Published on Aug 26, 2019 Commentaries 0 Hours ago

सुमारे तीन दशकांपूर्वी लोकशाहीवर आधारित घटना अंगिकारलेल्या तुर्कमेनिस्तानला अजून सशक्त लोकशाही व्यवस्थेच्या दिशेने बरीच वाटचाल करायची आहे.

तुर्कमेनिस्तान: मध्य आशियातील ‘तटस्थ’ खेळाडू

१९९१ मध्ये सोव्हिएत संघाचे विघटन होऊन मध्य आशियात पाच स्वतंत्र देशांचा उदय झाला; तुर्कमेनिस्तान त्यापैकीच एक. इतर मध्य आशियाई देशांच्या समूहात बसूनही तुर्कमेनिस्तानने सुरुवातीपासूनच स्वतःचे वेगळेपण टिकवून ठेवले आहे. त्याकाळात जन्माला आलेल्या देशांपैकी हा एक असा देश आहे, ज्याच्याबद्दल आजपर्यंत फार कमी लिहिले वा बोलले गेले आहे. त्यामुळेच त्याविषयी एक प्रकारची गूढ अनाकलनियता निर्माण झाली आहे. अशा या अद्भूत तुर्कमेनिस्तानच्या इतिहास, भू-राजकारण, संस्कृती आणि विदेशनीती समजून घ्यायला हवी.

सद्यकालीन युरेशियन भू-राजकारणात तुर्कमेनिस्तानला अनन्यसाधारण महत्त्व आहे, ते मुख्यतः त्याला लाभलेल्या मोक्याच्या स्थानामुळे. त्याच्या पूर्वेकडे कझाखस्तान आणि उझ्बेकिस्तान, दक्षिण-पूर्वेला अफगाणिस्तान, आणि दक्षिणेला इराण आहे. संपूर्णतः भूवेष्टित असला तरी तुर्कमेनिस्तानच्या पश्चिमेला कॅस्पियन समुद्र हा खाऱ्या पाण्याचा प्रचंड जलाशय आहे, जो ऊर्जा आणि संपर्कतेच्या बाबतीत महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर, या देशात खनिजतेल, नैसर्गिक वायू, मीठ, सल्फर व इतर खनिजांचे विपुल साठे आढळतात. जगातील एकूण नैसर्गिक वायू साठ्यांपैकी सुमारे ९.४% साठे तुर्कमेनिस्तानात असून त्यात हा देश चौथ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे संपर्क, ऊर्जा-सुरक्षा आणि पाईपलाईन्सचे राजकारण, या सगळ्यातच तो मोलाची भूमिका बजावतो.

भौगोलिकदृष्ट्या मोक्याच्या स्थानाचा या भूभागाच्या इतिहास आणि संस्कृतीवरही सखोल परिणाम दिसून येतो. प्राचीन काळापासूनच हा भाग पूर्व-पश्चिम आणि उत्तर-दक्षिण वाहतूक मार्गांवरील एक महत्त्वाचा दुवा म्हणून विकसित होत गेला. ‘सिल्क रोड’च्या माध्यमातून व्यापार-उदीमात वाढ होत गेली, त्याचबरोबर येथे अनेक शहरे भरभराटीला येत गेली. आजच्या तुर्कमेनिस्तानमधील मेर्व हे त्याच काळात उदयाला आलेलं एक संपन्न शहर, ज्याने आजही सिल्क रोडच्या पाऊलखुणा जतन करून ठेवल्या आहेत.

प्राचीन काळात या भागात पर्शियन लोकांचं वास्तव्य होते. कालांतराने तुर्की वंशाच्या विविध जनजातींनी येथे स्थलांतर केले. दरम्यान, अनेक आक्रमणे आणि सत्तांतरे या प्रदेशाने अनुभवली. १९व्या शतकाच्या उत्तरार्धात रशियन झारने हा भाग त्याच्या साम्राज्याला जोडला; आणि १९१७ च्या बोल्शेव्हिक क्रांतीनंतर तो सोव्हिएत संघाचा भाग झाला. पुढे स्टालिनच्या नेतृत्वाखाली तुर्कमेन गणराज्याची निर्मिती झाली. यावेळी प्रथमच या भूभागाला तुर्कमेन राष्ट्रीयतेच्या आधारे ठराविक सीमारेषा, विशिष्ट नाव आणि काही भाषिक-सांस्कृतिक अधिकार मिळाले. तरीही मॉस्कोप्रणित सोव्हिएत राजवटीत गणराज्यांना थोड्याफार प्रमाणात स्वायत्तता असली, तरी स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व मात्र नव्हते, जे १९९१ नंतर प्राप्त झाले.

