Author : Shoba Suri

Published on Sep 20, 2023 Commentaries 0 Hours ago

‘ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशन’ने प्रकाशित केलेले तुमचे दृष्टिकोन अन्न सुरक्षा, हवामान बदल, शाश्वत शेती आणि जमिनीचा वापर यांच्यातील व्यामिश्र दृष्टीवर प्रकाशझोत टाकते. या अविभाज्य नात्याबाबत जागरूकता दिसून येते का?

शाश्वत शेती, हवामान बदल आणि पोषण: एक जटिल आव्हान

अलिकडच्या वर्षांत अन्न असुरक्षितता, हवामानातील परिवर्तनशीलता, शाश्वत कृषी पद्धती आणि जमिनीचा वापर यांच्यातील जटिल आणि परस्परावलंबी संबंध ओळखण्यात मोठी वाढ झाली आहे. या परस्परावलंबी जालाचे पृथ्वी आणि तेथील नागरिकांच्या आरोग्यावर दूरगामी परिणाम होतात. पौष्टिक अन्नाच्या नियमित आणि न्याय्य प्रवेशाची हमी असणारी अन्नसुरक्षा, हवामान बदलाचा परिणाम झाल्याने वाढत्या आव्हानांना तोंड देत आहे. हवामानातील परिवर्तनशीलता आणि अंदाज करता येणार नाही, अशी हवामान पद्धती पारंपरिक कृषी पद्धतींत व्यत्यय आणत आहेत, परिणामी, पीक अपयशी ठरते आणि अन्न असुरक्षितता येते. दुष्काळ आणि पूर यांसारख्या टोकाच्या हवामानासंबंधीच्या घटना- विशेषत: असुरक्षित लोकांच्या समस्या अधिक वाढवतात. दुसरीकडे, हवामानातील परिवर्तनशीलता ही कृषी पद्धती आणि जमिनीच्या वापराशी निगडीत आहे. जंगलतोड, पशुधन संवर्धन आणि कृत्रिम खतांचा वापर यांसारख्या कृषी पद्धती विषारी वायूंच्या उत्सर्जनास कारणीभूत ठरतात, ज्यामुळे जागतिक तापमानवाढ होते आणि हवामानाच्या पद्धतींत आणखी व्यत्यय येतो, त्यामुळे अन्न उत्पादनाला धोका निर्माण करणारे दुष्टचक्र निर्माण होते. या आव्हानाचे समाधान शाश्वत शेतीत आहे, जे पर्यावरणाचा ऱ्हास कमी करताना, कृषी उत्पादकता टिकवून ठेवणाऱ्या किंवा सुधारणाऱ्या पद्धतींवर लक्ष केंद्रित करते. शाश्वत शेतीच्या सामान्य तत्त्वांमध्ये एकाच जमिनीवर क्रमश: वेगवेगळी पिके घेणे, सेंद्रिय शेतीकडे वळणे आणि कीटकनाशकांचा कमी वापर यांचा समावेश होतो. या समीकरणात जमिनीचा वापर हा देखील महत्त्वाचा घटक आहे, कारण कृषी विस्तारामुळे वातावरणात कार्बन सोडला जातो, ज्यामुळे हवामान बदलात आणखी वाढ होते. दुसरीकडे, पुनरुत्पादन आणि कृषी वनीकरण तसेच जमीन संवर्धन यांसारख्या पद्धती वातावरणातील कार्बन डायऑक्साइड शोषून साठवण्याची प्रक्रिया करू शकतात आणि मातीचे आरोग्य सुधारू शकतात. अशा प्रकारे कृषी आणि हवामान बदल कमी करण्यास हातभार लावतात. या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सर्वसमावेशक दृष्टिकोनाची गरज अधिकाधिक स्पष्ट होत आहे. पॅरिस करार आणि शाश्वत विकास उद्दिष्टे यांसारखे आंतरराष्ट्रीय करार, पृथ्वी आणि तेथील रहिवाशांसाठी सुरक्षित व शाश्वत भविष्य निर्माण करण्यासाठी या समस्या एकत्रितपणे सोडविण्याच्या गरजेवर भर देतात.

ज्या विषयासंबंधित सर्व शक्यतांचा विचार करण्याचा प्रयत्न तुम्ही केलेला आहे, त्यात जागतिक आणि स्थानिक दोन्ही प्रासंगिकता आहे. विकसनशील देशांमधील समुदायांमध्ये शेती अधिक शाश्वत आणि लवचिक कशी बनवता येईल?

