Author : John C. Hulsman

Published on Apr 02, 2021 Commentaries 0 Hours ago

सध्या चीन एक उदयोन्मुख जागतिक महासत्ता म्हणून आकाराला येत असून, त्यामुळे अमेरिकेचे वर्चस्व असलेल्या विद्यमान जागतिक व्यवस्थेपुढे आव्हान उभे आहे.

अमेरिकेचे चीनबाबतचे नवे धोरण

१९४७ ते १९५३ या कालखंडामध्ये अमेरिकेत राजकीय सत्तांतर घडून आले. तसेच सिनेटचे सदस्य जोसेफ मॅककार्थी यांनी कम्युनिस्ट पक्ष आणि गुप्तहेरांबाबतची भूमिका मांडली. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेची जागतिक महासत्तेकडील वाटचाल चालू असतानाच एक चमत्कार घडून आला आणि नवीन जागतिक व्यवस्थेमधील कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या सोविएत रशियाला कसे रोखून धरायचे, याबाबत अमेरिकेत सखोल विचारमंथन सुरू झाले.

प्राचीन ग्रीक संस्कृती नंतरच्या काळात, परराष्ट्र धोरण आणि त्या संबंधी येणारे पैलू यांची योग्य सांगड घालण्यासाठी लोकशाहीला असमर्थ ठरवण्यात आले होते. लोकशाहीत सतत घेतल्या जाणार्‍या निवडणुका आणि राजकीय पक्षांच्या रचनेमधील त्रुटी यांच्यामुळे लोकशाहीला अपात्र ठरवण्यात आले. १९४७-१९९१ हा शीतयुद्धाचा कालखंड पाहिला तर, असे दिसून येते की १९४०-५० या वर्षांमध्ये अमेरिकी नागरिकांच्या आयुष्यात अनेक बदल घडून आले.

समाजातील वेगवेगळ्या स्तरातील व्यक्ती अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदावर विराजमान झाल्या आणि असे असूनही अमेरिकेला प्रबळ परराष्ट्र धोरण राखण्यात यश मिळाले. याच काळात अमेरिका प्रेरित जागतिक व्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले गेले. याचे परिणाम इतके खोल होते की ट्रूमन यांच्या काळातील सेक्रेटरी ऑफ स्टेट असलेले डीन अचीसन यांनी यांच्या आत्मवृत्ताचे नाव ‘प्रेझेंट अॅट द क्रिएशन’ असे ठेवले.

माजी उपराष्ट्राध्यक्ष हेन्री वलास यांचे जोसेफ स्टॅलिन व कम्यूनिस्ट पक्षाबाबतचे नरमाईचे धोरण लोकशाहीवादी राष्ट्राध्यक्ष हॅरी ट्रूमन यांनी मोडीत काढले. या धोरणात कम्युनिस्ट वर्चस्ववादापासून पश्चिम युरोपचा बचाव करण्यासाठी कोणत्याही प्रकारे प्रयत्न केले गेले नाही. पुढील काळात जगभरात कम्यूनिस्ट विचारसरणीचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी वेळ पडल्यास आण्विक शस्त्रास्त्रांचा आधार घ्यावा असा जनरल डग्लास मॅकआर्थर यांनी मांडलेला प्रस्ताव राष्ट्राध्यक्ष आयसेनहॉवर यांनी फेटाळून लावला.

ट्रूमन आणि आयसेनहॉवर यांच्यातील वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवल्यास दोन्ही राष्ट्राध्यक्ष अमेरिकेच्या ‘कंटेनमेंट डॉक्टरीन’ च्या अंमलबजावणीसाठी कटिबद्ध राहिले. पाश्चिमात्य जग विरुद्ध कम्युनिझम या लढाईत संपूर्ण जग विभागले गेले असताना सोवियत युनियनच्या अतिक्रमणाला अमेरिका सक्षमपणे विरोध करेल, या धोरणाला ‘कंटेनमेंट डॉक्टरीन’ असे म्हटले गेले आहे.

या अनुषंगाने सोविएत यूनियनशी थेट लष्करी संघर्ष टाळण्याची भूमिका उजव्या विचारसरणीच्या नेत्यांना पटणारी नव्हती. तसेच अमेरिका आणि सोविएत यूनियन यांच्यातील जिओपॉलिटिकल सत्तास्पर्धेबाबत डावे विचारसरणीचे नेते चिंतित होते. सोविएत यूनियनच्या पतनानंतर ट्रूमन- आयसेनहॉवर यांच्या राजकीय व जिओ-स्ट्रेटेजिक धोरणाचा विजय झाला आणि कंटेनमेंट डॉक्टरीननुसार दोन्ही महासत्तांचे थेट संघर्ष आणि तिसरे महायुद्ध टाळण्यात यश मिळाले.

सद्यस्थितीत अमेरिकेपुढे चीन हा नवीन प्रतिस्पर्धी उभा आहे. या परिस्थितीला हाताळण्यासाठी ‘कंटेनमेंट डॉक्टरीन’ सारखे धोरण अनुसरावे असा सूर अमेरिकेत आळवला जात आहे. या धोरणाचा पूर्व भाग माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रूम्प यांच्या कारकिर्दीत रचला गेला. विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे या धोरणाच्या पुढील अंमलबजावणीसाठी सज्ज आहेत.

अमेरिकेचा धोकादायक आणि उदयोन्मुख प्रतिस्पर्धी म्हणून चीनचा जाहीररीत्या उल्लेख केल्याबद्दल डोनाल्ड ट्रूम्प यांचे कौतुक केले गेले. मुळात ट्रूम्प यांच्यासाठी ही सर्वात महत्वपूर्ण ऐतिहासिक कामगिरी ठरली आहे. चीनचा जागतिक व्यवस्थेतील उदय ही बाबत अमेरिकेच्या पथ्यावर पडणारी असल्यामुळे त्याला प्रोत्साहित करणे गरजेचे आहे, असा अमेरिकेचा सौम्य दृष्टीकोन ट्रूम्प राष्ट्राध्यक्ष होण्याआधी होता.

