Author : Hari Seshasayee

Published on Aug 05, 2023 Commentaries 0 Hours ago

ब्राझीलमधील पुराणमतवादी राजकीय चळवळ, ही "बीफ, बायबल आणि बुलेट्स" या त्रिसूत्रीवर आधारलेली शक्ती बनली आहे, असाच निष्कर्ष या निवडणूकांमधून हाती लागतो आहे.

ब्राझीलमधली निवडणुक : ‘बीफ, बायबल आणि बुलेट्स’ चळवळ

ब्राझीलमध्ये नुकत्याच २ ऑक्टोबरला सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीसंबंधी आलेल्या बहुतांश विश्लेषणांकडे पाहीलं, तर या निवडणुकांमधून दोन परस्परविरोधी निष्कर्ष हाती आले आहेत असं म्हणता येईल. त्यापैकी एक म्हणजे, ब्राझीलचे विद्यमान अध्यक्ष जेयर बोल्सोनारो यांच्या नेतृत्वाखाली वाढत चालेलल्या बोल्सोनारिस्मो या चळवळीला मोठं यश मिळालं आहे. पण असं असलं तर या निवडणूकीसाठी येत्या ३० ऑक्टोबरला होत असलेल्या दुसऱ्या फेरीत मात्र बोल्सोनारो यांचे प्रतिस्पर्धी ब्राझीलचे अध्यक्ष लुईस इनासिओ ‘लुला’ दा सिल्वा यांना आघाडी मिळेल हीच सर्वाधिक शक्यता आहे.

यावरून एक महत्वाचा प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे, मग बोल्सोनारिस्मो या चळवळीला मिळत असलेलं यश खरंच तितकं मोठं आहे का?  एका अर्थानं याचं उत्तर होकारार्थी आहे, कारण बोल्सोनारो यांच्या सहकाऱ्यांनी ब्राझीलीयन  काँग्रेसच्या / संसदेत अनेक जागा जिंकल्या आहेत,  काही जण तर गव्हर्नर म्हणूनही निवडून आले आहेत. निकोलस फरेरा या २६ वर्षीय उमेदवाराने चेंबर ऑफ डेप्युटीजमधील एका जागेसाठी सर्वाधिक मतं मिळवली आहेत आणि ते बोल्सोनारो यांचेच सहकारी आहेत. पण असं असूनही बोल्सोनारो यांच्या सहकाऱ्यांना ब्राझीलीयन काँग्रेसच्या कोणत्याही सभागृहावर वर्चस्व मात्र स्थापन करता आलेलं नाही. त्यामुळे वर्चस्व कुणाचं हे सेंट्राओ या तिथल्या अनेक राजकीय पक्षांचा मिळून तयार झालेल्या एका गटावर अवलंबून असणार आहे. महत्वाचं म्हणजे या गटानं स्वतःला उजव्या असो की डाव्या कोणत्याच विचारसरणीशी स्वतःचं नातं सांगितलेलं नाही.[1]

ब्राझीलमधल्या पुराणमतवादी राजकीय चळवळीकडे पाहिलंतर त्यामागची विचारधारा अधिक सुस्पष्ट असल्याचं दिसतं.

त्यामुळेच सध्याची स्थिती तटस्थपणे पाहिली तर इथे एक असाही युक्तिवाद केला जाऊ शकतो की, “गोमांस, बायबल आणि गोळ्या” / बीफ, बायबल आणि बुलेट या त्रिसूत्रीवर आधारलेली ब्राझीलची पुराणमतवादी राजकीय चळवळ हीच या निवडणूकीतली आत्तापर्यंतची सर्वात मोठी विजेती आहे. [2] याच पार्श्वभूमीवर आपण हे समजून घ्यायला हवं की बोल्सोनारो यांना पाठिंबा दर्शवलेल्या, बोल्सोनारिस्मो या चळवळीचं नेतृत्वच एका अपरिचीत गटाकडे आहे आणि त्यामुळेच या चळवळीबाबतची संदिग्धताही अद्याप कायम आहे. त्या उलट ब्राझीलमधल्या पुराणमतवादी राजकीय चळवळीकडे पाहिलं, तर त्यामागची विचारधारा अधिक सुस्पष्ट असल्याचं दिसतं, आणि त्यामुळेच या चळवळीनं मागच्या काही वर्षांत वेगही पकडला आहे. याची सुरुवात पीटी विरोधी (पॅट्रिडो दोस ट्रॅबल्हादोरेस किंवा वर्कर्स पार्टी / कामगार पक्ष) लाटेनं झाली आणि आता या चळवळीचं रुपांतर तिथल्या प्रमुख राजकीय शक्तीमध्ये झालं आहे. त्यामुळेच दुसऱ्या बाजुला असलेला प्रश्न असा आहे की जर का बोल्सोनारो यांना ब्राझीलचं अध्यक्षपद टिकवता आलं नाही, तर मात्र बोल्सोनारिस्मो चळवळीचं काय होईल? बोल्सोनारो यांचे सहकारी त्यांच्याशी एकनिष्ठ राहतील का, की ते तटस्थ राहतील वा स्वतंत्र होतील किंवा ते आपला पक्षच बदलतील? असा प्रश्न उभा राहण्यामागचं कारण हेच की, ब्राझील हा पक्षबदलाच्या वृत्तीसाठी कुप्रसिद्ध असलेला देश आहे, आणि त्यांच्याकडची ही परंपरा इतक्यात बदलेल अशी काहीएक शक्यता नाहीच.

