Published on Jun 15, 2020 Commentaries 0 Hours ago

कोरोनामुळे जीवाला असलेला धोका, त्यात लॉकडाऊनचा फटका आणि त्यावर आता ‘निसर्ग’ वादळाचा तडाखा… अशा तिहेरी संकटात कोकणी माणूस अडकला आहे. तरीही तो हरलेला नाही.

‘निसर्ग’विपन्न कोकणावर तिहेरी संकट

‘निसर्ग’ नावाच्या वादळाने निसर्गसंपन्न कोकणाची अवस्था अक्षरशः ‘निसर्ग’विपन्न अशी करून टाकली आहे. त्याची तीव्रता सांगणारी, मन हेलावून टाकणारी रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगडमधल्या साखरी जावळे येथील ही गोष्ट. या गावात राहणारे सचिन गोठल मुंबईहून येऊन आठच दिवस झाले होते आणि त्यांच्या गावात चक्रीवादळ येऊन धडकले. पत्रे लावलेले त्यांचे घर कोसळू लागले, तेव्हा ते जीवानिशी बाहेर पडले. त्याचवेळी त्यांची पत्नी आणि मुलगा अर्णवच्या डोक्यावर पत्रा पडला. अर्णवची जखम एवढी खोल होती की त्याला हरतऱ्हेचे प्रयत्न करून रत्नागिरीला आणावे लागले. एका गंभीर शस्त्रकियेला सामोरा जाणारा अर्णवचा चेहरा डोळ्यांसमोरून हलत नाही. आधी कोरोना, मग लॉकडाऊन आणि त्यानंतर वादळ… मुंबईमध्ये राहून कशीबशी नोकरी करून गावातल्या कुटुंबाचे पोट भरणाऱ्या सचिन गोठल यांच्यावर असे एकेक आघात झाले.

तीच गोष्ट गुहागर, दापोलीमधल्या नारळी- पोफळीच्या बागांची. वादळाचा रेटाच एवढा जोरदार होता की, पोफळीच्या बागा भुईसपाट झाल्या. मेहनतीने वाढवलेल्या आंब्याच्या कलमांची नासधूस झाली. आता पुन्हा एकदा अशी बाग उभी करायची तर किती वर्षं लागतील याचा हिशोब कल्पनेपलीकडचा आहे.

गरीब, श्रीमंत, बागायतदार, मोठमोठ्या रिसॉर्ट्समधल्या बागा… वादळाने कुणालाही सोडले नाही. श्रीवर्धनमधल्या कोकण कृषी विद्यापीठाच्या सुपारी संशोधन केंद्राचंही या वादळात मोठे नुकसान झाले.  गावेच्या गावे विस्कटली, जीव लावून बांधलेली कौलारू घरे कोसळली…. वादळ घुसले, तांडव करून गेले, शमले तरी कितीतरी गावे अंधारात बुडाली. वीजपुरवठा पुरता कोलमडून गेला. त्यातच आधीच दुर्गम असलेल्या मंडणगडसारख्या भागातली संपर्कयंत्रणाही पार निकामी झाली. कित्येकांचा आपल्या जीवलगांशी आठआठ दिवस संपर्क होऊ शकला नाही.

कोरोनामुळे जीवाला असलेला धोका, त्यात लॉकडाऊनचा फटका आणि त्यावर आता ‘निसर्ग’ वादळाचा तडाखा… अशा तिहेरी संकटात कोकणी माणूस अडकला आहे. आता सरकारकडून, वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्थांकडून मदतीचा ओघ सुरू झाला आहे, पण वादळाने झोडपलेल्या कोकणाला ऐन पावसाळ्यात यातून आपलेआपले सावरावेच लागणार आहे.

फयान, अम्फान आणि निसर्ग

निसर्ग वादळापूर्वी कोकणाने असे वादळ 2009 साली अनुभवले होते. तेव्हा आलेल्या ‘फयान’ चक्रीवादळात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले होते. ‘निसर्ग’ चक्रीवादळात रायगड आणि रत्नागिरीच्या सीमेवरचा भाग झोडपला गेला. मंडणगड, दापोली, गुहागर या तालुक्यांना याचा मोठा फटका बसला. कोकण म्हटले की रत्नागिरी, गुहागर, दापोली यासारखे नारळी- पोफळीचे हिरवेगार भाग डोळ्यासमोर येतात पण याच कोकणात मंडणगडसारखा एक अतिदुर्गम तालुका आहे हेही वादळामुळे सगळ्यांसमोर आले. याच मंडणगड तालुक्यातलं ऑलिव्ह रिडले कासवांसाठी झटणारे कासवांचं गाव वेळास उद्ध्वस्त झाले आहे.