१९८५ पासूनच तुर्कमेनिस्तान गणराज्याचे नेतृत्व सपरमुरात नियझॉव्ह ह्यांच्याकडे आले होते. स्वातंत्र्यानंतरही तेच राष्ट्राध्यक्षपदी निवडून आले. तिथून पुढे, २००६ मध्ये त्यांचा मृत्यू होईपर्यंत, ते देशाच्या सर्वोच्चस्थानी विराजमान राहिले. मुळात साम्यवादी रचनेतून आलेले नियझॉव्ह स्वातंत्र्यानंतर राष्ट्रवादी विचारसरणीकडे वळले. किंबहुना त्यांनी प्रचारित केलेल्या राष्ट्रवादात जाज्ज्वल्य राष्ट्राभिमानाबरोबरच त्यांच्या वैयक्तिक करिष्म्यालाही महत्त्वपूर्ण स्थान होते. राजधानी अशगाबातच्या केंद्रस्थानी त्यांनी स्वतःचा सोन्याचा पुतळा बसवला, जो दिवसभरात सूर्याच्या दिशेप्रमाणे दिशा बदलतो. तसेच, त्यांनी स्वतःला ‘तुर्कमेनबाशी’, अर्थात तुर्कमेन राष्ट्राचे जनक, असा खिताब बहाल केला. नियझॉव्ह यांनी ‘रूहनामा’ नावाने लिहिलेल्या ग्रंथात त्यांनी तुर्कमेन जनजातींचा इतिहास, संस्कृती आणि अध्यात्मिकतेविषयी सखोल भाष्य केले आहे. प्रत्येक तुर्कमेन घरी हा ग्रंथ सापडतो; लहान मुलांनाही शाळेच्या अभ्यासक्रमात हा ग्रंथ शिकवला जातो.

२००६ मध्ये नियझॉव्ह यांच्या अकाली मृत्यूनंतर गुरबांगुली बेर्दीमुहमेदोव देशाचे राष्ट्राध्यक्ष झाले, ज्या पदी ते आजही टिकून आहेत. सत्तेवर आल्यानंतर त्यांनी अनेकप्रकारे नियझॉव्ह यांचाच कित्ता गिरवायला सुरुवात केली.

सुमारे तीन दशकांपूर्वी लोकशाहीवर आधारित घटना अंगिकारलेल्या तुर्कमेनिस्तानला अजून सशक्त लोकशाही व्यवस्थेच्या दिशेने बरीच वाटचाल करायची आहे. येथे नियमित निवडणूका होत असल्या, तरी लोकतंत्रासाठी अपेक्षित स्वातंत्र्ये, अधिकार आणि मुक्त वातावरण येथे अजून निर्माण होऊ शकलेले नाही. सोव्हिएत काळापासून येथे प्रचलित असलेली धर्मनिरपेक्षता मात्र अजून बऱ्याच अंशी अबाधित आहे.

सुमारे ६.२ दशलक्ष लोकसंख्या असलेल्या तुर्कमेनिस्तानात सुन्नी मुस्लिम धर्म आचरणारे आणि ‘तुर्कमेन’ भाषा बोलणारे बहुसंख्येने आहेत. तरीही इतर धर्म, भाषा आणि वंशाचे लोकही येथे गुण्यागोविंदाने नांदतात. मुळात तुर्कमेन राष्ट्रीयतेवर धर्म, भाषा आणि राजकीय नेतृत्वाचा प्रभाव असला, तरीही त्याचा भरभक्कम आधार म्हणजे इथे जोपासली गेलेली समृद्ध अशी भटकी-विमुक्त जीवनशैली. आजही येथील लोकांनी त्यांची जनजातीय सांस्कृतिक वैशिष्ट्य जतन केली आहे. देशाच्या राष्ट्रध्वजावर पाच प्रकारच्या गालिचांच्या नक्ष्या सापडतात, ज्या पाच प्रमुख तुर्कमेन जनजातींचं प्रतीक मानल्या जातात.

