Author : Jaibal Naduvath

Published on Nov 17, 2023 Commentaries 0 Hours ago

रणांगणावर वर्चस्व गाजवण्यापेक्षा घटनांचा अन्वय लावण्यावर नियंत्रण ठेवणे हे या युगातील आव्हान बनले आहे. अशा वेळी राष्ट्रांनी प्रतिक्रियात्मक संरक्षणाऐवजी सक्रिय सहभागाचा पाठपुरावा करणे आवश्यक बनले आहे.

अविवेकाचे युग : घटनांचे अन्वय लावण्याच्या संघर्षात राष्ट्रे अपयशी का ठरतात?

‘एका व्यक्तीला तर्कसंगत विश्लेषणाने एखादी गोष्ट पटवून देता येते, त्यापेक्षा कितीतरी कमी वेळात हजार व्यक्तींना त्यांच्या पूर्वग्रहांना चुचकारून तीच गोष्ट पटवून देता येते,’ असे रॉबर्ट ए. हाइनलाइन यांच्या १९४० मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘इफ धिस गोज ऑन’ या लोकप्रिय कादंबरीचा नायक झेब म्हणतो. ‘न्यू जेरुसलेम’ नावाच्या एका शहरात घडणाऱ्या या कथेत विडंबनात्मकरीत्या इस्रायली सरकारच्या सध्याच्या दुर्दशेचे प्रतिबिंब दिसू शकते. विशेषतः गाझामधील अल-अहिली बाप्टिस्ट रुग्णालयावर झालेल्या बॉम्बहल्ल्यानंतर इस्रायल सरकार ‘घटनांचा अन्वय लावण्यातील संघर्षा’त (वॉर ऑफ नरेटिव्हज) गुंतले आहे. न्यायवैद्यकीय निष्कर्ष वेगळे असूनही जगभरातील अनेकांनी तत्परतेने इस्रायलवर दोषारोप करणे सुरू केले. हाच या संघर्षातील महत्त्वाचा वळणबिंदू ठरला. या दोषारोपांमुळे जगाचे लक्ष हमास आणि इस्लामिक जिहाद्यांनी सात ऑक्टोबर रोजी  असहाय्य इस्रायली नागरिकांवर केलेल्या अत्याचारावरून उडालेच, शिवाय आपली लष्करी उद्दिष्टे साध्य करण्यासाठी पॅलेस्टिनी नागरिकांचा मानवी ढाल म्हणून केलेल्या तिरस्करणीय वापरावरूनही जगाचे लक्ष दुसरीकडे वळले. हमास आणि हिजबुल्लाहने मानवी ढालींचा वापर केल्याने अमेरिकेत २०१८ च्या ‘शिल्ड्स कायद्या’चा अवलंब करण्यात आला. ज्या लोकांनी मानवी ढालींचा वापर केला, त्यांच्यावर अमेरिकेच्या अध्यक्षांनी निर्बंध आणण्याची गरज आहे.

न्यायवैद्यकीय निष्कर्ष वेगळे असूनही जगभरातील अनेकांनी तत्परतेने इस्रायलवर दोषारोप करणे सुरू केले. हाच या संघर्षातील महत्त्वाचा वळणबिंदू ठरला.

हमासच्या हल्ल्याला इस्रायलने दिलेल्या प्रत्युत्तरामुळे होणाऱ्या अनुषंगिक नुकसानासंबंधीही विकृत कथन केले जात आहे आणि या चुकीच्या गोष्टी अत्याधुनिक मल्टिमीडिया मोहिमांच्या माध्यमातून प्रखर केल्या जात आहेत. ज्या ठिकाणी आजारापासून मुक्तता मिळते किंवा जिथे आश्रय घेता येतो, अशा रुग्णालयावर बॉम्बहल्ला झाला होता. त्यामुळे त्याची प्रखरता अनेक पटींनी वाढली. यामुळे मोठ्या प्रमाणात मतभिन्नता असलेले अरब जगत या वेळी एकत्र आले. कारण छिन्नविछिन्न मृतदेह आणि रक्ताने माखलेल्या मुलांची बिभत्स छायाचित्रे दूरचित्रवाणीच्या पडद्यावर व्यापली गेली आणि सोशल मीडियावरही सातत्याने त्याचाच मारा सुरू झाला. याचा परिणाम म्हणजे, सार्वजनिक मत दीर्घ काळच्या शत्रूविरोधात म्हणजे इस्रायलविरोधात गेले. सावध सरकारने जनभावनेकडे कानाडोळा केल्याने भावनांचा उद्रेक होऊन सरकारच्या कृतीवरील प्रतिक्रिया रस्त्यावर उमटली. संकुचित संवेदना, आकर्षक कथन आणि माध्यमांचा जाणीवपूर्वक वापर करून विकृत परिणामांसाठी घटनांचा अन्वय कसा विपर्यस्त लावता येतो, याचे हे चांगले उदाहरण आहे.

