Author : Ayjaz Wani

Published on Aug 22, 2023 Commentaries 24 Days ago

‘शांघाय कोऑपरेशन ऑर्गनाझेशन’चे अध्यक्षपद भूषविल्याने भारताला एक महत्त्वाची प्रादेशिक शक्ती म्हणून ओळख संपादन करण्यास मदत झाली आणि ‘शांघाय कोऑपरेशन ऑर्गनाझेशन’च्या सर्व सदस्य राष्ट्रांसाठी एक विश्वासार्ह भागीदार म्हणून भारताने स्वतःला प्रस्थापित केले.

भारताच्या अध्यक्षतेखालील शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन

महाशक्ती स्पर्धा आणि नाजूक भौगोलिक घटकांच्या प्रभावाखालील जागतिक व्यवस्थेच्या पार्श्‍वभूमीवर, भारताने ४ जुलै २०२३ रोजी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या सदस्य राष्ट्रांच्या प्रमुखांच्या २३व्या शिखर परिषदेचे आयोजन केले होते. उझबेकिस्तानमधील समरकंद या ऐतिहासिक शहरात संस्थेचे आळीपाळीने येणारे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर, भारताने शांघाय कोऑपरेशन ऑर्गनाझेशनच्या प्रादेशिक सहयोगाच्या आणि सहकार्याच्या अजेंड्याचा अथक पाठपुरावा केला. अंतर्गत संबंध बळकट करणे आणि या वैविध्यपूर्ण व अनेकदा परस्परविरोधी गटात एकता वाढवणे या उद्देशाने भारताने १४ मंत्री-स्तरीय बैठकांसह १३४ कार्यक्रमांचे आयोजन केले. विधायक अजेंड्यासह निष्पक्षता आणि मुत्सद्देगिरी यासाठी भारताची ठोस वचनबद्धता सध्याच्या बहुध्रुवीय जागतिक व्यवस्थेत भारताचे वाढते महत्त्व अधोरेखित करते. शांघाय कोऑपरेशन ऑर्गनाझेशनच्या शिखर परिषदेदरम्यान, कठोर मूल्यमापन आणि विचार-विनिमयानंतर, इस्लामिक स्टेट ऑफ इराणला पूर्ण सदस्य दर्जा देण्यात आला, भारताने कझाकस्तान प्रजासत्ताककडे शांघाय कोऑपरेशन ऑर्गनाझेशनच्या अध्यक्षपदाची सूत्रे सूपूर्द केली.

उझबेकिस्तानमधील समरकंद या ऐतिहासिक शहरात संस्थेचे आळीपाळीने येणारे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर, भारताने शांघाय कोऑपरेशन ऑर्गनाझेशनच्या प्रादेशिक सहयोगाच्या आणि सहकार्याच्या अजेंडाचा अथक पाठपुरावा केला.

एक उदयोन्मुख जागतिक शक्ती म्हणून विविध क्षेत्रांमधील भौगोलिक घटकांच्या प्रभावाखालील आंतरराष्ट्रीय संबंधांचा आणि भौगोलिक घटकांवर आधारित आर्थिक हितसंबंधांचा पाठपुरावा करण्यासाठी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनाझेशनसह विविध बहुपक्षीय व्यासपीठांवरील सहभाग भारताकरता महत्त्वपूर्ण आहे. शांघाय कोऑपरेशन ऑर्गनाझेशनने भारताला मध्य आशियाई आणि दक्षिण आशियाई प्रदेशांमध्ये भौगोलिक घटकांवर आधारित सामरिक संबंधांच्या आणि भौगोलिक घटकांवर आधारित आर्थिक संबंधांच्या प्रयत्नांचे संरक्षण, प्रगती आणि प्रदर्शन करण्याची संधी दिली. २०१७ मध्ये, भारत या बहुपक्षीय संघटनेला लोकशाही स्वरूप देण्यासाठी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनाझेशनचा पूर्ण सदस्य बनला, अन्यथा ही संघटना म्हणजे हुकूमशाही नेते आणि हुकूमशाही देश एकवटलेली संघटना होती. २०२३ च्या अध्यक्षपदाच्या काळात, भारताने शांघाय कोऑपरेशन ऑर्गनाझेशनच्या सदस्य देशांमधील स्टार्टअप्स आणि नाविन्यपूर्णता, पारंपरिक औषधे, डिजिटल उपलब्धता, युवा सक्षमीकरण आणि सामायिक बौद्ध वारसा यांसह विकासाच्या नव्या क्षेत्रांना प्रोत्साहन देण्यासाठी शक्तिशाली भूमिका घेतली. या वचनबद्धतेचा एक भाग म्हणून, भारताने दोन नवीन यंत्रणा स्थापन केल्या- स्टार्टअप्स आणि नाविन्यपूर्णतेवर विशेष कार्य गट आणि पारंपरिक औषधांवरील तज्ज्ञ कार्य गट- यांतून प्रादेशिक आर्थिक आणि सामाजिक परिवर्तनांमध्ये योगदान देण्यासाठी भारताचे लक्षणीय समर्पण दिसून येते.