तुर्कमेनिस्तानात मुख्यतः वाळवंटी प्रदेश आहे, असं असलं तरी अमुदर्या नदीचं खोरं आणि कॅस्पियन समुद्र यामुळे येथे तुडुंब नैसर्गिक आणि खनिज स्रोत सापडतात. येथील सामान्यांचं जीवन सहजसोपं आहे. नागरिकांना वीज, पाणी, गॅस आणि मीठ या सुविधा मोफत उपलब्ध आहेत. येथील अर्थव्यवस्था मुख्यतः ऊर्जा-केंद्रित आहे. नैसर्गिक वायूच्या निर्यातीतून देशाला दरवर्षी लक्षणीय परकीय चलन मिळते. चीनच्या वायू आयातीमध्ये तुर्कमेनिस्तानचा पहिला क्रमांक लागतो. शिवाय रशिया, युरोपीय देश, इराण यांनाही हा देश गॅस निर्यात करतो. तसंच, मध्य आशियाई विद्युत प्रणालीमध्येही त्यांचा सहभाग आहे. अफगाणिस्तानला देखील हा देश विद्युत पुरवठा करतो.

तुर्कमेनिस्तानहून अफगाणिस्तान , पाकिस्तानमार्गे भारतात येणाऱ्या ‘तापी’ पाइपलाइनचा प्रकल्पही या देशाने उत्साहाने हाती घेतला. त्यांच्या सीमेअंतर्गत मोडणारे बांधकाम आधीच पूर्ण झाले असून, आता अफगाणिस्तानात बांधकामास सुरुवात झाली आहे. ही पाईपलाईन पूर्ण झाली तर भारताची ऊर्जा-भूक अनेकांशी भागू शकते. मात्र मधल्या दोन देशांमधील सुरक्षा आव्हानं लक्षात घेता, हा प्रकल्प सध्यातरी दुरापास्त वाटतो आहे. दरम्यान तुर्कमेनिस्तानकडून गॅस निर्यात करण्यासाठी भारत इराणमार्गेही प्रयत्नशील आहे. या प्रयत्नांमधून दोन्ही देशांची गॅस-व्यापारात वैविध्य आणण्याची निकड स्पष्ट होते.

तुर्कमेनिस्तानच्या परराष्ट्र धोरणाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी अंगिकारलेली ‘कायमस्वरूपी तटस्थता’, जिचे अध्वर्यू राष्ट्राध्यक्ष सपरमुरात नियाझॉव्ह होते. संयुक्त राष्ट्रांनीही या धोरणाला १९९५ मध्ये अधिकृत मान्यता दिली. या नीतीआधारे, कुठल्याही चालू वा भावी आंतरराष्ट्रीय संघर्षात तुर्कमेनिस्तान कुठल्या एका बाजूने उभा राहू शकत नाही. तसंच कुठल्याही लष्करी तहात वा सामरिक गटातही सामील होत नाही. मात्र याचा अर्थ हा देश विलगवादाचा पुरस्कर्ता आहे असा मात्र नाही.

किंबहुना तटस्थतेच्या बरोबरच तुर्कमेनिस्तानने स्वीकारलेलं ‘खुलेद्वार’ धोरण (ओपन डोअर पॉलिसी) लक्षणीय आहे, ज्यायोगे त्यांनी अनेक देशांशी आणि आंतरराष्ट्रीय संघटनांशी घनिष्ट संबंध प्रस्थापित केले आहेत. संयुक्त राष्ट्रे, ऑर्गनायझेशन फॉर सेक्युरिटी अँड कोऑपरेशन इन युरोप (ओ.एस.सी.ई), ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कंट्रीज (ओ.आय.सी), अलिप्त राष्ट्र चळवळ (नॉन अलाइनमेंट मुव्हमेन्ट), तसेच कॉमनवेल्थ ऑफ इंडिपेन्डन्ट नेशन्स (सी.आय.एस.) या संघटनांत तुर्केमेनिस्तानचा नेहेमीच सक्रिय सहभाग राहिला आहे. मात्र त्याचबरोबर युरेशिया प्रांतातील सामरिक दृष्ट्या महत्त्वाच्या अश्या शांघाय सहकार्य संघटना (एस.सी.ओ.), युरेशियन इकॉनॉमिक युनियन (इ.इ.यू.) आणि कलेक्टिव्ह सिक्युरिटी ट्रीटी ऑर्गनायझेशन (सि.एस.टी.ओ.) या संघटनांपासून हा देश अंतर बाळगून आहे.

स्वातंत्र्योत्तर काळापासून शांतता, सुरक्षा, आर्थिक संबंध आणि संपर्कता या क्षेत्रांमध्ये तुर्कमेनिस्तानने भरीव योगदान दिले आहे. संयुक्त राष्ट्रांचे मध्य आशियासाठीचे ‘प्रतिबंधात्मक राजनय’ (प्रिव्हेंटिव्ह डिप्लोमसी) केंद्र तुर्कमेनिस्तानची राजधानी अश्गाबात येथे स्थित आहे. हे केंद्र दहशतवाद, अमली पदार्थांची तस्करी, आणि हवामान बदल यासारख्या अति-संवेदनशील विषयांवर प्रादेशिक सहकार्य स्थापित करण्यास प्रतिबद्ध आहे. गेल्या काही वर्षांत शेजारी देशांसोबतच्या संबधांतही सुधारणा व वृद्धी झाली आहे.

