Author : Sunil Tambe

Published on Jun 04, 2020 Commentaries 0 Hours ago

चीन अजूनही स्वतःला कम्युनिस्ट म्हणवतो पण शी जिन पिंग यांच्या नेतृत्वाखाली चीनचा साम्राज्य विस्तार सुरू झाला आहे. त्यामुळे कन्फ्युशिअसचा पुनर्जन्म होतो आहे.

भूगोलाने घडवलेला चीनचा इतिहास

Source Image: worldatlas.com

(‘चीन आणि सभ्यताधिष्ठीत राष्ट्र’ या लेखमालेचा हा तिसरा भाग आहे. पहिला आणि दुसरा भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा.)

कोणत्याही भूभागाच्या इतिहासावर तेथील भूगोलाचा फार मोठा प्रभाव असतो. किंबहुना भूगोलातील रचनाच तेथील इतिहासाला आकार देतात, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. आज जागतिक महासत्ता म्हणून अमेरिकाच्याही तोंडात फेस आणणाऱ्या चीनचा इतिहासही असाच भूगोलाने घडविलेला आहे. भारताचा सख्खा शेजारी आणि भूराजकीयदृष्ट्या अंत्यत महत्त्वाचा देश असलेल्या चीनचा हा भूगोल आणि त्यावर उभा असलेला इतिहास आपल्याला व्यवस्थित माहिती असणे आवश्यक आहे.

यांगत्से आणि व्हांगह किंवा पीत नदी या चीनमधील दोन महत्त्वाच्या नद्या. या दोन नद्यांच्या पुरांवर नियंत्रण मिळवणे, या नद्यांच्या क्षमतांचा म्हणजेच पिण्याचे पाणी, मासेमारी, पाटबंधारे व उद्योगांना पाणी पुरवठा, जलविद्युत, वाहतूक, पर्यटन, इत्यादी, पूर्ण विकास साधणे आणि या दोन नद्यांच्या खोर्‍यातील हान वंशियांचे ऐक्य सिद्ध करणे, हे कायमच चीन साम्राज्याची उद्दिष्ट्ये राहिली आहेत.

या हान वंशियांच्या सुखासाठी, सुरक्षिततेसाठी जी बिगर हान क्षेत्रे आहेत, मग ती जमीनीवर असो, गोड्या पाण्याच्या जागा असो किंवा समुद्र (तिबेट, शिंगजिआन, मंगोलिया, कोरिया, दक्षिण चिनी समुद्र, प्रशांत महासागर, इत्यादी) हे आपल्या वर्चस्वाखाली आणणे हा चिनी साम्राज्याचा इतिहास राहिला आहे. अगदी इसवीसनपूर्व काळापासून आज एकविसाव्या शतकापर्यंतचा हा इतिहास अनेक चढ-उतारांचा आहे. आता एकविसाव्या शतकात तर या इतिहासाने कळसाध्याय गाठला आहे.

चिनी भूगोल अभ्यासक हू ह्यूयोंग यांनी १९३४ साली चिनी लोकसंख्येची विभागणी करणारी एक काल्पनिक रेषा चीनच्या नकाशावर काढली. पीत नदी आणि यांगत्से या दोन नद्यांच्या खोर्‍यांचा हा प्रदेश आहे. आजच्या चीनच्या ईशान्येकडील हेहो शहरापासून नैऋत्येच्या तोंगचॉन शहरापर्यंत काढलेल्या या रेषेच्या पश्चिमेकडे चीनचा एकूण ६४ टक्के भूभाग आहे, मात्र तेथील लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या केवळ ४ टक्के आहे. या रेषेच्या पूर्वेकडील चीनचा भूभाग केवळ ३६ टक्के आहे. पण या प्रदेशातील चीनची लोकसंख्या ९६ टक्के आहे. एवढी स्पष्ट मांडणी हा भूगोल अभ्यासक आपल्याला उलगडून दाखवतो. ही ९६ टक्के लोकसंख्या अर्थातच शंभर टक्के हान वंशीयांची होती. इसवीसनपूर्व काळापासून आजवर त्यामध्ये फारसा बदल झालेला नाही. या रेषेच्या पश्चिमेकडील प्रदेशात हान वंशीयांची लोकसंख्या गेल्या सत्तर वर्षांत वाढली आहे.