परंतु काही नेत्यांनी या दृष्टीकोनाबाबत आक्षेप घेतला. अर्थात त्यात ट्रूम्प यांचाही समावेश होता. आधी असा कयास बांधला जात होता की चीन हे राष्ट्र जागतिक व्यवस्थेचा महत्वाचा आधारस्तंभ ठरेल. परंतु सध्या चीन एक उदयोन्मुख जागतिक महासत्ता म्हणून आकाराला येत आहे. याचा थेट परिणाम असा की त्यामुळे अमेरिकेचे वर्चस्व असलेल्या विद्यमान जागतिक व्यवस्थेला मोठे आव्हान निर्माण होणार आहे.

ट्रूम्प यांच्या चीनबाबतच्या धोरणाची पुढील अंमलबजावणी बायडन आता करत आहेत. ट्रूम्प यांनी त्यांच्या या धोरणात अमेरिकेच्या मित्रराष्ट्रांना दूर ठेवलेले होते. पण त्या विरुद्ध बायडन हे इंडो- पॅसिफिक भागातील चीनचे वाढते वर्चस्व रोखण्याच्या दृष्टीने भारत, जपान आणि अँग्लोस्फीयर देशांशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या राष्ट्रांच्या मदतीने चीनवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.  

याच महिन्यात क्वाड्रीलॅटरल सेक्युरिटी डायलॉग ( द क्वाड) ही अमेरिका, भारत, जपान आणि ऑस्ट्रेलिया या देशांच्या प्रमुख नेत्यांची पहिली परिषद पार पडली. या परिषदेत चीनला रोखण्यासोबतच कोविड १९ च्या लसीचे उत्पादन व वितरण तसेच मुक्त इंडो- पॅसिफिक सागरी प्रदेश या महत्वाच्या विषयांवर चर्चा केली गेली. क्वाड अजेंडाचा प्रभावीपणे वापर करून एका नव्या नाटोचा पाया रचण्यासाठी बायडन प्रयत्नशील आहेत.

अलास्का येथे झालेल्या अमेरिका – चीन बैठकीत अमेरिकेच्या नव्या परराष्ट्र धोरणाचे दर्शन घडले. अमेरिका आणि चीन यांच्यातील बैठकीत दोन्ही देशांच्या अधिकार्‍यांकडून एकमेकांवर उघडपणे टीका करण्यात आली. पश्चिम चीन प्रदेशात उघिर यांना मिळणारी अमानुष वागणूक, हाँगकाँग मधील लोकशाहीविरोधी कारवाई, चीनचा तैवानवरील वाढता दबाव या मुद्यांवरून अमेरिकेचे सेक्रेटरी ऑफ स्टेट टोनी ब्लिंकेन यांनी बीजिंगवर खरमरीत टीका केली आहे. तसेच त्यांनी चीनला सायबर हल्ल्यावरुन सक्त ताकीदही दिली आहे. तसेच चीन आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील आर्थिक तणावाची नोंद अमेरिकेने घेतली आहे हे सुद्धा त्यांनी स्पष्ट केले आहे. जगभर सध्या थैमान घालत असलेल्या करोना वायरसचा जन्म चीनमधल्या वुहान या शहरातून झालेला आहे, या बाबीवर आंतरराष्ट्रीय परिषदेत सखोल चर्चा व्हावी यासाठी अमेरिका प्रयत्नशील आहे.

अमेरिकेत अल्पसंख्याकांना मिळणारी वागणूक आणि कमकुवत लोकशाही यंत्रणा यावरून चीनच्या केंद्रीय परराष्ट्र व्यवहार आयोगाचे संचालक यांग जीची यांनी अमेरिकेवर निशाणा साधला आहे. त्यांनी या टीकेत असे म्हटले आहे की चीनला राजकीय आणि लष्करी सामर्थ्यावरून अमेरिकेने उपदेश करू नये. या टीकेला प्रत्युत्तर देताना चीनने अमेरिकेच्या विरुद्ध जाऊ नये असा सूचक इशारा ब्लिंकन यांनी दिला आहे.

अमेरिकेला कमी लेखणार्‍या हुकुमशाही सत्तांच्या अधःपतनाचे पुरावे २० व्या शतकाच्या इतिहासात आपल्याला पदोपदी सापडतात. त्यात कैसर यांची जर्मनी, टोजोंचा जपान, हिटलरची रिच आणि स्टॅलिन यांच्या रशियाचा समावेश होतो. या प्रत्येक उदाहरणातील सत्तेने अमेरिकेला कमकुवत, असमर्थ आणि क्षीण या दृष्टिकोनातून पहिले होते. परंतु प्रत्येक वेळेस या सत्तांना अमेरिकेसमोर हार पत्करावी लागली आहे. आता त्याचीच पुनरावृत्ती होताना दिसत आहे. ट्रूमन आणि आयसेनहॉवर यांच्या काळात जे घडून आले तेच एकमेकांच्या धोरणाचा आणि विचारांचा कट्टर विरोध करणार्‍या आजी आणि माजी (डोनाल्ड ट्रूम्प आणि जो बायडन) राष्ट्राध्यक्षांच्या काळात पुन्हा एकदा घडण्याची दाट शक्यता आहे.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.

Author

John C. Hulsman

John C. Hulsman

John C. Hulsman is President and Managing Partner of John C. Hulsman Enterprises a political risk consulting firm. He is also a life member of ...

Read More +