यामुळेच मग दुसरा मद्दा समोर येतो, तो म्हणजे लुला हे या निवडणुकीची पुढची फेरी जिंकतील अशीच शक्यता आहे का?

तर या प्रश्नाचं उत्तर होकारार्थीच असल्याचं म्हणावं लागेल. कारण परिस्थिती पाहिली तर लुला यांचाच विजय होईल अशीच सर्वात जास्त शक्यता आहे. महत्वाची गोष्ट अशी की ब्राझीलमधील काही महत्त्वाच्या व्यक्तींनी याआधीच लुला यांना आपलं समर्थन जाहीर केलं आहे. त्यात सिमोन टेबेट आणि सिरो गोम्स (ज्यांना एकत्रितपणे ७.२ टक्के मते मिळाली होती) या उमेदवारांचाही समावेश आहे. आणि या दोघांनाही निवडणुकीच्या पुढच्या फेरीत प्रवेश करता आलेला नाहीए. याशिवाय ब्राझीलचे माजी अध्यक्ष फर्नांडो हेनरिक कार्डोसो (पुराणमतवादी, उजव्या विचारसरणीच्या पक्षाचे सदस्य) तसेच पेड्रो मलान आणि  ब्राझीलच्या प्लॅनो रिअलचे (Plano Real – १९९४मध्ये ब्राझीलच्या अर्थव्यवस्थेला स्थिरता मिळवून देण्यासाठी आखलेल्या उपाययोजना) कर्तेधर्ते आणि १९९० च्या दशकातील ब्राझीलच्या अर्थव्यवस्थेला पूर्वपदावर आणण्यात महत्वाची भूमिका बजावलेले एड्मार बाचा यांनीही लुला यांना समर्थन जाहीर केलं आहे. महत्वाची गोष्ट अशी की ‘द इकॉनॉमिस्ट’ या ब्रिटिश नियतकालिकानेही लुला यांचे समर्थन केले आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, लुला यांनी केंद्रस्थानाजवळ पोहोचणे हाच त्यांच्या विजयाचा एकमेव मार्ग आहे.

ब्राझीलमध्ये लष्करी उठाव होऊ शकतो का?

निवडणुकीसंदर्भातली स्थिती समजून घेतली तर निवडणुकीच्या पहिल्या फेरीनंतरही अनिश्चिततेसंदर्भारतले काही प्रश्न अजूनही अनुत्तरीतच आहेत हे नाकारता येणार नाही.  ते म्हणजे की निवडणुकीच्या दुसऱ्या फेरीनंतर फेरीनंतर तिथे हिंसक आंदोलने होतील का? आणि जर का बोल्सोनारो पराभूत झाले तर ते आपलं अध्यक्षपद सोडण्यास नकार देतील का? लष्करी उठाव होईल का? ब्रीझील पुन्हा एकदा संस्थात्मक पेचप्रसंगाच्या गर्तेत सापडेल का?

आत्तापर्यंत तरी निवडणुकीच्या प्रक्रियेत हिंसाचार किंवा अन्यायकारक प्रक्रियात्यासोबतच लष्करी उठावाचीही कोणतीही चिन्हं दिसलेली नाहीत आणि याच वातावरणात निवडणुका सुरळीत पार पडल्या आहेत.