इस्रायली सरकारची स्थिती ही युद्धखोर गटांशी लढणाऱ्या एका देशासारखी आहे. मात्र, या देशासाठी रणांगणावर वर्चस्व राखण्यापेक्षा घटनांचा अन्वय लावणाऱ्या संघर्षावर वर्चस्व ठेवणे मोठे आव्हान बनले आहे. असे गट जेव्हा मोठी लोकसंख्या असलेल्या भागांवर नियंत्रण ठेवतात, म्हणजे, उदाहरणार्थ, गाझामधील ‘हमास’ किंवा श्रीलंकेतील तत्कालीन ‘लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम’ आणि कोलंबियातील ‘एफएआरसी’ (फ्युरेझस आर्माडास रिव्होल्युशनरीज दा कोलंबिया) असे गट जेव्हा नियंत्रण प्रस्थापित करतात, तेव्हा ते अधिक गुंतागुंतीचे बनते. हे गट जागतिक मतांवर प्रभाव टाकतात आणि प्रचार, फेरफार व बळाचा वापर करून बिथरलेल्या समाजाला ओलिस ठेवतात आणि एकाच वेळी बळी व गुन्हेगार अशा दोहोंची भूमिका बजावतात. या द्वंद्वाचे कारण दुहेरी आहे. असा दृष्टिकोन शक्तिशाली भावनात्मक प्रतिक्रियांना जन्म देतो आणि विरोधकांना धमकाविण्याबरोबर आणि आंतरिक असंतोषाला दाबून टाकण्याबरोबरच सहानुभूतीपूर्ण घटकांना एकत्र आणतो.

सावध सरकारने जनभावनेकडे कानाडोळा केल्याने भावनांचा उद्रेक होऊन सरकारच्या कृतीवरील प्रतिक्रिया रस्त्यावर उमटली.

अशा गटांनी विशेषतः पारंपरिक आणि नव्या अशा दोन्ही माध्यमांच्या सामर्थ्याचा वापर करून आपला पाया मजबूत करण्यात व आंतरराष्ट्रीय सहानुभूती निर्माण करण्यात प्राविण्य मिळवले आहे. हॅशटॅग युगाच्या खूप आधी ‘एलटीटीई’ची एक स्वतंत्र माध्यम शाखा होती. ही शाखा तमिळ अल्पसंख्याकांवर लष्कराकडून होणाऱ्या कथित अत्याचारांचे व्हिडीओ तयार करीत असे. त्यांनी जगभरात विखुरलेल्या तमिळ जनसमूहाला साद घातली, नात्याची भावना जागृत केली आणि निधी व समर्थनही मिळवले. ‘एफएआरसी’ने गरीबी, भेदभाव व वर्गीय दडपशाही या मुद्द्यांभोवतीने आपला संघर्ष सुरू केला आणि पीडितांचे कैवारी म्हणून स्वतःची प्रतिमा निर्माण करून त्याला वैध स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी स्वतःच्या गुन्हेगारी कारवायांवर पाघरूण घालून सरकारपुरस्कृत कथित हिंसाचाराकडे मात्र लक्ष वेधले. गेल्या काही वर्षांत हमासने अत्यंत कुशलतेने घटनांचा अन्वयार्थ लावताना त्याला प्रतिकाराची डुब दिली आहे. इतकी की आपल्या कारवाया वैध ठरवण्यासाठी आपल्या राजकीय प्रतिस्पर्ध्यांशी म्हणजे पॅलेस्टिनी सरकारशी अवकाश आणि संदर्भाच्या जीवघेण्या लढाईत विरोधाभास राहील, असे दर्शन घडवले. आपल्या या प्रयत्नांमध्ये त्यांनी असंतुष्ट समुदायांनी बनलेल्या सोशल मीडियाचा आणि आपलाच कार्यक्रम चालवणाऱ्या व्यक्तींचा वापर केला. घटनांचा अन्वय लावताना ते एक तीव्र, भावनिक विरोधाभास तयार करतात. म्हणजे इस्रायली लष्कराची ताकद व दडपशाही यांविरोधात निष्पाप पॅलेस्टिनी नागरिक. त्यामुळे नाहक प्रतिसादांना चालना मिळते, रस्त्यावर उतरून कट्टरता दाखवली जाते आणि आंतरराष्ट्रीय मतांचे ध्रुवीकरण केले जाते.

