Published on Feb 28, 2020 Commentaries 0 Hours ago

भारत-अमेरिका संबंध दृढ व्हावेत या दृष्टीने ट्रम्प दौ-याकडे पाहिले पाहिजे. दोन्ही देशात झालेल्या करारांवर नजर टाकली, तर ही संधी साधली गेल्याचे स्पष्ट होते.

ट्रम्प यांच्या भारतभेटीचे फलित काय?

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारतभेटीचे कवित्व अजून सरलेले नाही. अवघ्या दीड दिवसांचा भारत दौरा आटोपून ट्रम्प मायदेशी परतले आहेत. आता या भेटीचे फलित काय, याचा आढावा घेण्याचे काम सध्या विविध पातळ्यांवर सुरू आहे. तसे पाहता भारतभेटीवर येणारे ट्रम्प हे आठवे अमेरिकी अध्यक्ष. तर भारतभेटीचा लाभ घेणारे सलग चौथे अध्यक्ष. आपल्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत भारताला आवर्जून भेट देण्याच्या अमेरिकी अध्यक्षांच्या वारंवारतेतून अमेरिकेप्रति भारताचे वाढत असलेले महत्त्व अधोरेखित करते तसेच उभय देशांच्या नेत्यांनी द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी केलेले प्रयत्नही स्तुत्य ठरतात. अटलबिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग आणि आता नरेंद्र मोदी या तिघांनी भारताच्या बाजूने तर बिल क्लिंटन, जॉर्ज डब्ल्यू बुश, बराक ओबामा आणि आता डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या बाजूने हे द्विपक्षीय संबंध केवळ सुधारण्याच्या नव्हे तर एका उच्च पातळीवर नेऊन ठेवण्याच्या प्रयत्नांत सातत्य ठेवले.

ट्रम्प यांच्या आधीच्या अध्यक्षांनी दिलेल्या भेटी आणि ट्रम्प यांची भारतभेट यांत जमीन-अस्मानाचा फरक आहे. त्याचे प्रत्यंतर अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियमवर आले. गेल्या वर्षी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौ-यावर गेले असता ह्यूस्टन येथे झालेल्या ‘हाऊडी मोदी’ कार्यक्रमात ट्रम्प यांनी संयत भाषण केले होते. अगदी त्याचप्रमाणे ट्रम्प यांनी मोटेरा स्टेडियमवर जमलेल्या एक लाखांहून अधिक लोकांशी संवाद साधला.

कोणत्याही आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात वादग्रस्त विधान करून वाद ओढवून घेण्याची खोड ट्रम्प यांना आहे.या दौ-यात त्यांनी त्यास तिलांजली दिल्याचे दिसून आले. ट्रम्प यांनी यजमानांच्या सुरात सूर मिसळण्याचेच धोरण ठेवले. मोटेरा स्टेडियमवर जमलेल्या जनसमुदायाशी संवाद साधताना ट्रम्प म्हणाले, ‘अमेरिकेला भारत प्रिय आहे. अमेरिका भारताचा आदर करते आणि अमेरिकन लोक नेहमीच भारतीयांचे सच्चे आणि निष्ठावान मित्र राहतील’. ट्रम्प यांनी त्यांच्या दौ-यात एका मोठ्या आशियाई देशाच्या वर्तणुकीची भारताशी तुलना केली. ते म्हणाले, ‘जगात असेही देश आहेत जे दरडावून, धमकावून प्रसंगी जबरदस्ती करून सत्ता हस्तगत करतात परंतु लोकांना मुक्त सोडून त्यांना त्यांच्या स्वप्नांची पूर्तता करू देण्याइतपत औदार्य फार कमी देशांकडे असते. आणि  असे औदार्य मी भारतात पाहिले आहे.’

ट्रम्प यांचा रोख भारताच्या शेजारी राष्ट्रांकडे होता. ‘पाकिस्तानने दहशतवाद्यांना आश्रय देणे बंद करून ज्या दहशतवादी संघटना किंवा दहशतवादी पाकिस्तानी भूमीचा वापर करत आहे, त्यांचा बंदोबस्त करण्याचा आग्रह आपल्या प्रशासनाने पाकिस्तानकडे धरला आहे’, हे ट्रम्प यांनी आवर्जून नमूद केले. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ‘तणाव निवळून’ दक्षिण आशियात ‘स्थैर्य’ निर्माण होईल, असा आशावादही ट्रम्प यांनी व्यक्त केला.

