Author : Saaransh Mishra

Published on Sep 01, 2021 Commentaries 0 Hours ago

आर्थिक, लष्करी आणि धोरणात्मक क्षेत्रांच्या बाबतीत चीन हा भारतासमोरचे मोठे आव्हान असेल, अशी चिंता भारताच्या तरुणांना वाटते आहे.

भारतीय तरुणांना वाटते चीनचे आव्हान

ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनच्या वतीने अलिकडेच “द ओआरएफ फॉरेन पॉलिसी सर्वे 2021: यंग इंडिया अँड द वर्ल्ड” या शीर्षकाखाली एक ‘परराष्ट्र धोरण सर्वेक्षण’ अहवाल प्रसिद्ध केला केला. या सर्वेक्षण अहवालातील एका निष्कर्षानुसार रशिया हा अमेरिका आणि ऑस्ट्रेलियानंतर भारताचा तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात विश्वासू देश असल्याचे म्हटले आहे.

या सर्वेक्षणासाठी १८-३५ वयोगटातील शहरी तरुणांची मते आणि प्रतिक्रिया नोंदवल्या गेल्या. येत्या दशकात भारताचा सर्वात आघाडीवरचा देश कोणता असू शकतो असा प्रश्नही या तरुणांना विचारला गेला. त्यावर त्यांनी दिलेल्या उत्तरानुसार क्वाडच्या सदस्य देशांनंतर रशियाला चौथे स्थान मिळाले आहे.

या सर्वेक्षणातल्या निष्कर्षांनुसार, शीतयुद्धाच्या काळानंतर तत्कालीन महासत्ता असलेल्या रशियासोबतचे भारताचे दीर्घकालीन घनिष्ठ अथवा मजबूत संबंध पुन्हा अधोरेखित झाले असल्याचे म्हणता येईल. इतकेच नाही तर २१व्या शतकात हे संबंध अधिक विकसित होऊन “खास आणि विशेष अधिकार असलेल्या भागिदारीत” परावर्तीत झाले आहेत. दोन्ही देशांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सौहार्दपूर्ण राजकीय संबंध आहेत, याशिवाय ब्रिक्स, जी-२० (जीट्वेंटी) आणि शांघाय सहकार्य संस्था (एससीओ/SCO)यांसारख्या बहुदेशीय सदस्य असलेल्या आंतरराष्ट्रीय संघटनांमध्येही भारत आणि रशियामध्ये सौहार्दाचे संबंध असल्याचे दिसते.

आजवरच्या घडामोडी पाहिल्या तर संयुक्त राष्ट्र संघात काश्मीरसारख्या पेच निर्माण करणाऱ्या मुद्द्यांवर रशियाने भारताचे समर्थन केले आहे. इतकेच नाही तर नंतरच्या काळातही क्रिमियाच्या (काळा समुद्र आणि अझोव समुद्राच्या दरम्यान असलेला युक्रेनमधील एक द्वीपकल्प जो कधीकाळी सोव्हिएत युनियनचा एक स्वायत्त प्रदेश होता) मुद्याबाबतही रशियाच्या धोरणावर टीका होण्याची वेळ येऊ न देता, रशियाने शांततापूर्ण संवाद व्हायला हवा असेच मत नोंदवले आहे.

अर्थात असे असले तरी राजकीय पटलावरच्या संबंधांच्या तुलनेत दोन्ही देशांमधल्या द्विपक्षीय व्यापार मात्र तेवढा तेजीत नसल्याचे चित्र आहे. २०१९-२० मध्ये दोन्ही देशांमधला परस्पर व्यापार १०.११ अब्ज अमेरिकी डॉलर्स इतका कमी होता. मात्र येत्या २०२५ सालापर्यंत परस्परांमधला द्विपक्षीय व्यापार ३० अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य दोन्ही देशांनी समोर ठेवले आहे. दुसऱ्या बाजुला परस्परांमधला शस्त्रास्त्रांचा व्यापार हा दोन्ही देशांमधल्या द्विपक्षीय संबंधांचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ राहिला आहे.

