Author : Dr. Gunjan Singh

Published on Aug 21, 2019 Commentaries 0 Hours ago

चीनमधील शिंजियांग प्रांतात खालपासून वरपर्यंत केलेल्या नियंत्रणामुळे या प्रदेशात कितपत शांतता आणि स्थैर्य टिकून राहील हे पाहणे गरजेचे आहे.

शिजिंयांगच्या तीन श्वेतपत्रिकांची कथा

चीनी सरकारने २०१९ मध्ये शिजिंयांगबाबत तीन श्वेतपत्रिका प्रसिद्ध केल्या आहेत. या श्वेतपत्रिकांचे शीर्षक आहे, “दहशतवादी कारवायांविरुद्धची लढाई आणि शिजिंयांगमधील मानवी हक्काचे सरंक्षण” (१८ मार्च, २०१९ रोजी प्रकाशित), “शिजिंयांगशी निगडीत ऐतिहासिक घडामोडी” (२१ जुलै, २०१९ रोजी प्रकाशित), आणि “शिजिंयांगमध्ये व्यायसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण” (१६ ऑगस्ट २०१९). फार कमी वेळेत या तीन श्वेतपत्रिका प्रसिद्ध केल्याने चीन सरकार अशी पावले का उचलत आहे, याकडे सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले आहे.

चीन सरकारने जाहीर केलेल्या या श्वेतपत्रिका त्यांचे कामकाज आणि त्यांची धोरण बनवण्याची पद्धत, तसेच भविष्यातील त्यांची वाटचाल कशी राहील याबाबत बरीच माहिती देतात. सहा महिन्यात तीन श्वेतपत्रिका प्रसिद्ध केल्याने हे लक्षात येते की, शिजिंयांग हा चीन सरकारच्या धोरणातील आणि नियोजनातील एक कळीचा मुद्दा आहे. शी जिंगपिंग यांच्या बेल्ट अॅंड रोड इनिशिएटिव्ह (बीआरआय) मध्ये शिजिंयांगचे स्थान मध्यवर्ती आहे, त्यामुळेही शिजिंयांग हा चीनच्या दृष्टीने एक महत्वाचा मुद्दा असू शकतो.

शी जिंगपिंग यांच्या नेतृत्वाखाली शिजिंयांगवरील नियंत्रण आणि तिथल्या देखीरेखीमध्ये वाढ करण्यात आली आहे. शी यांनी राष्ट्राचे अध्यक्ष या नात्याने शिजिंयांगला दिलेल्या पहिल्या भेटीतच त्यांची धोरणे स्पष्ट झाली होती. या भेटीदरम्यान शी यांनी पोलीस पथक आणि लष्करी दलांची भेट घेऊन, “दहशतवाद्यांशी लढण्यासाठी तुमच्याकडे अत्यंत प्रभावी साधने असली पाहिजेत,” असा आग्रह धरला. उईगूर लोकांसाठी चीन सरकारने ‘नजरबंदी केंद्रे’ उभारली असल्याचे अनेक अहवालातून स्पष्ट झाले आहे. याला चीन सरकारने शिजिंयांगमधील लोकांसाठी उभारलेली ‘व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण केंद्र” असे अधिकृत नाव दिलेले आहे.

