Author : Cahyo Prihadi

Published on Nov 26, 2020 Commentaries 0 Hours ago

ट्रम्प यांच्यामुळे ‘अमेरिका फर्स्ट’च्या संकुचिततेत अडकेलेली अमेरिका, बायडन यांच्या विजयाने पुन्हा जागतिक राजकीय-आर्थिक व्यवहारात परतेल, अशी आशा आहे.

अमेरिकेच्या निकालाने बदलाचे संकेत

जो बायडन हे अमेरिकेचे नवे अध्यक्ष होणार हे आता निश्चित झाले आहे. अमेरिकेत झालेल्या या सत्तांतरानंतर २० जानेवारी रोजी जेव्हा बायडन अध्यक्षपदाचा पदभार सांभाळतील तेव्हा जगाच्या राजकारणात एक नवा अध्याय सुरू होईल. ट्रम्प यांच्या कालखंडात ‘अमेरिका फर्स्ट’च्या संकुचित घोषणेत अडकेलेली अमेरिका, बायडन यांच्या राज्यात पुन्हा एकदा जागतिक राजकीय-आर्थिक व्यवहारात परतेल, अशी शक्यता निर्माण झाली आहे. अमेरिकेच्या या परतण्याने पुन्हा एकदा जागतिकीकरणाचे चाक वेगाने फिरेल, असाही आशावाद व्यक्त केला जात आहे.

परदेश मंत्री म्हणून अँटनी ब्लिंकन आणि जॉन केरी यांची वातावरण दूत म्हणून केलेली नेमणूक, ही देखील अमेरिका पुन्हा जागतिक व्यवहारात गुंतणार असण्याची चिन्हे आहेत. ब्लिंकन आणि केरी हे दोघेही मुत्सद्दी आंतरराष्ट्रीय व्यवहारातले निष्णात आणि अनुभवी मानले जातात. दोघांनाही आधी सरकारांत काम करण्याचा दीर्घ अनुभव आहे. त्यामुळे या दोघांच्या सल्ल्याने अमेरिका पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय राजकारणात सक्रिय होईल, असे बोलले जात आहे.

दुसऱ्या महायुद्धानंतर आणि १९९० नंतर जगभरचे समाज एकमेकात जास्तीत जास्त गुंतत गेले. जगभरातील देशांदेशांमधील व्यापार वाढला, पैसे-माणसे-तंत्रज्ञान-वस्तू देशांच्या सीमा ओलांडून फिरू लागल्या. या एकूण व्यवहारामुळे एकूणातच जग अधिक समृद्ध झाले. परंतु या घडामोडीत नव्याने एकत्र येणाऱ्या समाजांमधे तणावही निर्माण होत गेले. त्या तणावातूनच ट्रम्पसारख्या संकुचित शक्तींचा विजय झाला. पण आता बायडन यांच्या येण्याने पुन्हा एकदा जागतिकीकरणाचे वारे जोरात वाहू लागले आहेत.

चीनची उत्पादने अमेरिकेत गेल्यामुळे अनेक अमेरिकन उद्योग बंद पडले. अमेरिकेत बेकारी निर्माण झाली. तीच स्थिती चीनमधून जाणाऱ्या मालामुळे जगातील इतर देशातही निर्माण झाली. डोनल्ड ट्रम्प यांनी ‘अमेरिका फर्स्ट’ असे धोरण जाहीर करून, अमेरिकेला जगापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. जवळपास तोच उद्योग ब्रिटनने केला. तर्कालाही न पटणारी कारणे दाखवून, ब्रिटनने युरोपीय बाजारातून काढता पाय घेतला.

जगाची उस्तवारी करण्यात अमेरिकेचा पैसा खर्च होतो असे म्हणत अमेरिका जागतिक आरोग्य संघटना, पॅरिस करार यातून बाहेर पडलीच; पण नेटो या आंतरराष्ट्रीय लष्करी करारातूनही बाहेर पडण्याचे अमेरिकेने ठरवले. युरोपीय संघटनेतही चलबिचल होती. आर्थिक शिस्त पाळायची तयारी नसलेले इटाली आणि ग्रीस हे देश युरोपीय समुदायातून बाहेर पडायच्या गोष्टी करू लागले. त्यात भर पडली ती युरोपात पोचलेल्या स्थलांतरितांची.

सीरियातील यादवीचा परिणाम म्हणून लक्षावधी सीरियन ग्रीसमार्गे युरोपातल्या देशांत पसरले. त्यांना सामावून घेण्याची इच्छा आणि आर्थिक ताकद नसलेले युरोपातले देश स्थलांतरितांना घ्यायला तयार होईनात. फक्त जर्मनीनेच उदारपणे बाहेरच्या लोकाना सामावून घेतले. स्वतंत्रपणे युके आणि युरोपीय संघटना यात तणाव होतेच.

