Published on May 18, 2021 Commentaries 0 Hours ago

पॅट्रिक सॅंडोवल आणि मिताली मुखर्जी यांनी सांगितलेल्या या दोन कहाण्या… माणसामाणसाला जोडणाऱ्या. आज विघटनवादी ढगांनी जगभर मळभ दाटले असताना या दोन गोष्टी आशेचे किरण दाखवतील.

आपल्याला जोडणार्‍या सीमा

पॅट्रिक सॅंडोवल आणि मिताली मुखर्जी यांनी सांगितलेल्या या दोन कहाण्या… माणसामाणसाला जोडणाऱ्या. आज विघटनवादी ढगांनी जगभर मळभ दाटले असताना या दोन गोष्टी आशेचे किरण दाखवतील.

……………………………………………………………………………….

पॅट्रिक सॅंडोवल

एव्ह दिदीक अल्बर्टी या माझ्या सासुबाईंचा जन्म १९४२ च्या जून महिन्यात इद्रीजा येथे झाला. इद्रीजा हे शहर आल्प्स पर्वताच्या पूर्व भागात, सध्याच्या स्लोवेनिया येथे, इटलीच्या सीमेपासून ४० किलोमीटर व ट्रीस्टेपासून ६० किलोमीटर अंतरावर स्थित आहे. कित्येक वर्ष इद्रीजाचे नागरिक ऑस्ट्रो-हंगेरीयन राज्यात शांततेने आयुष्य घालावत होते. परंतु पहिल्या महायुद्धानंतर हा संपूर्ण प्रदेश इटलीचा हुकूमशहा बेनिटो मुसोलिनी याच्या फॅसिस्ट राजवटीखाली आला. ज्यावर्षी एव्ह यांचा जन्म झाला त्यावर्षी दुसरे महायुद्ध सुरू होते.

पॅसिफिक मधील युद्धात अमेरिकेच्या जपान विरुद्धच्या सरशीने या युद्धाला एक वेगळेच वळण लागलेले होते. १९४२ ह्या वर्षात हिटलरच्या जर्मनीने जे जे प्रदेश मिळवले होते, त्यातील अनेक प्रदेश त्यांना गमवावे लागलेले होते. त्यात उत्तर आफ्रिका आणि स्टॅलिनग्राडचा समावेश होताच. नाझी ज्यू लोकांची मोठ्या संख्येवर हत्या करत आहेत या बातम्या मित्रराष्ट्रांपर्यंत पोहोचत होत्या.

एव्ह यांची आई ‘टी’ ह्या इटालियन शाळेत शिक्षिका होत्या. त्यांचे सर्व बालपण जर्मन नन्सच्या सानिध्यात गेले. तर एव्ह यांचे वडील स्टानिस्लाओ हे पेशाने स्लोवेनियन डॉक्टर होते. त्यांनी बोलोना आणि प्राग येथे वैद्यकीय शिक्षण घेतले होते व व्हिएन्ना येथे प्रॅक्टिस सुरु केली होती. १९४३ मध्ये एव्ह यांचे वडील इद्रिजामध्ये परतले. तेथेच त्यांचा वैद्यकीय सेवा सुरू करण्याचा मानस होता. त्यावेळेस स्टानिस्लाओ यांना कामाची अत्यंत गरज होती. पण त्यांना कम्यूनिस्टांनी अटक केली व टीटो यांच्या सैन्यात त्यांना भरती करण्यात आले.

युद्धाच्या शेवटच्या टप्प्यात एका बॉम्ब हल्ल्यात त्यांना त्यांचा एक पाय गमवावा लागला. दोन महीने सैनिकी इस्पितळात त्यांना सक्तीची विश्रांती घ्यावी लागली. युरोपात पुन्हा शांतता प्रस्थापित झाल्यावर कम्यूनिस्टांच्या ताब्यात असलेल्या इद्रिजामध्ये राहायचे की अँग्लो- अमेरिकन प्रशासन असलेल्या ट्रीस्तेमध्ये राहायला जायचे हा एव्ह यांच्या पालकांसमोर प्रश्न उभा ठाकला होता. एव्ह यांच्या आईची आई ही ऑस्ट्रो-हंगेरियन सम्राट फ्रांझ जोसेफ याची खंदी समर्थक होती व एक यशस्वी व्यावसायिकही होती. बदललेल्या परिस्थितीचा कुटुंबावर होणारा परिणाम समजून घेऊन संपूर्ण परिवाराने ट्रीस्टे येथे कायमस्वरूपी वास्तव्य करायचे ठरवले.