आपण चीनचा नकाशा पाहिला की कळते की, आपल्या मोजमापानुसार चीन हा जगातला तिसरा किंवा चौथा किंवा पाचवा सर्वात मोठा देश आहे. पश्चिमेला तिबेटचे पठार आहे. सुमारे २५ लाख चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेला हा प्रदेश समुद्र सपाटीपासून १३००० ते १५००० फूट उंचीवर आहे.  तिबेटच्या दक्षिणेला आणि पश्चिमेला जगातील सर्वात उंच पर्वत रांग असलेला हिमालय आहे. तिबेटमध्ये सुमारे सात हजार हिमनद्या आहेत. सिंधू, सतलुज, ब्रह्मपुत्रा, हाँगहे वा पीतनदी, यांगत्से, मेकाँग, इरावंडी या प्रमुख नद्यांचे उगम तिबेटमध्ये आहेत. डोंगराळ आणि गवताळ प्रदेशातील लोकसंख्या कमालीची विरळ आहे. तिथे शेती शक्य नाही.

तिबेटी लोकांच्या आहारात त्यामुळे वनस्पतींचे प्रमाण नसल्यात जमा आहे. अन्नधान्य त्यांना इतर प्रदेशातून आणावे लागते. याक, शेळ्यामेंढ्या, घोडे यांचे कळप म्हणजे तिबेटी लोकांचे अन्नप्रक्रिया उद्योग आहेत. माणसे ज्या वनस्पती खाऊ शकत नाहीत, त्याचे भक्षण करून हे प्राणी त्याचे रुपांतर माणसांना खाण्यायोग्य मांस व दूध यामध्ये करतात. तसेच माणसाला लोकर आणि कातडीही देतात.

तिबेटच्या उत्तरेला शिंगजीयान वा उघ्यूर आहे. भारताचा अक्साई चीन हा प्रदेश याच प्रांतात येतो. मंगोलिया, रशिया, कझाकस्तान, किरगीझीस्तान, ताजिकीस्तान, पाकिस्तान, अफगाणिस्तान यांच्या सरहद्दींना भिडणारा हा प्रदेश आहे. ‘चायना-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर’ (सीपेक) याच प्रदेशातून जातो. काराकोरम, कुलुन आणि तिआनशान या तीन उत्तुंग पर्वतरांगांच्यामध्ये असणारे टाक्लमकान वाळवंट याच प्रदेशात आहे. सुमारे सोळा लाख चौरस किलोमीटरच्या या प्रदेशात लोकवस्ती कमालीची विरळ आहे.

चीनच्या उत्तरेला मंगोलिया आहे. त्यापैकी इनर मंगोलिया हा तर चीनचाच प्रांत आहे. गोबीचे वाळवंट इथे आहे. सुमारे बारा लाख चौरस किलोमीटरच्या या प्रदेशातही लोकसंख्या विरळ आहे. गोबीचे वाळवंट आणि तिबेटचे पठार यांच्यामधून म्हणजे सध्याच्या शिंगजीयान प्रांतातून प्राचीन रेशीम मार्ग जायचा. चीनच्या नैऋत्येला म्यानमार, लाओस आणि विएतनाम यांच्या सीमा भिडलेल्या आहेत. हा प्रदेश डोंगराळ आणि घनदाट जंगलांचा आहे. चीनच्या दक्षिणेला समुद्र आहे तर पूर्वेला प्रशांत महासागर.

पश्चिम, वायव्य आणि उत्तर या तीन दिशांकडून चीनवर आक्रमण होणे जवळपास अशक्य होते. कारण हे प्रदेश वैराण आणि दुर्गम होते आणि आजही आहेत. प्राचीन काळात वा आधुनिक काळातही या प्रदेशातून सैन्याला आगेकूच करणे अतिशय अवघड आहे. कारण रसद केव्हाही तोडता येणे शक्य आहे.

प्राचीन वा मध्ययुगीन काळात चीनला जाणे आणि तिथून परतणे ही बाब अशक्य नव्हती, परंतु अवघड आणि दुस्तर होती. व्यापार होता परंतु त्याची गती संथ होती. व्हांगह आणि यांगत्से नद्यांच्या खोर्‍यातील कृषी संस्कृतीवर आधारलेल्या संपन्न चीनचा जगातील विविध संस्कृतींशी, रोम वा भारत वा अन्य कोणत्याही, थेट संबंध आला नाही. तेथील ज्ञान-विज्ञान, विचार चीनपर्यंत पोचले नाहीत. त्यामुळे चीनमध्ये हजारो वर्षांपासून संस्कृतीचे सातत्य दिसून येते.