इथे हे लक्षात घ्यायला हवे की भारताची ८६ टक्क्यांहून अधिक संरक्षणविषयक साधने ही रशियन बनावटीची आहेत. ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्र प्रणाली, प्रमाणित एसयू-३० विमाने आणि टी-९० रणगाड्यांच्या भारतातील निर्मितीसाठीसाठी दोन्ही देश परस्परांना सहकार्य करत आहेत. याशिवाय दोन्ही देशांनी तंत्रज्ञानाच्या हस्तांतरणासह संयुक्तपणे एके-२०३ रायफल्स निर्मितीची योजनाही आखली आहे. दोन्ही देशांमधल्या परस्पर सहकार्याच्या अनुषंगाने पाहिले तर उर्जा निर्मिती क्षेत्रातली गुंतवणूक ही आणखी एक महत्वाची बाब आहे.

भारताचे परराष्ट्र सचिव हर्ष व्ही. श्रींगला यांनी १७ आणि १८ फेब्रुवारी २०२१ला रशियाला भेट दिली. सध्याच्या कोरोना महामारीच्या काळातला श्रींगला यांचा दक्षिण आशियाबाहेरचा हा पहिला परदेश दौरा होता. या दौऱ्यावरूनच सध्याच्या काळात धोरणात्मक पातळीवर भारतासाठी रशिया किती महत्वाचा देश आहे याचा अंदाज बांधता येऊ शकतो.

या दौऱ्यामध्ये भारतात होणाऱ्या आगामी वार्षिक शिखर परिषदेबाबत तसेच कोरोना महामारीविरुद्धचा लढा, द्विपक्षीय व्यापार आणि उच्च तंत्रज्ञान क्षेत्रातले सहकार्य याच्याशी संबंधित मुद्यांवर दोन्ही देशांमध्ये चर्चा झाली. यासोबतच अफगाणिस्तानसह, संयुक्त राष्ट्र, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद, ब्रिक्स, एससीओ, आरआयसी (रशिया, भारत, चीन व्यासपीठ), तसंच ईएईयू (युरेशिअन इकोनॉमिक युनियन) अशा विविध आंतरराष्ट्रीय संघटनांमध्ये परस्पर सहकार्य अशा विविध प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्यांवरही या दौऱ्यात चर्चा झाली.

धोरणात्मक पटलावर गेल्या दहा वर्षांमधली परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जर का या युवा वर्गात केलेल्या सर्वेक्षणाकडे पाहिले तर, असे दिसते की दोन्ही देशांमध्ये दृढ संबंध असूनही, रशियाला क्वाड सदस्य देशांनंतरचे (अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान) स्थान मिळाले आहे. दुसऱ्या बाजुला या सर्वेक्षणात असेही दिसून आले आहे की, येत्या काळात चीन एक शक्तीशाली देश म्हणून उदयाला येईल आणि त्यामुळेच येत्या काळात आर्थिक, लष्करी आणि धोरणात्मक क्षेत्रांच्या बाबतीत चीन हा भारतासमोरचे मोठे आव्हान असेल अशी चिंता भारताच्या तरुणांना वाटते आहे.

या सर्वेक्षणात युवा वर्गाने चीन वर कमी विश्वास असल्याचेही म्हटले आहे (७७ टक्के अविश्वास). यातून येत्या काळात चीन आणि भारताच्या संबंधांबाबत युवा वर्ग साशंक असल्याचेच दिसते. इतकेच नाही तर, आगामी दशकात चीन हा कोणत्याही अर्थाने भारताचा आघाडीचा भागीदार देश असणार नाही असे ६७ टक्के तरुणांचे ठाम मत असल्याचेही या सर्वेक्षणात दिसून आले. या सर्वेक्षणातल्या निष्कर्षांवरून असे म्हणता येईल की चीनच्या वाढत्या ताकदीचा सामना करण्याच्यादृष्टीने भारताच्या युवा वर्गाला क्वाड सदस्य देश महत्वाचे वाटतात, आणि त्यात विश्वासाच्या पातळीवर त्यांनी अमेरिकेला आघाडीचे स्थान दिले आहे.