शिखर परिषदेने ‘सिक्युअर’ शांघाय कोऑपरेशन ऑर्गनाझेशन अशी संकल्पना स्वीकारली. जिथे एस म्हणजे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी; इ- सर्वांच्या आर्थिक विकासासाठी; सी- प्रदेश जोडण्याकरता; यू- लोकांना एकत्र आणण्यासाठी; आर- सार्वभौमत्व आणि अखंडतेच्या आदराकरता; आणि इ- पर्यावरण संरक्षणासाठी अशा अक्षरमालेतून ‘सिक्युअर’ अशी संकल्पना आकाराला आली आहे. हे प्रदेश ‘सुरक्षित, स्थिर आणि समृद्ध’ करण्यासाठी २०१८ मध्ये क्विंगदाओ शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही संकल्पना सुचवली होती. या शिखर परिषदेने देशोदेशींच्या व्यक्ती-व्यक्तींमधील संपर्काचे महत्त्व अधोरेखित केले आणि इतर सदस्य देशांसोबतचे शतकानुशतकांच्या जुन्या सभ्यता, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक संबंध पुनरुज्जीवित आणि दृढ करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेची पुष्टी केली. शांघाय कोऑपरेशन ऑर्गनाझेशनचे अध्यक्षपद भूषवीत असताना, भारताने प्राचीन काशी (वाराणसी) शहराला पहिली पर्यटक आणि सांस्कृतिक राजधानी घोषित करून आपला समृद्ध सांस्कृतिक वारसा दाखवून दिला.

शांघाय कोऑपरेशन ऑर्गनाझेशन भारताला मध्य आशियाई आणि दक्षिण आशियाई प्रदेशांमध्ये भौगोलिक घटकांवर आधारित सामरिक संबंधांच्या आणि भौगोलिक घटकांवर आधारित आर्थिक संबंधांच्या प्रयत्नांचे संरक्षण, प्रगती आणि प्रदर्शन करण्याची संधी देते.