चहा, रेशीम, कागद, चिनीमातीची भांडी, दारुगोळा, छपाई, चलनी नोटा, होकायंत्र, होडीचे सुकाणू ते जहाजबांधणी, असे अनेक शोध व्हांगह आणि यांगत्से या नदीच्या खोर्‍यातील कृषी संस्कृतीने लावले. इतर कोणत्याही प्रगत संस्कृतीकडून देवाण-घेवाण न करता चिनी लोकांचा परकियांवर कमालीचा अविश्वास होता. त्यामुळे चहा असो की रेशीम वा चिनीमातीची भांडी यांच्या निर्मितीचे तंत्र काही शतके त्यांनी गोपनीय ठेवले होते. गुप्तता पाळण्याची चीनी सवय ही म्हणूनच ऐतिहासिक ठरते.

चीनचे अश्रू आणि संस्कृतीचा पाळणा

चीन राष्ट्राच्या निर्मितीला व्हांगह हे वा पीत नदी कारणीभूत ठरली, असे लोकप्रिय जागतिक इतिहासकार युवाल हरारी नोंदवतात. व्हांगह वा पीत नदीचा उगम तिबेटमध्ये आहे. तिथून ती पूर्वेला वाहात जाते. ही नदी प्रचंड प्रमाणात गाळ घेऊन वाहते, त्यामुळे तिचा प्रवाह अनेक ठिकाणी अडत असे. अनेक ठिकाणी ही नदी प्रवाह बदलत असे आणि प्रचंड पूर येई. म्हणून तर या नदीला चीनचे अश्रू असेही म्हणतात (आपल्या देशातील कोसी नदीची इथे आठवण होते). या नदीच्या महापुरात आणि दुष्काळात आजवर लक्षावधी लोक ठार झाले आहेत. या नदीच्या किनार्‍याने अनेक जमाती होत्या. पण नदीच्या प्रलयंकारी पुरांवर नियंत्रण मिळवणे त्यांना शक्य नव्हते. कारण प्रत्येक जमात नदीच्या एका छोट्या तुकड्यावर नियंत्रण ठेवून होती.

संपूर्ण नदीला गवसणी घालणारी उपाययोजना केल्याशिवाय या पुरांपासून संरक्षण मिळणे शक्य नव्हते. या जमातींमध्ये संघर्ष होते पण अतिशय गुंतागुंतीच्या संघर्ष आणि सहकार्याच्या प्रक्रियेतून या सर्व जमाती एकत्र यायला सुरुवात झाली. म्हणून तर या नदीला चिनी संस्कृतीचा पाळणा म्हटले जाते. यथावकाश त्यातून चीन या राष्ट्राची निर्मिती झाली. इसवीसन पूर्व काळात. कारण या नदीच्या पुरावर संपूर्ण नाही परंतु थोडेबहुत नियंत्रण मिळवण्यात राज्यकर्त्यांना यश मिळाले.

बंधारे आणि पाणीसाठ्यांची एक व्यवस्था त्यांनी निर्माण केली. तिच्या देखभालीची यंत्रणा उभारली. त्यामुळे या नदीच्या खोर्‍यातील अन्नधान्याच्या उत्पादनात वाढ झाली, माशांचे उत्पादन वाढले, राज्याचा महसूल वाढला. राज्य समृद्ध आणि संपन्न झाले. गुलामी होती, विषमता होती, अन्याय होता पण जास्तीत जास्त लोकांचे अधिकाधिक भले झाले. म्हणून तर या राज्यावर उत्तरेकडून हल्ले होऊ लागले. लुटालूट करण्यासाठी.

चीनच्या भिंतीची गोष्ट

या टोळ्यांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी लांबलचक भिंत वा तट बांधण्याचा प्रकल्प राज्यकर्त्यांनी हाती घेतला. पिढ्यानपिढ्या ही भिंत बांधण्याचे काम सुरू होते. राजे बदलले, राजघराणी बदलली पण भिंत बांधण्याचे काम सुरूच राहिले. हे काम सातत्याने सुरू राहावे एवढी सुबत्ता आणि स्थैर्य तेथे नांदत होते. शेती आणि व्यापार करणारे “सुसंस्कृत” हान भिंतीच्या अल्याड तर “रानटी” पशुपालक टोळ्या भिंतीच्या पल्याड अशी वाटणी या भिंतीने केली.

