Published on Jul 30, 2020 Commentaries 0 Hours ago

सौम्यसंपदा किंवा सॉफ्टपॉवर हा केवळ सरकारने हाताळण्याचा विषय आहे, असे न मानता आपण सगळ्यांनी एकजुटीने त्यासाठी प्रयत्न करायला हवेत.

‘भारताची सॉफ्टपॉवर’ समजून घेताना…

सौम्यसंपदा (Softpower) ही संकल्पना एका अर्थाने जगासाठी नवीन आहे. पण, भारतात या सौम्यसंपदेची साक्ष आपल्या इतिहासात अनेकदा सापडते. इतिहासात डोकावून पाहिले तर, साधारण १९९० च्या सुमारास अमेरिकन व्यवस्थापनतज्ज्ञ जोसेफ नाय यांनी ‘सॉफ्टपॉवर’ हा शब्द पहिल्यांदा वापरला. सॉफ्टपॉवर या विषयावर त्यांनी एक ग्रंथही लिहिला. त्यानंतर जगात ‘सॉफ्टपॉवर’ या संकल्पनेचा खऱ्या अर्थाने वापर सुरु झाला. परंतु भारतीय सॉफ्टपॉवरची परंपरा फार जुनी आहे. आपले सौम्यसंपदा या विषयातले संचितही अतुलनीय, अपरिचित आणि असाधारण आहे. त्यामुळे भारताविषयी जी मोहिनी, कुतूहल जगात आपल्याला पाहायला मिळते, ही आपली खरी सौम्यसंपदा आहे.

भारतात येणारा माणूस, भारताविषयी खूप प्रभावित होऊन जातो, याची अनेक उदाहरणे आपल्याला देता येतील. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन, बराक ओबामा भारतात आले आणि त्यानंतर त्यांच्या भारताकडे बघण्याच्या दृष्टीकोनात अमूलाग्र बदल झाला. जगभरातील विविध देशांमध्ये भारताबद्दल हा अनुभव अनेकदा येतो.

काही वर्षांपूर्वी मी ऑस्ट्रियातील सार्झबर्गमध्ये गेलो होतो. तेथे लोकशाही या विषयावरील एका परिसंवादात माझे भाषण होते. त्या परिसंवादात भारतामध्ये ज्यांनी ब्रिटनचे राजदूत म्हणून काम पाहिलेले डेव्हिड गोर बुथ हे फार मोठे ब्रिटिश मुत्सद्दी तेथे सपत्निक सहभागी झाले होते. या चार दिवसांच्या काळात आमची अनेकदा गाठभेट झाली. डेव्हिड बुथ यांच्या पत्नी भारताबद्दलच्या अनेक गोष्टी मला विचारत, त्यांचे अनुभव सांगत. त्या परिसंवादात लेटविया देशाच्या राष्ट्रप्रमुख श्रीमती फ्रायबर्गा समारोपाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून आमंत्रित होत्या. ‘लोकशाहीची तत्त्वे आणि सार्वभौमत्व’ या विषयावर त्या भाषण देत होत्या. तेव्हा डेव्हिड यांच्या पत्नी मला म्हणाल्या की, फ्रायबर्गा बाई व्यासपीठावरून खाली आल्यावर त्यांना जाऊन भेटा. त्यांना सांगा की, ‘लोकशाही, लोकशाहीची ताकद आणि जनतेचे सार्वभौमत्व’ या विषयावर तुम्ही आम्हाला भाषण द्यायची गरज नाही. तुमचा पूर्ण देश आमच्या मुंबईच्या एका लोकल ट्रेनमध्ये मावेल. भारताची लोकशाही विषयीची मूलभूत धारणा, लोकशाही संबंधातली आपली विश्वसनीयता, लोकतांत्रिक व्यवस्थेमुळे घट्ट रुजलेली आपली पाळमुळे या विषयीची इतकी खात्री श्रीमती डेव्हिड बूथ यांना होती! 

