Author : Dr. Gunjan Singh

Published on Mar 08, 2019 Commentaries 0 Hours ago

डॉनल्ड ट्रम्प आणि किम जाँग-उन यांच्या नुकत्याच संपन्न झालेल्या भेटीच्या जागतिक राजकारणावरील संभाव्य परिणामांची चर्चा करणारा लेख.

ट्रम्प-किम: भेटी झाल्या, पुढे काय ?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जाँग-उन यांची दुसरी बैठक व्हिएतनाम येथे २७-२८ फेब्रुवारी रोजी पार पडली. पहिल्या भेटीच्या तुलनेत या भेटीकडे आंतरराष्ट्रीय समुदायाचे अधिक लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळेच की काय, परदेशी पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नांना किम पहिल्यांदाच सामोरे गेले, ही बाब विशेष आश्चर्यजनक वाटली नाही. मात्र त्यांच्या या कृतीमुळे ही भेट अधिक संस्मरणीय बनली हे निश्चित. “देशाला अण्वस्त्रमुक्त करण्याबाबत उत्तर कोरिया गंभीररीत्या विचार करत आहे, अन्यथा मी या बैठकीला कधीच उपस्थित राहिलो नसतो”, असे आत्मविश्वासपूर्ण उत्तर त्यांनी पत्रकारांना दिले.  दुसरीकडे ट्रम्प यांनी “घटना किती वेगाने घडताहेत यावर या चर्चेचे अंतिम यश अवलंबून नसते. अण्वस्त्रांची चाचणी थांबणे महत्त्वाचे आहे आणि मला याबाबत “योग्य सौदा” हवा आहे.” असे वक्तव्य केले.

ट्रम्प आणि किम यांच्या दुसऱ्या भेटीने आशा अधिक उंचावल्या होत्या.  प्याँगयांग आणि वॉशिंग्टनमध्ये संपर्क-कार्यालये उभारली जातील, जी प्रत्यक्ष मुत्सद्दी राजकीय धोरण राबवण्यास सहाय्यभूत ठरतील आणि याद्वारे कोरियन युद्धदेखील समाप्त होईल असे अंदाज वर्तवले जात होते. परंतु, या दोन-दिवसीय बैठकीच्या कार्यक्रम आखडता घेऊन ही चर्चा लवकरच आटोपण्यात आली असून, दोन्ही नेत्यांनी कोणत्याही करारावर स्वाक्षऱ्या केलेल्या नाहीत.

या बैठकीसाठी ट्रम्प यांच्यासोबत वरिष्ठ अधिकारी माईक पॉम्पिओ (राज्य सचिव), जॉन बॉल्टन (राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार) आणि मिक मुलव्हॅनी (अॅक्टिंग व्हाईट हाउस चीफ ऑफ स्टाफ) तर किम यांच्या सोबत किम -योंग-चू (वरिष्ठ अण्वस्त्र मध्यस्थ) आणि री – योंग-हो (परराष्ट्र मंत्री) असे फक्त दोन अधिकारी होते. “निर्बंधाच्या मुद्द्यावरून ही चर्चा अचानक थांबली. या चर्चेतून मला बाहेर पडावे लागले कारण योंगबीन परमाणु सुविधा नष्ट करण्याच्या बदल्यात किम यांनी सगळे निर्बंध हटवण्याची अट घातली आहे, ही अट अमेरिकेला मान्य नाही.आमचा दृष्टीकोन वेगळा असला तरी, किम यांच्या विचारात गतवर्षीच्या तुलनेत निश्चितच प्रगती झाली आहे.” असं पेनिन्सुला अण्वस्त्रमुक्त करण्याविषयीच्या चर्चेबाबत बोलताना ट्रम्प म्हणाले.

प्रस्तुतची समस्या ही संघर्षापेक्षा चर्चेतून सोडवली जाऊ शकते याची जाणीव दोन्ही राष्ट्रांना झाली असल्याचे या दोन नेत्यांमधील बैठकीतून स्पष्ट झाले आहे. परंतु दोन्ही राष्ट्रे एकमेकांशी बोलण्याऐवजी एकमेकांना बोल लावत आहेत. या चर्चेतून नेमके काय साध्य करायचे हे ट्रम्प आणि किम दोघांनाही स्पष्टपणे माहित आहे. परंतु त्या दोघांचीही मते भिन्न आहेत. ट्रम्प यांना अण्वस्त्रमुक्तीचा कागदोपत्री आराखडा महत्वाचा आहे, तर किम यांच्यासाठी अमेरिकेने लादलेले निर्बंध हटवणे महत्वाचे आहे. दोन्ही नेत्यांपैकी कोणालाही कमीपणा घ्यायचा नाही, त्यामुळे यातून खऱ्या अर्थाने काही निष्पन्न होण्याची शक्यता कमीच आहे.