खरे तर ही नकारात्मक निराशाजनक भाकिते, विशेषतः ती पाश्चिमात्य माध्यमांमधून मांडली जाणे ही बाब तशी सर्वसामान्यच आहे, पण बऱ्याचदा त्यात अतिशयोक्ती असू शकते ही बाब नाकारता येणार नाही. कारण आत्तापर्यंत तरी निवडणुकीच्या प्रक्रियेत हिंसाचार किंवा अन्यायकारक प्रक्रिया, त्यासोबतच लष्करी उठावाचीही कोणतीही चिन्हं दिसलेली नाहीत आणि याच वातावरणात निवडणुका सुरळीत पार पडल्या आहेत. यात लुला यांनी पहिल्या फेरीत विजयासाठी आवश्यक असलेल्या ५० टक्क्याच्या मर्यादेपेक्षा काहीशी कमी म्हणजेच  ४८.४३ टक्के मते मिळवली, तर बोल्सोनारो यांनी ४३.२० टक्के मतं मिळवली आहेत.

खरे तर राजकारणात कधी काय घडू शकेल याबाबत नागरीसमहातली सर्जनशील व्यक्तीमत्वे अचूक भाकित वर्तवत असतात. याबाबत ब्राझीलमधलंच उदाहरण पाहायचं तर एकीकडे देशात लष्करी उठाव होण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच, तिथल्या पोर्टा डोस फंडोस, [3] या सर्वोत्तम सर्जनशील समुहाने ब्राझिलियामध्ये आणि रिओ डी जनेरियो या दोन ठिकाणी दोन विनोदी नाटिका सादर केल्या. या नाटिकांमध्ये लष्करी अधिकारी उठावाची योजना आखली जात असल्याचे आणि त्या योजना पूर्णपणे फसल्याचे दाखवले गेले आहे. तिथल्या लष्करी अधिकाऱ्यांनी उठाव करण्याऐवजी स्वातंत्र्यदिनानिमीत्तच्या सुट्टीत कुटुंबासोबत वेळ घालवण्याला आणि ब्राझीलच्या कार्निव्हल तसेच संगित कार्यक्रमांसारख्या समारंभात सहभागी होण्याला पसंती दिली. रिओमध्ये अधिकाऱ्यांनी लष्करी प्रशिक्षण घेतलेल्या पण सैन्यात नसलेल्या नागरिकांच्या सेनेचा किंवा माफियांचा सामना करण्याऐवजी स्थानिक क्लबमध्ये थंड बिअर आणि बार्बेक्यूचा आनंद लुटण्याला प्राधान्य दिलं. अशा कल्पना या विनोदी स्किटमधून सादर केल्या गेल्या.

खरे तर या  विनोदी नाटिका परिस्थितीविषयी अचूक भाकित करणाऱ्या होत्या, आणि त्यात ब्राझीलच्या नागरिकांच्या मतांचंच प्रतिबिंब उमटलं होतं असं नक्कीच म्हणता येईल. इतकच नाही तर या नाटिकांचा प्रभाव इतका होता की ब्राझीलच्या लष्करातील उच्चपदस्थांनी तर उठावाचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे सांगत, त्याबाबतीत देशातील नागरिकांना आश्वस्त केले आहे. या परिस्थितीची रॉयटर्स या वृत्तसंस्थेनेही पुष्टी केली असून, “तिथले लष्करी कमांडर्स उठावासारखे साहस करायचा धोका पत्कारतील अशी कोणतीच परिस्थिती नाही”, असे म्हटले आहे.

गेल्या साधारण दशकभरापासून ब्राझीलचे सामान्य नागरिक तसेच तिथल्या सरकारी संस्थां आर्थिक मंदीकोविड-१९ महामारीबेरोजगारीमहागाईचलन अवमूल्यन आणि हिंसाचाराचे वाढते प्रमाण अशा नानाविध संकटांचा सामना करत आले आहेत.

