Author : Roshan Saha

Published on Apr 15, 2021 Commentaries 0 Hours ago

अन्नधान्याचे उत्पादन, उत्पादनानंतरची प्रक्रिया आणि वितरण यांचा समावेश असलेल्या अन्न साखळीचा जगातील एकूण ग्रीन हाउस गॅस उत्सर्जनात २५ टक्के वाटा आहे.

वाढती भूक ठरतेय पृथ्वीला घातक

‘ग्लोबल वॉर्मिंग’ हे सध्याच्या काळातील अनेक मोठ्या आव्हानांपैकी एक आव्हान आहे. अन्नधान्याचे उत्पादन, उत्पादनानंतरची प्रक्रिया आणि वितरण यांचा समावेश असलेल्या अन्न साखळीचा जगातील एकूण ग्रीन हाउस गॅस उत्सर्जनात २५ टक्के वाटा आहे. त्याच वेळी अन्न उत्पादन हे पृथ्वीवरील नैसर्गिक स्त्रोतांवरच अवलंबून असते. त्यात ५० टक्के राहण्यायोग्य जमिनीचा आणि ७० टक्के शुद्ध पाण्याचा समावेश असतो व त्याच्या वापरातून समुद्राच्या पाण्याचे आणि शुद्ध पाण्याचे मिळून ७८ टक्के प्रदूषण होते. त्यामुळेच अन्न उत्पादन आणि उपभोगाच्या पद्धतीत सुधारणा करण्याची गरज आहे. त्यातून ग्लोबल वॉर्मिंगच्या समस्येवर दीर्घकालीन तोडगा काढण्यास मदत होऊ शकते. कृषी मालाच्या साखळीमध्ये उत्पादनाच्या टप्प्याचा पर्यावरणावर प्रामुख्याने परिणाम होतो, त्यामुळे संशोधन, वादविवाद आणि चर्चेचा भरही खासकरून पुरवठ्याच्या बाजूवर राहिला आहे. मात्र, अन्नाच्या मागणीच्या एकंदर पॅटर्नमध्ये अमूलाग्र बदल घडवून आणणे महत्त्वाचे आहे.

नुकत्याच समोर आलेल्या एका पाहणीनुसार, ऊर्जेचा वापर अधिकाधिक कार्यक्षमतेने कसा करता येईल आणि त्यायोगे हवामान बदलाच्या आव्हानाचा सामना कसा करता येईल, यावर तंत्रज्ञानाद्वारे तोडगा निघू शकतो. मात्र, गेल्या काही दशकांत तंत्रज्ञानाने आणलेले सकारात्मक बदल क्रयशक्ती किंवा उपभोग क्षमतेत झालेल्या (आणि काही प्रमाणात लोकसंख्या) वाढीमुळे पुसून टाकले आहेत. अशा परिस्थितीत सध्याच्या मागणीचे स्वरूप समजून घेतले पाहिजे आणि त्यात पृथ्वीवरील पर्यावरणास पोषक व भविष्यातील शाश्वत विकासाला पूरक असे बदल कसे करता येतील, हे पाहिले पाहिजे.

आपण पर्यावरणीयदृष्ट्या जबाबदार ग्राहक आहोत?

वाढती लोकसंख्या आणि जगभरातील वाढत्या उत्पन्नामुळे अन्नाची गरजही गुणाकार पद्धतीने वाढत आहे. दरडोई उत्पन्नातील वाढीच्या तुलनेत खाद्यपदार्थांवरील एकूण खर्च घटलेला असली तरी उपभोग्य वस्तूंवरील एकूण खर्चात मांस, दुग्धजन्य पदार्थ, तेल आणि चरबीयुक्त पदार्थांचा वाटा वाढला आहे. ह्या सगळ्या खाद्यांन्नाच्या उत्पादनासाठी पाणी, जमीन या स्त्रोतांचा तीव्रतेने वापर केला जातो आणि मोठ्या प्रमाणावर ग्रीन हाउस गॅस वातावरणात सोडला जातो. त्यामुळे पर्यावरणावर होणारा त्याचा एकंदर परिणाम सुद्धा खूप मोठा आहे.