मोक्याचे स्थान लाभल्यामुळे तुर्कमेनिस्तान सर्वच समकालीन संपर्कता प्रकल्पांत महत्त्वाचा आहे. आंतरदेशीय आणि आंतरखंडीय रेल्वेलाईन्स वरील, आणि उत्तर-दक्षिण व पूर्व-पश्चिम वाहतूक मार्गांवरील, एक महत्त्वाचा दुवा म्हणून हा देश स्वतःला प्रस्थापित करतो आहे. नोव्हेम्बर २०१७ मध्ये तुर्कमेनिस्तानच्या अध्यक्षतेखाली अशगाबात येथे एक मोठे ‘आंतराराष्ट्रीय परिवहन संमेलन’ भरवण्यात आले होते. चीन-प्रणित बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह (बी.आर.आय) मध्ये तुर्कमेनिस्तान सामील झाला आहेच. शिवाय अशगाबात करार, कझाखस्तान-तुर्कमेनिस्तान-इराण रेल्वे, तुर्कमेनिस्तान-अफगाणिस्तान-ताजिकिस्तान रेल्वे, लपीस लझुली करार, तसंच तुर्कमेनिस्तान-अफगाणिस्तान-पाकिस्तान-भारत वायू  पाईपलाईन, अश्या महत्त्वाच्या प्रादेशिक संपर्कता प्रकल्पांत तो अग्रणी भूमिकेत आहे. भारत, रशिया व इराण यांच्या पुढाकाराने आकाराला येत असलेल्या ‘आंतरराष्ट्रीय उत्तर दक्षिण परिवहन कॉरिडोर’ मध्येही हा देश महत्त्वाचा ठरू शकतो, मात्र त्यासाठी त्यांना या करारात सामील करून घेणं आवश्यक आहे.

अफगाणिस्तानसोबत तुर्कमेनिस्तानची सुमारे ८०० किमी सीमारेषा आहे, शिवाय दोहोंमध्ये भाषिक, वांशिक आणि सांस्कृतिक दुवे आहेत. अफगाणिस्तानात तुर्कमेनभाषी लोकांची संख्या लक्षणीय आहे. तसेच, त्यादिशेने येणाऱ्या दहशतवाद आणि इतर सुरक्षा आव्हानांची सुद्धा देशाच्या नेतृत्वाला जाणीव आहे. त्यामुळे शेजारी अफगाणिस्तानच्या शांतता प्रक्रियेत तुर्कमेनिस्तानला रस आहे. दोन देशांत वाहतूक, दळणवळण, व्यापार, ऊर्जा, सुरक्षा, सांस्कृती, इ. क्षेत्रांत मोलाचं सहकार्य आहे. २०१७ मध्ये तुर्कमेनिस्तानने ‘अफगाणिस्तान विषयी प्रादेशिक आर्थिक सहकार्य संमेलन’ (रिजनल इकॉनॉमिक कोऑपरेशन कॉन्फरन्स ऑन अफगाणिस्तान- रेक्का) चे अश्गाबात येथे यशस्वी आयोजन केले.

१९९० मध्ये सावकाश आणि दक्ष पावले टाकणाऱ्या तुर्कमेनिस्तानच्या बाह्य संबंधांत गेल्या काही वर्षांत मात्र लक्षणीय वृद्धी झाली आहे. हा देश ‘कायमस्वरूपी तटस्थता आणि खुलेद्वार’ या त्यांच्या मूलतत्वांशी अजूनही एकनिष्ठ आहे आणि त्याच चौकटीत बाह्य संबंधांत विस्तार करत आहे. सुरक्षा, दहशतवादाशी लढा, हवामान बदल, अश्या अनेक आयामांमध्ये जगात महत्त्वपूर्ण भूमिका पार पडतो आहे. त्याचबरोबर, संपर्कता, दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञानामध्येही अग्रेसर आहे. यायोगे हा देश उत्तरोत्तर अधिकाधिक खुला होईल, आणि आंतराराष्ट्रीय समुदायासाठी कुतुहलाचा आणि अभ्यासाचा विषय बनेल, असा विश्वास वाटतो.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.