मोदी आणि ट्रम्प यांच्यात असलेले मित्रत्वाचे संबंध, उभयतांमधील सुसंवाद, ट्रम्प यांच्या स्वागतासाठी आयोजित करण्यात आलेले विविध कार्यक्रम आणि ट्रम्पभेटीचे राजकीय महत्त्व या सर्व घटकांमुळे ट्रम्प यांच्या दौ-याला उत्सवी स्वरूप प्राप्त झाले होते. यंदा अमेरिकेत अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर ट्रम्प भारतात आले. परदेशात आपल्याला वाढता पाठिंबा असून तेथील जनता आपले विचार ऐकण्यास उत्सुक असते ही छबी ट्रम्प यांना स्वदेशात अधिक ठसवायची आहे. त्या दृष्टीनेही ट्रम्प यांच्या भारत दौ-याकडे पाहिले जाते. तसेच पारंपरिकरित्या डेमोक्रॅट्सना पाठिंबा देणा-या भारतीय-अमेरिकी नागिकांना साद देण्यासाठीही ट्रम्प यांनी या दौ-याची आखणी केली असावी. भारतातही या दौ-याचे राजकीय महत्त्व अधोरेखित झाले. भारताकडे पाहण्याचा अमेरिकेचा दृष्टिकोन सकारात्मक असल्याचे सातत्याने बिंबवले जात आहे.

भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध चांगले आहेत. मात्र, अधिक दृढ व्हावेत यासाठी ही सुसंधी होती. उभय देशांमध्ये झालेल्या करारमदारांवर नजर टाकली तर ही संधी साधली गेल्याचे स्पष्ट होते. भारत आणि अमेरिका यांच्यात सुरक्षेच्या मुद्दयावरून भागीदारी आहे. त्या पार्श्वभूमीवर शस्त्रास्त्र खरेदीचा करार झाला. आता भारतीय लष्कराच्या ताफ्यात अमेरिकी तंत्रज्ञानाने विकसित केलेली शस्त्रास्त्रे असतील. त्यातील काही तंत्रज्ञानाचे घटक भारतात उत्पादित होतील किंवा त्यांचे संकलन केले जाईल. याव्यतिरिक्त आणखी तीन विशेष संरक्षण सहाय्य करार उभय देशांमध्ये झाले. तसेच द्वीपक्षीय, त्रिपक्षीय आणि चौरंगी संवादाच्या करारांचेही नूतनीकरण झाले आणि दोन्ही देशांच्या तीनही दलांचा समावेश असलेल्या संयुक्त लष्करी कवायती नियमित करण्यावरही एकमत झाले.

गेल्या काही वर्षांत अमेरिकी आणि भारतीय लष्कर यांच्या नियमित संयुक्त कवायती सुरू आहेत. त्याचेच हे फलित होय. तसेच दोन्ही देशांमध्ये गेल्या काही वर्षांत जोडण्या पायाभूत सुविधा, सागरी सुरक्षा, दहशतवादविरोध आणि सायबर सुरक्षा या क्षेत्रांमधील सहकार्य वाढले आहे. उभय देशांच्या बहुपक्षीय सहकार्यातही, विशेषतः संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत, सुधारणा झाली आहे. गेल्या वर्षी पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर ही सुधारणा प्रकर्षाने अधोरेखित झाली होती.

आर्थिक आघाडीवरही उभय देशांच्या वस्तू आणि सेवा या दुहेरी व्यापारात वाढ झाली आहे. भारत हा अमेरिकेचा आठवा मोठा व्यापार भागीदार देश बनला आहे तर भारताच्या दृष्टीने अमेरिका हा सर्वात मोठा व्यापार भागीदार देश आहे. विशेषतः उभय देशांमध्ये ऊर्जा व्यापार लक्षणीयरित्या वाढला. भारतीय विद्यार्थ्यांची अमेरिकेतील संख्या आणि भारतात सक्रिय असलेल्या अमेरिकी कंपन्या या दोहोंच्या संख्येत वाढ झाली आहे. बहुतांश अमेरिकास्थित टेक-जायंट कंपन्यांच्या दृष्टीने भारत हा त्यांच्या पहिल्या तीनांतील ग्राहक बनला आहे. ट्रम्प यांनी दौ-यादरम्यान भारतीय उद्योजकांशीही वार्तालाप केला. त्यात अनेक भारतीय उद्योजकांनी अमेरिकेत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केल्याचे निदर्शनास आले. दरम्यान, भारतीयांनी अमेरिकेत मोठ्या संख्येने अब्जावधी डॉलर किमतीचे नव-उद्योग स्थापन केले आहेत.

