Author : Ramanath Jha

Published on Jul 25, 2023 Commentaries 0 Hours ago

जिथे रूग्णांचा जीव वाचावा यासाठी प्रयत्न केले जातात त्या रूग्णालयांमध्येच जर जिवीत हानी नोंदवली जात असेल तर त्याहून दुर्दैव ते काय?

रुग्णालयांमधील अग्नितांडवांची कारणमीमांसा

२०२१च्या नोव्हेंबर महिन्यात अहमदनगरमधील ५०० बेडसची व्यवस्था असलेल्या सिव्हील हॉस्पिटलच्या आयसीयू युनिटमध्ये आग लागल्याची घटना घडली. या घटनेत अकरा रूग्णांचा होरपळून मृत्यू झाला. ज्या आयसीयूमध्ये ही आग लागली तेथील सर्व रूग्ण कोरोनामुळे उपचाराधीन होते. यानंतर काहीच दिवसांनी भोपाळच्या सरकारी रूग्णालयातील स्पेशल न्यूबॉर्न केअर युनिटमध्ये आगीची घटना झाली. यात चार नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

भंडारा जिल्हा रुग्णालयातील नवजात बालकांसाठीच्या अतिदक्षता विभागात १० बालकांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. ही तीनही रुग्णालये राज्यातील आरोग्य सेवेतील महत्त्वाची केंद्रे मानण्यात आली आहेत. या तिन्ही रुग्णालयातील आगी इलेक्ट्रिकल बिघाडामुळे प्रामुख्याने शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे पुढे निदान करण्यात आले आहे.

आगीच्या या तीनही घटनांमध्ये त्या रुग्णालयातील मुख्य अधिकारी, परिचारिका, सर्जन आणि वैद्यकीय कर्मचारी यांच्यावर राज्य सरकारकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली. तसेच त्यादिवशी ड्युटीवर असलेले सर्वात ज्येष्ठ डॉक्टर आणि तीन परिचारिकांना अटक करण्यात आली. या आगींमुळे एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात आली की रुग्णालयामधील उपकरणांची देखभाल, त्यांची काळजी घेण्याचे प्रशिक्षण या रुग्णालयांतील स्टाफकडे नव्हते म्हणूनच रुग्णालयांतील उपकरणांमध्ये बिघाड झाल्यानंतर काय करायचे याची त्यांना कल्पना नव्हती.

ही गोष्ट सरकारच्या लक्षात आणून देण्यासाठी आंदोलने, निदर्शने करण्यात आली. वैद्यकीय कर्मचारी आणि परिचारिका यांच्यावर ३०४ आणि ३०४ एए ही कलमे लावल्याबद्दल इंडियन मेडिकल असोसिएशन, अहमदनगरच्या अध्यक्षांनी आश्चर्य व्यक्त केले. “खरेतर ह्या रुग्णालयांतील वायरिंग आणि देखभालीवर देखरेख करणे ही सार्वजनिक बांधकाम विभाग आणि विद्युत विभागाच्या अधिकार्‍यांची जबाबदारी आहे, असे असताना वैद्यकीय कर्मचार्‍यांवर आरोप करून त्यांच्यावर कारवाई का करण्यात आली? “, असाही प्रश्न त्यांनी याप्रसंगी उपस्थित केला. दुर्घटनेनंतर भोपाळमध्ये रुग्णालयाच्या संचालकांसह तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात आले तर भंडारा येथील वैद्यकीय कर्मचार्‍यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली.

अहमदनगरमध्ये, अग्निशमन दलाने इशारे देऊनही हॉस्पिटलमध्ये अग्निशामक उपकरणे, फायर स्प्रिंकलर, हायड्रंट्स किंवा स्मोक डिटेक्टर यांची तरतुद करण्यात आली नाही. जिल्हा रुग्णालयांच्या सेफ्टी ऑडिटसाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा महाराष्ट्राच्या आरोग्यमंत्र्यांकडून दुर्घटना घडून गेल्यानंतर करण्यात आली. तसेच सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये अग्निसुरक्षा अधिकाऱ्याचे नवीन पद निर्माण करण्यात येणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.

राज्यातील रुग्णालयांमध्ये लागणाऱ्या आगींकडे गांभीर्यपूर्वक पाहण्यात आले नाही, हेच यातून सिद्ध झाले आहे. रुग्णालयांमधील इलेक्ट्रिकल विंग अपग्रेड केले जाईल आणि वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत स्वतंत्र सिव्हिल इंजिनीअरिंग शाखा स्थापन केली जाईल, असे आश्वासन मध्यप्रदेशच्या संबंधित मंत्री महोदयांकडून देण्यात आले आहे.

