Author : Rajeev Jayadevan

Published on Jul 01, 2021 Commentaries 0 Hours ago

विषाणूसंसर्ग रोखण्यासाठी आज आपल्यापुढे आर्थिक विषमता, लोकसंख्येची दाट घनता आणि लसीच्या वापराबाबत असलेला संशय ही मोठी आव्हाने आहेत.

विषाणूसंसर्गाचे आव्हान आणि भविष्यातील संधी

सार्स कोव्ह २ विषाणूची नव्याने ओळख करून देण्याची आता गरज नाही. जगभर मृत्युचे थैमान घालणारा हा विषाणू आणि वैज्ञानिक संशोधन यांच्यात दीर्घकाळ रस्सीखेच सुरू आहे. या रोगावरील उपचारांचा विचार करताना लसीकरण आणि इतर काही उपचार सोडल्यास, गेल्या १०० वर्षाच्या उपचारपद्धतीत नवीन कोणत्याच गोष्टींचा समावेश झालेला नाही.

उदाहरणार्थ, आपल्याकडे प्रभावी अॅंटीव्हायरल एजेंट उपलब्ध नाहीत, या विषाणूचे फुप्फुसे आणि रक्त वाहिन्यांसह इतर अवयवांवरील परिणाम कसे रोखायचे हे अजूनही आपण शिकलेलो नाही, एकदा हा विषाणू आपल्या प्रतिकारक्षमतेची भिंत पार करून शरीरात पसरायला लागला की, त्याला थोपवून धरणे अजूनही ज्ञात नाही. काही लोकांच्या शरीरात या विषाणूचा संसर्ग जलद गतीने होतो आणि काहीवेळा ह्या संसर्गाने जीवही जाऊ शकतो. पण काही लोकांना हा संसर्ग झालेलाही कळून येत नाही. याबाबत अनेक सिद्धांत आहेत पण खरी वस्तुस्थिती कोणालाच अवगत नाही.

आरोग्य सेवांमधील विज्ञानामध्ये एक महत्वाची मूलभूत समस्या आहे आणि ती म्हणजे वर्षानुवर्ष एकाच प्रकारचे पॅटर्न वापरण्यात येत आहेत. अर्थात याचे जसे फायदे आहेत तसेच तोटेही आहेत. यामुळे संशोधनावर मर्यादा येते. भविष्यात एखादा विषाणू शरीरमध्ये पसरण्यापासून रोखण्यावर ठोस आणि प्रभावी उपाय शोधायला हवेत.

यासोबतच, शून्य वैज्ञानिक पाया असलेले आणि व्यावसायिक हितासाठी चमत्कारिक परिणाम दिसतील असा दावा करणारी सर्व उत्पादने शोधून त्यावर बंदी घालायला हवी. लोकांची फसवणूक करणारे घोटाळेबाज त्यांचे उत्पादन शास्त्रज्ञांहूनही अधिक ठासून लोकांपर्यंत पोहोचवतात. असे घोटाळेबाज सर्व ठिकाणी आढळून येतात. आपण ज्या उत्पादनाची जाहिरात करत आहोत त्या उत्पादनाची गुंतवणूकदारांना इतकी भुरळ पडते की हा एक मोठा घोटाळा आहे आणि आपण ह्यात अडकलेले आहोत हे अनेकदा त्यांना कळूनही येत नाही.

विषाणू कसे काम करतो ?

कोणताही विषाणू हा धूलिकणाप्रमाणे असतो. त्याच्यातील प्रोटीन कोटमध्ये जेनेटिक कोड असतो, तर यावर स्निग्धपदार्थाचे आवरण असते. हा विषाणू स्वतः हलू शकत नाही किंवा त्यांची वाढही होऊ शकत नाही. यासाठी त्याला माध्यमाची गरज असते. सार्स कोव्ह २ या विषाणूसाठी मानवी शरीर हा एक उत्तम माध्यम आहे. ही जागतिक महामारी हेच याचे जिवंत उदाहरण आहे.

