Published on Feb 26, 2020 Commentaries 0 Hours ago

रशियावर राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची जबर पकड आहे. पण, ती आता ढिली होण्यास सुरुवात झाली आहे, असे जगातील राजकीय विश्लेषक बोलू-लिहू लागले आहेत.

रशियातील घडामोंडीशी जगाचा काय संबंध?

रशियात सध्या राजकीय, सामाजिक बदल झपाट्याने होत आहेत. या बदलांनी तुमच्या-आमच्या जगण्यावर आणि आजच्या जगावर दृश्य-अदृश्य परिणाम होणार आहेत. गेल्या काही काळात रशियात अनेक राजकीय सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या अकल्पित घटना घडल्या आहेत. रशियामध्ये वेगवेगळ्या कारणांसाठी लोक रस्त्यावर मोर्चे काढायला लागले तसेच रशियन युवकांनी रशियाच्या निवडणूक धोरणाच्या विरोधात आंदोलन पुकारले अन रशियन व्यवस्थेला जबर धक्का दिला. रशियावर राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची जबर पकड आहे. ती आता ढिली होऊ पाहत आहे, तशी सुरुवात झाली आहे, असे जगातील राजकीय विश्लेषक बोलू-लिहू लागले आहेत.

रशियातील अशा आंदोलनांवर राष्ट्राध्यक्ष पुतीन काय भूमिका घेतात आणि हे आंदोलन कस हाताळतात, याकडे जगातील अनेकांचे लक्ष आहे. रशियावरील आपली पकड सैल होऊ नये, तसेच रशियात अजून मोठे बंड होऊ नये, यासाठी पुतीन यांनी अगदी हळुवारपणे पण कठोर पावले उचलायला सुरुवात केली आहे. रशियात पुन्हा जनआंदोलन उभेच राहू नये. यासाठी पुतीन यांनी रशिया आणि जग यांचा थेट संबंध येऊ नये यासाठी इंटरनेटवर बंधने आणली. ‘रुनेट’च्या माध्यमातून इंटरनेट वापरावर सरकारी निर्बंध व नियंत्रण आणले गेले आहे.

इंटरनेटच्या महाजालाने जग एकमेकांशी थेट जुळले गेलेले आहे. अमेरिकेतील एखादा व्यक्ती क्षणात भारतातील कुठल्याश्या खेड्यातील व्यक्तीशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क साधू शकतो. जगातल्या एखाद्या कोपऱ्यातील घटना किंवा कार्य हे जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यातील लोकांसाठी प्रेरक, मार्गदर्शक ठरू शकते. अशा काही घटना गत काही वर्षात घडल्या आहेत. इजिप्तच्या तेहरानमध्ये युवकांनी जुलमी शासन व्यवस्थेविरुद्ध सोशल मीडियावरून विरोध करायला सुरुवात केली. अल्पावधीत लाखो युवक रस्त्यावर आले, ही घटना अनेक देशांतील युवकांसाठी प्रेरक ठरली. अनेक शासन व्यवस्थेविरुद्ध मग लोक आवाज उठवू लागले.

सोशल मीडिया हे एकविसाव्या शतकात सामान्य माणसाच्या हातातातील असे अत्यंत प्रभावी शस्त्र ठरलेले आहे. जगभरात काय होते आहे, लोक काय म्हणत-बोलत-लिहत आहे हे सहजपणे जगात कळायला लागले. अनेक मोर्चे, आंदोलन अन व्यवस्था बदलावणाऱ्या घटना सोशल मीडियामुळे घडून आल्या. रशियातील युवकांनी स्थानिक निवडणूक प्रक्रियेविरुद्ध आंदोलन केले आणि जगाने त्याची दाखल घेतली.

