Author : Seema Sirohi

Published on Feb 19, 2020 Commentaries 0 Hours ago

महाभियोगातून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प सुटतील, हे अपेक्षित होते. पण चार महिन्यातील या गोंधळाला अमेरिकन मतदार कसा प्रतिसाद देणार, हे पाहायला हवे.

ट्रम्प यांना आव्हान कोण देणार?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पयांच्यावरील महाभियोग, डेमोक्रॅटिक पक्षाच्या नियंत्रणातीलहाऊसऑफ रिप्रेझेटेटिव्ह्जमध्ये मंजूर झालेला असला तरी, रिपब्लिकन पक्षाचे बहुमत असलेल्या सिनेटमध्ये मात्र कोसळला. या महाभियोग ठरावातील दोन अनुच्छेद- अधिकारशक्तीचा गैरवापर (५२-४८) आणि काँग्रेसला अडथळा आणणे (५३-४७) हे रद्दबातल करण्यासाठी मतदान घेण्यात आले. पण त्यात ट्रम्प यांना पदावरून काढून टाकण्यासाठी आवश्यक असलेली दोन तृतियांश मते मिळाली नाहीत.

खटला पाहून फक्त एक रिपब्लिकन नेता हेलावला आणि त्याने आपले मत डेमोक्रॅट्स पक्षाच्या बाजूने वळवले. सेनेटर मिट रोमनी यांनी पक्षीय राजकारणाची  रेषा ओलांडली. ट्रम्प यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून आपले राजकीय प्रतिस्पर्धी आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार जो बायडेनयांच्याविरुधोतील माहितीसाठी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांवर दबाव आणला, असा आरोप ट्रम्प यांच्यावर होता. या आरोपाबद्दल मिट रोमनी यांनी ‘हो’ असे मत दिले. रोमनी यांचे हे मत ऐतिहासिक ठरले.

परंतु आता प्रश्न असा उरतो की, डेमोक्रॅट्स पक्षाच्या नेत्यांना माहीत होते की, त्यांच्याकडे सिनेटमध्ये पुरेशी मते नाहीत. तरीही त्यांनी तपास थांबवून अपुऱ्या माहितीवर आधारित खटला का सुरु केला? आणि नंतर अतिरिक्त पुरावे व साक्षीदारांकडे विचारणा करण्याची मागणी का केली? डेमोक्रॅट पक्षाच्या स्पष्टीकरणानुसार न्यायालयीन लढाई लढण्याचीही वेळ नव्हती आणि पुरावे राजकारणापासून वेगळे करता येत नाहीत. त्यांना निकाल हवा होता आणि २०२० निवडणुकीचा प्रचार पूर्णपणे सुरू व्हायच्या आधी काही चर्चेचे विषय त्यांना हवे होते.

सभागृहाच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी  यांनी महाभियोगाचे अनुच्छेद सिनेटला पाठवण्यापूर्वी एक महिना वाट पाहिली. लोकांना त्यांची ही चाल भावली नाही. या काळात ट्रम्प यांनी आपला पाठिंबा मजबूत केला आणि अमेरिकन अर्थव्यवस्था देखील चांगल्या स्थितीत होती. या महाभियोग प्रक्रियेमुळे ट्रम्पची लोकप्रियता ४९% इतकी वाढली, जी ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून आतापर्यंत सर्वोच्च स्थानावर होती.

डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिक या दोन राजकीय पक्षांमध्ये आताएवढी दरी केव्हाच नव्हती. यामुळे आता अमेरिकन जनतेतही हा कडवट पक्षपातीपणा स्पष्ट जाणवतो आहे. ट्रम्प यांच्या ‘स्टेट ऑफ द युनिअन’ भाषणाच्या वेळी अमेरिकन राजकारणाचे झालेले तीव्र ध्रुवीकरण दिसून आले. सामान्यत: हा एक रटाळ वार्षिक कार्यक्रम असतो, जिथे राष्ट्राध्यक्ष आपल्या कर्तृत्वाचा आणि भविष्यातील योजनांचा लेखाजोखा देतात. जर भाषणातील एखादा विचार किंवा एखादे वाक्य लोकांच्या स्मरणात राहिले तर तो राष्ट्राध्यक्ष भाग्यवान मानला जातो. पण ट्रम्प यांनी यावेळी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