विकसनशील देशांमधील शेतीला हवामान बदल, संसाधनांची मर्यादा आणि अन्न असुरक्षितता यांसारख्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. या समस्यांचे निराकरण करण्यासाठी, प्रत्येक समुदायाच्या विशिष्ट गरजा आणि परिस्थितीनुसार तयार केलेल्या धोरणांचे संयोजन, शेतीला अधिक शाश्वत आणि लवचिक बनवण्यासाठी वापरले जाऊ शकते. उदाहरणे– पिकांची विविधता वाढवणे आणि पशुधन व मत्स्यपालन यांचा समावेश असलेल्या मिश्र शेती प्रणालीत चक्रीय मार्गाद्वारे पोषक द्रव्यांच्या पुनर्वापरात विविधता आणणे आणि लवचिकता सुधारणे; मातीचे आरोग्य आणि संवर्धन सुधारण्यासाठी कार्यक्षम सिंचन प्रणालींमध्ये गुंतवणूक करणे; सेंद्रिय शेती पद्धतींना प्रोत्साहन देणे; हवामान-प्रतिरोधक पिके आणि तृणधान्यांसारख्या दुष्काळ-प्रतिरोधक बियाण्यांची लागवड करणे; शेतकऱ्यांना त्यांचे उत्पादन वाजवी दरात विकता यावे यासाठी बाजारातील दुवे आणि मूल्य साखळी मजबूत करणे; आणि शाश्वत पद्धतींत गुंतवणूक करण्याकरता शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी कमी उत्पन्न असलेल्या व्यक्तींना अथवा गटांना बँकिंग सेवा संधी उपलब्ध करून देणे. अखेरीस, धोरण समर्थन जे शाश्वत शेतीवर जोर देते आणि शाश्वत पद्धतींसाठी प्रोत्साहन देते.

जी-२० गटाचे भारताला मिळालेले अध्यक्षपद ही एक विलक्षण संधी आहे आणि तुम्ही शोधलेला विषय हा धोरणात्मक चर्चेचा भाग आहे. जागतिक दृष्टिकोनातून तुम्हांला कोणत्या ठोस शक्यता दिसतात?

जी-२० गटाचे अध्यक्षपद भूषविण्याची भारताला मिळालेली संधी शाश्वत अन्न प्रणाली, हवामान बदल आणि अन्नाची मागणी यांच्याशी संबंधित जागतिक आव्हानांना तोंड देण्याची अनोखी संधी देते. अधिक शाश्वत, लवचिक आणि न्याय्य जागतिक अन्न प्रणाली तयार करण्याकरता आंतरराष्ट्रीय सहकार्य, ज्ञानाची देवाणघेवाण, संवादातून वाटाघाटी व मध्यस्थी करण्याची प्रक्रिया आणि संसाधनांची जमवाजमव यांचा यांत समावेश आहे. पृथ्वीचे रक्षण करताना वाढत्या जागतिक लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कृषीच्या भविष्याला आकार देण्याकरता जी-२० महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते. हवामान बदलासाठी लवचिक असलेल्या कृषी पद्धती आणि तंत्रज्ञानाचा जगभरात अवलंब करता येऊ शकतो. बदलत्या हवामानाच्या कलाशी जुळवून घेण्याकरता आणि कृषी-संबंधित विषारी वायूंचे उत्सर्जन कमी करण्यात देशांना मदत करण्याकरता जी-२० देश सर्वोत्तम पद्धतींचे आणि तांत्रिक सहाय्याचे परस्परांना आदानप्रदान करू शकतात. जी-२० देश त्यांची संसाधने व कौशल्ये एकत्रित करून कृषी संशोधन आणि नाविन्यपूर्ण क्षेत्रात आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन देऊ शकतात. एकत्र काम करून, देश शाश्वत पिकांच्या जाती, कीड-प्रतिरोधक पिके आणि अचूक शेती तंत्रज्ञानाच्या विकासाला गती देऊ शकतात. भारतासह जी-२० देश जागतिक अन्न सुरक्षा मुद्द्यांवर एकत्र काम करू शकतात. अन्न वितरण प्रणाली सुधारण्यासाठी आणि अन्नाचे नुकसान व अपव्यय कमी करण्यासाठी प्रयत्नांचा समन्वय साधणे, तसेच शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणे या बाबी जगभरातील असुरक्षित लोकसंख्येकरता अधिक अन्न सुरक्षित करण्यात मदत करू शकतात. गरिबी दूर करण्यासाठी आणि शाश्वत शेती पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी पायाभूत सुविधांची गुंतवणूक, क्षमता विकास आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य यांवर लक्ष केंद्रित करून विकसनशील देशांमधील कृषी आणि ग्रामीण विकास गुंतवणुकीचा जी-२०द्वारे अन्न प्रणालीसाठी एक शाश्वत प्रशासकीय व्यासपीठ म्हणून उपयोग केला जाऊ शकतो. हे व्यासपीठ शाश्वत शेतीसाठी सामायिक उद्दिष्टे आणि मानक स्थापित करण्यासाठी राष्ट्रांमधील संवाद आणि करार सुलभ करू शकते.

हा लेख मूलतः दि ग्लोबल आय’मध्ये प्रकाशित झाला आहे.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.