मानवी उपभोग आणि नैसर्गिक स्त्रोतांच्या पुरवठ्यामधील हा संबंध इकॉलॉजिकल फूटप्रिंट पद्धतीमध्ये नोंदला जातो. अलीकडच्या अंदाजानुसार, १९६१ पासून जागतिक पातळीवर इकॉलॉजिकल फूटप्रिंट सरासरी २.१ टक्क्याने वाढत आहे. १९६१ मध्ये ते ७ अब्ज ग्लोबल हेक्टरपुरते मर्यादित होते. २०१४ पासून ते तिपटीने वाढून २०.६ अब्ज ग्लोबल हेक्टरवर गेले आहे. त्यावेळी, म्हणजेच २०१४ मध्ये पृथ्वीची जैविक क्षमता फक्त १२.२ अब्ज जागतिक हेक्टर इतकी होती. याचाच अर्थ, २०१४ मध्ये जगातील संपूर्ण मानवी समुदायाचे इकॉलॉजिकल फूटप्रिंट क्षमतेपेक्षा ६९.६ टक्के अधिक होते.

बेभरवशाच्या कृषी उत्पादनाबरोबरच वाढती लोकसंख्या आणि दरडोई उपभोगामुळे पर्यावरणीय पातळी अवाक्याबाहेर गेली आहे. समृद्धी हा अति उपभोगाला चालना देणारा आणि अंतिमत: पर्यावरणावर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक आहे, असा इशारा शास्त्रज्ञांनी आधीच दिला आहे. पर्यावरणावर परिणाम करणारे हे उपभोगाचे ट्रेंड उच्च उत्पन्न गटातील लोक केवळ ठरवतच नाहीत तर, इतर लोकांच्या उपभोगाच्या बाबतीतील सामाजिक पद्धतींवरही प्रभाव टाकतात. उदाहरणार्थ, प्रत्येक जण इतरांच्या तुलनेत वरचढ होण्याच्या महत्त्वाकांक्षेने झपाटलेला आहे. त्यातून एकंदर उपभोगाची पातळी वाढत आहे.

अन्नाची वाढती मागणी, नैसर्गिक स्त्रोतांचे होणारे नुकसान आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणीयदृष्ट्या शाश्वत उपभोगासाठी काय करता येऊ शकते? केनेशियन अर्थशास्त्रानुसार, मागणी हा घटक उत्पादन व एकूण अर्थव्यवस्थेला चालना देतो. त्यामुळे अन्नाची योग्य निवड ही शाश्वत उत्पादनांच्या मागणीतील वाढीत महत्त्वाची भूमिका बजावू शकते. २०३० पर्यंत सर्वांसाठी सुरक्षित पृथ्वी हवी असेल तर ‘जबाबदार उपभोग’ हाच उपाय आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांमध्ये हे अधोरेखित करण्यात आले आहे. मात्र, शाश्वत उपभोगाकडे लोकांचा कल वाढताना दिसत असला तरी शाश्वत उत्पादनांचा बाजारातील वाटा अद्याप खूपच कमी आहे. त्यामुळेच टिकाऊ उत्पादनांच्या खरेदीकडे ग्राहकांचा अद्याप म्हणावा इतका ओढा नाही. अर्थात, खरेदी कमी आहे म्हणून ग्राहक पर्यावरणीयदृष्ट्या जागरूक नाहीत असा त्याचा अर्थ होत नाही.

ग्राहकांचे हेतू आणि वास्तव

आजच्या जमान्यातले ग्राहक हे अधिक जबाबदार होत आहेत. गरजेनुसार खरेदी करण्याकडे त्याचा कल वाढत असल्याचे दिसते. अन्न उत्पादन पद्धती आणि पर्यावरणीय ऱ्हासाबद्दल ते जागरूक असल्याचे दिसते. मात्र, जेव्हा प्रत्यक्ष खरेदीची वेळ येते त्यावेळी शाश्वत उपभोगाकडे असलेला कल आणि प्रत्यक्षातील वर्तनामध्ये विसंगती दिसते. वर्तनात सातत्य दिसत नाही. याला कल-वर्तन तफावत असे म्हटले जाते. उदाहरणार्थ, अनेक सर्वेक्षणामध्ये असे दिसते की, ३० ते ५० टक्के ग्राहक टिकाऊ उत्पादनांच्या खरेदीला आपले प्राधान्य असल्याचे दाखवतात किंवा सांगतात. मात्र, अशा उत्पादनांच्या विक्रीचा बाजारातील वाटा पाच टक्क्यांहून कमी आहे.