ट्रीस्टे या प्रदेशाचे एक वेगळे भौगोलिक महत्व आहे तसेच त्याला एक वैशिष्ट्यपूर्ण इतिहास आहे. कार्स्टच्या अवघड प्रदेशात अड्रिआटिक किनारपट्टीला लागून ट्रीस्टे वसलेले आहे. अनेक शतके ट्रीस्टे हे ऑस्ट्रो- हंगेरीयन साम्राज्यातील महत्वाचे बंदर होते. पहिल्या महायुद्धाच्या काळात, १९२०-३० मध्ये या प्रदेशावर फॅसीझमचा प्रभाव होता. परिणामी येथील स्लाविक लोकांचा मोठ्या प्रमाणावर छळ करण्यात आला. ह्या छळापासून सुटकेसाठी अनेकांना आपल्या आडनावांचे इटालियनायझेशन करावे लागले. १९४३ मध्ये मुसोलिनी मित्र राष्ट्रांना शरण गेला. ही संधी साधून हिटलरच्या सैन्याने उत्तर इटलीवर आक्रमण केले. ट्रीस्टे जवळपास दोन वर्षे नाझी प्रभावाखाली होता. १९४५ मध्ये पुन्हा एकदा ट्रीस्टेवर ४० दिवसांसाठी टिटोच्या सैन्याचे आधिपत्य होते. ह्या काळात अनेक इटालियन सैनिकांना मारण्यात आले.

काही इतिहासकारांनी याचे वर्णन ‘ भीषण नरसंहार’ असे केलेले आहे. यानंतरच्या काळात तब्बल ७ वर्षे या शहरावर ब्रिटन आणि अमेरिकेने मुक्त प्रदेश म्हणून राज्य केले. ट्रीस्टे हे शहर चर्चिल यांच्या ‘आयर्न कर्टंन’ च्या दक्षिण टोकावर कम्यूनिस्ट व पाश्चिमात्य देशांना विलग करत होते. १९५४ मध्ये हे शहर पुन्हा एकदा इटालियन लोकशाही प्रजासत्ताकात विलीन झाले. ट्रीस्टेच्या लोकांनी आपले शहर न सोडता तब्बल सहा देशांमध्ये राहण्याचा विक्रम केला आहे ही बाब तिथे मोठ्या विनोदाने सांगितली जाते. काही लोक ट्रीस्टेचा उल्लेख ‘कोल्ड- व्हेदर जेरुसलेम’ असा करतात. विसाव्या शतकामध्ये वांशिक द्वेष, सक्तीचे स्थलांतर यांसारख्या युरोपातील सर्वात गंभीर समस्यांचे ते केंद्र बनले होते.

ट्रीस्टेच्या इटालियन प्राथमिक शाळेमध्ये एव्ह ह्या एकमेव स्लोवेनियन विद्यार्थी होत्या. दिदिक या त्यांच्या स्लाविक वंशाच्या आडनावामुळे त्यांना मोठा त्रास सहन करावा लागला. त्यांना अनेकदा ‘सीवा’ असे इटालियन भाषिकांकडून हिणवले जात असे, हे त्या आवर्जून सांगतात. रोममधील प्रशासनाला ज्याप्रकारे इटालियन ओळख राष्ट्रीय पातळीवर वाढवायची होती, त्याला अनुसरून एव्ह यांचे व्यक्तिमत्व काहीसे वेगळे होते. एव्ह यांनी स्वतःच्या सुरक्षिततेची कधीच तमा बाळगली नाही. पण त्यांच्या बांधवांसोबत होणारा अन्याय त्यांना सलत असे. त्यावेळेस एखादी व्यक्ती तिचा वंश, तिची राजकीय पार्श्वभूमी व मते आणि कुटुंबाच्या इतिहासावरून ओळखली जात असे. या ओळखीपेक्षा वेगळी ओळख असलेल्या लोकांकडे संशयाने पाहिले जाई. यामुळे निर्माण होणार्‍या तणावाचे चटके एव्ह यांच्या कुटुंबाला पदोपदी लागत असत.