म्हणूनच भारतात येणाऱ्यांना, भारताविषयीच्या अनुभवातून, भारताविषयीच्या आकलनामध्ये वाढ झाल्यामुळे, भारताविषयीचे कुतूहल शमल्यामुळे त्यांची ‘भारत साक्षरता’ वाढते. या प्रकारचे कुतूहल, या प्रकारची सदिच्छाशक्ती, भारताबद्दल अधिकाधिक जाणून घेण्याची तीव्र इच्छा ही जगामध्ये सगळीकडे पाहायला मिळते. हे आपले सौम्यसंपदेच्या बाबतीतले भांडवल आहे. त्यामुळे आता या सदिच्छेला, कुतूहलाला जोपर्यंत भारताविषयीच्या आकलनामध्ये परावर्तित आपण करणार नाही, तोपर्यंत सौम्यसंपदा विकसित झाली असे आपल्याला म्हणता येणार नाही.

साधारणतः दुसऱ्या महायुद्धानंतर चाळीस वर्षाच्या काळात अनेक छोटी मोठी युद्धे झाली. या युद्धानंतर जगभरातील जनमानसात एक धारणा निश्चित झाली की, आता मोठमोठी आण्विक शस्त्रास्त्र असलेल्या देशांची संख्या वाढत असताना, आपल्याला सैन्य बळाच्या वा सामरिक शक्तीच्या आधारावर प्रभाव निर्माण करणे शक्य नाही. युद्ध खेळून एखादा भूभाग ताब्यात घेण्यापेक्षा लोकांच्या विचार व्यवहारांवर आपला प्रभाव स्थापित करणे, अधिक महत्त्वाचे आहे हे बड्या राष्ट्रांना कळून चुकले. त्यामुळेच १९९० नंतर सौम्यसंपदा रुजण्याची औपचारिकरित्या सुरुवात झाली

सौम्यसंपदेचा संदर्भ जगाच्या इतिहासात अनेक शतके असला तरी, भारताचा शोध हा सौम्यसंपदेमुळेच लागला. मसाल्याच्या पदार्थांच्या शोधात कोलंबस आणि वास्को-द-गामा यांनी भारताचा शोध घेतला. मसाल्याचे पदार्थ ही आपली सौम्यसंपदा आहे. दक्षिण पूर्व आशियामध्ये आजही भारतीय संस्कृतीची पदचिन्हे दिसतात. भारतीय सांस्कृतिक संसद परिषदेतर्फे( Indian Culture For Cultural Relations) दरवर्षी रामायण महोत्सव आयोजित केला जातो. या महोत्सवामध्ये इंडोनेशियातील काही मुस्लिम पथकेही सहभागी होतात. तिथली पथके व कलाकार आम्हाला सांगतात की, आम्ही धर्म बदलला असेल पण आमची संस्कृती तीच आहे. ही देखील आपली सौम्यसंपदा आहे. 

भारताचा इतिहास ही आपली सगळ्यात मोठी सौम्यसंपदा आहे. आपल्या अनेक वर्षाचा इतिहासामध्ये भारतीयांनी एखाद्या दुसऱ्या प्रदेशावर आक्रमण केले आणि तो प्रदेश कायमचा ताब्यात घेतला असे झालेले नाही. प्रभू रामचंद्रांनी त्यांच्या काळात श्रीलंकेचा प्रदेश जिंकून घेण्याचा प्रयत्न केला, रावणाबरोबर युद्ध केले परंतु लंका रामाच्या साम्राज्याचा भाग बनली नाही. बिभीषणाकडेच लंकेची सूत्रे सोपवली आणि ते आयोध्येला परतले.  त्यामुळे एक आक्रमक राष्ट्र अशी भारताची ओळख पूर्वीपासून नाही. त्यामुळे आक्रमक राष्ट्र नसण्याची वास्तविकता हा आपल्या अस्मितेचा एक अविभाज्य भाग आहे आणि म्हणून ती आपली महत्त्वाची सौम्यसंपदा आहे. 