या भाषणाचा इतिहासअसा रटाळ असला तरीही, ट्रम्प यांचे ‘स्टेट ऑफ द युनिअन’ भाषण सुरवातीपासून शेवटपर्यंत अतिशय नाट्यमय होते. त्या दिवशी त्या ठिकाणी मंचावर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या ऐवजी २०२० चे राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार ट्रम्प टीव्हीवर झळकण्याची संधी साधून अमेरिकन कॉंग्रेससमोर उभे राहिलेहोते. दौऱ्यावर असल्याने विभक्त झालेल्या लष्करी जोडप्याचे पुनर्मिलन देखील त्यांनी या ठिकाणी घडवून आणले.

ट्रम्प यांनी मंचावर जाताना नॅन्सी पेलोसी यांनी पुढे केलेल्या हाताकडे दुर्लक्ष केले. ही अनादरयुक्त वागणूक होती, यात काही शंका नाही, कारण नॅन्सी पेलोसी यांनी महाभियोग प्रक्रिया सुरू केली होती.पेलोसी यांनी या अपमानाची परतफेड करायला वेळ दवडला नाही. ट्रम्प यांचे भाषण सुरु असताना त्यांनी आपले डोळे फिरवून आपली नापसंती दर्शवली आणि अतिशय नाट्यमयरितीने ट्रम्प यांनी चेंबर सोडण्यापूर्वी ट्रम्प यांच्या भाषणाची प्रत कॅमेराच्या दृष्टीक्षेपात फाडली.

ट्रम्प यांचे भाषण म्हणजे “खोट्या गोष्टींचा जाहीरनामा” असल्याचे सांगून पेलोसी यांनी आपल्या कृत्याचे समर्थन केले. जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीतील कायद्याचे प्राध्यापक जोनाथन टर्ली जे रिपब्लिकन पक्षाच्या वतीने साक्षीदार म्हणून हजर झाले, पण रिपब्लिकन्सच्या गैरवर्तनाबद्दल त्यांनीही लिहिले आहे.त्यांनी असे वक्तव्य केले की, पेलोसी यांनी आपले पद भूषविण्याचा अधिकार गमावला आहे आणि सभागृहाच्या अध्यक्ष म्हणून तटस्थ राहण्यात अपयशी ठरल्याने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. राष्ट्राध्यक्ष क्लिंटन यांच्या महाभियोग कारवाईदरम्यान अशा प्रकारची वागणूक त्यांना देण्यात आली नव्हती.योग्य प्रक्रियेचा आदर करणारा प्रत्येकजण हे लक्षात घेईल की, घटनात्मक प्रक्रियेच्या या टप्प्यावर ट्रम्प यांच्यावर आरोप करण्यात आला आहे, परंतु ते अजून दोषी ठरवले गेले नाहीत.” असेही त्यांनी लिहिले.

झेनोफोबिया (परदेशातील लोकांबद्दल वाटणारा तिरस्कार किंवा भीती), वंशद्वेष आणि स्त्री-जातीचा द्वेष या सर्व दुष्कृत्यांसाठी ओळखला जाणारा, अत्यंत पुराणमतवादी विचारांचा रश लिंबॉह याचा सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मान करून ट्रम्प यांनी उदारमतवादी लोकांना चिथावण्याचे काम केले आहे. प्रथम महिला मेलॅनिया ट्रम्प यांनी रश लिंबॉह यांच्या गळ्यात पदक घातले तसे रिपब्लिकन पक्षाच्या लोकांनी जल्लोष केला तर डेमोक्रॅट्स विक्षुब्ध झाले.