आता ज्यावेळेस एव्ह यांच्याशी बातचीत होते त्यावेळेस त्या आवर्जून सांगतात की, सध्या युरोपात येणार्‍या स्थलांतरितांच्या व्यथा त्या समजू शकतात. त्यांचे बालपण अतिशय खडतर गेले त्यामुळे भविष्यात अशा नकारात्मक वातावरणात राहावे लागू नये यासाठी त्यांनी प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे.

सध्याच्या घडीला ट्रिस्टेच्या वैविध्यपूर्ण इतिहासाचा प्रभाव तिच्या रस्त्यारस्त्यांवर दिसून येतो. सध्या स्प्रिट्झ कॉकटेल हे स्लोवेनियन चिजसोबत दिले जाते, तर तेथील लोक पिझ्झ्यापेक्षाही जास्त ऑस्ट्रियन सॉसेज आणि गुलाशला लोक पसंती देताना दिसतात. जगातील कोणत्याही कॅफेपेक्षा ज्या कॅफेमध्ये सर्वात जास्त कॉफी पुरवली जाते त्या कॅफे डेगली स्पेशीमध्ये इटालियन, स्लोवेनियन आणि जर्मन या भाषिकांचा मोठ्या प्रमाणावर राबता दिसून येतो.

या परिसरात कॅथलिक चर्च, ओर्थोडॉक्स चर्च आणि सिनागोज हे हाकेच्या अंतरावर आहेत. आपल्या या शहराप्रमाणेच एव्ह या तीन सांस्कृतिक आणि भाषिक जगाच्या परिपाक आहेत – पहिले म्हणजे त्यांचे स्लाविक कुटुंब ज्यांच्यामुळे त्यांची वांशिक आणि सांस्कृतिक पाळेमुळे जोडली गेली आहे, नंतर इटली , ज्यामुळे त्यांना राष्ट्रीय आणि सांस्कृतिक ओळख मिळाली आणि शेवटची त्यांच्या आजीमुळे त्यांच्यावर असलेला जर्मानिक प्रभाव.

माध्यमिक शिक्षण संपवून एव्ह या स्वीत्झर्लंडला कायद्याचे शिक्षण आणि लुझेन्न येथे फ्रेंच शिकण्यासाठी रुजू झाल्या. तिथे त्यांची ओळख गंथर नावाच्या तरुण जर्मन राजदूताशी झाली. १९६७ मध्ये त्यांनी लग्न केले व ते दोघेही तत्कालीन जर्मनची राजधानी असलेल्या बॉन येथे राहावयास गेले. आपल्या भाषिक कौशल्याचा वापर करून इटालियन दूतावासात एव्ह यांनी नोकरी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

तत्कालीन कायद्यानुसार एव्ह यांनी त्यांच्या पतीचे जर्मन राष्ट्रीयत्व घेतले व आजतागायत त्या जर्मनीच्या नागरिक आहेत. त्यांनी त्यांच्या पतीला अंकारा, टर्की आणि बोलेव्हिया येथे साथ केली. बोलेव्हियामध्ये त्यांच्या पहिल्या कन्येचा म्हणजेच वानियाचा जन्म झाला. त्यानंतर एव्ह आणि गंथर यांचे नाते संपुष्टात आले व त्या बोनला परतल्या आणि तेथील विद्यापीठात त्यांनी काम सुरू केले.

बोनमधील एका पार्टीमध्ये त्यांची ओळख मनेल नावाच्या तरुण स्पॅनिश राजदूताशी झाली. हा तरुण त्याच्या पहिल्याच असाइनमेंटवर परदेशी आला होता. लवकरच त्यांनी लग्न केले व त्यांना बेट्रिझ नावाची मुलगी झाली. मनेल, एव्ह आणि त्यांच्या दोन मुली या मोण्टेविडिओ (उरूग्वे), मॅड्रिड (स्पेन), वॉशिंग्टन डीसी ( अमेरिका), ब्रस्सेल (बेल्जियम) आणि पनामा (पनामा) येथे वास्तव्यास होत्या. सततच्या बदल्यांमुळे त्यांच्या मुलींना आजूबाजूच्या वातावरणाशी जुळवून घेताना त्रास सहन करावा लागला. पण ग्लोबल लाइफस्टाईलने जगण्याचे एव्ह यांचे स्वप्न मात्र या बदल्यांमुळे पूर्ण होऊ शकले. त्यांना लहानपणी ट्रिस्टेमध्ये जे अनुभव आले त्याविपरीत त्या जिथे जिथे गेल्या त्या सर्व ठिकाणी त्यांना आपलेसे करण्यात आले.

