त्यासोबत सामूहिक रोगप्रतिकार शक्ती वाढण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे पडते. सध्याच्या घडीला कोविड १९ मध्ये सामूहिक रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी किती प्रमाणात लसीकरण व्हायला हवे, याचे कोणतेही आकडे शास्त्रज्ञांकडे उपलब्ध नाहीत. पण असे असले तरीही रोगाचा फैलाव रोखण्यासाठी लसीकरण करणे, आत्यंतिक गरजेचे आहे.

लसीकरणाचा वेग वाढत असताना त्यापासून काही विरोधाभासी परिणाम दिसू शकतात. लस टोचून घेणार्‍यांची रोग प्रतिकारक क्षमता वाढल्यामुळे लस न टोचलेल्या व्यक्तिला त्याचा अप्रत्यक्ष फायदा होतो, यामुळे लसीकरणाचा दर मंदावण्याचीही भीती असते. लसीबाबतचा गैरसमज, चुकीची माहिती, रोगाचा व्यक्तीवर पडलेला प्रभाव आणि त्यामुळे निर्माण झालेली भीती यामुळे लसीकरणाबाबतची उदासीनता वाढीला लागते. कोणत्याही गैरसमजांना खतपाणी मिळू नये यासाठी लसीकरणाच्या प्राथमिक टप्प्यापासून ही उदासीनता घालवण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.

लसीकरणाबाबतची उदासीनता आणि अज्ञान हे रोग प्रतिबंधात्मक उपायांच्या प्रयत्नांना निष्प्रभ करते. उदाहरणार्थ, भारतामध्ये २००० साली उत्तर प्रदेशात पोलिओ लसीच्या दुष्परिणामांबाबत गैरसमज पसरल्यामुळे पोलिओची लस घेणार्‍यांचे प्रमाण नगण्य होते.  तसेच इबोला साथीच्या वेळेस लोकांच्या मनात कोंगो सरकारविषयी असलेल्या अविश्वासाच्या भावनेमुळे सामूहिक लसीकरणात अडसर आलेला होता. आधुनिक काळात खोट्या बातम्या आणि गैरसमज यांचे पेव संपूर्ण जगभर फुटलेले आहे याचा परिणाम लस आणि लसीकरणाबाबत झालेला दिसून येत आहे.

अमेरिकेमध्ये लसीला २०१० मध्ये २.५ टक्के लोकांनी विरोध दर्शवलेला होता त्याचे प्रमाण २०१६ मध्ये ४ टक्क्यावर गेले आहे. विविध देशांमध्ये धार्मिक तेढ आणि राजकीय अस्थिरता याचा थेट परिणाम लसीबाबतच्या विश्वासार्हतेवर होत असल्याचा निष्कर्ष ‘लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसिन’ च्या अभ्यासात समोर आलेला आहे.

लोकांचे निवडीचे स्वातंत्र्य अबाधित राखत त्यांच्या वर्तनात, सवयीत बदल घडवून आणणे, याला नज सिद्धांत (Nudge Theory)असे म्हटले जाते. याचा वापर करून सामाजिक पुढाकार घेऊन लसीकरणाबाबतची उदासीनता कमी करणे आणि त्याची विश्वासार्हता वाढवणे, असे उपाय करता येऊ शकतात. फ्रान्समध्ये मुलांना शाळेत दाखल करून घेण्यासाठी मुलांच्या रोगप्रतिकारक शक्तीबाबत नोंदी दाखवणे गरजेचे आहे.  ऑस्ट्रेलिया सारख्या देशात लसीकरण केल्याबद्दल करात सवलत किंवा सूट मिळण्याची तरतूद आहे. काही वेळेस लोकांना संदेश पाठवून किंवा त्यांच्याशी संपर्क करून त्यांना लसीकरणाची आठवण करून दिली जाते. यामुळे लोकसहभाग वाढीस लागण्यास मदत होते.

लसीकरणाची संपूर्ण प्रक्रिया अखंडित आणि सुलभ व्हायला हवी. सर्वेक्षणात असे दिसून आलेले आहे की, ग्रामीण भागामध्ये लोक सहभाग वाढवण्यासाठी लसीकरण केल्यावर १ किलो डाळ देणे यासारखे लहान लहान उपाययोजना परिणामकारक ठरत आहेत. याचा परिणाम म्हणून लोकांचा लसीकरणाचा कोर्स पूर्ण करण्याकडे कल वाढलेला आहे. ग्रामीण भागातील बरेचसे लोक रोजंदारी तत्वावर काम करत असल्याने लसीकरणाच्या दिवशी काही भरपाई देऊन लोकांचा सहभाग वाढवणे गरजेचे आहे. विविध संपर्कमाध्यमांतून लोकांना वेळोवेळी लसीकरणाची आठवण करून देणे आणि नजीकच्या लसीकरण केंद्राविषयी माहिती देणे, उपयुक्त ठरू शकते. बर्‍याचदा आरोग्य कर्मचार्‍यांमधील उदासीनता हा लोकसहभागामधील मोठा अडथळा ठरत आहे.

लसीकरणाच्या प्राथमिक टप्प्यात लसीविषयी लोकांच्या मनात विश्वासार्हता आणि पारदर्शकता वाढीसाठी लस तयार करणाऱ्या कंपन्या, आरोग्य कर्मचारी आणि सामान्य जनता यांच्यात सुसंवाद असणे गरजेचे आहे.  लोकांपर्यंत लसीबाबत अधिप्रमाणित आणि अधिकृतपणे माहिती पोहोचायला हवी. उदाहरणार्थ. ब्रिटनमध्ये लोकांपर्यंत सुयोग्य माहिती पोहोचवण्यासाठी तसेच चुकीची माहिती आणि लसीबाबत गैरसमज थोपवण्यासाठी स्वतंत्र कक्ष समाज माध्यमांवर कार्यरत आहेत.  स्थानिक प्रशासन आणि संबंधीत नेते ह्यांचा लसीकरण जागृतीसाठी सहभाग महत्वाचा आहे. इबोला साथीच्या वेळेस काँगोच्या केंद्र सरकारपेक्षा स्थानिक प्रशासनावर लोकांचा अधिक विश्वास असल्याचे दिसून आले.  भारतात आशा सेविका व आरोग्य कर्मचारी यांची मदत घेणे अधिक प्रभावी ठरणारे आहे.

सध्याच्या काळात संपूर्ण जगात लसीची गरज आहे. जगाच्या तुलनेत १३% लोकसंख्या असलेल्या श्रीमंत राष्ट्रांकडे लसीचा अर्ध्याहून अधिक साठा असल्यामुळे, जगाच्या विविध कानाकोपऱ्यात ही लस पोहोचवणे हे एक आव्हान असणार आहे. लसीची उपलब्धता आणि पुरवठा सुरळीत ठेवणे जितके गरजेचे आहे तितकेच लसीकरण, लसीची उपलब्धता आणि वितरण या दृष्टीने येणाऱ्या अडथळ्यांवर मात करत जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्याचे फायदे पोहोचवण्यासाठी शासनाला प्रभावी रणनीती तयार करावी लागणार आहे. लसीकरणाच्या  प्राथमिक टप्प्यात लोकांमध्ये वैश्विक पातळीवरील लसीकरणाची गरज याबाबत जागृती आणि प्रबोधन याद्वारे विश्वासार्हता निर्माण होणे आत्यंतिक निकडीचे आहे.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.

Author

Shruti Jain

Shruti Jain

Shruti Jain was Coordinator for the Think20 India Secretariat and Associate Fellow Geoeconomics Programme at ORF. She holds a Masters degree in Public Policy and ...

Read More +