त्यांच्या पुढील भेटीची तारीख निश्चित केली नसल्याचे दोन्ही नेत्यांनी जाहीर केले आहे.

चर्चेच्या या अनपेक्षित शेवटाचा परिणाम दोन्हीकडील प्रदेशावर दिसून येईल. दक्षिण कोरियाच्या स्टॉक मार्केटमधील घसरण हा त्याचाच परिणाम आहे. दोन्ही देशांना एकत्र आणण्याच्या आणि उत्तर कोरियातील आर्थिक गुंतवणूक वाढवण्याच्या, दक्षिण कोरियाच्या अध्यक्षांच्या या स्वप्नावर देखील याचा परिणाम दिसून येईल. तर जपानच्या पंतप्रधानांनी चर्चेतून बाहेर पडण्याच्या ट्रम्प यांच्या निर्णयाचे कौतुक केले आहे. अबे म्हणाले, “त्यांनी सहजरीत्या तडजोड स्वीकारली नाही ही बाब अतिशय उल्लेखनीय आहे.”

यावर चीनची प्रतिक्रिया काय आहे हे पाहणे महत्वाचे आहे. ही चर्चा अचानकपणे थांबल्यानंतर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लु कांग यांनी एक पत्रकार परिषद बोलावली. या पत्रकार परिषदेला उद्देशून ते म्हणाले, “गेल्या अर्ध शतकाच्या अनुभवावरून सर्वांनाच हे कळून चुकले असेल की, कोरियन पेनिन्सुला मुद्यावर एका रात्रीत तोडगा निघणे शक्य नाही.”

आगामी बैठकीची चर्चा जोर धरू लागली तेंव्हाच गेल्या जानेवारीमध्ये किम यांनी शी जिंगपिंग यांची भेट घेतली होती. ट्रम्प अमेरिकेला परतल्यानंतर देखील किम २ मार्च पर्यंत व्हिएतनाम मध्ये राहतील, उत्तर कोरियाला परतण्यापूर्वी ते बीजिंग येथे थांबून या चर्चेबद्दल शी जिंगपिंग यांना माहिती देतील. या चर्चेला दिशा देण्यात चीनची भूमिका महत्वाची आहे हे तथ्य या भेटीतून अधोरेखीत होईल. शी यांची भेट घेऊन किम असा संदेश देऊ इच्छितात की बीजिंगशी चर्चा केल्याशिवाय ते कोणताही निर्णय घेणार नाहीत.

उत्तर कोरियाला आंतरराष्ट्रीय समुदायाच्या अखत्यारीत आणण्याचे एक ऐतिहासिक कामगिरी किम आणि ट्रम्प यांनी पार पडली असली तरी, हे एक ओढूनताणून जुळवलेले स्वप्न आहे. या चर्चे नंतर निर्माण झालेली परिस्थिती ही पूर्वीपेक्षाही अधिक गुंतागुंतीची वाटत आहे. चीन, जपान आणि दक्षिण कोरिया या सारख्या देशांचाही यामध्ये महत्वाचा वाट असल्याने, द्विपक्षीय चर्चेतून हा गुंता नक्की सुटणार का याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. या मुद्द्यावर ‘बहु-पात्री भूमिका’ आवश्यक असल्याचेच यातून सिद्ध होते.

किम आणि ट्रम्प यांच्या पहिल्या भेटीतून देखील काहीही ठोस निर्णय झालेला नाही हेच दुसर्या भेटीच्या अपयशावरून सिद्ध होते. ट्रम्प आणि किम यांनी एकमेकांना भेटण्याव्यतिरिक्त कोणतेही भरीव यश संपादन केलेले नाही, पेनिन्सुलाचा मुद्दा देखील जैसे थे स्थितीतच रहिला आहे.

(गुंजन सिंग या चीन आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासिका असून दिल्ली येथील ‘इन्स्टिट्यूट ऑफ चायनीज स्टडीज’ येथे सहायक संशोधिका म्हणून कार्यरत आहेत.)

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.