मागच्या वर्षी रशियातील तरुण वर्गाने सोशल मीडियाच्या माध्यमातून स्थानिक निवडणुकांवर आक्षेप घेतला. आंदोलन केले. जगात ही बातमी वेगाने पसरली. रशियन सरकारच्या व्यवस्थापनावर जगाने शंका घ्यायला सुरुवात केली. अशामुळे रशियन सरकारवर नैतिक दबाव आला व त्यांना थेट आंदोलन चिरडून टाकता आले नाही. पुन्हा असं होऊ नये, सरकारच्या विरोधात आंदोलन उभे राहू नये आणि देशांतर्गत होत असलेले सरकार विरोध व्यक्तव्य, आवाज, आंदोलन बाहेरच्या जगातील लोकांना कळूच नये यासाठी रशिया कठोर पावले उचलत आहे. रशियाबद्दल आता तेवढेच कळेल जेवढे रशियन सरकारला वाटत असा हा सगळा प्रकार आहे. त्यासाठी रशिया आता नव्या पद्धतीने देशांतर्गत बंधन आणतो आहे. म्हणजे रशिया एकाचवेळी जगासाठी संपर्क ठेवून असेल तर दुसरीकडे सामान्य रशियन लोकांना मात्र मर्यादित स्वरूपात सरकारी नियंत्रणात जगाशी संपर्क ठेवता येईल.

सध्या रशिया आपली स्वतंत्र इंटरनेट यंत्रणा विकसित करत असल्याची बातमी आहे. याद्वारे इंटरनेटच्या वापरावर सरकारी निर्बंध व नियंत्रण असेल असे समोर आले आहे. जग या बातमीने हादरले. माहिती-तंत्रज्ञाच्या युगात जर इंटरनेटवर व्यक्त होण्याच्या अधिकारावर गदा आणली गेली तर? रशियाच्या या भूमिकेने जगातील सामान्य लोकांना चिंतेच्या खाईत लोटले आहे. भारतात देखील अशाच इंटरनेट सेवेच्या प्रक्रियेची चाचणी होत असल्याची बातमी आली आहे. रशियाच्या भूमिकेचे असे जागतिक परिणाम झाले आहेत.

त्यानंतरच रशियन राज्यघटनेत बदल करण्यात येत असल्याची बातमी समोर आली. त्याद्वारे रशियन अध्यक्षांना अनेक अधिकार प्राप्त झाले व त्यांचा कार्यकाळही वाढविण्यात आला. आपले वर्चस्व कायम राहावे यासाठीच पुतीन यांची ही राजकीय खेळी आहे. जगातील अनेक राष्ट्रप्रमुख पूर्णवेळ सत्ताधीश होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यासाठी ते तेथील व्यवस्थेत अनेक बदल करत आहेत. रशियाने त्यात एक पाऊल उचलेले आहे. एकविसावे शकत अधिकाधिक लोकाभिमुख शासन व्यवस्थेकडे जायला हवे पण  जगात एकछत्री शासक उदयास येत आहे. रशिया त्याचा आदर्शच घालून देतो आहे, याचा जगावर दूरगामी परिणाम होणार आहे. उद्या कदाचित भारतात देखील असे होऊ शकते. तेव्हा रशियात पुतीन सत्ताधीश झाले तर आपल्याला त्याचे काय? हा प्रश्न निरर्थक ठरतो.

रशियांत घडणाऱ्या राजकीय सामाजिक घटनांशी आपला काय संबंध? त्यांचं ते पाहून घेतील? भारतात त्याचा काय फरक पडणार आहे? असेअनेकलोक म्हणतात. पण जागतिकीकरणापासून आणि व्यापारिक दळणवळण ते माहिती तंत्रज्ञानाच्या वापरामुळे आपण जगातील प्रत्येक घटनेशी, जागतिक प्रत्येक घडामोडीशी बांधल्या गेलो आहे. जगातल्या कुठल्याही कोपऱ्यातील कुठल्याही घटनेचा आपल्यावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक इ. परिणाम होतोच.

जसे एखाद्या राष्ट्रांत नवे सरकार निवडून आले तर त्या सरकारची आपल्या देशाबद्दल काय भूमिका आहे हे फार महत्वाचे असते. कारण त्यावर आपले त्या देशाशी राजकीय, व्यापारिक व इतर संबंध अवलंबून असतात. कुण्या देशातील नवनियुक्त सरकारने दुसऱ्या देशातील व्यापाऱ्यांवर निर्बंध आणले की त्या देशाच्या अर्थकारणावर त्याचा गंभीर परिणाम होत असतो. राजकीय भूमिकेची नव्याने मांडणी होत असते, त्याचा भविष्यावर मोठा फरक पडणार असतो. नेहरूंच्या अलिप्ततावादी भूमिकेने भारत शीतयुध्दत भरडला गेला नाही, अमेरिकेचे माजी अध्यक्ष बुश यांच्या युद्धखोर नीतीची झळ साऱ्या जगाने सोसली, ईराण. इजिप्त, इराक, लिबिया येथील हुकूमशहांनी जनतेला व जगाला कसे वेठीस धरले होते हे जगणे अनुभवले आहे.

