Author : Manoj Joshi

Published on Apr 03, 2023 Commentaries 0 Hours ago

शी यांनी अमेरिकेच्या प्रतिबंधात्मक धोरणामुळे उद्भवणारी 'गंभीर आव्हाने' अधोरेखित केली आहेत.

अमेरिका-चीन संबंधातील तणाव

चीन आणि अमेरिका यांच्यातील संबंध सध्या तणावातून जात आहेत. स्पाय बलूनच्या घटनेमुळे आणि ऑकसमधील नुकत्याच झालेल्या घोषणेमुळे निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी  जिनपिंग यांच्याशी संपर्क साधण्याची मागणी केली होती, असे यापूर्वीच अहवालांमधून दिसुन आले आहे. १३ मार्च रोजी सांगता झालेल्या नॅशनल पीपल्स काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये पक्षाच्या अध्यक्षपदी पुन्हा शी यांची निवड झाल्यानंतर हे संभाषण होऊ शकेल अशी अमेरिकेला अपेक्षा होती. पण चीनकडून आतापर्यंत कोणताही प्रतिसाद आलेला नाही. हा खरेतर एक पॅटर्न आहे. अमेरिकेने चीनचा स्पाय बलून पाडल्याच्या पार्श्वभुमीवर त्यांच्या चिनी समकक्षांशी बोलण्याचे अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन यांनी केलेले प्रयत्न फलदायी ठरले नाहीत. तसेच या घटनेमुळे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांचा बीजिंग दौराही रद्द झाला आहे.

गेल्या नोव्हेंबरमध्ये बाली येथे झालेल्या जी २० बैठकीच्या पार्श्‍वभूमीवर बायडेन- शी बैठकीनंतर त्यांच्या उच्चस्तरीय चर्चेत काहीशी सुलभता आणण्याचा ब्लिंकेन भेटीचा उद्देश होता.

शी यांनी आपल्या भाषणातून अमेरिकेवर केलेली टीका हे वाढत्या तणावाचे महत्त्वाचे कारण आहे. शी अमेरिकेवर टीका करताना असे म्हणाले की, युनायटेड स्टेट्सच्या नेतृत्वाखालील पाश्चात्य देशांनी आपल्याला सर्वांगीण मार्गाने अडकवले आणि दडपले आहे, ज्यामुळे आपल्या देशाच्या विकासाला गंभीर आव्हान निर्माण झाले आहे. २०२२ मध्ये केवळ ३ टक्के वाढ झाल्यामुळे मंदावलेल्या अर्थव्यवस्थेच्या परिणामामुळे चीन त्रस्त आहे. हा विकास दर गेल्या अर्ध्या शतकातील दुसरा सर्वात वाईट वार्षिक विकास दर आहे, असे मानण्यात येत आहे. अमेरिका हा चीनचा एकमेव सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे पण चीनची अमेरिकेला होणारी निर्यात १५ टक्क्यांनी कमी झाली असली तरी तिची आयात सुमारे ३ टक्क्यांनी वाढली आहे.

अमेरिकेतील अनेकांचा असा विश्वास आहे की चीन तैवानवर आक्रमण करण्याच्या तयारीत आहे. तसे झाल्यास त्याचे परिणाम दोन्ही देशांसाठी गंभीर होऊ शकतात. चीनकडे तैवानवर मात करण्याची लष्करी क्षमता आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. इतक्या कमी वेळात तैवानवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक असलेले जवळपास अर्धा दशलक्ष किंवा अधिक सैन्य आणण्यासाठी लागणारी एंफीबियस व एअरलिफ्ट करण्याची क्षमता सध्या चीनकडे नाही. या कारणास्तव, अनेकांना अशी शंका आहे की चीन एक वेगळी रणनीती आखेल. यात तैवानमध्ये अंशत: नाकेबंदी करणे,  इंटरनेट लिंक कापून टाकणे आणि शेवटचा उपाय म्हणून त्यावर आक्रमण करणे यावर लक्ष केंद्रित करणे याचा समावेश असेल. परंतु यामुळे अमेरिकेच्या काउंटर नाकेबंदीचा धोका कायम आहे.

अमेरिका हा चीनचा एकमेव सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे पण चीनची अमेरिकेला होणारी निर्यात १५ टक्क्यांनी कमी झाली असली तरी तिची आयात सुमारे ३ टक्क्यांनी वाढली आहे.

अशा नाकाबंदीमुळे अँटीबायोटिक्स बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इंग्रिडियंट्स (एपीआय) औषधांसारखी प्रमुख आयात नाकारली जाण्याची शक्यता आहे. चिनी लोक सुमारे २० टक्के अँटीबायोटिक्स अमेरिकेतून आयात करतात म्हणून कदाचित चीनलाच याचा फटका बसण्याची अधिक शक्यता आहे. सेल फोन आणि इलेक्ट्रिक वाहनांसाठी लिथियम-आयन बॅटरीसारख्या घटकांसाठी चीन हा एक महत्त्वपूर्ण पुरवठादार आहे. अमेरिकन कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स सेक्टरलाही याचा मोठा फटका बसणार आहे. कपडे, फर्निचर, यंत्रसामग्री, ऑटोमोबाईल्स, दूरसंचार उपकरणे यांसारख्या क्षेत्रांवरही याचा परिणाम दिसुन येणार आहे.