खरे तर सत्य हेच आहे आहे की, ब्राझीलमधील नागरिक हे २०१३ पासून देशाला सतत अडचणीत आणणाऱ्या राजकीय, आर्थिक आणि सामाजिक संकटांच्या मालिकांनी वैतागले आहेत. गेल्या साधारण दशकभरापासून ब्राझीलचे सामान्य नागरिक तसेच तिथल्या सरकारी संस्थां आर्थिक मंदी, कोविड-१९ महामारी, बेरोजगारी, महागाई, चलन अवमूल्यन आणि हिंसाचाराचे वाढते प्रमाण अशा नानाविध संकटांचा सामना करत आले आहेत. बोल्सोनारो यांनी अध्यक्षपद सोडण्यास जरी नकार दिला, तरी शांततेने सत्तांतर व्हावे हेच ब्राझीलवासीयांना हवे आहे, महत्वाचे म्हणजे ब्राझीलचे सर्वोच्च न्यायालय, तिथले निवडणूक अधिकारी, राजकीय नेते आणि लष्करानेही जनमताचे हेच सूर आळवले आहेत.

बोल्सोनारिस्मो चळवळीच्या भवितव्याची अनिश्चितता 

खरे तर सध्या ब्राझीलमध्ये बोल्सोनारिझस्मो चळवळ सर्वत्र चर्तेत आहे. मात्र असे असूनही या चळवळीचे भवितव्य काय याचे उत्तर अद्यापही अधांरातच आहे. खरे तर या निवडणुकांमुळे बोल्सोनारिस्मो चळवळीला एक संस्थात्मक स्वरूप मिळण्यात मोठीच मदत झाली, याशिवाय या चळवळीमुळेच बोल्सोनारो यांच्या अनेक सहकाऱ्यांना ब्राझीलीयन कॉंग्रेसवर आणि गव्हर्नर म्हणून आपला काहीएक प्रभावही प्रस्थापित करता आला. जे मागच्या म्हणजे २०१८च्या निवडणुकीच्यावेळी घडू शकलेले नव्हते. बंदुकीच्या वापरावचे नियंत्रण, अर्थव्यवस्थेचे उदारीकरण आणि “बीफ, बायबल आणि बुलेट” समर्थक गटांचे तुष्टीकरण याबाबतीतल्या सुधारणा घडवून आणण्यासाठी आणि संबंधित कायदे संमत करण्यासाठी हा तसा नियंत्रणाच्या बाबतीत काहीएका प्रमाणात सैल असलेला गट एकसंध राहील का ही बाब येणारा काळच सांगू शकेल. या चळवळीसमोर असलेले दुसरे महत्वाचे आव्हान म्हणजे नेतृत्व. : समजा जर का यापुढे बोल्सोनारो हे पुराणमतवादी राजकीय चळवळीचा चेहरा म्हणून टिकाव धरू शकले नाहीत, तर इतर कोणताही राजकीय नेता ही जबाबदारी स्विकारेल का हा प्रश्न आहे, त्यातही कदाचित एडुआर्डो, फ्लॅव्हिओ किंवा कार्लोस या बोल्सोनारो यांच्या मुलांपैकी कोणा एकाकडे ही जबाबदारी दिली जाईल का? हा प्रश्न आहे.

या निवडणुकांमुळे बोल्सोनारिस्मो चळवळीला एक संस्थात्मक स्वरूप मिळण्यात मोठीच मदत झालीयाशिवाय या चळवळीमुळेच बोल्सोनारो यांच्या अनेक सहकाऱ्यांना ब्राझीलीयन कॉंग्रेसवर आणि गव्हर्नर म्हणून आपला काहीएक प्रभावही प्रस्थापित करता आला. जे मागच्या म्हणजे २०१८च्या निवडणुकीच्यावेळी घडू शकलेले नव्हते.

इथे एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे, ब्राझीलमधली पुराणमतवादी राजकीय चळवळ ही बोल्सोनारिस्मोपेक्षा मोठी आणि जुनी चळवळ आहे. बोल्सोनारो प्रकाशझोतात येण्यापूर्वीच या चळवळीला सुरूवात झाली होती, आणि बोल्सोनारो यांची राजकीय कारकीर्द संपल्यानंतरही ती तशीच चालू राहणार आहे.