ची हु आंग डी हा चीनचा पहिला सम्राट. वयाच्या तेराव्या वर्षी तो राजा झाला. व्हांगह आणि यांगत्से नदीच्या खोर्‍यातील सात राजांचा निर्णायक पराभव करून त्याने स्वतःला सम्राट घोषित केले. साम्राज्याचा कारभार चालवण्याची केंद्रीय पद्धत त्याने निर्माण केली. त्यापूर्वी विविध उमराव आपआपले सैन्य बाळगायचे. या सम्राटाने सैन्य पूर्णपणे आपल्या अधिकाराखाली आणले. राज्यकारभार चालवण्यासाठी गुणवान माणसे हवीत, जमात, घराणे यांच्याशी बांधिलकी असणारे उमराव, अधिकारी दूर करण्यासाठी या सम्राटाने लेखी परिक्षा आणि मुलाखतींची पद्धत अंमलात आणली.

त्यावेळच्या चीनमध्ये अनेक भाषा बोलल्या जात. त्यामुळे साम्राज्याला तडे जाऊ शकतात हे हेरून या सम्राटाने चीनी भाषेचे आणि लिपीचे प्रमाणीकरण केले. वजने, मापे, चलन यांचेही प्रमाणीकरण केले. त्यामुळे व्यापाराला चालना मिळाली. व्हांगह नदीला बांध घालून, कालवे काढून पूर आणि दुष्काळावर नियंत्रण मिळवले. नवे युद्धतंत्र विकसित केले. शेती आणि उद्योगांचा विकास केला.

चीनची जगप्रसिद्ध भिंत बांधण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प त्यानेच हाती घेतला. आधीच्या राजांनी आपआपल्या राज्यांच्या संरक्षणासाठी तटबंदी उभारल्या होत्या. परंतु मंगोल टोळ्यांच्या आक्रमणापासून बचाव करण्यासाठी हजारो किलोमीटरची भिंत बांधण्याचा प्रकल्प या सम्राटाने हाती घेतला. चेंगीज खानाने उत्तरपूर्वेकडून चीनवर आक्रमण केले. चीनची जगप्रसिद्ध भिंत त्याला रोखू शकली नाही. विसाव्या शतकात याच मार्गाने जपाननेही चीनवर आक्रमण केले आणि चीन पराजित झाला. भिंतीचा उपयोग झाला नाही पण पहिला सम्राट किती दूरदर्शी होता ही बाब मात्र भिंतीवरून अधोरेखित होते.

ही भिंत बांधण्याच्या कामावर त्यावेळच्या चीनमधील एक पंचमांश लोकसंख्या राबत होती. वयाच्या १४ व्या वर्षी ची हु आंग डी चा राज्याभिषेक झाला. सम्राट म्हणून स्वतःला घोषित करण्याच्या आधीपासूनच त्याने आपली कबर बांधण्याचे काम हाती घेतले. मेल्यानंतरही आपली चतुरंगी सेना, दास, दासी, नर्तिका आपल्यासोबत असाव्यात म्हणून मातीचे पूर्णाकृती पुतळे आणि अन्य शिल्पांसाठी त्याने हजारो कारागीर कामाला लावले. साम्राज्य स्थिर होताना काही दशके त्याच्या कबरीचे वा स्मृतीस्थळाचे वा परलोकाच्या उभारणीचे कार्य गुप्तपणे सुरू होते. कारागीरांना घरी जाण्याची मुभा नव्हती. ते आजारी पडले वा जखमी झाले वा मेले तर त्यांची प्रेते तिथेच पुरली जात. या सम्राटाने अमर होण्याचा ध्यास घेतला होता. त्यासाठी एक खास औषधी बनवण्यात आली. पण त्याचा परिणाम नेमका उलट झाला. ते औषध प्याल्यावर या सम्राटाचा मृत्यू झाला.

ची हु आंग डी याने स्वतःला सम्राट घोषित करताना चीन या राजघराण्याची घोषणा केली. त्यानेच चिनी साम्राज्याचा पाया घातला. हे सर्व घडलं इसवीसनपूर्व २२१ मध्ये. पण त्याच्याकारभाराला प्रजा विटली होती. त्याच्या मृत्यूनंतर प्रजेने बंड केले आणि हान घराणे सिहांसनावर आरुढ झाले.