वैश्विक लसीकरण आणि इतर उपचार पद्धतींचा वापर करून मानवामधील संसर्ग वाढवण्याच्या या विषाणूच्या क्षमतेवर मर्यादा घालण्यात आपल्याला जर यश आले तर आपण या महामारीला आळा घालू शकतो. अर्थात हे काम इतके सोपे नाही. आर्थिक विषमता, लोकसंख्येची दाट घनता आणि लसीच्या वापराबाबत असलेला संशय ही आपल्यासमोरील मोठी आव्हाने आहेत.

काही इतर उपायांचा विचार करताना एकदा विषाणूने शरीरात प्रवेश केला की त्याचा पुढील प्रवास कसा असतो हे समजून घेता यायला हवे. अर्थात याचा फायदा संसर्ग रोखण्याच्या कामी येऊ शकतो. कोविड १९ ह्या आजारात दोन टप्प्यांचा समावेश होतो. काही लोकांमध्ये हा आजार पहिल्या टप्प्यामध्ये संसर्गानंतर कमी होतो. फार कमी लोकांमध्ये दूसर्‍या टप्प्यात हा आजार बळावतो. ह्याच टप्प्यात काहीवेळा शरीरातील अवयवांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. दुर्दैवाने एखाद्या रुग्णामध्ये जर अशी लक्षणं दिसून आली तर त्याच्या शरीरातील संसर्ग कसा थांबवायचा ह्यावर आपल्याकडे कोणताही पर्यायी उपचार उपलब्ध नाही.

आपल्यातील बर्‍याच जणांनी सार्स कोव्ह २ विषाणूचा आपल्या पेशींमध्ये प्रवेश कसा होतो हे ऐकले असेल. यामध्ये विषाणूमधील प्रोटीन स्पाईक हे एसीई-२ रिसेप्टर्सशी जोडले जातात. याद्वारे विषाणूचा शरीरात प्रवेश होतो. एकदा हा प्रवेश झाला की विषाणू आपल्या शरीरातील संसाधंनाचा वापर करून त्याच्या अनेक प्रतिकृती तयार करतो. यानंतर विषाणूला संसर्ग तसाच चालू ठेवण्यासाठी शरीरातील इतर पेशींची आवश्यकता असते.

हा विषाणू शरीरातील इतर पेशींमध्ये कशापद्धतीने पसरतो , हा एक मोठा प्रश्न आहे. म्हणजेच दर वेळेस विषाणू एसीई २ रिसेप्टर्समध्ये प्रोटीन स्पाईक जोडून शरीरात प्रवेश करतो का ? किंवा हयाहून इतर प्रकारे तो शरीरात प्रवेश करू शकतो हे समजून घेणे गरजेचे आहे.

कोरोनाच्या विषाणूची वाढ कशी होते, हे समजून घेण्याची गरज

शरीरामधील ऊतींमध्ये लाखो पेशी दाटीवाटीनेने असतात. विषाणू हल्ला करून तो भाग बाधित करतील असा फार थोडा खुला पृष्टभाग पेशीमध्ये उपलब्ध असतो. दोन पेशींच्या संपर्क पृष्ठभागामधील जागेचा वापर करून ‘साइडवे मेकॅनिझम’ च्या सहाय्याने एचआयव्ही १ आणि गोवराचे विषाणू संसर्ग वाढवतात. म्हणून प्रत्येकवेळी पेशीच्या पृष्ठभागावर रिसेप्टरच्या सहाय्याने उतरून त्याद्वारे पेशीमध्ये प्रवेश करण्याची विषाणूला गरज पडत नाही.

हे समजून घेण्यासाठी आपण एका गगनचुंबी इमारतीचे उदाहरण घेऊया. एखाद्या इमारतीच्या एका उघड्या खिडकीमधून ढेकूण इमारतीमधील एका खोलीमध्ये घुसतो. यानंतर तो मोठ्या प्रमाणावर प्रजनन घडवून आणतो. यातून निर्माण झालेले नवजात ढेकूण भिंतींमधून आसपासच्या इतर खोल्यांमध्ये प्रवेश करतात. असे होत असताना अल्पावधीतच संपूर्ण इमारत ढेकुणामुळे संक्रमित होते.

