Published on Sep 24, 2020 Commentaries 0 Hours ago

'जीआयएस'चा सुयोग्य वापर करुन शहरांचे नियोजन, व्यवस्थापन, विविध प्रश्नांचे निराकरण होऊ शकते, हे कोरोनाकाळात अधोरेखित झाले आहे.

कोविड संकटात ‘जीआयएस’चे वरदान

भारतातील स्मार्ट सिटी कॉर्पोरेशन्स कंपन्यांनी शहराचा विकास करताना भौगोलिक माहिती प्रणालीकडे (जीआयएस) दुर्लक्ष केले. पण सध्या देशभर पसरलेल्या कोविड-१९ विषाणूचा पाठलाग करताना हेच ‘जीआयएस’ शहरांच्या तंत्रज्ञानाचा कणा असल्याचे सिद्ध झाले आहे. कोविडमुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीला तोंड देताना योग्य माहितीसाठीचे व्यासपीठ म्हणून ‘जीआयएस’ उपयोगी ठरत आहे.

‘जीआयएस’ तंत्रज्ञानाचा वापर करून भारतातील शहरांमधील बफर झोनचे नियंत्रण करण्यात येते. तेथील उष्णतेच्या मापनासाठी आणि भविष्यात उद्धभवणाऱ्या परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठीही ‘जीआयएस’चा वापर करुनच मार्गदर्शक तत्वे निश्चित केली जात आहेत. सामान्यत: स्मार्टसिटी कॉर्पोरेशनकडे इंटरनेटवर निर्धारित सर्व अद्ययावत गोष्टी असतात. जसे की, आयसीटी-सक्षम आरोग्य रेकॉर्ड, इंटेलिजेंट ट्रान्सपोर्ट सिस्टम इत्यादी. या सुविधांच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना दिल्या जात असलेल्या सार्वजनिक आरोग्य, ट्राफिक व्यवस्थापन आणि प्रशासनाशी संबंधित गोष्टी सक्षम केल्या जातात.

‘जीआयएस’ तंत्रज्ञानाने स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनला रिअल टाइम डेटा अॅनालिटिक्स, दूरस्थ मालमत्तेचे परीक्षण, निर्णय क्षमता किंवा सादरीकरण इत्यादी महत्वपूर्ण घटकांमध्ये मदत केली. ‘जीआयएस’ डॅशबोर्डच्या रुपात स्मार्टसिटी कॉर्पोरेशनने व्हिज्युअलायझेशन आणि संदर्भित डेटासाठीचे वातावरण विकसीत करण्याचे काम केले. या डॅशबोर्डच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना सक्रिय कोरोना रुग्णांचे मॅपिंग, होम क्वारंटाइन नागरिकांचे वय आणि क्षेत्रनिहाय विश्लेषण करण्यास मदत मिळाली. यासोबतच रिअल टाइम माहिती अपडेट करुन मॅपिंग करण्याच्या कामांचा समन्वय यातून साधता आला.

‘जीआयएस’चे काम सामान्यत: विश्लेषण आणि व्हिज्युअलायझेशनवर आधारित असते. यातील डॅशबोर्डवर मॅपमध्ये ‘फिल्ड डेटा’चा समावेश असतो. अशाप्रकारे, ‘जीआयएस’ प्रणालीने स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनला कोविड-१९ विरोधातील लढ्यासाठी तंत्रज्ञान आणि संस्थात्मक समन्वय ठेवण्यात महत्वपूर्ण मदत केली.

‘जीआयएस’ तंत्रज्ञानाचा उपयोग कंटेन्मेट, क्वारंटाईन व्यवस्थापन आणि अत्यावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यातील समन्वय म्हणून होत आहे. जवळपास सर्व स्मार्ट सिटी कॉर्पोरेशन्सकडून ‘जीआयएस’ डॅशबोर्डने समृद्ध असलेली कोविड-१९ ‘वॉर रुम’ तयार केलेली आहे. ‘जीआयएस’ डॅशबोर्डच्या माध्यमातून हॉटस्पॉट्स, सक्रिय रुग्ण, बरे झालेले रुग्ण आणि इतर उपयुक्त माहितीचा मागोवा घेता येतो. ‘जीआयएस’ डॅशबोर्ड आणि अॅप्सच्या एकत्रीकरणामुळे नागरिक आणि प्रशासनाला लोकसंख्याशास्त्रीय (डेमोग्राफिक) रुग्णांची माहिती मिळवण्यास मदत झाली.