अमेरिकेत ट्रम्प सरकार निवडून आले आणि भारतावर त्याचा परिणाम होण्यास सुरुवात झाली. इथला आयटी सेक्टर मधला वर्ग धास्तावला कारण ‘अमेरिका फर्स्ट’ हे धोरण ठरवत अमेरीकन तरुणांना आधी रोजगार या धोरणामुळे भारतीय आयटी व त्यासंबंधीच्या इतर व्यापारिक गोष्टीवर त्याचा परिणाम झाला. ‘अमेरिका फर्स्ट’ या धोरणाखालीच अमेरिकेने चिनी मालाच्या आयातीवर प्रचंड बंधने आणली व चीन अमेरिका यांच्यातील व्यापार युद्धात जग भरडल्या जाते आहे. अनेक वस्तूंचे दर जगभर कडाडले, वस्तूंचा तुटवडा जाणवायला लागला. व्यापाराच्या दळणवळणावर त्याचा परिणाम झाला. जग हे असे एकमेकांशी एकमेकांच्या धोरण, संबंधांशी बांधले गेले आहे. त्यामुळे निर्णयांचे परिणाम देखील वैश्विक असतात.

रशियावर देखील अमेरिका आणि इतर युरोपीय देशाने व्यापारिक निर्बंध लादले आणि रशिया आपल्या देशातील उत्पादीत माल व संरक्षण सामग्रीसाठी नव्या बाजारपेठा शोधायला लागला. केवळ अमेरिका व युरोपमध्ये आलेल्या नव्या राज्यकर्त्यांच्या भूमिकेमुळे जगाचे एकमेकांबद्दलचे निकष बदलले आणि नव्या जडण घडणीला सुरुवात झाली.

कुठल्या देशात कुठले सरकार, कुठल्या विचारांचे शासक व्यवस्थापन करत आहे याचा साऱ्या जगभर परिणाम होत असतो. रशियात पुढे अनेक वर्ष कम्युनिस्ट विचारसरणीचे पुतीन सर्वेसर्वा म्हणून शासन करणार असतील तर अनेक देश हे त्यांच्या भूमिकेशी संगत किंवा विसंगत अशी भूमिका घेतील. ज्यांचा व्यापार रशियावर अवलंबून आहे ते पुतीन यांच्या विरोधात जाणार नाहीत, ज्यांना रशियन बाजार पेठ हवी आहे ते पुतीन यांना सुसंगत अशी भूमिका घेतील. या सगळ्यांचा परिणाम त्या त्या देशातील लोकांवर, आणि त्यांच्या लहानात लहान व्यापारावर होईल.

रशियातील बदल

रशिया गेल्या काही वर्षात आपल्या राजकीय, व्यापारी भूमिका बदलवताना दिसतोय. रशियाचा पारंपरिक ग्राहक म्हणजे युरोपियन बाजारपेठ. या बाजारपेठा युरोपियन देशांनी लादलेल्या काही निर्बंधामुळे पूर्वीसारख्या उपलब्ध राहिलेल्या नाहीत. रशियाला नवा व्यापारी मित्र व बाजारपेठ शोधणे आवश्यक होते. कारण तसे केले नाही तर सामान्य रशियन भांडवलदार व नोकरदार वर्ग हा बेरोजगारीतून विरोधात जाईल आणि  विरोधी वातावरण तयार होईल. तेव्हा राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी आशियातील काही नव्या देशांशी मैत्री अधिक वाढवण्यास सुरुवात केली आहे.

