Published on Jul 17, 2020 Commentaries 0 Hours ago

आग्नेय आशियायी देशांमध्ये भारताचा जो सांस्कृतिक प्रभाव आहे त्याचा प्रसार करण्यात बॉलिवूडने म्हणजे भारतीय चित्रपट उद्योगानेही महत्त्वाची भूमिका निभावली आहे.

‘बिमस्टेक’शी भारताने जोडावा बॉलिवुड सेतू

Source Image: wikimedia.org

थायलंडची राजधानी बँकॉक येथील विमानतळाचे नाव आहे, सुवर्णभूमी इंटरनॅशन एअरपोर्ट. एवढेच नव्हे तर, या विमानतळाच्या दर्शनी भागातील देव आणि असुरांच्या समुद्र मंथनाचे शिल्प ही या या विमानतळाची ओळख आहे. या विमानतळावर दररोज सुमारे दोन-पावणेदोन लाख प्रवासी ये-जा करतात आणि जगातील सर्वाधिक धावपळीच्या विमानतळांमध्ये त्याची गणना होते. हे सारे या लेखाच्या सुरुवातीलाच सांगण्याचे कारण एवढेच की, थायलंडप्रमाणेच इंडोनेशिया, फिलिपिन्स, बाली इत्यादी आग्नेय आशियायी देशांवर असलेला भारतीय प्रभाव किती मोठा आहे, हे कळावे.

रामायण-महाभारतातील कथांप्रमाणेच बौद्ध धर्मातील अनेक संकल्पना या देशांवर कित्येक शतके गारूड करून आहेत. या सांस्कृतिक प्रभावाची दखल आपण अद्यापही योग्य त्या पद्धतीने घेतलेली नाही. या आग्नेय आशियायी देशांमध्ये भारताचा सांस्कृतिक प्रभाव (सॉफ्ट पॉवर) वाढवण्यासाठी धार्मिक पर्यटन उपयुक्त ठरू शकेल, असे प्रतिपादन लेखकाने ‘ओआरएफ’द्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या विशेष अहवालात केले आहे. आग्नेय आशियायी देशांतील समाजांबरोबर ऐतिहासिक संबंध स्थापित करण्यासाठी बौद्ध धर्माने महत्त्वाची भूमिका वठवली होती, असे त्यात नमूद केले आहे.

धर्माबरोबरच अन्य विविधांगी सांस्कृतिक बाबी भारत आणि या प्रदेशातील देशांशी – विशेषत: ‘बिमस्टेक’च्या सदस्य देशांशी (बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ, भूतान, थायलंड, म्याममार) – असलेले संबंध वृद्धिंगत करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतील. त्यातून भविष्यात परस्पर सहकार्यामधून विविधांगी प्रगती साधता येईल. बॉलीवूड या देशांशी नाते जोडण्यासाठी फार महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतो. त्या दिशेने आता पावले पडू लागली आहेत. ही नक्कीच स्वागतार्ह बाब आहे.

इतिहासात डोकावून पाहताना

आग्नेय आशियायी देशांत असलेल्या संपन्न बौद्ध सामाजिक-राजकीय संस्कृतीसह रामायण-महाभारतासारख्या हिंदू महाकाव्यांची परंपरा ही तेथील सांस्कृतिक जीवनाचा प्रमुख भाग राहिली आहे. तसेच, संस्कृत-प्राकृत परंपरा आणि त्याने निर्माण केलेला सांस्कृतिक प्रभाव हा आग्नेय आशियायी देशांच्या सांस्कृतिक इतिहासाचा अदृश्य हिस्सा राहिला आहे. हा प्रभाव एवढा मोठा होता की, दहाव्या शतकामध्ये अंगकोर किंवा जावा येथील लोक स्वत:ला ‘भारतीय जगाचा’ हिस्सा मानत.

प्रा. ऑलिव्हर वोल्टर्स यांनी अधोरेखित केल्याप्रमाणे, अशी विस्तृत पायावर आधारित लोकभावना म्हणजे सांस्कृतिक प्रभावाचे जगाच्या इतिहासातील सर्वांत मोठे उदाहरण आहे. देवभाषेच्या शक्तीने आशियातील या दोन भौगोलिक आणि सांस्कृतिक महत्त्वाच्या प्रदेशांना खरोखरच एकत्र आणले होते. आग्नेय आशिया अन्य कोणत्याही परकीय संस्कृतींपासून फटकून राहिला असला तरीही भारतीय आणि चिनी संस्कृतींचे त्यांनी स्वागत केले. या दोन्ही संस्कृतींना सामावून घेऊन आपली सांस्कृतिक वीण अधिक घट्ट केली आहे, असे तज्ज्ञ मानतात.

