भारत हा अनेक धर्म व पंथांना सामावून घेणारा वैविध्यपूर्ण असा देश आहे. परंतु या सर्व धर्मांचा गाभा एकच आहे. सर्व धर्मांनी आपल्या अनुयायांना एक साधी व सरळ शिकवण दिलेली आहे. ती म्हणजे, इतरांशी प्रेमाने वागा. इतरांसोबत वागताना दयाभाव ठेवा. तसंच, इतरांपासून आपणांस जे मिळावे असे वाटते, ते आधी इतरांना द्या. परस्पर सहकार्याची संकल्पना सुरुवातीच्या काळापासूनच मानवी उत्क्रांतीला मार्गदर्शक ठरत आलेली आहे. एक आदर्श नागरिक होण्यासाठी ही भावना कर्तव्य म्हणून अंगी बाणवणं गरजेचे आहे.
लोकसाहित्य आणि पुराणकथांमध्ये आपण नेहमीच मानवाच्या सामूहिक चांगुलपणाच्या गोष्टी ऐकत आलो आहोत. ह्या सामूहिक चांगुलपणामुळे संपूर्ण मानवी समाजाचे कल्याण केले आहे, असे कुणाला वाटत असेल तर त्यात चुकीचे काहीच नाही. मात्र, मानवी समाज जसजसा उत्क्रांत होत गेला. अधिकाधिक विभक्त व स्वयंभू होत गेला, तसतशी परस्पर सहकार्याची ही संकल्पना लोप पावू लागली. आता आपल्या सोयीनुसार इतरांना मदत करण्याची संस्कृती रुजली आहे. मानवी वर्तनात प्रचंड प्रमाणात झालेल्या या बदलाचे उत्तर प्रत्येक व्यक्तीच्या अहंकारी स्वभावात सापडते. मदत करतानाही आपल्यासाठी उत्तम पर्याय काय आहे, हे लोक तपासून पाहतात. त्यातही स्वार्थ आणि वैयक्तिक फायद्याच्या बाजूने विचार करताना दिसतात.
दुर्दैवाने, या आत्मकेंद्रित स्वभावाचे दर्शन घडवणारी अशी अनेक उदाहरणं मागच्या दोन महिन्यांत आपल्याला पाहायला मिळाली आहेत. जगातील बहुसंख्य देश कोरोना विषाणूच्या संसर्गाचा सामना करण्यासाठी पावले उचलत आहेत. करोनच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी (आणि विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी) संचारबंदी आणि प्रवासबंदीसारखे निर्बंध कायद्याने घातले जात आहेत. सत्ताधारी नेते त्या-त्या क्षेत्रातील अधिकाऱ्यांना या निर्बंधांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश देत आहेत, किंबहुना दिले आहेत. भारत सरकारने देखील मानवी संहाराच्या भीतीनं २४ मार्च रोजी देशव्यापी टाळेबंदी जाहीर करून अन्य देशांचा कित्ता गिरवला.
या निर्बंधांमुळे लोकांमधील सामाजिक अंतर वाढलेय. अत्यावश्यक कामे किंवा प्रवासाव्यतिरिक्त इतर कुठल्याही कारणांसाठी संचारबंदीचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई (आर्थिक दंड व जमाव होऊ नये म्हणून लाठीमार) केली जात आहे. मात्र, नागरिकांचे हाल होऊ नयेत आणि त्यातून सामूहिक उद्रेक होऊ नये याची काळजीही सरकार घेत आहे. या संकटाच्या काळात जीवनावश्यक वस्तू पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्याचे सरकारने आश्वासन दिले आहे. सरकारच्या या आश्वासनानंतरही प्रत्यक्ष चित्र वेगळेच आहे.
अन्य देशांतील नागरिकांप्रमाणेच भारतीय लोक खरेदीसाठी गर्दी करत आहेत. नाशिवंत खाद्यपदार्थांबरोबरच किराणा माल, औषधे व संरक्षक ‘मास्क’ची अनावश्यक साठेबाजी करत आहेत. कोरोनामुळे अचानक वाढलेल्या मागणीमुळे देशातील पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा आटला आहे. परिणामी बाजारात वस्तूंचा टंचाई होऊ लागली आहे. मॉल्समधील रॅक रिकामे दिसू लागले आहेत. मात्र, अशा प्रकारचे वर्तन हे केवळ छोट्या व संकुचित स्वभावाच्या ग्राहकांपुरतेच मर्यादित आहे असे नाही. मोठमोठ्या देशांनीही आपल्याकडच्या मालाचा साठा करण्याचे कुटिल उद्योग सुरू केले आहेत.