फक्त चीन एवढा एकच देश जगभर पसरत होता. बाकीचे देश आपापल्या सीमांमध्ये स्थिरावू पहत होते.

दुसऱ्या महायुद्धानंतर आणि विशेषतः १९९० च्या डिजिटल क्रांतीनंतर जागतिक व्यापार आणि व्यवहाराला गती मिळत असताना, पुन्हा एकदा युरोपीय देश आणि अमेरिका आपल्या कोषात परतू पहात होते. अमेरिका आणि युकेने त्या व्यवहाराला तीव्र गती दिली. डोनल्ड ट्रम्प हे त्या विचाराचे नेते झाले, बोरिस जॉन्सननी आपला डबा त्यांच्या गाडीला जोडला.

हे झाले देशोदेशांमधील वाढत्या अंतराबाबत. अनेक देशांमधेही अंतर्गत दुफळ्या, त्रिफळ्या माजल्या. त्याचीही कारणे प्रामुख्याने आर्थिकच आहेत. अमेरिकेत श्वेतवर्णीय लोकांनी इतर लोकांपासून दूर जायला सुरुवात केली. त्यात कृष्णवर्णीय, आफ्रोआशियाई, लॅटिनो, मुस्लिम ही मंडळी येतात. ही सर्व मंडळी श्वेतवर्णियांना नकोशी झाली. त्या मंडळींना अमेरिकन श्वेतवर्णियांना सवतीच्या मुलांसारखे वागवायला सुरुवात केली. कृष्णवर्णीय लोकांमधली वाढती गरीबी, त्यांच्यावर होणारे अत्याचार, त्यांची प्रमाणाबाहेर तुरुंगात रवानगी इत्यादी गोष्टी नजरेत भराव्यात इतक्या वाढल्या. युकेमधेही आशियाई आणि मुसलमान लोकांबद्दलचा द्वेष लोकांच्या वागण्यातून दिसू लागला.

युरोपभर गैर-युरोपीय मुसलमान माणसे द्वेषाचा बळी ठरली. आंतरराष्ट्रीय कराराचे बंधन होते म्हणून युरोपने सीरियातून आलेल्या स्थलांतरीताना देशात घेतले, पण ती माणसे आपल्याला नकोत हे दाखवण्याची संधी तिथली माणसे सोडत नाहीत. त्यांना युरोपीय स्वधर्मीय सोडता इतर माणसे आपल्या गावांत नको आहेत. तिकडे अझरबैझानमधे नागोर्नो कारबाखमधे असलेल्या आर्मियन लोकाना अझरबैझानी लोकाबरोबर नांदायचे नाही.

भारतात आसामी लोकांना गैरआसामी लोक त्यांच्या राज्यात नको आहेत आणि देशभर हिंदूना त्यांच्या वस्तीत मुसलमानांना रहायला जागा द्यायची नाही. ख्रिस्ती, मुसलमान आणि हिंदू असे धार्मिक तणाव तर केव्हांपासूनचे आहेत. थोडक्यात असे की जग एकत्र रहायला तयार नाहीये, समाजांना एकटेएकटे घेटो करून रहायची इच्छा आहे. इतर संस्कृती, इतर भाषा, इतर धर्म इत्यादींपासून फटकून रहाण्याकडे जगभर गेला काही काळ कल दिसतोय.

अशा रीतीने इतर जगापासून फटकून राहून चालणार नाही, त्याने कोणाचेच भले होत नाही, हे जगाला समजलंय, कळलंय, पण वळत नाही आहे. फटकून राहून शेवटी सर्वांचाच विकास खुंटणार आहे, जागतिकीकरणामुळे व्यापार आणि एकूण समृद्धी वाढली हे जगाला समजले आहे. परंतु जगभरचे देश एखादे संकट आले की, त्यातून वाट काढायच्या ऐवजी आत्मनिर्भरतेचा शॉर्टकट काढताना दिसतात. डोनाल्ड ट्रम्प त्या प्रवाहाचे अग्रदूत होते. ‘अमेरिका प्रथम’ म्हणता म्हणता त्यांनी ‘अमेरिका एकटी’ अशी स्थिती आणली.