आग्नेय आशियात अनेक ठिकाणी संस्कृत आणि प्राकृत भाषेतील अनेक शिलालेख आणि संदर्भ सापडतात. तेथील  राज्यकर्त्यांचे आणि तज्ज्ञांचे भारतीय संस्कृतीशी किती घट्ट सांस्कृतिक आणि जैविक नाते होते, याची साक्ष हे संदर्भ आजही देत आहेत. तेथील अनेक राजे गंगा नदीच्या खोऱ्यात सध्याच्या बिहारमध्ये (पूर्वीचा वंगदेश म्हणजे बंगाल) त्यांचे पूर्वज नांदत असल्याचे सांगत असत. तसेच तेथील बौद्ध-जैन अभ्यासक, पंडित आदी गुर्जर-देशात म्हणजे आजच्या गुजरातमध्ये नेहमी प्रवास करत असल्याचेही अनेक दाखले आहेत.

आजही हे संबंध कायम

कोरोना विषाणूच्या महासाथीमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये लोकांना घरातच राहू देण्यासाठी भारत सरकारने मायण, महाभारत या जुन्या मालिका पुन्हा दाखविल्या. तीन दशकांपूर्वी त्यांचे देशात जेव्हा प्रथमच प्रसारण झाले होते तेव्हा त्यांनी लोकांना भुरळ पाडली होती. आजही त्या मालिकांनी प्रेक्षकांना आकर्षित करण्याचे उच्चांक गाठले आहेत. आजवर त्यांचे देशातील विविध प्रादेशिक भाषांत रूपांतर करून अनेक देशी आणि विदेशी वाहिन्यांवरून प्रसारण केले जाते. या महाकाव्यांचा आणि त्यातील पात्रांचा प्रभाव आग्नेय आशियायी देशांतील पुरातन, मध्ययुगीन आणि आधुनिक शिल्पांतून तसेच कलाकृतींमधून स्पष्टपणे दिसून येतो.

त्या देशांमध्ये अनेक प्रकारच्या धार्मिक आस्था रूढ असल्या, तरीही या कथांना तेथील जनमानसांत भारताइतकेच महत्त्व आहे. जावा येथील जुन्या रामायणावर सातव्या शतकातील प्रसिद्ध भारतीय कवी भट्टी यांच्या भट्टी-काव्याचा मोठा प्रभाव आढळून येतो. त्यांनी प्रसिद्ध रामकथेला पाणिनी यांच्या दृष्टांतांची आणि संस्कृत व्याकरणाची जोड दिली होती.

इंडोनेशियातील काकावीन रामायण हे तेथील पुरातन कावी भाषेत ग्रथित करण्यात आले होते. इंडोनेशिया हा जगातील सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्या असलेला देश असला तरीही तेथील सांस्कृतिक संवेदनांमध्ये या रामायणाला महत्त्वाचे स्थान आहे. जाकार्ता येथील श्रीकृष्ण आणि अर्जुनाच्या विशाल मूर्ती असोत किंवा इंडोनेशियाच्या राष्ट्रीय मानचिन्हात गरुडाला असलेले स्थान असो, आग्नेय आशियायी देशांत भारतीय पुराणकथांचा प्रभाव मोठा महत्त्वाचा असल्याचे पाहावयास मिळते.

फोटो कॅप्शन – बाली येथील पाम वृक्षाच्या पानांवर (भूर्जपत्र) रामायणात सीतेला सुवर्णमृग आवडल्याच्या प्रसंगाचे चित्रण करण्यात आले आहे. (सौजन्य – ब्रिटिश लायब्ररी)

पूर्वेकडील आशा

गेल्या काही वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पूर्वाभिमुख धोरण (अँक्ट ईस्ट पॉलिसी) आग्नेय आशियायी देशांशी भारताचे संबंध सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे दिसून येत आहे. अनेक तज्ज्ञांच्या मते भारताचे हे पूर्वाभिमुख धोरण हळूहळू भारत-प्रशांत क्षेत्रात विस्तारत आहे. हा धोरणविस्तार करताना, भारताने चीनच्या विस्तारवादी धोरणाचा आणि आग्नेय आशियायी देशांच्या महत्त्वाच्या भौगोलिक स्थानाचा कधीही विसर पडू देऊ नये. तसेच, भारताने आग्नेय आशियायी प्रदेशाच्या फक्त भूराजकीय आणि संरक्षणविषयक हितसंबंधांचे रक्षण करण्यापुरता विचार करू  नये. त्यापुढे जाऊन भारताने सहस्रकाहून अधिक काळ या प्रदेशाशी असलेल्या सांस्कृतिक आणि सहकार्याच्या परंपरेचे पुनरुज्जीवन केले पाहिजे.

आग्नेय आशियायी शेजाऱ्यांशी भारताचे जे पूर्वापार सांस्कृतिक बंध आहेत, त्यांच्या संभाव्य भूमिकेचे महत्त्व अनेक तज्ज्ञांनी गेल्या काही दशकांतून अधोरेखित केले आहे. यात पारंपरिक कथांसोबत नव्या कहाण्यांचा म्हणजे बॉलिवूडचाही मोठा वाटा आहे. आज भारताचा जो प्रचंड सांस्कृतिक प्रभाव आहे त्याचा प्रसार करण्यात बॉलिवूडने म्हणजे भारतीय चित्रपट उद्योगानेही महत्त्वाची भूमिका निभावली आहे.