इथेच कल आणि वर्तनामधील अंतर समोर येते. ग्राहकांच्या निर्णय प्रक्रियेवर परिणाम करणारे अनेक घटक यास कारणीभूत आहेत. तर्कसंगतीवर आधारलेल्या पारंपरिक अर्थशास्त्रीय नियमांप्रमाणे मानवी निर्णय प्रक्रिया स्थिर आणि सातत्यपूर्ण नाही. ‘लोक नेहमीच तर्कसंगत विचार करतात किंवा नेहमीच पूर्णपणे स्वार्थी वागतात असे नाही. शिवाय, त्यांच्या आवडीनिवडी काहीही असतील, पण त्या स्थिर असतात,’ असे डॅनियल काहनेमान यांनी ‘थिंकिंग फास्ट अँड स्लो’ या आपल्या पुस्तकात नमूद केले आहे.

मानवी वर्तन हे नेहमीच तर्कसंगत नसते हे खरे, परंतु थोडेसे मार्गदर्शन त्यांना योग्य दिशा दाखवू शकते, असे २०१७ च्या नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आलेले अर्थशास्त्रज्ञ रिचर्ड थेलर यांनी दाखवून दिले आहे. आवडीनिवडीच्या प्राधान्यक्रमावर हे सगळे अवलंबून असते. ग्राहकाच्या वर्तनाचा अंतिम हेतू वस्तूची किंमत, गरज, प्रोत्साहन, ज्ञान, माहिती, उपलब्धता आणि परसिव्हड कन्झ्युमर इफेक्टिव्हनेस (PCE) या घटकातील परस्पर प्रभावातून ठरतो.

पीसीई (PCE) म्हणजे एखादी समस्या सोडवण्यासाठी आपण केलेली कृती किती परिणामकारक आहे याबाबत ग्राहकाला असलेला विश्वास. हा विश्वास जितका जास्त असेल, तितका टिकाऊ उत्पादने खरेदी करण्याबद्दल ग्राहक अधिक सकारात्मक असतो. तसेच, पीसीई जितका कमी असेल, तितका शाश्वत किंवा टिकाऊ उत्पादनांच्या बाबतीत ग्राहक नकारात्मक असतो. शाश्वत उत्पादनांच्या प्रती ग्राहकांच्या प्रतिसादाच्या अभ्यासातून चार प्रकार आढळून आले आहेत.

वृत्तीचा संबंध शाश्वत उत्पादनाच्या वैशिष्ट्यांप्रति असलेल्या पूर्वग्रहाशी असतो, मग ते सकारात्मक असोत वा नकारात्मक. उदाहरणार्थ, किमान ऊर्जावापर. तर, वर्तनाचा संबंध ग्राहक खरोखरच एखादी वस्तू खरेदी करेल का? म्हणजेच, वृत्तीला हेतूची जोड देण्याशी संबंधित असतो.

किमान कल-किमान उद्दिष्ट् आणि उत्तुंग दृष्टिकोन-उदात्त हेतू असलेल्या ग्राहकांच्या वर्तनव्यवहारात सातत्य असते. कारण, त्यांचा दृष्टिकोन आणि हेतू हे शाश्वत उपभोगासाठी पूरक असतात. मात्र, उदात्त हेतू असलेल्या पण कल नसलेल्या आणि प्रचंड कल असलेल्या, पण कुठलाही उद्देश नसलेल्या ग्राहकांमध्ये वृत्ती-वर्तनाचे अंतर दिसते. एकीकडे ग्राहक शाश्वत उत्पादनांच्या उपभोगाबद्दल सकारात्मक असतात, मात्र वस्तू उपलब्ध नसल्यामुळे किंवा किंमत जास्त असल्यामुळे ते ती घेऊ शकत नाहीत किंवा विशेष आकर्षण नसूनही एखादी वस्तू खरेदी करतात.

