Author : Nadine Bader

Published on Oct 13, 2020 Commentaries 0 Hours ago

गोंगाट हा आपल्या सार्वजनिक आयुष्याचा मुख्य भाग झालेला आहे. हा गोंगाट फक्त ध्वनी प्रदूषणाशी संबंधित नाही तर विचार प्रदूषणाशीही संबंधित आहे.

आपल्याला गोंगाटाचे व्यसन लागलेय का?

माणसाला अनेक प्रकारची व्यसने असतात. माणूस ती का करतो? तर त्याला त्यातून किक मिळते. हि किक त्याच्या बुद्धीच्या सारासार विवेकशक्तीला काही काळ बधीर करते. पण, त्या नशेच्या झोकात माणूस त्याकडे दुर्लक्ष करतो. कुठलेही व्यसन कधीच चांगले नसते. आजारच तो. तसे असणे त्या माणसाला आवडत असेल, पण बाकी समाजासाठी ते वाईट असते. धोकादायकही ठरू शकते. पण जर समाजालाच एखादे व्यसन लागले तर? आज स्थिती अशी आहे की, आपल्या सगळ्यांनाच गोंगाटाचे व्यसन लागलेय की काय, असा प्रश्न पडावा.

माझ्या मनात हा विचार आयपीएलच्या सध्या सुरू असलेल्या मॅचेस बघताना आला. कोरोनाच्या काळात दुबईत सुरू असलेल्या मॅचेस स्टेडियममधल्या प्रेक्षकांशिवाय सुरू आहेत. पण, आपल्या घरात टेलिव्हिजन स्क्रीनवर बघताना किंवा मोबाईलच्या स्क्रीनवर बघताना लोकांना स्टेडियममध्ये प्रेक्षक बसलेलेच आहेत की काय, असा भास होतोय. याचे कारण या मॅचच्या प्रक्षेपणावेळी ऐकू येणारा गोंगाट. रिकाम्या स्टेडियममध्ये लोक बसलेलेच आहेत आणि त्यांचा एरव्ही मॅच सुरू असताना जो आरडाओरडा ऐकू येतो तो तसाच गोंगाट आताही सुरू आहे असा भास आपल्याला होतो.

प्रत्येक बॉल नंतर आवाज येतो, फोर-सिक्स मारल्यावर तो वाढतो, विकेट गेल्यावर तो वाढतो. गदारोळ कमी होत नाही. अगदी लोक हातात पिपाणी घेऊन वाजवत आहेत असाही आवाज आपण ऐकतो. लोक तिथे नसताना! आपल्यावर स्टेडियममध्ये प्रत्यक्ष नसलेला पण रेकॉर्डिंगच्या माध्यमातून काढलेला आवाज फेकला जातो. का? कारण आपल्याला आपलं मॅच बघणे ‘नॉर्मल’ वाटावे म्हणून!

तुम्हाला व्यसनमुक्ती करताना सुरुवातीला काय करतात ठाऊक आहे? त्या व्यक्तीला असे काहीतरी करायला लावतात, जेणेकरून एकतर त्याला ते व्यसन आठवणार नाही किंवा त्याला आपण ते व्यसन करतच आहोत असे वाटावे. पण, हे व्यसनमुक्तीवेळी करतात! इथे गोंगाटाची ‘सवय’ सुटू नये म्हणून रेकॉर्डिंगचा मारा करतात!! का? कारण त्या तिथे प्रक्षेपण करणाऱ्या मंडळींना ठाऊक आहे की, हा गोंगाट त्यांच्या व्यवसायासाठी गरजेचा आहे!

आयपीएलचा बिझनेस हा स्टेडियमच्या उत्पन्नात नाही. तो जाहिरातींमध्ये आहे. पडद्याआड असलेल्या शेकडो कोटींच्या उलाढालीत आहे. हा बिझनेस तुम्ही आम्ही किती काळ स्क्रीनशी चिकटलेले राहणार, यावर अवलंबून आहे. या चिकटून राहण्यासाठी, त्याच्या मागे असलेल्या अब्जावधींच्या बिझनेसाठी स्टेडियमचा गोंगाट आवश्यक आहे.