सध्या एव्ह त्यांच्या आवडत्या शहरात म्हणजेच मॅड्रिड मध्ये वास्तव्यास आहेत. कोविद १९ महामारी आधी त्या मॅड्रिड ओपेरा, सिनेमागृहे, नाटकगृहे यांना आवर्जून भेटी देत असत. त्यांना अवगत असलेल्या सहा भाषांमध्ये त्या कित्येक तास वाचन करतात. बाकीच्या वेळात पर्यटन करण्यावर त्यांचा भर असतो. प्रत्येक उन्हाळ्यात त्या जर्मनी मधल्या म्युनिक शहराला भेट देतात. तिथे त्यांची मैत्रीण हायड्रन यांच्यासोबत वेळ घालवणे आणि साल्झबर्ग उत्सवाला भेट देणे या त्यांच्या आवडत्या बाबी आहेत.

जगाच्या पाठीवर कुठेही असोत पण त्यांच्या दोन लेकी आणि पाच नातवंडांना आवर्जून भेटायला येतात. दर ख्रिसमसला संपूर्ण कुटुंब ट्रिस्टे जवळील दुईनो या छोट्याश्या गावात उत्सव साजरा करणे, सिनेमा पाहणे आणि ट्रिस्टेनीज पदार्थ खाण्यासाठी जमा होते. ख्रिसमस ट्री विकत घेऊन सजवण्यासाठी एव्ह आवर्जून वेळ काढतात. पाहुणे मंडळींसाठी चविष्ट जिन्नस करणे, जगाच्या पाठीवरून येणार्‍या पाहुण्यांशी संवाद साधणे, नातवंडांसोबत भरपूर खेळणे या गोष्टींमध्ये एव्ह विशेष रमतात.

एव्ह यांची कथा ही फक्त ट्रीस्टेची कहाणी नाही तर संपूर्ण आधुनिक युरोपाचीही ती कहाणी आहे. स्लोवेनियन वडील आणि इटालियन आई यांच्या पोटी जन्म घेतलेल्या एव्ह यांनी लहान वयातच युरोपातील अनेक संघर्ष अगदी जवळून पाहिले आहेत. यांचे आयुष्य युरोपातील वैविध्य असलेल्या शहरांनी आणि यूरोपियन युनियनने आणलेल्या सीमा नसलेल्या शांतता आणि स्थैर्याने आकाराला आलेले आहे.

……………………………………………………………………………….

मिताली मुखर्जी

रंजन बॅनर्जी यांचा जन्म भारताची फाळणी होण्याआधीच्या पूर्व बंगालमध्ये आणि आताच्या बांगलादेशमध्ये १९४१ मध्ये झाला. नात्याने ते माझ्या आईचे चूलते लागतात. कुटुंबात त्यांना रंजू म्हणतात पण मी त्यांना छोटो दादू म्हणते.

सध्याची बांगलादेशची राजधानी ढाका येथे जरी त्यांचा आणि त्यांच्या भावंडांचा जन्म झाला असला तरी स्वतंत्र भारतासमोरील आव्हानांची पेशाने शिक्षक असलेल्या त्यांच्या वडीलांना कल्पना आलेली होती. १९४३ मध्ये त्यांचे संपूर्ण कुटुंब पश्चिम बंगालच्या कलकत्ता मधील इंडियन इंस्टीट्यूट फॉर द कल्टीव्हेशन ऑफ सायन्स येथे स्थायिक झाले.