चीनमधील धारणा

गौतम बुद्ध आणि कन्फ्युशिअस (इसवीसनपूर्व ५५१ ते ४७९) हे समकालीन होते. या काळात चीनमध्ये म्हणजे व्हांगह आणि यांगत्से नदीच्या खोर्‍यात अंदाधुंदी माजली होती. अनेक छोटे-मोठे राजे सरंजामदार यांची सत्ता होती. त्यांच्या आपआपसांमधील युद्धामुळे राजकीय-सामाजिक व्यवस्था खिळखिळी झाली होती. राजकीय, सामाजिक, नैतिक अधःपतनाच्या काळात सदगुणी होणे शक्य आहे, असा कन्फ्युशिअसचा ठाम विश्वास होता. या परिस्थितीत सदगुणी कसे होता येईल, या प्रश्नाच्या उत्तराचा शोध तो घेऊ लागला. त्याच्या काळात ताओ वा डाओ दर्शन लोकप्रिय होते. या दर्शनाची धारणा अशी होती की मानवी समाज ही एक कृत्रिम व्यवस्था आहे. आनंदी राहायचे असेल तर निसर्गानुकूल व्यवहारांची कास धरायला हवी. निसर्गाशी एकरुप झाल्यानेच माणूस आनंदी होऊ शकतो. कन्फ्युशिअसला हे मान्य नव्हते. माणूस म्हणजे प्राणी किंवा पक्षी किंवा झाडे नाही, असे तो म्हणत असे.

त्यावेळच्या चीनमध्ये सर्वशक्तीशाली देवाची कल्पना नव्हती. दोन नैसर्गिक शक्ती असतात अशी मान्यता होती. एक शक्ती म्हणजे ड्रॅगन. ही शक्ती स्वर्गाची आहे तर दुसरी शक्ती आहे भूमीची. या दोन शक्तींमध्ये समतोल साधणे, मेळ घालणे यामध्ये मानवी जीवनाचे साफल्य आहे, अशी मान्यता होती. या दर्शनानेही कन्फ्युशिअसचे समाधान झाले नाही. कारण त्यामधून सदगुणी होण्याचा मार्ग दिसत नाही, राजकीय-सामाजिक व्यवस्था निर्माण होण्याची शक्यता नाही, असे त्याचे म्हणणे होते.

कन्फ्युशिअसने चिनी इतिहासाचा अभ्यास केला. कधीतरी प्राचीन काळात असं सुवर्णयुग होते की ज्यामध्ये राजकीय आणि सामाजिक व्यवस्था उत्तम होत्या. त्या राज्यात सदगुणांचा परिपोष होत असे. त्यामुळे सुख, समाधान आणि शांती नांदत होती. आनंद सर्वत्र भरून राहिलेला होता. ती व्यवस्था पुन्हा निर्माण करायला हवी, अशी कन्फ्युशिअसची धारणा होती. ही व्यवस्था निर्माण करायची तर सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठेची उतरंड अशी हवी, की ज्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला आपल्या स्थानाची, त्यास्थानाबरोबर येणार्‍या कर्तव्यांची आणि जबाबदार्‍यांची जाणीव असेल. दडपशाही नाही तर परस्पर समजुतीने समाजाचे राजकीय व सामाजिक व्यवहार होतील. यामध्ये कर्मकांड किंवा विधींची भूमिका निर्णायक असते. कारण शुद्ध हेतूने, निर्मळ मनाने विधी पार पाडले तर चारित्र्य निर्मिती होते, अशीही कन्फ्युशिअसची धारणा होती.

कुटुंब हे मॉडेल तसे आहे असे तो सांगत असे. कुटुंबामध्ये पती-पत्नी, पिता-पुत्र, लहान-थोर अशी अनेक नाती असतात. नात्यांची उतरंड असते. प्रत्येकाला आपले स्थान माहीत असते. त्या स्थानानुसार प्रत्येक व्यक्तीचे हक्क, कर्तव्ये आणि जबाबदार्‍या निश्चित होतात. त्या पार पाडल्याने कुटुंब आनंदी, सुखी होते. अशा कुटुंबाचा आधार प्रेम असतो. हे मॉडेल समाजाच्या राजकीय-सामाजिक व्यवस्थेला लागू करायला हवे, असे दर्शन किंवा तत्वज्ञान कन्फ्युशिअसने मांडले.