विविध भाषांत रूपांतरित केलेल्या भारतीय चित्रपटांना आणि दूरचित्रवाणी मालिकांना किमान २० देशांमधून भरघोस प्रतिसाद मिळतो. यातून भारताच्या या देशांवरील सांस्कृतिक प्रभावाचा प्रत्यय येतो. या देशांतील स्थानिक निर्मात्यांबरोबर भारताने काही सांस्कृतिक-करमणुकीचे कार्यक्रम संयुक्तरित्या तयार केले तर, त्यातून बिमस्टेकच्या चौकटीमध्ये व्यूहात्मक भागीदारी वाढवण्यास मदत होऊ शकते. या प्रदेशातील देशांशी असलेले संबंध वृद्धिंगत करण्याच्या कामी सांस्कृतिक संवेदना आणि बॉलिवूडच्या प्रभावाचा पूरेपूर धोरणात्मक वापर करून घेण्यात यावा, असे अनेक तज्ज्ञांनी सुचवले आहे.

हे ध्येय साध्य करण्याचा एक उपाय म्हणजे, जुन्या चित्रपट-निर्मात्यांना पुन्हा एकत्र करून या महाकाव्यांच्या आग्नेय आशियायी देशांत स्थानिक परंपरेनुसार ज्या आवृत्ती आहेत, त्यांचेही चित्रीकरण करणे. अशा प्रकारच्या एखाद-दुसऱ्या चित्रपट, मालिका किंवा वेब मालिकेच्या माध्यमातून तेथील नागरिकांना भारतीय सामाजिक प्रवाहाच्या अधिक जवळ आणण्यास मदत होऊ शकते. यातून केवळ मोठ्या प्रमाणावर सद्भावना आणि संयुक्त परंपरेची भावनाच निर्माण होणार नाही तर महत्त्वाची वारसासंपदा तयार होऊन उभयतांतील सांस्कृतिक बंध घट्टही होतील. तसेच त्याने रामायण आणि महाभारत यांच्यावर आधारित सादरीकरणाची जी शेकडो वर्षांची अखंड परंपरा आहे तिला उत्तेजन मिळेल.

बिमस्टेक सहकार्य उपक्रमाच्या अंतर्गत भारत पर्यटन क्षेत्रात आघाडीवर आहे. तर भूतान बिमस्टेकच्या सांस्कृतिक उपक्रमात आघाडीवर आहे. पण भारतातील मोठ्या चित्रपट उद्योगाचा (बॉलिवूडचा) विचार करता भारताने या क्षेत्रात आघाडी आणि पुढाकार घेऊन या देशातील नागरिकांबरोबर सौहार्द आणि सद्भावना निर्माण केला पाहिजे.

भविष्याचा सेतू

या कामी आग्नेय आशियायी देशांमध्ये ‘द इंडियन काऊन्सिल ऑफ कल्चरल रिलेशन्स’ (आयसीसीआर) सक्रियपणे प्रयत्नशील आहे. म्यानमारमधील यांगून येथे असलेले भारतीय सांस्कृतिक केंद्र स्वामी विवेकानंद सांस्कृतिक केंद्र (एसव्हीसीसी) या नावाने ओळखले जाते. मूळ मुंबईतील असलेल्या संस्कृततज्ज्ञ डॉ. आसावरी बापट या सध्या त्या केंद्राच्या प्रमुख आहेत. स्वामी विवेकानंद सांस्कृतिक केंद्र हे भारत सरकारचे उत्तम भागीदार ठरू शकते. त्याच्या माध्यमातून भारत आग्नेय आशियातील देशांशी असेलेले विविधांगी संबंध मजबूत करण्याचा मार्ग चोखाळू शकतो. भगवान राम यांनी त्यांच्या वानरसेनेच्या मदतीने भारत आणि श्रीलंका यांच्यात जो सेतू (पूल) बांधला होता त्याने या दोन्ही देशांच्या संबंधांत नव्या युगाची सुरुवात केली होती, असे मानतात.

हे संबंध मैत्री, नैतिकता आणि नीतीतत्वांवर आधारित होते. या पार्श्वभूमीवर, बिमस्टेकमधून अभिप्रेत असलेले संबंध सुधारण्याच्या कामी तसेच सांस्कृतिक भागीदारी वाढवण्यात अशा सेतूची भूमिका महत्त्वाची ठरू शकते. अशा सांस्कृतिक सेतूमुळे बिमस्टेकच्या अंतर्गत व्यापार, संरक्षण, ऊर्जा आणि अन्य क्षेत्रांत जे सहकार्य अपेक्षित आहे, ते साध्य करण्यासही मदत होऊ शकेल, तसेच परस्परांविषयी सामंजस्य वाढवण्यासही हातभार लागेल.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.