माणसाला पाच ज्ञानेंद्रिये. डोळे, नाक, कान, जीभ आणि त्वचा! टीव्ही बघताना आपला डोळे आणि कानांचा संबंध येतो. या ज्ञानेंद्रियांना टार्गेट करणे टिव्हीचे काम. डोळ्यांना सतत आपल्यासमोर हलते चित्र राहणे आणि कानांना विशिष्ट प्रकारचा उत्तेजक आवाज सतत ऐकू येणे हवे असते. आपल्या संवेदना यातून उद्दीपित होतात. एखादी विशिष्ट कृती करताना, त्यासंबंधीचे विशिष्ट वातावरण असावे लागते. मॅच बघताना आवाज येणे, चित्र सतत हलत राहणे हे त्या वातावरण निर्मितीचा भाग आहेत. या वातावरण निर्मितीतून आपल्या संवेदना जागृत होतात. कालांतराने त्याची सवय होते.

हे वातावरण नसले की, सपक वाटू लागते. गोंगाट नसेल तर, आपल्याला आयपीएल सपक वाटेल. फार काळ म्युटवर टाकून आयपीएल बघता येणार नाही. कारण त्याची आयपीएलचा चसका लागलेल्यांना सवय नाही. सवय हळूहळू व्यसन बनते. तो गोंगाट खोटा आहे, हे ठाऊक असतानाही तो हवा आहे. हा सवयीचा गुलाम बनल्याचा पुरावा आहे! आयपीएलचा गोंगाट हे आपले आयपीएल बघतानाचे व्यसन आहे.

याची आणखी एक बाजू आहे.

गावाखेड्यांमध्ये पारधीला (शिकारीला) जाताना लोक ढोल, ताशे घेऊन जातात. का? जुन्या काळी राजे रजवाडे शिकारीसाठी जाताना आपला नौबतखाना नेत. का? तर जंगलात वाद्यांचा जोराचा आवाज सुरू झाला की, प्राणी घाबरून, बिथरून बाहेर पडत. शिकार करणे सोपे जाते. आयपीएलच्या चालकांना प्रेक्षकांना आनंद देण्याच्या नावाखाली आपल्याकडे खेचून आणायचे आहे आणि गुंतून ठेवायचे आहे. अशावेळी प्रेक्षकांसाठी जे जे उत्तेजक आहे ते टीव्हीवर असणे गरजेचे आहे. आवाज हा त्या उत्तेजनाचाच एक भाग आहे.

एकप्रकारे गोंगाट कायम ठेवून प्रेक्षकांची शिकार करण्याचा हा प्रकार आहे. आजच्या ‘अटेन्शन सिकिंग’ तीव्र स्पर्धेत वापरावी लागणारी ही क्लृप्ती आहे. गोंगाट ही जंगलात शिकारीची आणि टीव्हीवर आयपीएलची गरज आहे! फरक इतकाच की जंगलात प्राण्यांना बिथरवले जाते आणि इथे प्रेक्षकांना उत्तेजित केले जाते. इतके, की त्याचे व्यसन लागावे!

यातला अधिक गंभीर, अधिक काळजीचा मुद्दा हा की, गोंगाट हे आपले व्यसन आता केवळ आयपीएलपुरतेच उरलेले नाही. हो. आयपीएलपुरतेच असते तर त्याकडे काही प्रमाणात दुर्लक्ष करता आले असते. पण, गोंगाट हा आपल्या सार्वजनिक आयुष्याचा मुख्य भाग झालेला आहे. हा गोंगाट फक्त ध्वनी प्रदूषणाशी संबंधित नाही तर विचार प्रदूषणाशीही संबंधित आहे.

या परिस्थितीची सुरुवात होऊन साधारण एक दशक लोटले. आपल्या अवतीभोवती सतत वेगवान, नाट्यमय आणि चटकदार घटना घडत राहतात. आपल्याला त्या समजतात टीव्ही आणि पेपर आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून. या घटना इथला मीडिया एकाच वेळी कॅपचर पण करतो आणि अम्प्लिफाय पण करतो. म्हणजे त्या घटना तो दाखवतो पण आणि वाढवतो पण. प्रत्येक घटनेसोबत एक गोंधळ सदृश स्थिती तयार होते. त्या घटनेवर असलेल्या आणि नसलेल्या सगळ्या अँगल्समधून क्रिया आणि प्रतिक्रियांचा भडिमार होतो.

घटना बघणा-या सगळ्यांच्या अंगावर एकाचवेळी अनेक गोष्टी त्या घटनेच्या निमित्ताने येऊन आदळत असतात. हळूहळू मूळ घटना काय हे बाजूलाच पडतं आणि उपघटनांच्या गदारोळात आपण हरवून जातो. गोंगाट वाढतो. मती गुंग होते. आपण बधीर होतो. यातून सावरतोय न सावरतोय तर पाठोपाठ दुसरी घटना घडते. परत हेच चक्र सुरू राहतं. आपलं बधिर असणं जणू काही आपली गरजच आहे असं आपल्याला वाटत राहतं.