दोन मित्रदेशांमध्ये सर्वच मुद्द्यांवर सहमती असते असे नाही. मतभेद असतात. तसेच भारत आणि अमेरिका यांच्यातही काही मुद्द्यांवर मतभेद आहेत मात्र, मतभेदांची दरी अरुंद करण्यावर उभय देशांनी कायम भर दिला आहे. रशियाकडून भारताने शस्त्रास्त्र खरेदी केली म्हणून अमेरिका भारतावर आर्थिक निर्बंध लादेल, अशी भीती होती. मात्र, तीच शस्त्रास्त्रे तुर्कस्तान रशियाकडून खरेदी करणार असताना त्यात निर्माण झालेल्या गुंतागुंतीमुळे ही भीती कमी झाली. इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव टोकाला गेला त्यावेळी भारताने इराणकडून इंधन खरेदी करू नये, असा इशारा अमेरिकेने दिला होता. मात्र, ती परिस्थिती यशस्वीपणे हाताळण्यात आली. तेलगरजा पूर्ण करण्यासाठी इराणऐवजी दुसरा भागीदार मिळेपर्यंत भारताला पुरेसा अवधी देण्यात आला आणि चाबहार बंदर प्रकल्पाबाबतही अमेरिकी निर्बंधांतून भारतला सूट देण्यात आली.

भारत आणि अमेरिका यांच्यात कृषी आणि आरोग्य देखभाल यांच्यासह अनेक व्यापार मतभेद आहेत. मात्र, ते मिटविण्यात आले. परंतु डिजिटल पेमेंट्स, डेटा लोकलायझेशन आणि ई-कॉमर्स यांच्याशी संबंधित वादाचे नवे मुद्दे ऐरणीवर आले आहेत. अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर भारताने अमेरिकेला नेहमीच सहकार्य केले आहे. तालिबान्यांशी वाटाघाटी करताना ट्रम्प प्रशासन आणि अफगाणिस्तान सरकार यांच्यात समन्वयाची भूमिका भारताने समर्थपणे पेलली आहे. पाकिस्तानने मात्र या सर्व कालावधीत विश्वासार्हता गमावली आहे. अमेरिकेकडून त्या देशाला होणारे लष्करी सहाय्यही आता कमी झाले आहे. त्यातच पाकिस्तानला फायनान्शिअल ऍक्शन टास्क फोर्सच्या (एफएटीएफ) सदस्य देशांनी करड्या यादीत टाकल्याने त्या देशासाठी परिस्थिती अधिकच बिकट बनली आहे.

नोव्हेंबरमध्ये होणा-या निवडणुकीत ट्रम्प पुन्हा अध्यक्षपदी निवडून येवो अथवा न येवो परंतु भारत-अमेरिकेच्या ताळेबंदात या दौ-याचे महत्त्व कायम राहील. दोन्ही बाजूंच्या सकारात्मक आणि नकारात्मक मुद्द्यांना घेऊन त्यावर भारत आणि अमेरिका उभयतांनी पुढील संबंधांचा आकृतिबंध तयार करायला हवा. उभय देशांनी पुढाकार घेऊन व्यापार कराराला अंतिम स्वरूप देण्याला प्राधान्य द्यायला हवे जेणेकरून अधिक व्यापार कर लावण्याचे थांबेल आणि दोन्ही देशांतील वाणिज्यिक वाद संपुष्टात येतील.

संरक्षण संशोधन व विकास आणि इमिग्रेशन प्रश्न सोडविणे हे दोन्ही मुद्दे दोन्ही देशांच्या अजेंड्यांच्या दृष्टीने अग्रक्रमावर असतील. रशियाशी असलेले वाद मिटवून अमेरिकेच्या उद्योगांसाठी भारतात कायदेस्नेही वातावरण तयार करणे यांवरही भर दिला जावा. आंतरराष्ट्रीय राजकारणात दिवसेंदिवस कमालीचा बदल होत असताना भारत-अमेरिका यांच्यातील संबंध दृढ राहिले आहेत. ट्रम्प यांच्या भारत दौ-याचे फलित हेच की, दृढ संबंधांची ही परंपरा यापुढेही कायम राहील.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.