बळी आणि सत्तेतील विषमतेच्या राजकारणात गुंतलेले असे दृष्टिकोन सुसंघटित देशाचे नुकसान करतात. ते भावनिकदृष्ट्या प्रखर आणि साचेबद्ध संकल्पनांवर आधारित अन्वयार्थाशी झगडण्याचे काम करतात. मात्र, ज्या ठिकाणी भावना प्रधान असतात आणि घटनांचा अन्वय  युद्धाची व्याख्या निश्चित करतात, तेथे काळ महत्त्वपूर्ण असतो. एकमेकांशी जोडलेल्या या युगात माहिती पसरण्याचा वेग विलक्षण असतो आणि पूर्वग्रह शक्तिशाली आधाराचे काम करतात. माहितीवर प्रक्रिया होण्याचे मोठे कारखाने म्हणजे समाज. माहितीचे प्रमाण आणि गुंतागुंत जसजशी वाढत जाते, तसतसे ते आपल्या जगामध्ये रुजू शकतील, असे परिचित अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न करतात. अशा एकारलेल्या अन्वयार्थाला अवास्तव महत्त्व दिल्याने चुकीची माहिती आणि पूर्वग्रह मते बनतात. उदाहरणार्थ, अल-अहली रुग्णालयावर बॉम्बहल्ला झाल्यानंतर हमासने लगेचच सोशल मीडिया आणि गाझा येथील वृत्तसंस्थांच्या माध्यमातून इस्रायलवर ठपका ठेवत तपशीलवार माहिती दिली. हा हल्ला इस्लामिक जिहादींकडून करण्यात आला असल्याचा पुरावा इस्रायलने देईपर्यंत हमासचे कथन सर्वत्र पसरले होते आणि इस्रायलविरोधात लोक रस्त्यावर आले होते; परंतु सत्याचा अपलाप करणाऱ्या निराधार बातम्या प्रसारित केल्याबद्दल अनेक वृत्तसंस्थांनी नंतर खेद व्यक्त केला, तरी इस्रायलचे प्रयत्न निष्फळच ठरले होते. त्याहीपेक्षा आश्चर्याची गोष्ट म्हणजे, आपल्या विरोधातील घटनांचा अन्वय लावण्याचे युद्ध रोखण्यासाठी सात ऑक्टोबर रोजी घडलेल्या घटनांचे व्हिडीओ प्रसारित करण्यासाठी इस्रायलला सुमारे तीन आठवड्यांचा कालावधी लागला.

हॅशटॅग युगाच्या खूप आधी ‘एलटीटीई’ची एक स्वतंत्र माध्यम शाखा होती. ही शाखा तमिळ अल्पसंख्याकांवर लष्कराकडून होणाऱ्या कथित अत्याचारांचे व्हिडीओ तयार करीत असे.

राजकीय समीकरणे, नोकरशाहीचे अडथळे आणि धोरणातील त्रुटींमुळे सरकारकडून येणाऱ्या उत्तराची गती बरेचदा मंद असते. त्याचे आणखी तोटेही होतात. कारण ते किमान सैद्धांतिकदृष्ट्या माध्यमांच्या नैतिक मानकांच्या चौकटीत असतात आणि त्यांच्या कृतींची व घटनांच्या अन्वयांची अधिक कठोरपणे फेरतपासणी करतात. ज्या लोकशाही देशांची तीव्र स्पर्धा आणि स्वरूप गुंतागुतीचे असते, तेथे त्वरित कृती होणे अवघड बनते. मात्र, डिजिटल क्षेत्राच्या विकसित होत असलेले आयाम ही घटनांच्या अन्वयाची नवी युद्धभूमी एक लक्षणीय आव्हान बनले आहे. अनेक देश या डिजिटल संघटनांच्या विरोधात आवाज उठवत असले, तरी त्यांनी जास्तीत जास्त प्रयत्न करूनही त्याचे परिणाम संमिश्र आहेत. कारण युद्धखोर लोक या क्षेत्राचा फायदा घेण्यासाठी नव्या नव्या पद्धती शोधत आहेत. त्यामुळे हा एक बारा महिन्यांचा कुत्र्या-मांजराचा खेळ बनतो. प्रसारमाध्यमांच्या बहुतांश व्यासापीठांवर हमासवर प्रतिबंध आणला, तरी या माध्यमाचा उपयोग करण्याच्या त्याच्या क्षमतेवर कणभरही परिणाम झालेला नाही. सोशल मीडियावरील प्रॉक्सी हँडल आणि पाठीराख्यांनी हमासला पाठिंबा दिला. उदाहरणार्थ, ‘गाझा नाऊ’ या हमासच्या टेलिग्रामवरील प्रॉक्सी चॅनेलच्या फॉलोअर्सची संख्या सुमारे चारशे टक्क्यांनी वाढून केवळ आठवडाभरात ती १३ लाखांवर पोहोचली.