या सर्वेक्षणातील निष्कर्ष लक्षात घेतले, तर भारत आणि रशियामधल्या संबंधांवर बाहेरच्या जगाचा असलेला दबावही त्यातून दिसून येतो. इतकेच नाहीत तर यातून बदलत्या जागतिक समीकरणांचा जगभरातल्या देशांवर पडत असलेला प्रभाव आणि त्यासोबतच त्यांचे दोन महासत्तांसोबतचे परस्पर संबंध अधिक पारदर्शकपणे दिसू लागले असल्याचे म्हणता येईल.

दुसरीकडे दोन्ही देशांमधील विवादाच्या मुद्यांच्या बाबतीत विचार केला, तर क्वाडचे पुनरुज्जीवन हा एक विवादाचा मुद्दा असल्याचे लक्षात येईल. क्वाड हे काही लष्करी सहकार्यासाठीचे संघटन नाही, त्याउलट क्वाडचे सदस्यदेश प्रादेशिक पातळ्यांवरच्या आव्हानात्मक मुद्यांवर परस्पर सहकार्य करण्यासाठीचे संघटन म्हणूनच याकडे पाहतात. असे असले तरीदेखील रशियाने सातत्याने असा गट स्थापन करण्याच्या मुद्यावर टीका केली आहे.

क्वाड म्हणजे चीन विरोधातील आपल्या कारस्थानात भारताला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी, अमेरिकेने स्वतःच्या नेतृत्वात राबवलेले ‘सातत्यपूर्ण, आक्रमक आणि कुटिल’ धोरणच आहे, त्यासोबतच रशिया आणि भारतामधील संबंध बिघडवण्याच्यादृष्टीनेच या संघटनेची आखणी केली गेली आहे, असा शिक्का रशियाने क्वाड संघटनेवर मारला आहे.

इतकेच नाही तर, भारत प्रशांत क्षेत्राबाबतच्या अमेरिकेच्या धोरणालाही रशिया सातत्याने विरोध करत आला आहे. या क्षेत्रातल्या देशांचे तुकड्या तुकड्यात विभाजन करणे आणि त्यातून या प्रेदेशासाठी मध्यवर्ती असलेल्या आशियान (ASEAN) संघटनेचे महत्व कमी करत जाणे, हाच या धोरणाचा उद्देश असल्याची टीका रशीयाने केली आहे.

सर्वंकष आणि सर्वसमावेशक संवादाच्यादृष्टीने क्वाड ही संघटना या प्रदेशासाठी धोक्याची असल्याचे म्हणत, रशीयाने या प्रदेशासाठी व्यापक “एकिकृत धोरण” आखण्याचे आवाहन केले आहे. थोडक्यात हा मुद्दा, भारत आणि रशिया या म्हणजे धोरणात्मक पटलावर भागिदार असलेल्या दोन देशांमध्ये सातत्याने काही एक वितुष्ट निर्माण करणारा मुद्दा ठरू लागला आहे.

एकीकडे भारत आणि अमेरिकेमधील संबंधांमध्ये अधिक जवळीक निर्माण झाली असली, तरी दुसऱ्या बाजुला २०१४च्या युक्रेनसंबधीच्या संकटानंतर मात्र रशियाचे पाश्चिमात्य देशांशी असलेले संबंध सातत्याने बिघडत चालले आहेत. तर त्याच दरम्यान, याआधीच्या या जागतिक महासत्तेने चीनसोबतचे आपले संबंध उत्तरोत्तर अधिक मजबूत केले आहेत. म्हणूनच अलिकडच्या काळात चीन हा रशियाचा आघाडीचा व्यापारी भागीदार देश बनल्याचे दिसते.