प्रकाशित झालेल्या अनेक अहवालानुसार या नजरबंदी केंद्रामध्ये अंदाजे दहा लाख उईगूर मुस्लीम नजरकैदेत ठेवण्यात आले आहेत. शिजिंयांग मधील नागरिक विशेषतः मुस्लीम नागरिक कशा प्रकारे वर्तन करतात यावर देखरेख आणि त्यांची नोंद ठेवण्यासाठी सरकार अत्याधुनिक सुरक्षा साधने वापरत आहे. सरकारद्वारे चालवण्यात येणाऱ्या शस्त्रास्त्र उत्पादक, चायना इलेक्ट्रॉनिक्स टेक्नोलॉजी कॉर्पोरेशनने बनवलेल्या यंत्रणे नुसार, “परिचित माहितदारांच्या नेटवर्क्समध्ये व्यक्तीला टॅप केले जाते, त्या व्यक्तीचा मागोवा घेतला जातो आणि त्याच्या वर्तनाचे विश्लेषण केले जाते, यावरून संभाव्य, गुन्हा, निषेध किंवा हिंसाचाराच्या घटनांचा अंदाज लावला जातो, आणि हे थांबवण्यासाठी कोणती सुरक्षा यंत्रणा राबवली पाहिजे हे सुचवले जाते.”

परंतु, शिजिंयांग मधील सध्या अस्तित्वात असणाऱ्या भेदभावाच्या आणि वांशिक नियंत्रणाच्या आख्यायिका खोट्या ठरवण्यासाठीच या श्वेतपत्रिका जाहीर करण्याचा प्रयत्न केला आहे. या तिन्ही श्वेतपत्रीकांमधून चीन सरकार शिजिंयांग मधील नागरिकांचे जीवनमान सुधारण्याचा आणि त्यांना अधिक चांगले जीवन देण्यावर भर देत असल्याचे स्पष्ट होते. म्हणूनच, “दहशतवादी आणि अतिरेकी कारवाई विरुद्ध लढाई आणि शिजिंयांगमध्ये मानवी हक्काचे सरंक्षण” या मार्च २०१९ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या श्वेतपत्रिकेमध्ये, “शिजिंयांग मध्ये बेकायदेशीर धार्मिक कृत्ये, बेकायदेशीर धार्मिक प्रचार साहित्य आणि इंटरनेटच्या आधारे बेकायदेशीर धर्मप्रसार, ज्यामुळे धार्मिक अतिरेकीपणा पोसण्यास, वाढण्यास, आणि फैलावण्यास मदत होते, अशा गोष्टींविरोधात लढण्यासाठी  कायद्यावर आधारित  कट्टरता-विरोध मोहीम राबवली जात आहे.” यावरून कोणत्याही प्रकारची अस्वस्थता जर ती दहशतवादाकडे झुकणारी असेल तर, तिला विरोध करण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी हरएक प्रयत्न चीन सरकारकडून केले जात आहेत, हे स्पष्ट होते.

दुसरी श्वेत पत्रिका, “शिजिंयांगशी निगडीत ऐतिहासिक घडामोडी” जुलै २०१९ मध्ये जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये असा दावा करण्यात आला आहे की, शिजिंयांग मधील संस्कृतीचे मूळ चीनी संस्कृतीमध्ये दडलेले आहे आणि काळाच्या ओघात इस्लामी संस्कृतीशी देवाणघेवाण वाढल्याने तिच्यात काही बदल होत गेले आहेत. या श्वेतपत्रिकेतून असा दावा करण्यात आला आहे की, “शिजिंयांग मधील पारंपारिक संस्कृती समृद्ध आणि विकसित होण्यासाठी त्यांनी काळाशी सुसंगत गती राखणे आवश्यक आहे, त्यांनी खुलेपणा स्वीकारला पाहिजे आणि सर्वसमावेशक असले पाहिजे, चीन मधील इतर पारंपारिक संस्कृतीशी त्यांनी देवाणघेवाण करणे आणि त्या आत्मसात करणे गरजेचे आहे, तसेच जगभरातील इतर पारंपारिक संस्कृतीकडूनही त्यांनी शिकले पाहिजे, सर्वप्रकारच्या चीनी वांशिक समूहासाठी एक पवित्र घर उभे राहील यासाठी त्यांनी आपले योगदान दिले पाहिजे.”