एकाकी पडलेले देश बरेचदा गुन्ह्यांच्या सूत्रधारांना त्यांच्या समुदायांसमवेत एकत्र आणण्याची घोडचूक करतात. त्यामुळे ते आपोआपच बळी बनतात. हेच चित्र श्रीलंकेत दिसून आले. तेथे तमिळ लोकांना एलटीटीईचाच विस्तार असे समजण्यात आले. म्यानमारमध्ये रोहिंग्यांना रोहिंग्या एकता संघटना आणि अराकन रोहिंग्या साल्व्हेशन आर्मी हे सर्व एकच समजले गेले आणि गाझामध्ये हमासविरोधातील मोहिमेचा नागरिकांवर विपरीत परिणाम झाला. जवळजवळ प्रत्येक संघर्षात हे सत्य आहे. दुर्दैवाने, कल्पना, आदर्श आणि विचारसरणीच्या अशा चुकीच्या गोष्टींमुळे संपूर्ण समुदायांनाच हिंसक सूडासाठी लक्ष्य केले जाते. यामुळे पीडितांचेच रूपांतर गुन्हेगारांमध्ये होते आणि हल्ल्या-प्रतिहल्ल्यांमध्ये अडकलेल्या नागरिकांवर सर्व बाजूंनी अन्याय्य स्थिती ओढवते. यामुळे न संपणाऱ्या हिंसेचे चक्र सुरू होते. जेव्हा दोन्ही बाजूंमधील एक बाजू प्रचंड व असमान शक्ती घेऊन उभी ठाकते आणि दुसऱ्या बाजूला नष्ट करते, तेव्हाच हे चक्र थांबते. हेच श्रीलंकेमध्ये दिसले आणि आता तेच करण्याची इस्रायलने धमकी दिली आहे.

माहितीवर प्रक्रिया होण्याचे मोठे कारखाने म्हणजे समाज. माहितीचे प्रमाण आणि गुंतागुंत जसजशी वाढत जाते, तसतसे ते आपल्या जगामध्ये रुजू शकतील, असे परिचित अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न करतात.

संघर्ष जेवढे हृदय आणि मनाच्या लढ्याबद्दल असतात तेवढेच ते शस्त्रांच्या लढ्याबद्दल असतात. प्रचार आणि जवळचे पाहणे हे दोन्ही विजेच्या तारांसारखे काम करतात, विचारांना एका केंद्राशी घेऊन जातात, संस्थांना आकार देतात आणि संघर्षाचे पुढील टप्पे निश्चित करतात. युद्धखोर गट स्थितीवर नियंत्रण मिळवत असतात. त्यांच्यावर कोणतेही उत्तरदायित्व नसते आणि आपणच पीडित असल्याचे दाखवून कौशल्याने इतरांची सहानुभूती मिळवत असतात. या उलट संघटीत देश अधिक ओझे वाहात असतात. त्यांची ताकद व त्यांचे संघटन विरोधाभास निर्माण करून या असमान युद्धात त्यांचीच बाजू दुबळी बनते. अशा वेळी विचारांपेक्षाही माहिती अधिक वेगाने पसरते आणि कोणत्याही रासायनिक प्रक्रियेपेक्षा दृष्टिकोन पूर्वग्रहांच्या आधारानेच मार्गक्रमण करतात. देश घटनांच्या अन्वयांचा प्रतिकार करण्यासाठी झगडत राहतात.