इतकेच नाही तर चीन आणि रशियाने २०२४पर्यंत परस्परांमधील द्विपक्षीय व्यापार २०० अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले असल्याचीही चर्चा आहे. सुरक्षा आणि संरक्षण या क्षेत्रांमध्येही रशिया आणि चीन परस्परांमधील संबंध अधिक दृढ करायचा प्रयत्न करत आहेत, त्यादृष्टीने परस्परांमधील लष्करी सहकार्याचा अधिक विस्तार केला जात आहे. या दोन्ही देशांचे अमेरिकेबद्दलचे एकसारखे वाटणारे शत्रुत्वाचे धोरण हा त्यांच्यातील संबंधाला अधिक बळकटी देणारा महत्त्वाचा मुद्दा ठरला आहे.

दुसऱ्या बाजुला अफगाणिस्तानात आपला प्रभाव वाढवण्यासाठी आणि मध्य आशियातील आपल्या हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी रशियाने पाकिस्तानसोबतचे आपले संबंधही अधिक बळकट केले आहेत. याच दरम्यान, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांचे विशेष दूत जमीर काबुलोव्ह यांनी अलीकडेच केलेले एक वक्तव्य इथे लक्षात घ्यावे लागेल. त्यांनी असे म्हटले आहे की, भारातचे तालिबानसोबत कधीच संबंध नव्हते, आणि त्यामुळेच अफगाणिस्तानाच्या बाबतीत भारत हा प्रभावशाली देश नाही.

थोडक्यात भारत आणि रशिया यांच्यातील संबंधांच्यादृष्टीने अनेक आव्हाने समोर आहेत. मात्र अशा प्रकारची आव्हाने असतानाही, सर्वेक्षण केलेल्या लोकांनी यानंतरच्या काळात दोन्ही देशांच्या संबंधांच्यादृष्टीने सकारात्क स्थिती दिसून येईल असे मत नोंदवलेले आहे. खरे तर दोन्ही देशांमधे दीर्घकाळापासून असलेल्या स्थिर संबंधांना याचे श्रेय देता येईल.

दोन्ही देशांमध्ये अनेक मदभेत असले असले तरीदेखील, संरक्षण, ऊर्जा, अंतराळ सहकार्य अशा इतर विविध क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांनी परस्पर सहकार्यासाठी नेहमीच पुढाकार घेत काम केले आहे. यासोबतच बहुपक्षीय संस्थांमधील सहकार्यालाही दोन्ही देशांनी नेहमी महत्व दिले आहे, तसेच मध्य आशिया, पश्चिम आशिया आणि अगदी अलीकडच्या काळात अफगाणिस्तान यांसारख्या विविध भूप्रदेशातल्या घडामोडींबाबतही चिंता व्यक्त करत आले आहेत.

या सगळ्या मुद्यांकडे एकसंधपणे पाहिले तर आपल्याला असे म्हता येईल की भारताच्या शहरी भागातल्या युवा वर्गामध्ये अजूनही रशियाच्या बाबतीतला विश्वास कायम आहे, तर दुसऱ्या बाजुला चीनच्या वाढत्या आव्हानाच्या पार्श्वभूमीवर, दीर्घकालीन उपाययोजनांच्यादृष्टीने त्यांचा कल क्वाड संघटनेच्या दिशेने वळला आहे.

भारत आणि रशिया या धोरणात्मक भागीदार देशांचे अमेरिका आणि चीनसोबत सध्या ज्या प्रकारचे द्विपक्षीय संबंध आहेत, त्यामुळे बदलत्या जागतिक समीकरणात या दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधावर काहीएक दबाव येत राहणारच आहे. याच परिस्थितीमुळे एकीकडे चीनच्याबाजूने सातत्याने वाढत असलेल्या धोक्याचा सामना करत असतानाच रशियासोबतचे संबंध टिकवून ठेवत कसे मार्गाक्रमण करावे याबाबत भारतासमोर नक्कीच नवा पेच निर्माण झाला आहे.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.