पुन्हा एकदा कन्फ्युशिअसकडे

सम्राटाला साक्षात स्वर्गातून सत्ता मिळाली आहे. सत्ता गाजवायचा त्यांना अधिकार आहे. मात्र सम्राटाचा प्रजेशी असणारा व्यवहार पिता-पुत्रांसारखा हवा. आपल्या मुलांप्रमाणे राजाने प्रजेचा सांभाळ करायला हवा. राजाने आपल्या कर्तव्यामध्ये कसूर केली, प्रजेवर अन्याय, अत्याचार केले तर स्वर्ग त्याला धडा शिकवतो. महापूर येतात, दुष्काळ पडतात. कन्फ्युशिअस व्हांगह वापीत नदीच्या खोर्‍यातला होता. त्यामुळे नैसर्गिक आपत्तींमध्ये महापूर आणि दुष्काळाचे संदर्भ देतो. जुलमी राजाच्या विरोधात प्रजा बंड करते, तो प्रजेचा अधिकार आहे असेही कन्फ्युशिअस बजावतो.

माणूस जन्मतःच सदगुणी नसतो. शिक्षणाने तो सदगुणी बनतो. त्यामुळे स्थिर, समतोल, शाश्वत आणि आनंदी सामाजिक-राजकीय व्यवस्था निर्माण करायची तर शिक्षण अपरिहार्य आहे. शिक्षण घेतलेल्या शहाण्या माणसांच्या सल्ल्यानुसार राजाने राज्यकारभार करायला हवा, असे कन्फ्युशिअस सांगतो. कन्फ्युशिअसला अनेक शिष्य मिळाले. काही शिष्योत्तम सरकारी अंमलदारही झाले. परंतु कन्फ्युशिअसला राजाश्रय मिळाला नाही. आपल्याला स्वामी मिळणे आता शक्य नाही, असे वृद्ध कन्फ्युशिअस म्हणत असे.  वयाच्या ७३ व्या वर्षी कन्फ्युशिअसचे निधन झाले.

चीन पहिल्या सम्राटाच्या मृत्यूनंतर हान घराण्याने सत्ता हाती घेतली. प्रजेवर जुलूम-जबरदस्ती केली तर प्रजा बंड करते, ह्या कन्फ्युशिअसच्या शिकवणुकीला त्यामुळे दुजोरा मिळाला. कन्फ्युशिअसचे महत्व हान सम्राटांच्या ध्यानी आले. निष्ठा, इमान, प्रामाणिकपणा ही मूल्ये जनतेमध्ये रुजवायची तर कन्फ्युशिअसच्या शिकवणीनुसार राज्यकारभाराची घडी बसवण्याचा निर्णय नव्या सम्राटाने घेतला. सरकारी अधिकार्‍यांना कन्फ्युशिअसच्या विचारधनाचा अभ्यास सक्तीचा करण्यात आला. त्यासाठी शाळा काढण्यात आल्या. शिक्षण, विधी किंवा कर्मकांड आणि सदगुण यांना महत्व प्राप्त झाले. समतोल आणि मेळ साधण्यामध्ये कला, साहित्य, संगीत यांना अनन्यसाधारण महत्व आहे अशी कन्फ्युशिअसची शिकवण होती. म्हणून कला-साहित्याला उत्तेजन देण्याचे धोरण राज्यव्यवस्थेने स्वीकारले.

कन्फ्युशिअस हा चीनमधील राजेशाहीचा धर्म बनला. संपूर्ण चीनमध्ये एक भाषा, एक चलन, वजने-मापांचे प्रमाणीकरण, सरकारी अंमलदार आणि नोकर यांच्यासाठी प्रशिक्षणाची एक व्यवस्था आणि प्रस्थापित राजकीय-सामाजिक घडीला मान्यता देणारे कन्फ्युशिअसचे दर्शन हे सर्व चीनमध्ये इसवीसनपूर्व काळात घडले. थेट विसाव्या शतकातपर्यंतही घडी कायम राहीली होती.