अखंड भारतातील स्वातंत्र्याच्या वार्‍याचे थेट परिणाम छोटो दादूंच्या आयुष्यावरही दिसून आले. स्वतंत्र भारताच्या पहिल्या निवडणुकीत पंडित नेहरूंच्या नेतृत्वाखाली इंडियन नॅशनल कॉंग्रेसला मोठे यश मिळाले. त्यावेळी छोटो दादू त्यांच्या ऐन तारुण्यात होते. वेगवेगळे जिन्नस चाखण्यासाठीच्या नव्या जागा शोधणे, आधुनिक संगीत, डॅशिंग लूक्स, ऊंची कपडे व केशरचनेसाठी आणि अर्थात परिसरातील तरुणींसाठी ‘रोमिओ’ म्हणून ते प्रसिद्ध होते. त्यांच्याशी बातचीत करण्यासाठी आणि त्यांच्या काळ्या वोक्सहॉल गाडीतून फिरण्यासाठी अनेक जणी उत्सुक असत.

१९६०च्या दशकात भारताला दोन मोठ्या युद्धांचा सामना करावा लागला. हा संपूर्ण देशासाठी बिकट काळ होता. १९६२ ला चीन सोबतचे युद्ध आणि १९६५ मध्ये पाकिस्तानसोबतचे दुसरे युद्ध यामुळे भारताचे अतोनात नुकसान झाले. या सगळ्या कठीण काळात छोटो दादू त्यांची ओळख शोधण्यासाठी धडपड करू लागले.

त्यावेळेस ते कलकत्ता विद्यापीठात भौतिकशास्त्राचा अभ्यास करत होते आणि या विषयात ते अव्वल होते. इतर तरुणांप्रमाणे आपणही आपल्या वडिलांच्या पायावर पाय ठेऊन पुढे जावे असे त्यांना वाटत नव्हते. त्याऐवजी वेगवेगळ्या संधी, वेगवेगळे मार्ग जाणून घेण्यात त्यांना अधिक रस होता.

इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून निवडून आल्या. त्याच वर्षी छोटो दादूंनी कलकत्ता सोडून कॅनडाची वाट धरली. ज्याकाळात त्यांनी हा प्रवास केला त्यावेळेस एखादा देश सोडून दुसर्‍या देशात जाणे सहज मान्य केले जात नसे. आपल्या सारखा वेश परिधान करणार्‍या, अन्न सेवन करणार्‍या, समविचारी, समान भाषा बोलणार्‍या लोकांपासून दूर परदेशी जाणे ही बाब त्याकाळात काहीशी अवघड होती.

असंख्य कल्पना, उम्मेदींनी भरलेले जग जिथे वेगवेगळ्या देशांचे, प्रांतांचे, वेगळी भाषा बोलणारे लोक, विचार आहेत, असे नवे जग छोटो दादूंना जग खुणावत होते. कॅनडा हा प्रदेश अनेक आश्चर्यकारक गोष्टींनी युक्त आहे. पण या नव्या परिस्थितीशी जुळवून घेणे ही काही सोप्पी बाब नव्हती. नवी शिक्षण पद्धती आणि मदत न करणारे प्राध्यापक, गाईड यांच्यामुळे अल्पावधीतच पीएचडीचा विचार सोडून ते नोकरीच्या शोधाला लागले. १९६७ मध्ये नव्याने लग्न झाल्यानंतर आणि १९८४ मध्ये कॅलेडोस्कोपीक व्हर्जनमध्ये दादू यांना पाहण्याची त्यांच्या भारतातील कुटुंबाला संधी मिळाली.

१९८४च्या ऑक्टोबरमध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच अंगरक्षाकाकडून गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्याच वर्षी डिसेंबरमध्ये भोपाळच्या यूनियन कार्बाइड प्रकल्पामध्ये गॅसची गळती होऊन हजारो निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला, तर कित्येक जण आयुष्यभरासाठी अपंग झाले.

या सर्व घटनांचे तीव्र पडसाद देशमध्ये उमटत होते. याच काळात माझी आणि छोटो दादूंची पहिल्यांदा भेट झाली.
या भेटीचा असर खूप मोठा होता. लुव्रमधल्या मोनालीसाच्या चित्राला पाहण्यासाठी करावी लागलेली धडपड, बोलताना इंडोनेशियन वाक्प्रचारांचा वाक्यात सहज वापर, रस्त्यावरील गाडीवाला आणि कुटुंबातील थोरल्यांशी बोलतानाची सहजता, यामुळे त्यांच्याशी बोलताना आपण एका व्यक्तीशी न बोलता एका वेगळ्याच नव्या जगाशी बोलत आहोत असा विचार सहजच मनात येत असे.