उदाहरणच द्यायचे झाल्यास, अमेरिकेने अलिकडंच ‘मास्क’ने भरलेल्या एक जहाज ताब्यात घेतले. संपूर्ण जगातून अमेरिकेच्या या कृत्याचा निषेध करण्यात आला. कोरोनाच्या विषाणूच्या संसर्गावर हायड्रोक्सीक्लोरोक्वीन हे औषध प्रभावी ठरत असल्याचे लक्षात येताच भारत सरकारने या औषधाच्या निर्यातीवर बंधने घातली. रशिया, युक्रेन आणि कझाकस्तान यांसारख्या देशांनी कोरोनाच्या साथीचा मुकाबला करताना सज्जता म्हणून अन्नधान्याच्या निर्यातीवर बंदी लागू केली.
फूड नॅशनलिझम (अन्नकेंद्री राष्ट्रवाद) आणि संकटकाळात आवश्यक असलेल्या वस्तूंच्या साठेबाजीमुळे आंतरराष्ट्रीय व्यापार कोसळला आहे. पूर्णपणे आयातीवर अवलंबून असणाऱ्या देशांना यामुळे गंभीर संकटाला तोंड द्यावे लागत आहे. जगभरातील नागरिकांच्या व देशांच्या या स्वार्थी वर्तनास मानसशास्त्रात काही उत्तर आहे का? अपरिहार्यता म्हणून भीतीपोटी स्वत:च्या फायद्यासाठी असं वागण्याचे नैतिकतेच्या दृष्टिकोनातून समर्थन करता येईल का? की वैयक्तिक लालसेने परस्पर सहकार्याच्या भावनेवर मात केली आहे? महात्मा गांधी यांनी म्हटल्याप्रमाणे ‘प्रत्येकाची गरज भागू शकेल एवढी साधनसंपत्ती पृथ्वीवर आहे, परंतु त्यातून हव्यासाची पूर्तता शक्य नाही.’
वर्तनशास्त्रातील वेगवेगळ्या सिद्धांताच्या मदतीने अलीकडे घडणाऱ्या या घटनांची सांगड घालण्याचा प्रयत्न कदाचित केला जाऊ शकतो. उदाहरणार्थ, साठेबाजीमागचे अर्थशास्त्र काय?, हे एखादा मानसशास्त्रीय सिद्धांत मांडून स्पष्ट केले जाऊ शकते. इतरांच्या कृतीवर जेव्हा एखाद्याचा फायदा अवलंबून असतो, त्यावेळी तो कसा वागतो याचा अंदाज बांधला जाऊ शकतो. सामूहिक कृतीमुळे निर्माण होणाऱ्या द्विधा मनस्थितीवरूनही एखाद्याचा ‘खरेदीचा पर्याय’ ठरू शकतो. याउलट एखादा तर्कशुद्ध विचार करणारा माणूस समाजाच्या फायद्याचा (उदा. बाजारातील सर्व सॅनिटायझर मीच खरेदी केले, तर इतर लोक त्यांच्या हातांची स्वच्छता कशी करतील?) विचार करून खरेदीचा निर्णय घेऊ शकतो.
माणूस हा क्वचितच तर्कसंगत वागतो. भीतीपोटी किंवा अहंकारी वृत्तीमुळे समाजाच्या दृष्टिकोनातून विचार न करता खरेदी करत असतो. कारण, आपण तसे न केल्यास (सामान्य माणसांची शोकांतिका) इतर लोक सर्व काही घेऊन जातील आणि त्याचा फटका शेवटी आपल्याला बसेल, या विचाराने तो तसं वागत असतो. प्रत्येकजण स्वतःचा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करणार आहे, हाच विचार ग्राहकांना अतार्किक वागण्यास आणि साठेबाजी करण्यास प्रवृत्त करत असतो.
‘शून्य जोखीम विसंगती’ (Zero Risk Bias) या सिद्धांताच्या माध्यमातून देखील वर्तनातील विसंगतीचे समर्थन केले जाऊ शकते. अनेक अर्थतज्ज्ञ आता माणसाची नुकसान टाळण्याची जन्मजात वृत्ती समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी खरेतर प्रख्यात अर्थतज्ज्ञ टव्हर्स्की आणि कहनेमन यांना सलाम करायला हवा. आपल्या आयुष्यातील अनिश्चितता टाळणे याकडे सर्वसाधारणपणे माणसाचा कल असतो आणि आयुष्यातील विविध प्रकारचे धोके टाळण्यात त्याला अपयश आल्यास त्यामुळे होणाऱ्या नुकसानीची तीव्रता कमी करण्याचा त्याचा प्रयत्न असतो.