पुतीन आंतरराष्ट्रीय राजकारणात आपल्या देशाविषयी काय भूमिका घेतात यावर त्या देशाचे रशियासोबतचे संबंध कसे असतील हे ठरत होते. उदा. भारत हा रशियाचा फार जुना पारंपरिक मित्र तर पाकिस्तान व चीन हे भारताचे शस्त्रू. तरीही पुतीन यांनी पाकिस्तान व चीन यांच्यासोबत राजकीय, व्यापारी व संरक्षक विषयात मदतीचे करार केले. त्यामुळे आता रशिया किंवा पुतीन हे आंतरराष्ट्रीय मंचावर या दोन देशांच्या विरोधात भारताच्या बाजूने भक्कमपणे उभे राहणार नाही हे उघड आहे. त्यासोबतच भारत म्हणून आपली संरक्षक सिद्धता व भारतातून रशियात होणारी मालाची निर्यात यावरही परिणाम होतील.

चीन आणि रशियाचे अध्यक्ष हे वर्चस्ववादी भूमिकेबाबत ओळखले जातात. अनेक वर्ष आपलीच सत्ता तिथे असावी याबद्दल हे प्रयत्नशील आहेत. तशीच राजकीय भूमिका ते घेत असतात. या दोघांच्या मैत्रीमुळे, यांच्यातील राजकीय-व्यापारी देवाणघेवाण किती प्रमाणात होतात, त्या कशा होतात यावर जगाचे लक्ष असणारच कारण त्यांच्या संबंधाचा जगातील प्रत्येक देशावर परिणाम होणार आहे. 

रशिया जर आपल्या राज्यघटनेत बदल करून राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना अधिक अधिकार देत असतील तर पुतीन आंतरराष्ट्रीय मंचावर राजकीय काय बाजू घेतात याचा परिणाम साऱ्या जगावर होणार असतो, तसा तो होतो.अनेक देशांच्या प्रमुखांनी घेतलेल्या भूमिकेचा पुढे अनेक दशके परिणाम झाला आहे म्हणून रशियाच काय जगातील कुठल्याही देशातील कुठलाही निर्णय व त्याचे परिणाम जागतिक आहेत.

सारे काही व्यापारासाठी

साऱ्या जगात जे काही सुरु आहे, जी काही देवाणघेवाण आहे, जे संबंध आहे, जे वैर आहे ते त्यामागे मूळ कारण आर्थिक आहे. अमेरिकेला सौदी देशांसोबत मैत्री हवी आहे कारण तिथलं तेल अमेरिकेला हवं आहे. सौदीला अमेरिकन डॉलर हवा आहे. चीन इतर राष्ट्रांशी मैत्री वाढवतो आहे कारण त्यांच्या देशातील प्रचंड उत्पादित मालाला बाजारपेठ हवी आहे. रशिया भारताशी मैत्री ठेवतो कारण भारत हा त्यांच्यासाठी संरक्षण यंत्र सामग्री विकार घेणारी मोठी बाजारपेठ आहे.

चीन व पाक बाबतही हीच भूमिका रशियाची आहे. युरोप इतर विकसनशील देशांवर प्रभुत्व प्रस्थापित करू पाहतो कारण युरोपला व्यापारी बाजारपेठ हवी आहे. हा सगळा खेळ पैशांचा आहे. पुतीन आपली रशियावरील पकड सुटू देऊ इच्छीत नाही कारण त्यांना सत्ता हवी आहे. आणि ते हवं असेल तर रशियन व्यापारचा विकास झाला पाहिजे हे ते जाणतात. तेव्हा आपल्या विचारसरणीच्या इतर सत्ताकांक्षी लोकांशी मैत्री वाढवायची आणि व्यापारी धोरण मजबूत करायचे असाच हा प्रकार आहे.

जागतिकीकरण व एकमेकांवर वस्तू व सेवेच्या व्यापारावरील वाढलेले अवलंबित्व यामुळे एक देशातील घटनांचे जगावर परिणाम होणे क्रमप्राप्त आहे. सध्या चीन मध्ये कोरोना व्हायरस मुळे हाहाकार उडाला आहे. याच्या परिणाम जगावर झाला आहे. चीन मधील पर्यटनपासून ते चिनी वस्तू पुरवठ्यापर्यन्त तुटवडा जाणवायला लागल्यामुळे त्यावर अवलंबून असणारे जगातील उद्योगावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. असे परिणाम झाले नसते तर जगभर राजकीय विश्लेषक दिवसरात्र दुसऱ्या देशांचा अभ्यास करत बसले नसते. हेच रशियाबाबतही लागू आहे. आणि त्यामुळेच रशियात काय होते आहे हे जग डोळ्यात तेल घालून पहाते आहे.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.