कन्फ्युशिअसचं दर्शन वस्तुतः शेती संस्कृतीचे दर्शन आहे. हंटिग-गॅदरींग म्णजे शिकार-संकलन यातून जे उत्पादन मिळते त्यापेक्षा दहापट उत्पादन प्राथमिक तंत्राने केलेल्या शेतीतून मिळते. शेती संस्कृती हा एक सापळा आहे. शेती करायला लागल्यावर समूहाची लोकसंख्या वाढते. बहुसंख्य लोक शेतीमध्ये गुंततात. कारण उर्वरित लोकांसाठी अन्नोत्पादन करण्याची जबाबदारी त्यांच्यावर येते. शेतीमध्ये गुंतलेल्या लोकांना पिढ्यानपिढ्या केवळ शेतीच करावी लागते. कारण एकदा का अधिक उत्पादनाची चटक समाजाला लागली की तो समजा शिकार-संकलन अवस्थेतील सोप्या समाजसंस्कृतीकडे परतणं शक्य नसते.

शिकार-संकलन स्थितीत प्रत्येक व्यक्तीला अधिक स्वातंत्र्य असते. समूहात अधिक समता असते. परंतु शेती संस्कृतीत बहुसंख्य लोकांना रात्रंदिन राबावे लागते. त्यासाठी विषमता आणि विषमतेला मान्यता देणार्‍या तत्वज्ञानाची, दर्शनाची शेती संस्कृतीला गरज असते. विषमतेचे समर्थन करणे, विषमतेला दार्शनिक मान्यता देणे ही शेती संस्कृतीची गरज असते. म्हणून चीनमध्ये कन्फ्युशिअसच्या विचारधारेला राजाश्रय मिळाला.

१९११ मध्ये चीनमध्ये क्रांती झाली. सम्राटाची सत्ता उलथून टाकण्यात आली. लोकशाहीची मागणी करणार्‍या तरुणांनी कन्फ्युशिअसचा धिक्कार केला. १९५० च्या दशकात माओ झेडाँगच्या नेतृत्वाखालील कम्युनिस्ट क्रांतीने कन्फ्युशिअसच्या शिकवणुकीवर हल्ला चढवला. लाल सैनिकांनी कन्फ्युशिअसचे पुतळे फोडले, मंदिरे तोडली, ग्रंथ जाळून टाकले. त्याची कबर तोडली. पण, २१ व्या शतकामध्ये पारंपारिक चिनी म्हणजे कन्फ्युशिअसच्या शिक्षणविचारावर आधारीत हजारो शाळा चीनमध्ये सुरु झाल्या आहेत. चीन अजूनही स्वतःला कम्युनिस्ट म्हणवतो पण शी जिन पिंग यांच्या नेतृत्वाखाली चीनचा साम्राज्य विस्तार सुरू झाला आहे.

बेल्ट अँण्ड रोड इनिशीएटिव्ह या चीनच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्दिष्ट तेच आहे. त्यामुळे कन्फ्युशिअसचा पुनर्जन्म होतो आहे. कारण चिनी कम्युनिस्ट पक्ष आज साम्राज्यवादाचे प्रतिनिधित्व करतो आहे. त्यामुळेच सिव्हिलायझेशन-स्टेट वा सभ्यताधिष्ठीत राष्ट्र ही संकल्पना चिनी मानसाची पकड घेत आहे. हे सभ्यताधिष्ठीत राष्ट्र अर्थातच चीनमधील हान वंशीयांचे आहे. या सभ्यताधिष्ठीत राष्ट्राची मदार निर्यातीवर आहे कारण चीन जगाचा कारखाना बनला आहे.

हे असे का घडले? कसे घडले? चीनमधील नामुष्कीच्या शतकाचा आढावा पुढच्या लेखांकात.

(‘चीन आणि सभ्यताधिष्ठीत राष्ट्र’ या लेखमालेचा हा तिसरा भाग आहे. पहिला आणि दुसरा भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा.)

संदर्भ

चीनचा भूगोल- विकीपिडीया

https://pubmed.ncbi.nlm.nih.gov/12294257/

Confucius and the world he created, Michael Schuman, Basic Books,2015

Sapiens: A Brief History of Humankind, Yuval Noh Harari,Harper, 2014.

The Yellow River: The Problem of Water in Modern China, David A. Pietz, Harvard University Press, 2015.

The Penguin History of Modern China: The Fall and Rise of a Great Power, 1850 to 2008, Jonathan Fenby, 2008.

Origins: How Earth Made Us, Lewis Dartnell,  Vintage, 2019

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.