बघा. मागच्या दहा बारा वर्षांतल्या आपल्या अंगावर येऊन आदळलेल्या घटना बघा. आरुषी हत्याकांड, आयपीएलचा तथाकथित घोटाळा, आण्णा आंदोलन, 2जीचा सीबीआय कोर्टाने अमान्य केलेला घोटाळा, २०१४ चा प्रचार, दादरी-अखलाक हत्याकांड, रोहिथ वेमुला आणि जेएनयू वाद, विचारवंतावर झालेले शारीरिक आणि शाब्दिक हल्ले, नोटबंदी, पुलवामा आणि त्यानंतरच्या उच्चरवातल्या प्रतिक्रिया, कलम ३७०, CAA आंदोलन ते अगदी सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरण. या सगळ्यात एक समान धागा आहे.

प्रत्येक वेळी लोकांच्या टीव्हीवर आणि मोबाईल्सवर योग्य आणि अयोग्य, खरी आणि खोटी, सभ्य आणि निंदानालस्ती करणारी इतकी माहिती येत होती की प्रत्यक्षात त्या विषयाचे नेमके स्वरूप, भान, आकलनच झाले नाही आणि आपण प्रत्येक वेळी जे नाही त्यावर फक्त त्याच्या वेगवान, चित्तथरारक प्रचाराच्या आधारावर विश्वास ठेवला. किंवा, प्रचंड गदारोळातून परिस्थितीच अशी तयार केली गेली की आपल्याला त्यावर विश्वास ठेवणं भाग पडले, पाडलं गेले. आपली सारासार विचारशक्ती कुंठित करून टाकणारा हा कुठल्याही घटनेच्या उपकथानकांचा भडिमार म्हणजे एकप्रकारे सामाजिक गोंगाटाच आहे! आणि आता या इतक्या एकामागोमाग एक समाज ढवळून काढणा-या घटना पाहिल्यावर आपल्यालाही या गोंगाटाची सवय झालेली आहे.

अगदी आत्ताचे हाथरस प्रकरण घ्या. त्या मुलीवर बलात्कार झाला असे अलिगढ मेडिकल युनिव्हर्सिटीने रिपोर्टमध्ये सांगितले. त्या मुलीचा ऑक्सिजन लावल्यानंतरचा व्हिडीओ आहे. त्यात ती स्वतः आपल्यावर कशी जबरदस्ती झाली आणि नंतर मारहाण झाली हे सांगत आहे. तरीही तिच्यावर बलात्कार झाला नाही आणि तिला मारहाणही झाली नाही असे अनेकांनी ट्विटर ते टीव्ही ते फेसबुक ते पेपरच्या माध्यमातून सांगितले. वरती, तिच्याच घरच्यांनी तिला मारले असेही काही जण म्हणाले. ती मुलगी आरोपींपैकी एकाच्या संपर्कात होती आणि मग अश्या संपर्कातील व्यक्तीकडून कसा बलात्कार होईल असाही उफराटा, असंवेदनशील प्रश्न काहींनी विचारला.

ज्यांनी याबद्दल आंदोलन केलं त्यांना पाकिस्तानमधून फंडिंग होत आहे अशाही बातम्या दाखवल्या गेल्या. ज्या रिपोर्टरने त्या मुलीच्या मृतदेहावर रात्रीच्या अंधारात उत्तर प्रदेश पोलिस अंत्यसंस्कार करत होते हे दाखवले तिचा फोन टॅपिंगला टाकला गेला. या सगळ्यात मूळ मुद्दा काय? तर एका मुलीवर बलात्कार झालाय, तिचा मेडिकल रिपोर्टही तेच सांगतो आणि ती स्वतः मृत्यूपूर्वी एका व्हिडिओत तेच सांगते. यातून योग्य ती कारवाई व्हायला हवी होती. ती संवेदनशीलता होती. पण ते राहिले बाजूला आणि पाकिस्तानच्या फंडिंगपासून पत्रकारांच्या फोन टॅपिंगपर्यंत उपघटना घडल्या. गोंधळ उडाला. गदारोळ झाला. बधिरतेची सवय झालेल्या आपल्या मनाने आणि इंद्रियांनी आणखी एक गोंधळ अनुभवला.