जे ईस्ट इंडिया कंपनीने वसाहती स्थापून केले ते आपण करू शकलो नाही, कारण तो आपला स्वभाव नाही. आपण सदिच्छादूत, ज्ञानाचे वाहक म्हणून अनेक ठिकाणी गेलो, परंतु आक्रमक म्हणून भारतीय कधीच गेले नाहीत. दुसरी आपली सौम्यसंपदा ही लोकतांत्रिक परंपरा आहे. तिची गंगोत्री ही आध्यात्मिक लोकशाही आहे. ‘एकम् सत विप्रा बहुधा वदन्ति’ हे आपले सूत्र आहे. म्हणजे ईश्वरापर्यंत पोहोचण्याचे मार्ग अनेक आहेत, पण जिथे पोहोचायचे आहे ते स्थान एकच आहे. ही धारणा आपण स्वीकारल्यामुळे आपण आध्यात्मिक लोकशाहीच्या (Spiritual Democracy) आधाराने जीवनव्यवहार करतो. त्यामुळे कोणत्याही एका उपासनेचे धुरीणत्व (Hegemony) आपल्या देशात निर्माण झालेले नाही. या दृष्टीने जीवनातल्या सर्व व्यवहारांकडे बघणे, हा देखील आपल्या सौम्यसंपदेचा एक भाग आहे. 

तिसरा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे भारताची ज्ञानपरंपरा. गांधीवादी विचारसरणीचे लेखक धरमपाल यांनी ‘द ब्युटिफुल ट्री’ या पुस्तकात सोळाव्या शतकात देखील मुलींना शिक्षण दिले जात असे व शिक्षणामध्ये भेदभाव केला जात नसे, असा उल्लेख केला आहे. त्यामुळे भारताची शिक्षणाची, ज्ञानाची परंपरा ही जुनी आहे. मध्यंतरी मी तेहरानला पर्शियन आणि संस्कृत भाषेमधल्या साधर्म्याविषयी आयोजित केलेल्या चर्चासत्रात सहभागी झालो होतो. तेव्हा तेहरान विद्यापीठाच्या कुलगुरूंनी मला विचारले की, आमच्या विद्यापीठांमध्ये आम्ही उपनिषदे शिकवितो. तुमच्या देशात कोणी उपनिषदे शिकवते का? त्यावेळी माझ्या मनात प्रश्नांचे काहूर उभे राहिले. फाईहान, अलमेरू ही परदेशी मंडळी भारतात पर्यटनासाठी आली नव्हती, तर ही सगळी मंडळी भारतातील तक्षशिला, नालंदा यांसारख्या ज्ञानगंगेच्या शोधामुळे भारतात आकर्षित झाली होती. म्हणून ही ज्ञानपरंपरा हा भारतीय सौम्यसंपदेचा तिसरा महत्त्वाचा घटक आहे. 

चौथा घटक आहे तो म्हणजे आपली सामाजिक आणि विशिष्ट कुटुंब व्यवस्था. कुटुंब व्यवस्थेला केवळ गृहीत धरल्यामुळे आपल्याला तिचं महत्त्व वाटत नाही. परंतु कुटुंब व्यवस्था ही गृहीत धरण्याची नव्हे तर जाणीवपूर्वक जोपासण्याची एक सामाजिक संस्था आहे. कुटुंब व्यवस्था हा आपल्या सामाजिक संरचनेचा पायाभूत घटक आहे. आज जगात अनेक ठिकाणी कुटुंब व्यवस्था कोलमडत असताना भारतात मात्र ती तग धरून आहे. तशीच इथली सामाजिक व्यवस्था आहे

आपल्याकडे सामाजिक ताण-तणाव, जातिभेद या विकृती असल्या तरी सामाजिक न्याय हा सर्वतोपरी आहे. आपण व्यक्ती आणि समाज यांच्यातील नात कसे असावे, याचा अत्यंत संकुचित विचार करतो. आपली धारणा अतिरेकी व्यक्तीवादी नाही, जशी अमेरिकेची आहे. भारतीय धारणा, व्यक्ती आणि समाजाचे नाते हे शरीर आणि अवयवांच्या नात्यासमान मानते. शरीराच्या एखाद्या अवयवाला दुखापत झाली की, पूर्ण शरीराला इजा होते तसेच भारतातला प्रत्येक समाजघटक भारतीय समाजाशी एकरूप झालेला आहे. 