आग्रा शहराने दैनंदिन पातळीवर माहिती अपडेट करत ‘आयजीआयएस’ व्यासपीठाच्या माध्यमातून डॅशबोर्ड विकसीत केला आहे. यात ‘जीआयएस’चे स्वदेशी तंत्रज्ञान, इमेज प्रोसेसिंग, छायाचित्रण आणि कॅड (सीएडी) यांच्या एकत्रीकरणातून वास्तविक माहिती (रिअल टाइम डेटा) ‘जीआयएस’ डॅशबोर्डमध्ये संयुक्त करण्यात आली.

पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनने विकसीत केलेले ‘हेल्थ केअर’ डॅशबोर्ड ‘जीआयएस’ तंत्रज्ञानाच्या आधारानाचे तयार करण्यात आले आहे. यातून प्रशासनाला होम क्वारंटाइन, कंटेन्मेंट विभाग आणि इत्यादी सविस्तर माहिती उपलब्ध झाली. याच माहितीच्या जोरावर आरोग्य विभागाने घरोघरी जाऊन मोहीम राबवणे आणि रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांपर्यंत पोहण्यासाठी विशेष टास्क फोर्सच्या निर्मितीसाठी वापरली. व्हायरसच्या पुढील प्रसाराला आळा घालण्यासाठी भौगोलिक माहितीचा आधार घेऊन रुग्णसंख्या कुठे वाढू शकते हे ठरविण्यात ‘जीआयएस’ मदत करते. याच माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना निरोगी ठेवता येऊ शकते.

बंगळुरूनेही कोविड-१९ रुग्णांच्या माहितीसाठी ‘जीआयएस’ डेटाचा वापर केला. एप्रिलपासून दैनंदिन पातळीवर नवीन रुग्णसंख्येची माहिती प्रकाशीत करणारी ही पहिली भारतीय स्मार्ट कॉर्पोरेशन कंपनी ठरली आहे. ‘जीआयएस’ डॅशबोर्ड आणि ‘सिटी सर्व्हिलंस’ डॅशबोर्ड दोघांचीही संपूर्ण शहरात पोहोच आहे. लोकसंख्या, भौगोलिक परिस्थिती, जमीन इत्यादी. मापदंडांचा वापर करुन ‘जीआएस मॅप्स’ तयार केले गेले. यात संपूर्ण माहितीचे एकत्रीकरण करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे, ‘जीआयएस’ तंत्रज्ञानाचा वापर सॅनिटायझेशनच्या प्रकियेत देखील केला गेला. याशिवाय सॅनिटायझर फवारणीची इत्यंभूत माहिती देखील यातून घेता आली. यातून ज्या भागात अद्याप सॅनिटायझेशन झालेले नाही याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात मदत झाली. आपला विभाग सॅनिटाइझ झालाय की नाही याची माहिती नागरिक आणि प्रशासनाला मिळण्यासाठी अॅप्सच्या माध्यमातून संपूर्ण डेटा ‘जीआयएस मॅप्स’मध्ये अपडेट करण्यात आला. ‘राउरकेला स्मार्ट सिटी कॉर्पोरेशन’ने तर कंटेन्मेंट झोनमध्ये अनावश्यक मानवी हालचाली टाळण्यासाठी आणि सॅनिटायझरच्या फवारणीसाठी ड्रोनच्या तंत्रज्ञानाचा वापर केला. यात ड्रोन टीमने शहरातील इमारती आणि भूप्रदेशाचे सर्वेक्षण करण्यासाठी ‘जीआयएस मॅप्स’चाच वापर केला. याशिवाय, सूरत, तिरुपूर, सालेम, पाटणा या स्मार्ट सिटी कॉर्पोरेशननेही सॅनिटायझेशनसाठी ‘जीआयएस’चाच आधार घेतला आहे.