जगातील सर्वात शक्तिशाली लोकशाहीमध्ये आज एकाधिकारशाही राजकीय प्रवृत्तीची अवस्था आहे. रिपब्लिकन पक्षावर ट्रम्प यांची मजबूत पकड आहे आणि जरी कोणी त्यांच्याशी सहमत नसले तरी त्यांना  आव्हान करण्याचे कोणी धाडस करत नाही. काही सेनेटर्सनी मान्य केले की ट्रम्प यांनी युक्रेनवर दबाव आणण्यासाठी खेळलेले डावपेच चुकीचे आहेत, परंतु तरी त्यांनी महाभियोगाच्या विरोधातच मत दिले. 

दुसरीकडे, डेमोक्रॅट्स विभाजित झाले आहेत आणि त्याचे कारण त्यांच्या पक्षावर प्रभाव कोणाचा आहे, हेच स्पष्ट होत नाही. मवाळवाद्यांचा, पुराणमतवाद्यांचा, उदारमतवाद्यांचा की अत्यंत पुढारमतवाद्यांचा? यावरून त्यांच्यात अखंड संघर्ष चालू आहे. हा विवाद संपता संपत नाही आणि त्यांच्यातील विविध गटांचे समर्थक इतरांना शत्रू म्हणून पाहतआहेत.डेमोक्रॅट्सकडे तंत्रज्ञानाचाही अभाव आहे. एका अॅप्लिकेशनमध्ये झालेल्या बिघाडामुळे उमेदवार निवडण्यासाठी घेतलेल्या पहिल्या पक्षाच्या अंतर्गत मतदानाचा निकाल येण्यास दोन दिवस उशीर झाला. ते जर आयोवा कॉकसचा निकाल मोजू शकत नाहीत,ते अर्थव्यवस्था कशी चालवणार असा प्रश्न रिपब्लिकन पक्षाने केला आहे.

“Error 404 Not Found” – हा संगणकात काही बिघाड असल्यास दिसणारा संदेश ट्रम्प यांना पराभूत करण्यासाठी स्पर्धेत उतरलेल्या उमेदवारांसाठी उत्तम रूपक आहे. जो बायडेन, माजी सिनेट सदस्य आणि उपराष्ट्रपती, हे डेमोक्रॅट्स यांच्या मते ट्रम्प यांच्याविरोधात लढण्यासाठी निवडले गेले होते.परंतु त्यांचा आयोवा कॉकस मध्ये निराशाजनक चौथा क्रमांक आला.

पिटर बटिगीग, एक छोट्या नगराचे महापौर, ज्यांनी आश्चर्यकारक कामगिरी केली आहे यांनी स्वघोषित लोकशाही समाजवादी बर्नी सँडर्स यांच्यासमवेत सुरुवातीच्या स्पर्धेत वरचा क्रमांक मिळविला आहे. जर सॅंडर्सने आपले स्थान टिकवले आणि उमेदवारी मिळवली तर डेमोक्रॅट्सवर वेनेझुएलासाठी समाजवाद का वाईट आहे, परंतु अमेरिकेसाठी कसा चांगला आहे… हे समजावून सांगण्याची कठीण वेळ येईल.

डेमोक्रॅट्ससाठी एकूणच वाईट दिवस आहेत. त्यांनी ट्रम्प यांच्या महाभियोगाच्या निकालाचा चुकीचा अंदाज लावला, आयोवामधील निकालांची गणना करणे त्यांना शक्य झाले नाही आणि एकूण गोंधळ दिसून आला. त्यांनी सुरु केलेल्या नाटकाचा नायक मिट रोमनी – एक रिपब्लिकन ठरला. ज्याने आपली राजकीय विचारधाराबाजूला ठेवून, विवेकबुद्धी वापरून मतदान केले आणि आपल्या पक्षातून तो बाहेर पडला.

हे सारे असले तरी ट्रम्प यांच्यासाठी यश समोर दिसते आहे. महाभियोगाच्या कारवाईचा त्यांना धक्का बसेल हे निश्चित आहे. परंतुत्यांच्या सिंहासनाला हात लागेल, अशी आजतरी चिन्हे नाहीत.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.