दुसऱ्या प्रकारातील खरेदी सामाजिक नीतीनियम आणि इतरांच्या मतांना बळी पडण्यातून होते. टिकाऊ वापराकडे कमीतकमी कल असणार्‍या लोकांना शाश्वत उत्पादनांच्या वापरामुळे होणारे फायदे समजावून सांगितल्यास, आरोग्याच्या दृष्टीने होणारे फायदे समजावून सांगितल्यास त्यांच्या वर्तनात बदल होऊ शकतो किंवा टिकाऊ वस्तूंच्या वापराकडे त्यांना वळवता येऊ शकते. त्याचप्रमाणे आधीपासूनच सकारात्मक दृष्टिकोन असलेले ग्राहक टिकाऊ उत्पादनांच्या वापराकडे वळण्याची शक्यता जास्त असते. उत्पादनाच्या उपलब्धतेविषयी माहितीचा अभाव किंवा परिणामकारकतेबद्दलचा अविश्वास हा ग्राहकाची इच्छा असूनही टिकाऊ वस्तूच्या खरेदीतील अडथळा ठरू शकतो. वस्तूची भरमसाठ किंमत हा देखील ग्राहकाच्या खरेदीच्या निर्णयावर परिणाम करणारा प्रमुख घटक आहे.

ह्यावर उपाय हवा असेल तर खाद्यपदार्थांच्या उत्पादन पद्धतीमध्ये मोठा बदल करण्याची गरज आहे. जेणेकरून उत्पादनाच्या अंतिम किंमतीमध्ये सामाजिक व पर्यावरणीय उत्पादन खर्चाचाही समावेश केला जाईल. सामाजिक व पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचा उत्पादन खर्चात अंतर्भाव असल्यामुळे सेंद्रिय, हरित व शाश्वत उत्पादनांची किंमत वाढते. जोपर्यंत याचा विचार उद्योग आणि क्षेत्रांमध्ये केला जाणार नाही, तोपर्यंत शाश्वत उत्पादनांची किंमत तुलनेने जास्त राहील.

चांगल्या निवडींवर प्रभाव टाकताना

पुरवठ्याच्या प्रक्रियेतील हस्तक्षेपाशिवाय उपभोगाच्या अंतिम हेतूवर परिणाम करणारे सामाजिक, वैयक्तिक आणि परिस्थितीजन्य घटक असतात. परंतु हे घटक वेगवेगळ्या गटांमध्ये एकसमान किंवा एकाच गटात एकसारखे नसतात.

शाश्वत उपभोगाच्या संदर्भातील वेगवेगळ्या निर्णयांवर परिणाम करणारे प्रमुख घटक शोधून काढण्यासाठी वर्तनात्मक आणि प्रायोगिक अर्थशास्त्रीय तंत्रांवर आधारित सर्वेक्षणाची मदत होऊ शकते. सामाजिक, वैयक्तिक व परिस्थितीजन्य असे उपभोगाचे प्रकार ओळखून अंतिम निर्णयावर प्रभाव टाकला जाऊ शकतो. शिवाय, उपभोगाच्या पद्धतीमध्ये बदल आणण्यासाठी जनजागृती व लोकशिक्षणापेक्षा प्रोत्साहन देणे अधिक फायदेशीर आहे. कारण, ते कमी खर्चिक असून त्यासाठी बौद्धिक प्रयत्न कमी लागतात.

या माध्यमातून निवडीसाठी पोषक वातावरण निर्माण करून ग्राहकांच्या उपभोगासंबंधी निवडीत सुधारणा घडवून आणणे सोपे जाते. उदाहरणार्थ, उत्पादनांची माडंणी, देखावा किंवा पॅकेजिंग ग्राहकांच्या वागण्यात लक्षणीय बदल आणू शकते. सर्वप्रथम कुंपणावर असलेल्या ग्राहकांनाच लक्ष्य केले पाहिजे. अशा प्रकारच्या यंत्रणेचा वापर राजकीय प्रचार मोहिमांमध्ये मतदारांच्या निर्णयावर प्रभाव टाकण्यासाठी यापूर्वीही करण्यात आला आहे. मग हीच गोष्ट पृथ्वीच्या एकूण भल्यासाठी का करू नये?

उपभोगाच्या पद्धतीत बदल घडवून आणण्यासाठी केलेले एकत्रित प्रयत्न कृषी उत्पादनातील सुधारणांसाठी पूरक ठरतात. पृथ्वी सर्वांसाठी सुरक्षित राहावी असे वाटत असेल तर या दोन्ही गोष्टी जोडीने चालल्या पाहिजेत.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.