या सगळ्याचा विचार करता एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की, ‘कोविड १९’च्या साथीच्या उद्रेकाने मानवी आयुष्य अनिश्चिततेच्या गर्तेत ढकलून दिले आहे. आपली नोकरी टिकेल का? टिकलीच तर पगार कपात होईल का? आपल्याला या जीवघेण्या रोगाची लागण तर होणार नाही ना? याशिवाय, टाळेबंदीचा काळ किती वाढणा? अशा अनेक प्रश्नांनी ही अनिश्चितता अधोरेखित होते आहे. अनेक धोक्यांचा हा पेटारा जेव्हा समोर येतो, तेव्हा साहजिकच माणूस यातील सगळेच नव्हे पण एखादा धोका टाळण्याचा प्रयत्न निश्चितच करतो. त्यामुळे एखादी व्यक्ती जेव्हा हापापल्यासारखी खरेदी किंवा साठेबाजी करते, तेव्हा ती संभाव्य संकटाच्या काळात स्वत:सह आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाच्या अनिश्चिततेवर मात करत असते.
‘आत्यंतिक तिटकारा’ यातही विसंगत वर्तनाचे मूळ शोधता येते. मानवी स्वभावातील ‘तिरस्काराची’ भावना एखादा रोग टाळण्यासाठी प्रेरक ठरू शकते. ही भावना एक साधन म्हणून पुढे आल्याचं अलीकडेच तज्ज्ञांनी केलेल्या अभ्यासातून दिसून आलेय. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, एखाद्या व्यक्तीमध्ये तिरस्काराची भावना केवळ त्याच्या आरोग्याच्या चिंतेतूनच बळावते असं नाही तर समाजाच्या चिंतेपोटीही ती मनात मूळ धरू धरते. कोरोनाच्या साथीसारख्या घटना संकटाचा प्रतिकार करण्याची आपली संवेदना अधिक प्रबळ करू शकतात.
त्यामुळेच, ‘कोविड १९’ विषाणूमुळे आजाराचा धोका जसजसा वाढला, तसा या आजाराबद्दलचा तिटकाराही लोकांच्या मनात वाढत गेला. औषधे आणि स्वच्छतेच्या वस्तूंची अतिरिक्त खरेदी (किंवा साठेबाजी) हे कोरोनाबद्दलच्या वाढत्या तिटकाऱ्याचंच द्योतक आहे. कारणं काहीही असोत, परिस्थितीचा फायदा उठवून नफा कमावण्याचा विचार असो, धोका टाळण्याकडे कल असो किंवा तिरस्काराच्या भावनेतून असो, प्रत्येक देशाने आपल्या नागरिकांचे आणि स्वत:चे वर्तन तपासून पाहायला हवे आणि या वर्तनाचे काही दुष्परिणाम होऊ नयेत म्हणून योग्य ती पावले उचलायला हवीत.
जगभरातील देशांकडून होत असलेल्या सामाजिकदृष्ट्या अयोग्य अशा वर्तनापासून स्वत:चे संरक्षण करताना राष्ट्रवादी भावना जागृत करण्यापासून भारत सरकारही मागे राहू शकत नाही. आपुलकी व औदार्याच्या भावनेला प्रोत्साहन देणे हाच असहकार्याच्या व तुटलेपणाच्या वर्तनावर उतारा ठरू शकतो. त्यातून परस्पर सहकार्याच्या संकल्पनेचे पुनरुज्जीवन होऊ शकतं. ‘कोविड १९’ सारख्या जीवघेण्या रोगाशी लढणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता म्हणून ‘जनता कर्फ्यू’च्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला टाळ्या व थाळ्या वाजवण्याचं केलेलं आवाहन, तसंच सामूहिक शक्ती जागृत करण्याच्या उद्देशानं ५ एप्रिल रोजी मेणबत्त्या व दिवे उजळण्याचे केलेले आवाहन हा देशातील परस्पर सहकार्याची भावना व सहविश्वास जागृत करण्याचा यशस्वी प्रयत्न होता. मात्र, अशाप्रकारे परस्पर विश्वासाच्या भावनेला आवाहन करणारा भारत हा एकमेव देश नाही.
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी देखील त्यांच्या देशातील आरोग्य सेवकांना प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांचे आभार मानण्यासाठी देशातील जनतेला वेळोवेळी आवाहन केले आहे. अशाच पद्धतीनं जगभरातील लोक एका भावनेने एकत्र येत राहिले तर परस्परांबद्दल सहकार्याची भावना निश्चितच वाढेल. तसंच, कोरोनाच्या साथीच्या कचाट्यातून बाहेर पडण्यास मदत मिळेल आणि एकत्र येऊन कुठल्याही संकटातून तरून जाता येते, हा आशावाद पुन्हा एकदा बळकट होईल.
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.