पश्चिम किनारपट्टीवरचे इशारे

कोरोनाच्या लॉकडाऊनच्याच काळात पश्चिम बंगालमध्ये ‘अम्फान’ चक्रीवादळ आले. अगदी तेव्हाही अशाच प्रकारचे एक चक्रीवादळ पश्चिम किनारपट्टीवर घोंघावते आहे याची कोकणवासियांना कल्पना नव्हती. ‘अम्फान’ आले तेव्हा मी लॉकडाऊनमुळे कोकणातच अडकलेले होते. पश्चिम किनारपट्टीवर वादळ धडकणार असे इशारे येऊ लागले तेव्हाही हे वादळ कोकणाचं असे नुकसान करेल, याचा अंदाज रत्नागिरीमधल्या सामान्य माणसांना नव्हता हे गावकऱ्यांशी बोलताना लक्षात येत होते.

रायगडला तडाखा

हे चक्रीवादळ मुंबईला धडकणार, असा अंदाज हवामान विभागाने आधी दिला होता. मुंबईमध्ये आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सुसज्ज होत्या. त्यानंतर वादळ अलिबागला धडकणार असे अलर्ट येऊ लागले आणि मग रायगड आणि रत्नागिरीची यंत्रणा सतर्क झाली. या दोन्ही जिल्ह्यांत मिळून सुमारे एक लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले होते. त्यामुळे या वादळात जीवितहानी रोखली गेली. तरीही घरे, फळबागांचे मोठे नुकसान झेलावे लागले.

अस धडकल वादळ

रत्नागिरीच्या मिऱ्या बंदरावर एक जहाज भरकटून आले ती दृश्ये पाहून या वादळाची तीव्रता लक्षात येत होती. ‘निसर्ग’ चक्रीवादळाचे जवळून सर्वेक्षण करणारे मयुरेश प्रभुणे सांगतात, ‘वादळ जेव्हा धडकले तेव्हा मी रायगडमध्ये नागावला होतो. वारे प्रचंड वेगाने वाहत होते. हे वादळ जेव्हा जमिनीला धडकते तेव्हा वादळाची प्रचंड मोठी भिंत तयार होते. यामध्ये वारा, पाऊस, ढग सगळेच असते. श्रीवर्धन ते काशीद या ४० किमीच्या पट्ट्यात त्याचा जबरदस्त तडाखा बसला. हे वारे तासाला ११० किमी वेगाने वाहत होते. दुपारी दोन वाजेपर्यंत हा तडाखा सगळ्यात जास्त जाणवला. तरीही पूर्वेकडच्या ‘अम्फान’ चक्रीवादळापेक्षा या वाऱ्यांचा वेग निम्माच होता. त्यामुळे इथे तुलनेने कमी नुकसान झाले आहे.

पश्चिम किनारपट्टी ही चक्रीवादळांच्या दृष्टीने पूर्वेपेक्षा सुरक्षित मानली जाते. इथे आधी १९६८ साली चक्रीवादळ आल्याची नोंद आहे. हे वादळ दापोलीजवळच्या हर्णे बंदराला धडकले होते. त्यानंतर २००९ साली ‘फयान’ आले. मयुरेश प्रभुणे सांगतात, पश्चिम किनारपट्टीने पूर्वेसारखी तीव्र वादळे अनुभवलेली नाहीत. त्यातही ही दोन्ही वादळे दिवाळीच्या सुमाराला पाऊस परतताना आली होती.

११ वर्षांनी पुन्हा वादळ

‘निसर्ग’ चक्रीवादळ मात्र मॉन्सूनच्या सुरुवातीला आले आणि पावसाआधीच तांडव करून गेले. या वादळाबद्दलचा दुसरा मुद्दा आहे त्याच्या वारंवारितेचा. १९६८ नंतर सुमारे ४० वर्षांनी ‘फयान’ आले. पण त्यानंतर लगेचच १० वर्षांनी ‘निसर्ग’ आले आहे. कोकण किनारपट्टीला आता अशा चक्रीवादळांचा सततचा धोका असेल का, याबद्दल अजून ठोसपणे काही सांगता येणार नाही. पण वादळांची वारंवारिता हा नक्कीच चिंतेचा विषय आहे. हवामान बदल आणि जागतिक तापमानवाढ ही याची कारणे आहेत का, हाही एक महत्त्वाचा मुद्दा. यासाठी चक्रीवादळ नेमके कसे तयार होते हे आपण लक्षात घ्यायला हवे.

चक्रीवादळ कस तयार होत?

समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान वाढते आणि ही तापलेली हवा उंचउंच जाऊ लागते. यामुळे हवेची पोकळी निर्माण होते. ही पोकळी आजुबाजूची हवा भरून काढायचा प्रयत्न करते. नेमकी हीच हवा चक्रीवादळाला इंधन पुरवते. ‘निसर्ग’ चक्रीवादळ हे अरबी समुद्राचे तापमान वाढल्यामुळेच निर्माण झाले. याचाच अर्थ तापमानवाढ आणि हवामान बदल हे चक्रीवादळ तयार होण्याचे एक कारण नक्कीच आहे, असे मयुरेश प्रभुणे यांना वाटते. हवामान बदल आणि तापमानवाढीच्या या काळात अतिवृष्टी, वादळे अशा नैसर्गिक आपत्तींना आपल्याला तोंड द्यावे लागणार आहे हाच या निसर्ग चक्रीवादळाचा धडा आहे, असे ते सांगतात.

संपर्कयंत्रणा निकामी

या चक्रीवादळातून मुंबई वाचली ही दिलासा देणारी बाब आहे. पण मुंबईत चक्रीवादळ आले नाही म्हणजे कुठेच आले नाही का? असा प्रश्न सोशल मीडियावर विचारला जात होता. या सगळ्यांना, वादळामुळे कोकणाचे जे नुकसान झालेय त्याकडे लक्ष वेधायचे होते.

कोकणचे अभ्यासक आणि ज्येष्ठ पत्रकार सतीश कामत यावर नेमकेपणाने बोलतात. त्यांच्या मते, कोणत्याही आपत्तीच्या काळात कोकणाबद्दलची एक बाब पुन्हापुन्हा समोर येते आणि ती म्हणजे कोकणातली दुर्गमता आणि कनेक्टिव्हिटीचा अभाव. समुद्राला समांतर असणाऱ्या कोकणच्या या चिंचोळ्या पट्ट्यात मुंबई – गोवा महामार्ग किंवा कोकण रेल्वेमुळे उत्तर-दक्षिण असे जोडलेले आहेत. पण कोकणात पूर्व-पश्चिम असे जोडमार्ग नाहीत. ‘निसर्ग’ चक्रीवादऴात कोकणातल्या गावागावांत जे नुकसान झाले ते समोर यायला वेळ लागला तो यामुळेच. मोबाइलच्या नेटवर्कमुळे आता कोकणातली संपर्कयंत्रणा सुधारली असली तरी, वादळात तीही कोलमडून गेली. त्यामुळे त्या गावांत प्रत्यक्ष गेल्याशिवाय फोन करून माहिती घेणेही अवघड झाले होते.

एरव्हीही पावसाला सुरुवात झाली की कोकणातल्या गावांमध्ये वीजपुरवठा खंडित होतो. या वादळाचा ज़ोर एवढा होता की त्यापुढे वीजयंत्रणा तग धरू शकली नाही. विजेच्या तारांवर अनेक ठिकाणी झाडे पडली आणि कोसळलेल्या तारा पूर्ववत करणे हे मोठे आव्हान बनले. हे सगळे पाहता कोकणात अंडरग्राउंड केबलिंगचे काम हाती घ्यावे लागणार आहे. वीजपुरवठा करणारे भूमिगत तारांचे जाळे तयार झाले तर, वादळ किंवा अतिवृष्टीमध्ये ती कोलमडण्याचा धोका राहणार नाही.

विजय केळकर समितीचा अहवाल

सतीश कामत यांनी या वादळाच्या निमित्ताने पुन्हा एकदा विजय केळकर समितीच्या अहवालाची आठवण करून दिली आहे. या अहवालात राज्यातल्या वेगवेगळ्या विभागांचा विकास नेमका कसा असावा, यावर भर देण्यात आला आहे. त्याचबरोबर जिल्हानिहाय विकास धोरण तालुकाकेंद्रित करावे असाही मुद्दा आहे.

सतीश कामत यांच्या मते, वादळाने नुकसान झालेल्या भागांची पुन्हा एकदा उभारणी करताना कोकणाचा तालुकानिहाय विचार व्हायला हवा. कोरोनाच्या संकटात कोकणातल्या गावागावांकडे, तालुक्यांकडे आपले लक्ष गेले. त्यानंतर वादळानेही आपल्याला हेच शिकवले आहे. आता तरी कोकणातल्या पायाभूत संरचना, आरोग्य यंत्रणा, रोजगाराच्या संघी यासाठी नवा विकास आराखडा बनवायला हवा, असे त्यांना वाटते.