याविरुद्ध, दुसरा एखादा असा ढेकूण जो खिडकी उघडी असल्याशिवाय इमारतीत प्रवेश करू शकत नाही. तो आधीच्या भिंतीतून पसरणार्‍या ढेकणाच्या तुलनेत अधिक नुकसान करू शकणार नाही. सार्स कोव्ह २ विषाणूच्या बाबतीत पेशींच्या भिंतींमधून वाढणार्‍या संसर्गाची शक्यता गेल्या वर्षीच मांडण्यात आली होती.
संशोधक अनामिका बसू आणि कोलकत्त्याच्या जाधवपुरा विद्यापीठाच्या गुरुदास महाविद्यालयातील त्यांच्या सहकार्‍यांनी २६ मे २०२० मध्ये सार्स कोव्ह २ हा विषाणू पारंपरिक विषाणू संसर्गाहून कसा वेगळा आहे हे मांडणारे संशोधन प्रसिद्ध केले होते.

काही दिवसांपूर्वी १ जून २०२१ ला या संशोधनाला कोंग झेंग आणि ओहायओ विद्यापीठ तसेच वॉशिंग्टन विद्यापीठामधील काही अभ्यासकांनी सार्स कोव्ह २ हा विषाणू पेशींमधील संपर्क भिंतीतून इतर पेशींमध्ये प्रवेश करतो ह्याला दुजोरा दिलेला आहे.

दोन पेशींना जोडणारा गोंदासारखा एक चिकट पदार्थ दोन पेशींच्या मधील जागेत असतो. त्याद्वारे विषाणू एका पेशीमधून दुसर्‍या पेशीमध्ये प्रवेश करतो. पेशींदरम्यानच्या या भागात विषाणू रोखणारी कोणतीही प्रतिपिंड पोहोचू शकत नाहीत म्हणूनच ही जागा विषाणूच्या वाढीसाठी अनुकूल ठरते. शरीरातील एकूण प्रतिपिंडांमध्ये संसर्ग रोखणारी प्रतिपिंडे लहान समूहात आढळतात. ही प्रतिपिंडे विषाणूच्या विशिष्ट पृष्टभागाला जोडून घेतात त्यामुळे एसीई २ रिसेप्टरचा वापर करून पेशींमध्ये संसर्ग वाढवणे विषाणूला शक्य होत नाही.

संसर्ग रोखणारी प्रतिपिंडे पेशी भित्तिकांच्या दरम्यान असलेल्या छोट्या जागेत मोठ्या संख्येने प्रवेश करू शकत नाहीत. याचाच फायदा घेऊन विषाणू पेशींभोवताली असलेल्या अनेक आवरणांमधून प्रतिपिंडांना चकवा देत पेशींमध्ये प्रवेश करतात.

नतालीया क्रुग्लोवा आणि गमलेया राष्ट्रीय संशोधन केंद्र, मॉस्को मधील त्यांच्या सहकार्‍यांनी ५ मे २०२१ मध्ये प्रसिद्ध केलेल्या संशोधनामध्ये याला दुजोरा दिलेला दिलेला आहे. पेशींमधील भित्तिकांमधून प्रवेश करताना संसर्ग रोखणार्‍या प्रतिपिंडांचा विषाणूवर कोणताही परिणाम होत नाही.

याव्यतिरिक्त शरीरमधील पेशींमधून विषाणूचा प्रवेश ही बाब चिंताजनक आहे. अर्थात यामुळे उपचारांच्या वेगळ्या संधीही उपलब्ध होऊ शकतात. सार्स कोव्ह २ हा विषाणू पेशींच्या पृष्टभागावर असलेल्या एसीई -२ रिसेप्टरच्या सहाय्याने पेशींमध्ये प्रवेश करू शकतो. पण या विषाणूचा संसर्ग फक्त रिसेप्टरच्या सहाय्याने न होता पेशींमधील थेट संक्रमण प्रक्रियेमुळे होतो, हे स्पष्ट आहे.

औषधशास्त्राच्या मदतीने हे संक्रमण रोखणे शक्य आहे का ? जर हे शक्य झाले तर भविष्यात महामारीचा सामना करण्यासाठी याचा कितपत फायदा होईल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.