आता असा गोंधळ लोकांना हवा असतो की नाही ठाऊक नाही. पण तो उडाल्यानंतर, गोंगाट वाढल्यानंतर त्यात मूळ मुद्दा सोडून, इतर सर्व चर्चा करणारे आपण सगळेच जण तो गोंगाट आणखीनच वाढवत असतो हे मात्र खरे आहे. या अश्या घटना आणि त्यांचा असा हा गोंगाट सतत होत असताना आपल्या बोलण्यात, सोशल मीडियावर व्यक्त होण्यात, घरातल्या चर्चेत आपणही हे परिघावरच्या मुद्द्यांचेच दळण दळत असतो. मग एकप्रकारे आपल्यालाही ह्या गोंगाटात एक मानसिक समाधान लाभत असावे का जसे एखाद्या व्यसनी व्यक्तीला व्यसन केल्यावर लाभते? हा असा गोंगाट ही आपल्या सामाजिक बधीरपणाची गरज झालीय का?

एक बाब आपण यात सुक्ष्मतेने बघू गेलो तर लक्षात येईल की, हा जो गोंगाट उडतो तो विशिष्ट अस्मितांभोवती फिरतो. कुठल्याही घटनेत काही गोष्टी बघितल्या जातात. घटनेशी संबंधित आपल्याला सोयीस्कर लोकांना मध्यवर्ती ठेवून मग त्या व्यक्ती बरोबर असोत किंवा चुकीच्या, या काही गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. जशा की जात, पोटजात, धर्म, प्रांत आणि विचारधारा. म्हणजे जर घटना हिंदू दलित आणि हिंदू सवर्ण यांच्यामधली असेल तर गोंगाट करताना जाणीवपूर्वक हे विभाजन वाढवले जाते. हिंदूधर्मीय सोडून इतर कुणी असेल आणि विशेषतः मुस्लिम तर गोंगाटाचे लक्ष्य हिंदू विरुद्ध मुस्लिम करणे असते. सुशांतसिंग राजपूत प्रकरणात बिहारी छोकरा, राजपूत युवा इथपासून ते मुंबई म्हणजे पीओके इथपर्यंत गोंगाट वाढवला गेला. हे सगळं जाणीवपूर्वक सुरू असते. माणसांच्या अस्मितांना शक्य होईल तितकी टोकदार, अणूकुचीदार धार काढणे हे या गोंगाटाचे मुख्य उद्दिष्ट असते.

अस्मिता प्रत्येकाला असते. काहींना जातींची, काहीना धर्माची, काहींना प्रांताची, भाषेची वगैरे वगैरे. या अशा गोंगाटात आपली लखलखीत धारेदार अस्मिता बघून आपल्यालाच एक नशा होत असावी. बेभानता येत असावी. जशी दारुड्याला दारू प्याल्यावर येते. अस्मितांची नशा ही सर्वोच्च नशा आहे. जर अवघ्या समाजालाच नशा झाली असेल तर मग असा गोंगाट, गदारोळ हवाहवासा वाटतो. अशावेळी मग आपण न्याय, माणुसकी आणि सभ्यता यांच्या मर्यादा पार केलेल्या आहेत याचे भान राहत नाही. हे असे भान राहू न देणे, हेच या गोंगाटाचे वैशिष्ट्य आहे.

जे प्रत्यक्षात घडत नाही, तेही नुसत्या आवाजाची चिटिंग करून घडतेय असे आयपीएलमध्ये दाखवले जाते. तेव्हाही आपल्याला गुंतून ठेवणे आणि सत्याचं भान न येऊ देणे हे उद्दिष्ट असते. शिकारीवेळी मोठमोठ्याने केलेला आवाज हा ज्याची शिकार करायची आहे, त्याला गोंधळवून टाकणे, बिथरवणे हे असते. तसेच या वेगवेगळ्या घटनांवेळी सामाजिक चर्चेचा स्वर टिपेला नेऊन ठेवताना लोकांना अस्मितांच्या राजकारणातून बिथरवणे, खोट्या ख-या माहितीचा मारा करून गुंतून ठेवणे हे असते.

आपली आताची स्थिती ही लोकांनाच या अश्या गोंगाटाची आवड निर्माण झाल्याची आहे. आपल्याला गोंगाटाचे, गदारोळाचे, कर्कशपणाचे, असंमजसतेचे हे असे व्यसन लागलेले आहे.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.