बायडन यांनी केरी यांना वातावरण दूत नेमलेय. ते जागतिक आरोग्य संघटना, पॅरिस करारात पुन्हा शिरतील. युरोपीय आणि चिनी मालावर लादल्या जाणाऱ्या जकाती ते शिथील करतील. नेटो कराराचे नेतृत्व पुन्हा करतील असे नाही, परंतु नेटोवर होणारा खर्च कमी करून कां होईना पण नेटोशी पुन्हा संबंध प्रस्थापित करतील. ट्रम्प भारताशी भांडणे उकरण्याच्या मूडमधे होते, बायडन भारताशी काहीसे बिघडलेले संबंध सुधारतील. इराणबरोबर जगातल्या अनेक देशांनी केलेला अणुकरार ट्रम्प यांनी युरोपीय देशांना न विचारता एकतर्फी पद्धतीने मोडला होता. बायडन तो करार पुन्हा कार्यान्वित करतील, अशी आशा आहे

तिकडे युकेमधले अनेक लोक आता म्हणू लागलेत की, युरोपशी संबंध तोडण्यात चूक झाली. जगाचे तुकडे करण्याचे ट्रम्प यांचे धोरण काही विशिष्ट विचारांवर आधारलेले होते असे नाही. जे काही आहे ते उध्वस्थ करत सुटायचे असे त्यांचे धोरण होते. इराणला आंतरराष्ट्रीय व्यवहारात आणून जगातले तणाव कमी करायचे असे धोरण ओबामा यांनी आखलं होते. या धोरणाला युरोपीय देशांचा पाठिंबा होता. एका परीने आखातातल्या सौदी गटाच्या देशांची तेलावरची मक्तेदारी कमी करणे असेही धोरण त्यात होते. अरब जगातल्या अरेरावीला काहीसा वचक बसवण्याचाही विचार त्यात होता.

ट्रम्प यांनी इराण करार तर मोडलाच परंतु सौदी अरेबियाला आणि पॅलेस्टाईनला मदतीचे आमिष दाखवून इस्रयाल-सौदी दोस्ती घडवून आणण्याचा प्रयत्न केला. तो करताना पॅलेस्टाईनमधल्या इस्रायलच्या घुसखोरीला त्यांनी मान्यता दिली आणि पॅलेस्टाईन स्वतंत्र देश करण्याच्या प्रयत्नांत खीळ घातली. या खटाटोपात सौदी राजपुत्र महंमद सलमान यांच्या गुन्हेगारी वर्तनालाही त्यांनी पाठीशी घातले. हे सारे केवळ सणक आली, म्हणून ट्रम्प करत होते, त्यापाठी कोणताही दूरगामी विचार नव्हता. पण त्यामुळेच जगाचे तुकडे होत होते.

बायडन यांनी ट्रम्प यांची धोरणे उलटी फिरवण्याचे ठरवले असल्याचे संकेत मिळतांना दिसतात. समांतर पातळीवर पोप फ्रान्सिसही तणाव कमी करा, असे म्हणत आहेत. अमेरिकेचे नाव न घेता ते म्हणताहेत की, एखाद्या देशाने मुस्लिम, आफ्रिकी लोकांना आपल्या देशात मज्जाव करणे योग्य नाही. अमेरिकेतल्या अवैज्ञानिक विचार करणाऱ्या लोकांना ते सांगत आहेत की, कोविडची साथ आणि ती साथ थोपवण्याच्या विचार वैज्ञानिक आहे तो नाकारू नका. त्यांच्या या वक्तव्याला अर्थ आहे कारण धर्माचे नाव पुढे करून अनेक इव्हँजेलिकल अमेरिकन साथ अस्तित्वात नाही आणि लस टोचून घेऊ नका, असा प्रचार करत आहेत. इतर धर्माच्या लोकांना शत्रू मानू नका, आपल्याला त्यांच्यासह रहायचे आहे असेही पोप सांगत आहेत.

शहामृग संकट आले की मान वाळून खुपसून संकट जणू नाहीच आहे, असे समजतो. संकट आले की त्याचे खापर इतर देश, इतर धर्म, इतर वर्ण इत्यादींवर फोडून मोकळे होण्याचा प्रयत्न राजकीय पुढारी सत्ता मिळवण्यासाठी करत असतात. हिटलरने नेमके तेच केलं आणि त्याची फार मोठी किमत जगाने मोजली. जो बायडन काय किवा पोप काय, साऱ्या जगाने एकत्र आलं पाहिजे हे सांगत आहेत. कोविड साथीने दाखवून दिलेय की, एकत्र आले तरच कोविडवर आणि कोविडसारख्या असंख्य जागतिक प्रश्नांवर मात करता येईल. जग त्यांना किती सहकार्य करते, हे येणारा काळच सांगेल.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.