परंतु चीनसाठी त्याचे परिणाम आपत्तीपेक्षा कमी असणार नाहीत.चीन हा तेल आणि नैसर्गिक वायूच्या आयातीवर अवलंबून आहे आणि दुसरे म्हणजे, त्याला मोठ्या प्रमाणात अन्न आयात करणे गरजेचे आहे. रशिया व मध्य आशियातील पुरवठादार आणि चीन यांच्यातील पाइपलाइनमुळे तेल आणि वायूची काही असुरक्षितता काही प्रमाणात कमी झाली आहे. पण तरीही, चीनकडून आयात होणाऱ्या तेलांपैकी ८० टक्के तेल हिंदी महासागरमार्गे जाते, हे लक्षात घ्यायला हवे.

पण चीनची खरी अगतिकता अन्नाच्या क्षेत्रात आहे. लेखक एडवर्ड लुटवाक यांनी निदर्शनास आणल्याप्रमाणे, चीन हे जगातील सर्वात मोठे चिकन, मटण, गोमांस आणि दुग्धजन्य पदार्थ तसेच सोयाबीन, मका, गहू आणि ज्वारीच्या रूपात पशुखाद्याचे आयातदार राष्ट्र आहे. तसेच तणाव असूनही, आज अमेरिकेची सर्वात मोठी कृषी निर्यात बाजारपेठ म्हणुन चीनकडे पाहिले जाते.

२०२० मध्ये, चीनने प्रामुख्याने ब्राझील आणि अर्जेंटिना येथून २ दशलक्ष टन गोमांस आयात केले आहे. अमेरिका आणि युक्रेनमधून प्रामुख्याने २० दशलक्ष टन मका आयात केला आहे. यूएससह विविध स्त्रोतांकडून ४.५ दशलक्ष टन डुकराचे मांस व ८ दशलक्ष टन गहू प्रामुख्याने अमेरिका, कॅनडा आणि फ्रान्समधून आयात करण्यात आले आहे. याशिवाय पशुखाद्य म्हणून काही १०० दशलक्ष टन सोयाबीन; आणि ८ दशलक्ष टन खाद्यतेल देखील आयात करण्यात आले आहे. चीनची लोकसंख्या जसजशी वाढत जाईल आणि तिचे शहरीकरण होईल, तसतशी ही अन्नाच्या बाबतीतील असुरक्षितताही वाढत जाणार आहे. लुटवाक यांनी चीनच्या एक- पाल्य नियमानुसार पीएलएच्या जीवितहानी करण्याच्या क्षमतेचा मुद्दा देखील उपस्थित केला आहे.

अमेरिकेला चीनचा मुख्य भूभाग आणि तैवानपासून दूर ठेवण्याची क्षमता कदाचित चीनमध्ये असू शकेल, परंतु प्रशांत महासागर आणि हिंदी महासागराच्या उर्वरित भागात युद्धासारख्या परिस्थितीत काम करू शकणारे नौदल त्यांच्याजवळ अजिबात नाही. सध्याच्या घडीला पॅसिफिक आणि हिंदी महासागरात यूएस नौदल सर्वात शक्तिशाली आहे.

धोरणात्मक पातळीवर, चीन आत्मनिर्भरता आणि पुरवठा शृंखला लवचिकता या कल्पनेला दोन दशके आणि त्याहून अधिक काळ प्रोत्साहन देत आहे. उर्वरित जगाला याचा अनुभव कोविड काळातील अनुभवावरून आलेला आहे. ऑस्ट्रेलियन स्ट्रॅटेजिक पॉलिसी इन्स्टिट्यूटनुसार, चीन आता संरक्षण, अंतराळ, रोबोटिक्स, ऊर्जा, पर्यावरण, जैवतंत्रज्ञान, प्रगत साहित्य आणि उत्पादन, तसेच एआय आणि क्वांटम तंत्रज्ञानाशी संबंधित अत्यावश्यक तंत्रज्ञानामध्ये जगात आघाडीवर आहे.

अमेरिकेला चीनचा मुख्य भूभाग आणि तैवानपासून दूर ठेवण्याची क्षमता कदाचित चीनमध्ये असू शकेल, परंतु प्रशांत महासागर आणि हिंदी महासागराच्या उर्वरित भागात युद्धासारख्या परिस्थितीत काम करू शकणारे नौदल त्यांच्याजवळ अजिबात नाही.

स्वावलंबनावर भर देऊन आपल्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासाच्या जोरावर बाह्य आणि अंतर्गत आव्हानांवर आपण मात करू, अशी चीनची अपेक्षा आहे. देशांतर्गत वापराला चालना देणे आणि जागतिक पुरवठा साखळ्यांवरील त्याचे अवलंबित्व कमी करणे हे उद्दिष्ट असलेल्या ‘ड्युअल सर्क्युलेशन’ ची संकल्पना चीनमध्ये मोठ्याप्रमाणावर वापरली जाते. असे असले तरी शेतीच्या क्षेत्रात मात्र त्यांचे हात बांधले गेले आहेत.

कोणत्याही परिस्थितीत, सर्व क्षेत्रातील स्वावलंबन भविष्यासाठी निकडीचे आहे. पुढील पाच वर्षांत तैवानच्या प्रश्नाला वेगळी दिशा मिळू शकेल. सध्या, मात्र चीन उर्वरित जगावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. चीन युद्धाचा निर्णय घेणार की नाही हे आत्ता कोणीही सांगू शकत नाही. युद्धाशी संबंधित सर्वच जोखमींचा विचार सर्वार्थाने नेत्यांना करता येतोच असे नाही हे आपल्याला इतिहासावरून दिसुन आले आहे.

हे भाष्य मूळतः The Tribune मध्ये प्रसिद्ध झाले आहे.

हे लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.

Author

Manoj Joshi

Manoj Joshi

Manoj Joshi is a Distinguished Fellow at the ORF. He has been a journalist specialising on national and international politics and is a commentator and ...

Read More +