त्यांना जगाची खूप जाण होती. हा सगळा अनुभव त्यांनी पुस्तकातून न शिकता वेगवेगळ्या लोकांना भेटून, त्यांच्याशी चर्चा करून घेतलेला होता. छोटो दादूंचे संपूर्ण आयुष्य या प्रकारच्या अनुभवांनी भरलेले होते. १९९० मध्ये पंतप्रधान पी. व्ही नरसिंह रावांनी भारतासाठीच्या सर्वात महत्वाच्या सुधारणांचा उपक्रम हाती घेतला. भारत त्याच्या अर्थव्यवस्थेच्या सीमा जगासाठी खुल्या करण्यासाठी सज्ज होता. आणि मीही माझ्या विचारांच्या कक्षा रुंदावण्यासाठी तयार होते.

पुढील काही वर्षांमध्ये आम्हाला छोटो दादूंचा अधिक सहवास मिळाला. काही काळासाठी त्यांची भारतात नवी दिल्लीमध्ये बदली झाली होती. याकाळात आम्हाला त्यांच्या सुंदर घरी जेवणासाठी अगत्याचे आमंत्रण असे. खरेतर त्यांच्याशी आणि त्यांच्या बुद्धिमान आणि मनमिळावू पत्नीशी बातचीत करणे ही आमच्याशी एकप्रकारे मेजवानीच असे. त्यांच्या गप्पांमध्ये त्यांना आलेले अनुभव, बाहेरचे जग यांचे वर्णन असे. त्यामुळे हे बाहेरचे जग पाहण्याची आणि अनुभवण्याची एक दुर्दम्य इच्छा आमच्यात निर्माण होत असे.

माझ्या पाहण्यात ते एकमेव असे गृहस्थ होते की जे पाकिस्तानवर चाललेल्या गरमागरम चर्चेत शांतपणे आणि स्मितहास्य ठेऊन भारत आणि पाकिस्तान हयांमध्ये असलेले साम्य सहज सांगत असत. असे म्हणता म्हणता वर्ष सरली. मी आणि माझी बहीण, आम्ही आमचे शिक्षण पूर्ण करून आमच्या करियरच्या मार्गाला लागलो. हळूहळू काही वर्षात आम्ही सेटल झालो.

लग्न करून माझी बहीण अमेरिकेत गेली पण मी मात्र भारतात राहिले. लोकशाहीत वेगवेगळ्या धर्म, पंथ, वंश, भाषा, वेश, आहार, विचार यांचे लोक सहज राहू शकतात, हे छोटो दादूंचे मत मी भारतात प्रत्यक्षात येताना अनुभवले आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि विचारांचे स्वातंत्र्य यामुळे लोकांमध्ये तणाव वाढत नाही तर वेगवेगळे ज्ञान, विचार प्रवाह यांना चालना मिळते. या सगळ्या परिस्थितीत लोकांचे विचार त्यांची मते यांच्यात फरक दिसून येतोच पण ते तसे होणे ही लोकशाहीची गरज आहे. एकमेकांना समजून घेण्यासाठी विचारांचा पूल बांधणे गरजेचे आहे.

माणसाने माणसाशी जोडून घेणे हयाहून विलक्षण कोणतीही गोष्ट नाही. संपूर्ण जग सध्या महामारीमुळे एकमेकांपासून दूर गेले आहे. आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि आरोग्यासाठी अनेक देशांनी त्यांचे दरवाजे बंद केलेले आहेत.

उत्तम शिक्षण आणि परस्परांबद्दल असलेली आपुलकी यामुळे माणसामाणसामधील भिंती कमी होण्यास मदत होणार आहे. येणार्‍या पुढील काळात आपल्या देशात अशा अनेक छोटो दादूंना पोषक वैचारिक वातावरण तयार व्हावे आणि जगाकडे पाहण्याच्या या समृद्ध खिडक्या त्यांना आणि त्यांच्या पुढील पिढ्यांना मिळत राहाव्या.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.

Authors

Mitali Mukherjee

Mitali Mukherjee

Mitali Mukherjee was a Fellow at ORF. Her key areas of interest and expertise are gender finance and media ethics.

Read More +
Patrick Sandoval

Patrick Sandoval

Patrick Sandoval was born in Madrid to a Spanish father and American mother. He joined the Spanish Foreign Service in December 2008 and has a ...

Read More +