महाराष्ट्रामधील भंडारा जिल्हयातील नवजात शिशुंसाठीच्या आयसीयूच्या विस्तारासाठी १ कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. या विभागाचे बांधकाम पूर्ण झाले परंतु अग्निशमन दलाकडून परवानगी घेण्यात आली नाही आणि इलेक्ट्रिकल फिटिंग्ज बसविण्यावर विद्युत अभियंत्याकडूनही देखरेख ठेवण्यात आली नाही.

एप्रिल २०२० ते ऑगस्ट २०२१ दरम्यान २४ रुग्णालयांमध्ये घडलेल्या आगीच्या घटनांमध्ये एकूण ९३ लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. यातील बहुतांश आगी २०२१ च्या मार्च ते एप्रिल या कालावधीत कोरोनाच्या दुसर्‍या लाटेदरम्यान लागलेल्या होत्या.

२०१० ते २०१९ या कालावधीमध्ये १०० हून अधिक खाटांची व्यवस्था असलेल्या जवळपास ३३ रुग्णालयांत करण्यात आलेल्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की या आगींचे बहुतांशी कारण हे विद्युत व्यवस्थेतील बिघाड असेच होते, यातील ७८ टक्के घटना शॉर्ट सर्किटमुळे घडलेल्या होत्या आणि बहुतांश वेळा या आगी रुग्णालयातील एयर कंडीशनरमध्येच लागल्याचे निदर्शनास आले.

शहरातील रुग्णालयांमध्ये वारंवार होणाऱ्या अशा दुर्घटनांची अनेक कारणे सांगता येतील. पहिली गोष्ट म्हणजे, भारतातील सरकारी रुग्णालयांवर आधीपासूनच रुग्णांच्या ओव्हरलोडमुळे प्रचंड ताण आलेला होता. तथापि, कोरोना महामारीच्या काळात ही परिस्थिती अधिकच बिकट झाली. या महामारीच्या काळात रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन बेड, उपकरणे जोडणे आणि कर्मचार्‍यांना रुजू करून घेणे आवश्यक होते, परंतु हे सर्व करताना विद्युत यंत्रणा कार्यरत करण्यावर फारच कमी वेळ देण्यात आला.

परिणामी, रुग्णालयांच्या वायरिंग यंत्रणेवर क्षमतेपेक्षा जास्त ताण आला. त्यांच्या अतिवापरामुळे तसेच अतिउष्णतेमुळे आग लागण्याच्या घटना वारंवार घडू लागल्या. स्पेशल केअर युनिट्समध्ये अधिक बेड जोडल्यामुळे इलेक्ट्रिकल ओव्हरहीटिंगचे प्रमाण वाढले व परिणामी आग लागण्याच्या घटनाही वाढल्या. ज्याप्रमाणे वैद्यकीय कर्मचार्‍यांना अथक मेहनतीनंतर विश्रांतीची आवश्यकता आहे, त्याचप्रमाणे एअर कंडिशनिंग सिस्टमला देखील विश्रांतीची आवश्यकता असते. मात्र, असा दिलासा रुग्णालये आणि त्यांच्या यंत्रणेला उपलब्ध करून देण्यात आला नाही.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमध्ये उपकरणांमधील बिघाडामुळे रुग्णालयांमध्ये आगी लागल्या हे जितके खरे आहे, तितकेच भारतात सामान्य परिस्थितीतही आगी लागण्याचे प्रमाण अधिक आहे हे देखील खरे आहे. सरकार वैद्यकीय पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देते आहे परंतु त्यांची देखभाल करण्याकडे मात्र दुर्लक्ष करत आहे. परिणामी रुग्णालयांमध्ये पुरेशी आणि दर्जेदार विद्युत व्यवस्था आणि त्यांच्या देखभालीसाठी पैसा आणि तांत्रिक मनुष्यबळ दोन्ही उपलब्ध करून देण्यात सरकारांना सपशेल अपयश येत आहे.