पाकिस्तानच्या सरकार प्रायोजित दहशतवादापासून आपली उत्तर सीमा सुरक्षित करण्यासाठी भारताने शांघाय कोऑपरेशन ऑर्गनाझेशनचा एक व्यासपीठ म्हणून उपयोग केला. पाकिस्तान १९८९ पासून जम्मू- काश्मीरमधील दहशतवादाला पाठिंबा देत असून, अफगाणिस्तान-पाकिस्तान हा प्रदेश दहशतवादाचा बालेकिल्ला बनला आहे आणि ते मध्य आशिया व युरेशियामधील कट्टरपंथी घटकांना पाठिंबा देत आहे. पाकिस्तानच्या सरकार प्रायोजित दहशतवादाचा सामना करण्याचे मोठे आव्हान असूनही, भारताने प्रादेशिक दहशतवादविरोधी सहकार्यासाठीचे कट्टर समर्थन केले. २०१८ मध्ये संयुक्त राष्ट्र संघाच्या आंतरराष्ट्रीय दहशतवादावर व्यापक अधिवेशनात (सीसीआयटी), भारताच्या दहशतवादविरोधी मोहिमेला मिळालेल्या महत्त्वपूर्ण पाठिंब्याचा आधार घेत, भारताने त्यांच्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनाझेशनच्या अध्यक्षपदाच्या कालावधीत दहशतवादाचा मुद्दा यशस्वीपणे मांडला. प्रादेशिक दहशतवादविरोधातील प्रभावी सहकार्यासाठी आणि कृतीकरता एक अपरिहार्य यंत्रणा म्हणून भारत शांघाय कोऑपरेशन ऑर्गनाझेशनच्या प्रादेशिक दहशतवादविरोधी संरचनेच्या बाजूने ठामपणे उभा राहिला. प्रादेशिक दहशतवादविरोधी प्रयत्नांमध्ये अखंड संवाद आणि समन्वय सुनिश्चित करण्यासाठी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनाझेशनमध्ये वापरल्या जाणार्‍या प्राथमिक भाषांपैकी एक म्हणून इंग्रजीचा स्वीकार करण्यास भारताने जोरदार समर्थन केले. या व्यतिरिक्त, ‘अफगाण-नेतृत्वाखालील, अफगाण-मालकीच्या आणि अफगाण-नियंत्रित’ शांतता प्रक्रियेच्या भारताच्या मागणीला, शांघाय कोऑपरेशन ऑर्गनाझेशनच्या सर्व मध्य आशियाई सदस्यांकडून आणि रशियाकडून पाठिंबा मिळाला. भारत आणि मध्य आशियाई प्रजासत्ताकांमधील दहशतवाद, सुरक्षा सहकार्य आणि संरक्षण यावरील करारांनी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनाझेशनच्या माध्यमातून भारताने महत्त्वपूर्ण प्रगती करून दाखवली.

पाकिस्तानने आपल्या भूभागाद्वारे प्रादेशिक ‘कनेक्टिव्हिटी नेटवर्क’ नाकारून आपल्या सांस्कृतिक, सामरिक आणि आर्थिक हितसंबंधांचा पाठपुरावा करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना खीळ घातली. चीनने आपल्या महत्त्वाकांक्षी आणि अनेकदा शोषण करणाऱ्या ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह’ (बीआरआय)द्वारे शांघाय कोऑपरेशन ऑर्गनाझेशन क्षेत्रातील आपले संकीर्ण हितसंबंध वाढवण्याकरता, पाकिस्तान आणि भारत यांच्यातील तणावपूर्ण संबंधांचा वापर केला आहे. चिनी ‘बीआरआय’ प्रकल्पांमुळे कर्जाचे संकट निर्माण झाले आहे आणि शांघाय कोऑपरेशन ऑर्गनाझेशनच्या सदस्य देशांच्या सार्वभौमत्वाचे आणि अखंडतेचे उल्लंघन झाले आहे. कर्जाच्या वाढत्या संकटामुळे शांघाय कोऑपरेशन ऑर्गनाझेशन प्रदेशात, प्रामुख्याने मध्य आशियामध्ये चीनविरोधी निदर्शने सुरू झाली आहेत. चीन आणि पाकिस्तानमधील सांस्कृतिक व राजकीय संबंधांवर मात करण्यासाठी, भारताने चाबहार बंदर आणि ७,२०० किमी लांबीच्या आंतरराष्ट्रीय उत्तर- दक्षिण वाहतूक कॉरिडॉरमध्ये गुंतवणूक केली. भारताच्या नेतृत्वाखालील हे जोडणी उपक्रम व्यावसायिक सल्ला किंवा शिफारसी देणारे, पारदर्शी, किफायतशीर आणि विश्वासार्ह आहेत. सर्वसमावेशक आणि सहभागात्मक दृष्टिकोनातून, बहुतांश शांघाय कोऑपरेशन ऑर्गनाझेशनच्या सदस्य देशांनी द्विपक्षीय आणि बहुपक्षीयरित्या भारताच्या नेतृत्वाखालील जोडणी प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याकरता पर्याय शोधले आहेत. २०२० मध्ये, भारताने पायाभूत सुविधा प्रकल्प विकसित करण्यासाठी मध्य आशियाई देशांना १ अब्ज अमेरिकी डॉलर्सचे कर्ज प्रदान केले आणि युरेशियामधील भौगोलिक आणि आर्थिक हितसंबंध बळकट करून ताजिकिस्तानचा दुशान्बे-चोरटुट महामार्गही बांधला.

