Author : Silvana Lopez

Published on May 07, 2020 Commentaries 0 Hours ago

‘कोविड १९’कडे केवळ एक साथीचा रोग किंवा संकट म्हणून न पाहता, भविष्यातील बदलाची कल्पना आपल्याला वर्तमानात देणारी व्यवस्था म्हणून या साथीचा विचार केला पाहिजे.

…म्हणून ‘कोविड १९’चे आभार मानायला हवेत!

नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तींमुळे मानवजात संकटात सापडल्याची कथा असलेले अनेक चित्रपट आपण सर्वांनीच कधी ना कधी पाहिले आहेत. मात्र, खऱ्या आयुष्यात आपल्याला याचा अनुभव घ्यावा लागेल, अशी कल्पनाही कुणी केली नसावी. अर्थात, सध्याचे चित्र पाहिल्यास कल्पनेने वास्तवावर मात केलेली दिसतेय. बदल अत्यंत वेगाने झालाय आणि त्याला आपल्याला आत्ताच तोंड द्यावे लागणार आहे. कारण, ‘नंतर’मध्ये अंतर असते. किंबहुना, ‘नंतर’ची काही शाश्वती नसते, हेच यातून सिद्ध झाले आहे..

‘कोविड १९’ची साथ आल्यामुळे काही आठवड्यांतच आपली जीवनशैली बदलली आहे, हे आता सर्वांनीच मान्य केलेले आहे. तसेच ‘फ्युचर ऑफ वर्क’ ही संकल्पनाही आपल्यासाठी आता नवी राहिलेली नाही. त्यामुळे कोरोनाच्या या परिस्थितीत आपली नवी कार्यसंस्कृती कशी असेल? याबद्दल आपल्यातील अनेकांना विचार करणे भाग पडत आहे. आजघडीला याबद्दल आपल्याला खूपच कमी माहिती आहे, हे प्रथमत: मान्य करावे लागेल. त्यामुळे भविष्यातील परिस्थितीचा अचूक अंदाज वर्तवणारे अनेक मॉडेल जगात असले किंवा तसा आपला दावा असला तरी ‘कोविड १९’चे संकट आणखी किती काळ घोंगावत राहील, याबद्दल कुणीच खात्रीने काही सांगू शकत नाही. या काळात लोकांच्या वर्तनात कसा बदल होईल आणि भविष्यातील अनिश्चिततेशी ते कसे जुळवून घेतील, हेही सांगता येणार नाही. आपल्या पूर्ण क्षमतेचा वापर करून अभ्यासपूर्ण अंदाज बांधणे एवढेच तूर्त आपल्या हातात आहे.

आजची कार्यसंस्कृती आपल्याला कशी दिसते?

‘रिमोट’ हा इंग्रजी शब्द सर्वसाधारणपणे दोन अर्थांनी वापरला जातो. त्याचा एक अर्थ दूरस्थ, दुर्गम किंवा खूप दूरच्या अंतरावरचा असा होतो. दुसरा अर्थ, शारीरिक अंतर ठेवून असा होतो. सध्याच्या काळात हा शब्द पूर्णपणे वेगळ्या अर्थाने वापरला जातोय, तो म्हणजे ‘जवळीक’.

‘रिमोट वर्क’चा अर्थ शारीरिक संपर्काचे निर्बंध पाळून आपल्या सहकाऱ्यांशी जवळीक साधणे असा आहे, हे आता आपल्याला कळून चुकलेय. कामाच्या या नवीन मॉडेलशी आपण खूप वेगाने जुळवून घेत आहोत. लॉकडाऊनच्या काळात सहकाऱ्यांशी जवळीक साधण्याची ही निकड लक्षात घेऊन ‘झूम’ आणि ‘गुगल मीट’सारखे नवनवे तंत्रज्ञानही पुढे येत आहे.‘फ्युचर ऑफ वर्क’ नावाच्या एका मजेशीर सामाजिक प्रयोगाचा अनुभव आपण सगळे घेत आहोत. मात्र, नावात ‘फ्युचर’ असले तरी हे सगळे आजच घडत आहे.

हे तंत्रज्ञान स्वीकारण्याची मानसिकता लोकांमध्ये दिसते. कोणीही या नव्या तंत्रज्ञानाबद्दल फारशी खळखळ करताना दिसत नाही. यामागचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे, सध्याच्या मनुष्यबळामध्ये मिलेनियल्सचे (८०च्या दशकात जन्मलेले आण टेकसॅव्ही) प्रमाण मोठे आहे आणि त्यांच्यापेक्षा थोडे वयस्कर असलेले लोकही हल्ली कुठल्याही प्रकारचे स्मार्ट तंत्रज्ञान सहज हाताळतात. शिवाय, सोशल मीडियाने आपल्याही नकळत आपल्याला नव्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तयार केले आहे. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रचंड वेगाने होणारे संशोधन आणि वापरात येणाऱ्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे प्रत्येकाला किमान तांत्रिक ज्ञान व कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक झाले आहे.

अजूनही आव्हानांची मोठी मालिका बाकी आहे

आपल्यातील अनेकांना सध्या ट्रॅफिकच्या समस्येचा सामना करावा लागत नाही. तसेच कार्यालयीन बैठकांना उपस्थित राहण्यासाठी किंवा सेलिब्रेशनाठी, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करावा लागत नाही. परिणामी आपला वेळ वाचतो आहे. या अतिरिक्त वेळेत उत्पादकता वाढवण्याचा व अधिकाधिक चांगला परफॉर्मन्स देण्याचा ताण (अर्थातच स्वत:हून घेतलेला) आपल्यावर आहे. हा ताण तुम्ही कसा हाताळता? हे महत्त्वाचे आहे.