आता जरी का लुला यांची अध्यक्षपदावर निवड झाली तरीदेखील त्यांनी २००३ ते २०११ या काळात ज्या प्रभावीपणे कारभार केला होता, तितक्या प्रभावीपणे किंवा समर्थपणे ते यावेळेस आपला कारभार हाकू शकणार नाहीत. त्यामागचे कारण हेच की, एक तर त्यांच्याकडे काँग्रेसच्या कोणत्याही सभागृहात बहुमत असणार नाही, दुसरे कारण हे की, त्यांचे विरोधक असलेले सिनेटर सर्जिओ मोरो, ज्यांनी २०१८मध्ये लुला यांना झालेल्या अटकेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती, अशा आपल्या विरोधकांसह, विरोधी पक्षांमधल्या अनेक गव्हर्नरसोबत त्यांना सतत संघर्ष करत कारभाराची कसरत करत राहावी लागणार आहे.  विरोधी राज्यपाल आणि प्रतिस्पर्ध्यांशीही त्यांना संघर्ष करावा लागेल. ही परिस्थिती लक्षात घेतली तर लुला हे कदाचित जनमत आपल्याबाजुने करता यावं यासाठी सत्तेचं केंद्रीकरण करण्याची पुराणमतवादी विचारसरणीनेच पुढे जाण्याची, तसेच मोठ्या उद्योजकांना खूश करण्यासाठी समतोल साधणाऱ्या किंवा पुराणमतवादी विचारांच्या अर्थतज्ञांची नेमणूक करतील अशीच शक्यता आहे.

लुला हे २०००च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात ब्राझीलच्या आर्थिक यशाचा चेहरा होते, त्यानंतर २०१८मध्ये भ्रष्टाचारानं कलंकित, तुरूंगात गेलेले राजकारणी अशी त्यांची प्रतिमा होती. या घडामोडींवरून लुला यांच्या व्यक्तीमत्वाच्या जडणघडणीतले मोठे चढउतार आपल्याला सहज लक्षात येतील. २०२२ मध्ये मात्र पुनर्जन्म झाल्यासारखीच बोल्सोनारो यांना एक सर्वोत्तम पर्याय म्हणून लुला यांची प्रतिमा तयार झाली, आणि याचा प्रभावही इतका जबरदस्त होता की लुला हे ब्राझीलच्या विद्यमान अध्यक्षांपेक्षा जास्त मते मिळवणारे पहिले उमेदवार ठरले आहेत.

आता येत्या ३० ऑक्टोबरला ब्राझीलमध्ये निवडणुकांची पुढची फेरी होईल, मात्र ही फेरी अध्यक्षपदाची शर्यत असणार नाही. त्याऊलट ही फेरी म्हणजे आपला राजकीय वारसा अधिक भक्कम करण्यासाठीचीच लढाई ठरणार आहे. लुला हे स्वतःला ब्राझीलच्या इतिहासातील सर्वात लोकप्रिय नेत्यांपैकी एक अशी प्रतिमा निर्माण करण्यासाठी लढत आहेत, तर दुसऱ्या बाजुला बोल्सोनारो हे ब्राझीलच्या ‘बीफ, बायबल आणि बुलेट्स’ या पुराणमतवादी चळवळीचा चेहरा म्हणून आपले स्थान अधिक बळकट करण्यासाठी लढत आहेत.

_____________________________________________________________________

[1] सेंट्रोओ ही कोणत्याही एका विचारसरणीचे समर्थन करत नसली, तरी देखील त्यांची विचारसरणी ही बऱ्यापैकी सेंटर-राईट / उजव्याबाजुची असल्याचे म्हणता येईल.

[2] इथे ‘बीफ’ चा अर्थ, ब्राझीलमधील सामर्थ्यशाली कृषी गट असा आहे.  ‘बायबल’ याचा अर्थ पुराणमतवादी ख्रिस्ती चळवळ असा आहे जी, पुराणमतवादी इव्हॅन्जेलिकल्स, प्रोटेस्टंट आणि कॅथलिक यांना एकत्र आणणारी आहे. तर ‘बुलेट्स’ याचा अर्थ बंदूकीच्या वापराला समर्थन देणारा आणि हिंसा तसेच अंमली पदार्थांच्या तस्करीची समस्या सोडवण्यासाठी अधिक आक्रमकपणे उत्तर देण्याच्या भूमिकेचा समर्थन करणारा गट असा आहे.

[3] पोर्टा डॉस फंडोस ब्राझीलमधील अतिशय लोकप्रिय सर्जनशील समूह आहे. त्यांची स्वतःची युट्यूब वाहिनी असून ही वाहिनी आजवर ६ अब्जाहून अधिक लोकांनी पाहिली आहे. याशिवाय या वाहिनीला आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार मिळाला आहे, तसंच त्यांनी नेटफ्लिक्स, एचबीओ आणि कॉमेडी सेंट्रल अशा व्यासपीठांसाठीही कार्यक्रमांची निर्मिती केली आहे.

हे लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.