रुग्णांची सेवाशुश्रूषा करणे ही वैद्यकीय कर्मचार्‍यांची जबाबदारी असते त्यामुळे रुग्णालयातील विद्युत बिघाडांसाठी फक्त त्यांना जबाबदार धरणे योग्य नाही. खरेतर, रुग्णालयांसाठी अपुर्‍या वित्त आणि मनुष्यबळाकडे राज्य आणि नगरपालिका सरकारांनी दुर्लक्ष केल्यामुळे त्यांना यासाठी जबाबदार धरायला हवे. म्हणूनच रुग्णालयांमधील इलेक्ट्रिकल सिस्टीमची सुधारणा आणि विस्तार करणे, यासोबतच त्यांच्याकडे असलेल्या भौतिक आणि विद्युत पायाभूत सुविधा यांचा सारासार विचार करून प्रत्येक रुग्णालयांमध्ये रुग्ण घेण्याची कमाल क्षमता सरकारांनी निश्चित करायला हवी.

अर्थात संकटकाळात या क्षमतेचे उल्लंघन केले जाते का ? किंवा त्याचा रुग्णालयाच्या विद्युत प्रणालीवर काय ताण येतो ? याचे अत्यंत बारकाईने निरीक्षण करणे आवश्यक आहे. यासाठी प्रत्येक रुग्णालयामध्ये विद्युत व्यवस्थेची वेळोवेळी तपासणी करण्यासाठी त्या त्या रुग्णालयात सुसज्ज आणि कुशल मनुष्यबळ असायला हवे. ऑक्सिजनच्या वापरासाठीची इलेक्ट्रिकल आणि मॉनिटरिंग उपकरणे कोणत्या ठिकाणी ठेवणे सोयिस्कर आहे याबाबत तज्ञांनी काही सोपे उपाय सुचवले आहेत त्यांची अंमलबजावणी व्हायला हवी.

अतिदक्षता विभागात ऑक्सिजन मॉनिटरिंग उपकरणे कुठे असावीत याचीही शिफारस करण्यात आली आहे. ज्वलनशील पदार्थांचे संचयन आणि मध्यवर्ती गॅस सप्लाई पॉइंट्सचे स्थान हे रुग्णांच्या बेड्स तसेच रूम्स पासून दूर असावेत. आग किंवा इतर दुर्घटनांमध्ये कोठे आग लागली आहे हे ओळखण्यासाठी व ती आटोक्यात आणण्यासाठी अद्ययावत व्यवस्था असावी. सुयोग्य अग्निशामक उपकरणांची कार्यक्षमता तपासण्यासाठी सुरक्षितता ऑडिट तसेच इलेक्ट्रिकल ऑडिट वेळोवेळी करणे आवश्यक आहे, असे काही महत्त्वाचे उपाय रुग्णालयांनी करायला हवे.

अग्निशामक उपकरणे हाताळण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणेही तितकेच आवश्यक आहे. तज्ज्ञांनी असे सुचवले आहे की हवा प्रसारित करण्यासाठी आयसीयूमध्ये एअर हँडलिंग युनिट्स (एएचयू) स्थापन करायला हवीत. ह्या एअर हँडलिंग युनिट्सचे वैशिष्ट्य म्हणजे ही उपकरणे वातावरणातून हवा शोषून घेतात, व त्यावर योग्य ती प्रक्रिया करून इमारतीमधील किंवा इमारतीच्या एका भागातील नलिकांद्वारे प्रसारित करतात. भूतकाळातील घटनांपासून धडा घेऊन, सार्वजनिक विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्वरित पावले उचलून रुग्णालये आगीपासून सुरक्षित करायला हवीत आणि त्यांची जबाबदारी सुयोग्य व्यक्तींकडे सुपूर्त करावी.

या संदर्भात, सरकारी रुग्णालयांसह इतर सर्व रुग्णालये नॅशनल अक्रेडीटेशन फॉर हॉस्पिटल्स अँड हेल्थकेअर प्रोवायडर्स म्हणजेच एनएबीएचच्या कक्षेत ठेवणे शहाणपणाचे ठरणार आहे. एनएबीएच हे भारतीय गुणवत्ता परिषदेचे एक घटक मंडळ आहे. हे घटक मंडळ स्वत: च्या आणि बाह्य मूल्यांकनाच्या प्रक्रियेद्वारे, निर्धारित मानकांवर आधारित रुग्णांच्या सुरक्षिततेवर आणि आरोग्यसेवेच्या गुणवत्तेवर योग्य लक्ष केंद्रित करू शकेल.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.

Author

Ramanath Jha

Ramanath Jha

Dr. Ramanath Jha is Distinguished Fellow at Observer Research Foundation, Mumbai. He works on urbanisation — urban sustainability, urban governance and urban planning. Dr. Jha belongs ...

Read More +