एका क्लिकवर क्षणार्धात जगाशी जोडून घेता येणे, हे नव्या अर्थव्यवस्थांचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. जगातील कोणत्याही ठिकाणी बसून आणि कोणत्याही वेळी आपल्याला परस्परांसोबत काम सुरू करता येते. सर्वव्यापी असणे, हे केवळ ईश्वरी शक्तीचे वैशिष्ट्य आहे किंवा केवळ देवालाच ही कला साध्य आहे, हा समज मागे पडण्याचा हा काळ आहे. मग प्रश्न असा निर्माण होतो की, जागतिक अर्थव्यवस्थेचे चक्र सुरू ठेवताना हे तंत्रज्ञान उत्पादकतेला चालना कसे देऊ शकते? अर्थात, या सगळ्यामध्ये सुधारणेला बराच वाव असला तरी आपण योग्य मार्गावर आहोत हेही तितकेच खरे आहे.

नजिकच्या भविष्यातील कार्यसंस्कृती नेमकी कशी असेल?

आपल्या भविष्याने आताच आपल्या वर्तमानात शिरकाव केला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळातील कार्यसंस्कृती ही सध्या आपण अंगिकारलेल्या पद्धतीपेक्षा वेगळी असणार नाही. या नव्या वर्तमानात, म्हणजेच सायबर नात्यामध्ये (दैनंदिन व्यवहार व दूरस्थ काम ज्याचा केंद्रबिंदू आहे अशा) विश्वास निर्माण करणे हे सर्वात मोठे आव्हान असणार आहे. हे आव्हान कसे पेलायचे याचा विचार करणे जास्त महत्त्वाचे आहे.

‘ब्लॉकचेन’ हे कदाचित त्यावरचे उत्तर असेल. लोक रोजच्या रोज नव्या डेटाची निर्मिती करतात. या नव्या डेटाच्या मालकी हक्कावरून बऱ्याच काळापासून वाद होत आले आहेत. वेब क्रांतीचा तिसरा टप्पा डेटाच्या लोकशाहीकरणाचा, विकेंद्रीकरणाचा एखादा ढोबळ मार्ग सुकर करेल, अशी चिन्हे आहेत. त्यायोगे विश्वासार्ह आणि सहज शोधता येतील असे व्यवहार करण्याचा मार्गही खुला होईल.

‘कोविड १९’मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन आपल्याला वेब ३.० आणि ब्लॉकचेनच्या आधारे एक आचारसंहिता बनवता येऊ शकते. या आचारसंहितेच्या माध्यमातून ग्लोबल कनेक्टिव्हिटी व तात्कालिक स्वरूपातील अर्थव्यवस्था नवी उंची गाठण्यासाठी प्रयत्नशील राहील.

सध्या जग हे आर्थिक मंदीच्या दिशेने वाटचाल करतेय याची आपल्याला पूर्ण जाणीव आहे. त्यामुळेच आपण सध्याचे आपले सायबर वास्तव शक्य तितके प्रत्यक्ष आयुष्यासारखे जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तसे झाले तरच आपल्याला  पूर्वीसारखे रोजगार देणारी डिजिटल अर्थव्यवस्था उभी करता येईल.

अस्थायी किंवा तात्कालिक स्वरूपाच्या कार्यसंस्कृतीला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. कारण, हीच भविष्यातील कार्यसंस्कृती ठरणार आहे. यात नोकरशाहीचे वर्चस्व कमी होईल. मागणी (आणि संधी) खूपच वेगाने वाढेल आणि कदाचित निकड त्याहूनही अधिक असेल. स्पर्धेची व्याख्या नव्याने लिहिली जाईल. यापूर्वीचे काही प्रतिस्पर्धी उद्योगांच्या विविध क्षेत्रांत टिकून राहण्यासाठी कदाचित एकमेकांचे सहकारी होतील. अनुभव आणि नवी गोष्ट साध्य करण्यासाठी लागणाऱ्या विविध कौशल्यांच्या निकषांवर प्रतिभेचे किंवा बुद्धिमत्तेचे नव्याने मूल्यमापन होईल.

कामाचे ठिकाण हे प्रत्यक्षात कामाचे ठिकाण राहणार नाही. जिथे कुठे इंटरनेट कनेक्टिव्हिटी मिळू शकते, ते आपल्या कामाचे ठिकाण असेल. हे ठिकाण आपले घर असेल किंवा आपल्या आवडीचे एखादे दुसरे ठिकाण असेल. स्वातंत्र्य आणि स्वायत्तता ही नव्या अस्थायी अर्थव्यवस्थेची दोन प्रमुख वैशिष्ट्ये असतील आणि कनेक्टिव्हिटी हा त्यांचा आधार असेल. त्यामुळेच ‘कोविड १९’कडे केवळ एक साथीचा रोग किंवा संकट म्हणून न पाहता एक उत्प्रेरक (बदलास उद्युक्त करणारी घटना) या अंगाने त्याचा विचार केला पाहिजे. एक असे उत्प्रेरक ज्याने आपली भविष्यातील कार्यशैली व पर्यायाने जीवनशैली वर्तमानात रूपांतरित केलीय.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.

Author

Silvana Lopez

Silvana Lopez

Silvana is an entrepreneur intellectual property expert and innovator strategist. She is the CEO &amp: Co-founder of The Blockchain Challenge Inc. a Boston-based startup with ...

Read More +