लॉकडाऊन दरम्यान जीवनावश्यक वस्तूंचा अखंड पुरवठा सुरू ठेवणे हे एक मोठे आव्हान होते. स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनने ‘जीआयएस’चा वापर करुन औषधे, किराणा आणि शिजवलेल्या अन्नाची वितरण व्यवस्था केली. ‘जीआयएस’ आधारित देखरेखीमुळे शहरातील कानाकोपऱ्यातील अत्यावश्यक वस्तूंच्या विक्रेत्यांच्या ठिकाणांची मॅपद्वारे माहिती मिळवणे शक्य झाले. आग्रा स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनने तर एक वेब पोर्टल विकसित केले ज्यायोगे नागरिकांना दैनंदीन वस्तू विकत घेण्यासाठी जवळच्या विक्रेत्याचे ठिकाण आणि त्याचा संपर्क क्रमांक मिळवता येऊ लागला. ‘जीआयएस प्रॉपर्टी सर्व्ह’मध्ये यापूर्वीच हा तपशील गोळा केला गेला होता. त्यामुळे या प्रणालीच्या निर्मितीसाठी कमीत कमी वेळ लागला.

रायपूर स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनने शहरात कुणीही उपाशी पोटी झोपणार नाही या उद्देशाने गरजू व शहरी गरीब लोकांना अन्न पुरवण्यासाठी ‘जीआयएस’ तंत्रज्ञानाने समृद्ध ‘वॉर रुम’, हेल्पलाइन आणि वितरण केंद्रांची स्थापना केली. वितरण केंद्रे ‘जीआयएस मॅप’चा वापर करुन डिजिटल पद्धतीने एकमेकांशी जोडली गेली आणि याची संपूर्ण माहिती एका अॅपमध्ये उपलब्ध करुन देता आली. चेन्नई आणि भुवनेश्वरमध्ये ‘जीआयएस’च्या सहाय्याने केलेल्या स्थानिक विश्लेषणामुळे औषधांच्या घरपोच सेवेला मदत झाली. ‘जीआयएस’ यंत्रणेद्वारे डिलिव्हरी सिस्टमची पोहोच नसलेली ठिकाणे शोधून काढण्यात आली. त्याची माहिती संबंधित झोन अधिकाऱ्यांना देऊन तक्रारींचे निवारण करता आले.

‘जीआयएस’शी संबंधित साधनांचा सुयोग्य वापर करुन दैनंदिन नियोजन, व्यवस्थापन ,शहर पातळीवरील प्रश्नांचे निराकरण आणि प्रशासनात उपयोग केला जाऊ शकतो हे वरील सर्व उदाहरणांवरुन अधोरेखित होते.  ‘जीआयएस’च्या नेटवर्क अॅनालिसीस यासारख्या अॅप्लिकेशनद्वारे शहर स्वच्छतेची योजना तयार करणे, पाणी व सांडपाण्याचे नियोजन करण्यासाठी केला जाऊ शकतो. ‘जीआयएस’वर आधारित रिअल टाइम लोकेशनच्या विश्लेषणातून ट्राफिक व्यवस्थापन यंत्रणेला ट्राफिक टाळण्यासाठी मदत होऊ शकते. याशिवाय जीवनावश्यक वस्तू आणि सेवांच्या पुरवठा साखळीचे व्यवस्थापन आणि स्थानिक उद्योजकांना यातून मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध करुन देता येऊ शकतात.

शहराच्या माहितीपूर्ण मॅप्सच्या मदतीने आणि प्रशासकीय वेब पोर्टलच्या एकत्रीकरणातून लोकांचा सहभाग व संवाद वाढवता येऊ शकेल. कोविड १९ महामारीने शहर नियोजनातील अनेक गैरसोयींचा पर्दाफाश केला, पण यामुळे होणाऱ्या नुकसानावर ‘जीआयएस’ यंत्रणेमुळे कसे नियंत्रण मिळवता येऊ शकते याकडेही सर्वांचे लक्ष वेधले गेले.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.