१६ ऑगस्ट २०१९ रोजी प्रसिद्ध झालेल्या, तिसऱ्या श्वेतपत्रिकेमध्ये शिजिंयांग मध्ये वाढती नजरबंदी केंद्रे किंवा व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण केंद्रे यांच्या समस्येवर भाष्य करण्यात आले आहे. या श्वेतपत्रिकेनुसार, या केंद्रात  विशेषतः तीन प्रकारचे लोक प्रशिक्षक म्हणून काम करतात. पहिले ते ज्यांच्यावर कोणत्यातरी दहशतवादी किंवा अतिरेकी कारवाई मध्ये सामील होण्यासाठी जबरदस्ती केलेली असते, ज्यामुळे इतर लोकांना फारसा धोका उद्भवलेला नसतो. दुसरे, असे ज्यांनी स्वतः अशा अतिरेकी कारवायांमध्ये सहभाग घेतलेला असतो आणि फार मोठ्या समूहाला त्यामुळे हानी पोचलेली असते. तिसऱ्या प्रकारचे म्हणजे अशा दशहतवादी कृत्यांमध्ये जे दोषी आढळलेले आहेत ते लोक. या सर्व लोकांनी स्वतःहून प्रशिक्षण केंद्राच्या कामात रस दाखवला आणि त्यांना या प्रशिक्षण केंद्रात भरती होण्याची इच्छा व्यक्त केली. अशा लोकांना चांगला रोजगार मिळावा आणि त्यांच्यातील कौशल्याला वाव मिळावा हाच या प्रशिक्षण केंद्रांचा प्राथमिक उद्देश आहे.

परदेशी पत्रकारांनी या प्रदेशाचा दौरा करून शिजिंयांगच्या स्थानिक नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रांचा कसा लाभ झाला याचे अहवाल सादर केले होते, अशा अनेक अहवालांचा समावेश या श्वेतपत्रिकेमध्ये करण्यात आलेला आहे. “या भागात फिरल्यानंतर अनेकांना सत्य समजले आणि हे शिक्षण आणि प्रशिक्षण देण्यामागची निकड, आवश्यकता, कायदेशीर बाबी आणि तार्किकता देखील त्यांनी समजावून घेतली,” असा दावा या श्वेतपत्रिकेत करण्यात आला आहे.

सरकारचे दावे अगदी स्पष्ट आहेत. पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाच्या दीर्घकालीन नियंत्रणाची बाजू मांडताना शिजिंयांगमध्ये शांताता आणि स्थैर्य कायम ठेवण्यावर त्यांच्या भर आहे. या श्वेतपत्रिकांच्या माध्यमातून चीन उईगूर मुस्लीम युवकांना चीनी राष्ट्राच्या संकल्पनेत आणण्याच्या गरजा अधोरेखित करत आहे. परंतु, यासाठी चीन सरकारने जो मार्ग अवलंबला आहे त्यामुळे उगूर लोकांचे स्वतःचे वांशिक वैशिष्ट्य लोप पावत असून ते हून वंशाचाच एक भाग बनत आहेत.

उईगूर लोकांवर केंद्र सरकारकडून सातत्याने त्यांच्या सांस्कृतिक वैशिष्ट्याला तिलांजली देऊन भविष्य घडवण्याची सक्ती केली जात आहे. तसेच जास्तीत जास्त हून लोकांचे शिजिंयांगला स्थलांतर होत असल्याने आणि उगूर लोकांना मँडरीन शिकवण्याच्या दृढ इच्छेमुळे पुढे जाऊन उईगूर त्यांच्याच प्रदेशात अल्पसंख्य ठरू शकतात. अशा पद्धतीने खालपासून वरपर्यंत केलेल्या नियंत्रणामुळे या प्रदेशात कितपत शांतता आणि स्थैर्य टिकून राहील हे पाहणे गरजेचे आहे. उईगूर लोकांवर जितके नियंत्रण ठेवले जाईल, त्यांच्याकडूनही तितकाच तीव्र प्रतिकार होण्याची शक्यता आहे.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.