जगभरात भौगोलिक घटकांच्या प्रभावाखाली नाजूक बनलेले आंतरराष्ट्रीय संबंध आणि रशिया-युक्रेन संघर्षाच्या कालावधीत भारताने शांघाय कोऑपरेशन ऑर्गनाझेशनचे अध्यक्षपद स्वीकारले. या संघर्षाने गटात चीनच्या वर्चस्ववादी आणि युद्धखोर वर्तनाचा समतोल साधण्याच्या रशियाच्या क्षमतेला खूप कमी केले. चीनच्या अमेरिकेशी असलेल्या तीव्र शत्रुत्वाच्या दरम्यान, शांघाय कोऑपरेशन ऑर्गनाझेशनचा वापर भौगोलिक, भू-आर्थिक आणि प्रादेशिक फायद्यांसाठी प्रतिस्पर्ध्याला रोखण्याकरता, चीनच्या वर्चस्ववादी हितसंबंधांना यशस्वीरित्या अक्षम करण्याकरता, भारताने आपल्या वाढत्या राजनैतिक प्रभावाचा आणि जागतिक स्तराचा फायदा घेतला. भारताच्या वाढत्या जागतिक आर्थिक आणि राजकीय प्रभावामुळे शांघाय कोऑपरेशन ऑर्गनाझेशनचे युरेशियामधील विकास-केंद्रित संघटनेत रूपांतर करण्यात एक प्रमुख भूमिका बजावणारा देश म्हणून भारताला आपले स्थान बळकट करण्यास मदत झाली. पाश्चिमात्य देशांविरोधी आघाडी करण्याऐवजी, भारताने या प्रदेशाच्या सामूहिक समृद्धीला चालना देण्याकरता, संयुक्त राष्ट्रांच्या सनदेचे पालन करून शांतता आणि सुरक्षा राखण्याच्या महत्त्वावर भर दिला.

भारताने आपले राजनैतिक संबंध आणि बौद्धिक भांडवल बळकट केले आहे, तसेच जोडणी, दहशतवाद रोखण्यासाठीच्या कृती योजना आणि अफगाणिस्तान यांवर प्रगतीशील अजेंड्याचा पुरस्कार केला आहे. अनेक पाश्चात्य अभ्यासकांनी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनाझेशनला चीन निर्मित आणि चीनचे वर्चस्व असलेला गट म्हणून संबोधले असले तरीही, भारताच्या अध्यक्षपदाने देशाला एक महत्त्वपूर्ण प्रादेशिक शक्ती म्हणून ओळख संपादन करण्यासाठी आणि शांघाय कोऑपरेशन ऑर्गनाझेशनच्या सर्व सदस्य राष्ट्रांकरता एक रचनात्मक, खात्रीचा आणि विश्वासार्ह भागीदार म्हणून स्वतःला प्रस्थापित करण्यासाठी एक अनमोल व्यासपीठ म्हणून काम केले. मात्र, व्यग्र रशिया, वर्चस्ववादी महत्त्वाकांक्षेचा अथक पाठपुरावा करणारा चीन, त्यांच्या भूभागातून जोडणीला परवानगी देण्यास ठाम नकार देणारे पाकिस्तान आणि संधीसाधू चीन-पाकिस्तान संबंध हे सारे शांघाय कोऑपरेशन ऑर्गनाझेशनच्या प्रादेशिक आणि जागतिक प्रभावावर खीळ घालत राहतील.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.