भारतीय सौम्यसंपदेचा पाचवा महत्त्वाचा घटक आहे ‘शाश्वतता'(Sustainability). म्हणजेच निसर्गाशी नाते सांगण्याचा आपले प्रयत्न, ज्यामध्ये निसर्गाला आपण कधी स्पर्धक मानलेले नाही. निसर्गावर विजय मिळवावा अशी भाषा आपण वापरलेली नाही. निसर्गाशी साहचर्य राखून आपण नैसर्गिकतेच्या अंगाने विचार करत गेलो त्यामुळे आपल्याला शाश्वततेच्या विषयात देखील एक वैचारिक परंपरा आहे. 

या पाचही सौम्यसंपदेची काही उपकरणे आहेत. त्यातले पहिले उपकरण रामायण, महाभारत या पौराणिक संपदेविषयीचे आकलन निर्माण करण्याशी निगडित आहे. आपली परंपरा, इतिहास, ऐतिहासिक वास्तू, किल्ले, प्राचीन मंदिरे आणि लेणी, आपल्या शिल्पकला, नृत्यकला या गोष्टी आपल्या सांस्कृतिक संपदेच्या उपकरणांचे घटक आहेत. आज जगाच्या कानाकोपऱ्यात भारतीय खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्यायला मिळतो, त्यामुळे आपली खाद्यसंस्कृती ही अगदी प्राचीन काळापासून आपली महत्त्वाची सौम्यसंपदा आहे. 

या सर्व सौम्यसंपदांविषयी आपल्यात आकलन निर्माण होऊन जबाबदारीचे भान येणे गरजेचे आहे. सौम्यसंपदा हा केवळ सरकारने हाताळण्याचा विषय आहे, असे न मानता आपण सगळ्यांनी एकजुटीने त्यासाठी प्रयत्न करायला हवेत. २०१४ मध्ये नरेंद्र मोदी सरकारने परराष्ट्रीय धोरणाचे काही मूलभूत घटक नव्याने व्याख्यित केले होते. त्यामध्ये संवाद, साधर्म्य, समृद्धी, सुरक्षा, संस्कृती आणि सन्मान या घटकांचा समावेश होता. या सगळ्या विषयीचा आपल्या दृष्टीकोनातला परिचय हा भारतीय व्यक्तीच्या आचरणातून परदेशी व्यक्तीला होणार आहे, हे आपण लक्षात घ्यायला हवे. 

खरेतर आपली अवस्था ‘तुझे आहे तुजपाशी, परि तू जागा चुकलासी’ अशी आहे. कधी कधी कस्तुरीमृगाप्रमाणे आपल्याला कळत नाही की, आपल्याकडे सौम्यसंपदेचे एवढे मोठे संचित आहे. यापुढे आपल्याकडे असलेल्या या अमूल्य गोष्टींचे भान राखून, ती अधिकाधिक वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत.

(डॉ. विनय सहस्रबुद्धे हे ज्येष्ठ विचारवंत, राज्यसभेचे खासदार, भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष आहेत. त्यांनी ओआरएफ मराठीच्या ‘#विश्ववेध व्याख्यानमाले’मध्ये दिलेल्या व्याख्यानाचे हे संकलित शब्दांकन आहे. हे व्याख्यान मूळातून ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.)

शब्दांकन- स्नेहल जंगम

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.