घटनांचे अन्वय योग्य व चुकीच्या आणि जगातील स्थानाची जाणीव करून देणाऱ्या या माहितीच्या विस्फोटात राष्ट्रांना संयम व प्रतिक्रियाशील संरक्षणापासून चपळ व सक्रिय प्रतिबद्धतेकडे संक्रमण करणे गरजेचे आहे. त्यांना घटनांच्या नोंदी करण्यापासून आणि खोट्या गोष्टींचा प्रतिवाद करण्यापासून ते सुसंबद्ध आणि वेळेवर सत्य सांगणे आवश्यक आहे. केवळ संवादक बनण्याऐवजी त्यांनी आपल्याच उलगडत जाणाऱ्या इतिहासाचे प्रामाणिक कथनकार बनणे आवश्यक आहे. १९९१ मध्ये ‘ऑपरेशन डेझर्ट स्टॉर्म’च्या दरम्यान बगदादमध्ये अल-फिरदोस बंकरवर झालेल्या बॉम्बहल्ल्यावेळी अमेरिकेने दिलेली प्रतिक्रिया यासाठीचे एक उदाहरण ठरू शकते. त्या वेळी झालेल्या हल्ल्यात चारशेपेक्षा अधिक नागरिक मृत्युमुखी पडले होते. त्यावेळच्या इराक सरकारने या घटनेचा लाभ उठवण्याचा तातडीने प्रयत्न केला. सरकारकडून आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांना प्रत्यक्ष घटनास्थळी नेण्यात आले. मात्र, केवळ काही तासांतच अमेरिकेच्या लष्कराने केलेल्या वक्तव्याने घटनांचे अन्वय लावण्यामध्ये समतोल साधला गेला. या घटनेमुळे या संपूर्ण प्रदेशात संतापाची लाट उसळली आणि ती अत्यंत वादग्रस्त घटना ठरली.

अशा वेळी विचारांपेक्षाही माहिती अधिक वेगाने पसरते आणि कोणत्याही रासायनिक प्रक्रियेपेक्षा दृष्टिकोन पूर्वग्रहांच्या आधारानेच मार्गक्रमण करतात. देश घटनांच्या अन्वयांचा प्रतिकार करण्यासाठी झगडत राहतात.

अल-अहली रुग्णालयावरील बॉम्बहल्ला आणि त्याच्या परिणामांनी देशांसमोर उभ्या असलेल्या मूळ आव्हानांना अधोरेखित केले आहे. पीडित ठरवण्याच्या राजकारणात दुर्बलांच्या विरोधात उभे राहताना राष्ट्रांना अशा प्रकारच्या आव्हानांना तोंड द्यावे लागते. या सगळ्या प्रकाराकडे नेहमी दडपशाही करणाऱ्यांकडून असुरक्षित लोकांवर वापरण्यात आलेले बळ अशा दृष्टीने पाहिले जात असल्याने त्याला एक प्रभावी भावनात्मक डुब मिळते. ही भावनाच राष्ट्रांना हतबल करते. ‘द बेटर एंजल्स ऑफ आवर नेचर’ या २०११ मध्ये प्रसिद्ध झालेल्या आपल्या पुस्तकात स्टीव्हन पिंकर म्हणतात, ‘अंदाधुंद घटनांचे व सामूहिक दुर्दैवाचे कथन करताना विश्वास ठेवणाऱ्यांच्या नैतिकतेला व क्षमतेला उत्तेजन मिळेल, अशा दृष्टीने अन्वय लावला जातो आणि घटनांचा छेद घेताना पुरेशी अस्पष्टता व संशय राहील, याची काळजी घेतली जाते, तेव्हाच ती विचारसरणी एक समाधानकारक अन्वय लावू शकते.’ दृष्टिकोनाच्या या अवघड समस्येवर उपाय शोधण्यासाठी कोणतीही जादूची छडी अस्तित्वात नाही. अल्गोरिदमच (समस्या सोडवण्याच्या टप्प्यांची कार्यसूची) राष्ट्रगीत बनवल्या जाणाऱ्या आणि घटनांच्या अन्वयांनी प्रस्थापित कल्पनांना धक्का देणाऱ्या वातावरणात वेग आणि तात्पर्य हेच खऱ्या अर्थाने देशांचा आधार आहेत.

जयबाल नडूवात हे ‘ऑब्झर्व्हर रीसर्च फाउंडेशन’चे उपाध्यक्ष आणि वरिष्ठ फेलो आहेत.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.

Author

Jaibal Naduvath

Jaibal Naduvath

Jaibal is Vice President and Senior Fellow of the Observer Research Foundation (ORF), India’s premier think tank. His research focuses on issues of cross cultural ...

Read More +