कोकणात वादऴामुळे नुकसान झालेल्या घरांसाठी मदत जाहीर करण्यात आली आहे. फऴबागांचे, शेतीचे किती नुकसान झाले यासाठी गावागावांत पंचनामे सुरू आहेत. ही मदत तर होतेय आहे पण त्याचबरोबर उद्धवस्त झालेल्या फळबागा नव्याने उभाराव्या लागणार आहेत. ही झाडे कोकणच्या मातीत पुन्हा उभी राहतीलही पण आता अतिवृष्टी, वादळे यांचा धोका लक्षात घेऊनच या बागांची आखणी करावी लागेल, असे कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत यांचे मत आहे.

ते सांगतात, मध्यंतरीच्या काळात आम्ही कोकणातल्या जुन्या आमरायांचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रकल्प हाती घेतला होता. आंब्याची जी जुनी मोठी झाडे आहेत पण आता ज्यांना फळं धरत नाहीत अशा झाडांच्या फांद्या छाटून त्यांना पुन्हा फळते करण्यात आले. या वादळात अशा कमी उंचीच्या आणि फांद्यांचा विस्तार नसलेल्या झाडांचे फारसे नुकसान झाले नाही, असे आमच्या लक्षात आले. त्यामुळे आमरायांच्या संवर्धनाची हीच पद्धत पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय कोकण कृषी विद्यापीठाने घेतला आहे.

स्थानिक प्रजीतींची लागवड

‘निसर्ग’ चक्रीवादळात नारळाची झाडे तगून राहिली, पण सुपारीच्या बागा मात्र उद्धस्त झाल्या. रत्नागिरीमध्ये हर्णे, अंजर्ले, केळशी, दिवेआगर, श्रीवर्धन या भागांतल्या पोफळी पडल्या. या बागांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आम्ही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो आहे, असे डॉ. संजय सावंत यांनी सांगितले.

ही झाडे लावताना कोकणातल्या स्थानिक प्रजातींची लागवड करण्यावर आमचा भर आहे, याचा ते मुद्दाम उल्लेख करतात. श्रीवर्धनच्या भागात श्रीवर्धन रोठा नावाची सुपारी प्रसिद्ध आहे. सुपारीची झाडे पुन्हा लावताना या प्रजातीची लागवड करण्यासाठी कोकण कृषी विद्यापीठ शेतकऱ्यांशी संवाद साधते आहे. त्याचबरोबर आंबा, काजूची जी झाडं अजूनही तग धरून आहेत, त्यांना पुन्हा उभे करावे लागणार आहे. ही झाडे वाढवण्यासाठी आपल्याकडे अख्खा पावसाळा आहे ही मोठी दिलाशाची बाब आहे, असेही डॉ. सावंत म्हणतात.

कोकणची नैसर्गिक भिंत

निसर्ग चक्रीवादळाने कोकणात जे तांडव केले त्यावरून तरी आपण किनारपट्टी सुरक्षित ठेवण्याचे धडे घ्यायला हवेत. कोकणच्या किनारपट्टीला जिथेजिथे डोंगरकडे, खारफुटी, सुरुची बने असे नैसर्गिक संरक्षण होते तिथेतिथे वादळाने कमी नुकसान झाले. त्यामुळेच अशी पुढे कधी वादळ आलेच तर त्यापासून संरक्षण करणारी ही नैसर्गिक भिंत आपण जपायला हवी, असेही डॉ. सावंत यांनी अधोरेखित केले.

कोकणात चक्रीवादळामुळे निसर्गाचे तांडव पाहायला मिळाले पण आता इथले लोक या धक्क्यातूनही सावरले आहेत. पुन्हा नव्या उमेदीने जगणं सुरू झाले आहे. पडलेली घरे आता पुन्हा शाकारली जात आहेत, माणसे उभारी घेत आहेत. उद्ध्वस्त झालेल्या बागांमध्येही पहिल्या पावसाने नवे अंकुरही फुटले आहेत.

हवी निसर्गाची साथ

कोकणाला निसर्गाने भरभरून दिले आहे. निसर्ग चक्रीवादळाने त्यातला काही अमूल्य ठेवा नेला असला तरी पुन्हा एकदा निसर्गच ही हानी भरून काढणार आहे… वादळात उन्मळून पडलेले एक पोफळीचे झाड पुन्हा उंच आभाळात जायला काही वर्षं लागतील, आंब्याची कलमे मोहरायला, फळे धरायला काही ऋतू जावे लागतील. पण तरीही कोकणच्या लाल मातीतली हिरवीगार उमेद कायम आहे. हीच उमेद कायम ठेवून, गरजणाऱ्या समुद्रासोबत आणि बरसणाऱ्या पावसासोबत कोकण पुन्हा एकदा उभारी घेणार आहे.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.