Author : Harsh V. Pant

Published on Oct 06, 2023 Commentaries 0 Hours ago
पुतिन यांच्या चुकीच्या निर्णयांचे दीर्घकालीन परिणाम

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये युक्रेनविरूद्ध ‘विशेष लष्करी कारवाई’ सुरू केल्यापासून, त्यांनी एक राष्ट्र म्हणून रशियाचा सामरिक कमकुवतपणा टप्प्याटप्प्याने उघड केला आहे. युक्रेन विरूद्ध पुढील आक्रमक पवित्रा घेण्याच्या त्यांच्या धोरणात्मक, कार्यपद्धतीतील आणि रणनैतिक चुका पुढील अनेक वर्षे रशियाला त्रासदायक ठरतील. परंतु दोन दशकांपूर्वी सत्तेवर आल्यापासून त्यांच्या अधिकार पदासमोरील सर्वात मोठे आव्हान- त्यांचे सर्वात निकटचे सहकारी- वॅग्नर ग्रूपचे नेते येवगेनी प्रिगोझिन यांच्याकडून उभे ठाकेल याची त्यांना कल्पनाही नव्हती. प्रिगोझिन यांनी केलेले बंड २४ तासांत आटोक्यात आले असले तरी, जे घडले त्या धक्क्याचे प्रतिध्वनी रशियातील सरकारी वर्तुळात आणि त्यापलीकडे उमटत आहेत. बंडखोरी सुरूझाल्यानंतर रशियन लोकांना संबोधित करताना, पुतिन यांनी सुचवले होते की, मॉस्कोपर्यंत मोर्चा नेणाऱ्या आयोजकांना ‘गुन्ह्याकरता अटक केली जाईल आणि त्यांच्यावर न्यायालयात खटला चालवला जाईल, याची खात्री बाळगा’, प्रिगोझिन यांच्या कृतीला रशियाच्या पाठीत केलेला वार असे मानले गेले. परंतु जेव्हा पेचप्रसंगाचे निराकरण करण्याची वेळ आली तेव्हा बेलारशियन नेते अलेक्झांडर लुकाशेन्को यांनी एक करार केला. प्रिगोझिन त्या कराराचा एक भाग म्हणून बेलारूसमध्ये आहेत, ज्याअंतर्गत त्यांना सुरक्षिततेची हमी मिळाली आहे तसेच त्यांच्यावरील फौजदारी खटला मागे घेतला गेला आहे, तर त्यांच्या सैनिकांना रशियन सैन्यात सामील होण्यास किंवा बेलारूसला जाण्यास सांगितले आहे. यामुळे पोलंड, लॅटव्हिया आणि लिथुआनिया यांसारखे राजकीय शक्ती विकेंद्रित असलेले प्रादेशिक देश अस्वस्थ आहेत.

बेलारूसमध्ये प्रिगोझिन सुरक्षितपणे गुप्त ठिकाणी स्थानापन्न झाले, ही वस्तुस्थिती पुतीन यांच्याशी व्यवहार करताना त्यांच्यापाशी असलेल्या अधिकाराच्या झुकत्या मापाविषयी सांगते.

पुतीन यांनी कदाचित त्यावेळचे संकट आटोक्यात आणले असेल, परंतु संपूर्ण प्रकरण रशियन सरकारी संस्थांच्या कार्यप्रणालीवर आणि सरकारी यंत्रणेवर पुतीन यांच्या असलेल्या नियंत्रणासंबंधी प्रश्न उपस्थित करते. त्यांनी या संकटाचा पाया फार पूर्वीच रचला, जेव्हा रशियाच्या वतीने वॅग्नर गटासारख्या भाडोत्री सैनिकांना लष्करी मोहिमा राबविण्याची परवानगी दिली. युक्रेनियन रणांगणावर संपादन केलेल्या सर्वात मोठ्या यशापैकी काही प्रिगोझिन यांच्या सैन्याचे आहे तर रशियन सैन्याची कामगिरी गोंधळलेल्या पद्धतीची आहे. प्रिगोझिन काही काळापासून रशियाच्या संरक्षण नेतृत्वाला थेट लक्ष्य करत आहेत आणि रशियन संरक्षण मंत्रालय प्रिगोझिन यांच्या भाडोत्री सैनिकांना सामावून घेण्याच्या योजना पुढे नेत असताना, प्रिगोझिन यांनी अशा प्रकारे पलटवार करण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे त्यांचे सामर्थ्य राष्ट्रासमोर आणि नेतृत्वासमोर अधोरेखित झाले. बेलारूसमध्ये प्रिगोझिन सुरक्षितपणे गुप्त ठिकाणी स्थानापन्न झाले, ही वस्तुस्थिती पुतीन यांच्याशी व्यवहार करताना त्यांच्यापाशी असलेल्या अधिकाराच्या झुकत्या मापाविषयी सांगते. देशद्रोहाबद्दल प्रिगोझिन यांचा तिरस्कार वाटत असूनही, त्यांच्याकरवी थेट अपमानित होऊनही, पुतिन यांना किमान आत्तापुरते तरी प्रिगोझिन यांना सहन करावे लागले आहे.

पण याचा अर्थ असा आहे की, पुतिन यांना आता त्यांच्या कमी होत चाललेल्या अधिकारांचे पुनरुत्थान करण्यासाठी आणखी काहीतरी आवश्यक आहे. युक्रेनच्या विरोधात प्रगती हा सर्वात संभाव्य परिणाम आहे. युक्रेनच्या विविध शहरांवर क्षेपणास्त्र हल्ले आधीच सुरू झाले आहेत, रशियाने युक्रेनमध्ये अनेक नागरी लक्ष्यांवर हल्ला केल्याचे वृत्त आहे. रशिया हे स्पष्ट करत आहे की, देशांतर्गत अशांतता असूनही, युक्रेन विरुद्धचे युद्ध रशिया सर्वतोपरी क्रौर्याने सुरू ठेवेल. रशियन सैन्य आक्रमण करून परिस्थिती सर्वसामान्य असल्याची भावना प्रक्षेपित करण्याचा प्रयत्न करेल.

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी सुचवले की, वॅगनरच्या बंडाने पुतिन यांच्या अधिकारातील ‘खऱ्याखुऱ्या भेगा’ उघड केल्या आहेत आणि ते रशियन सरकारसाठी ‘थेट आव्हान’ आहे, तर चीनने या घटनेला ‘रशियाचा अंतर्गत मामला’ असे संबोधले आहे. दोन हुकूमशाही राष्ट्रांमधील घनिष्ट संबंध अधोरेखित करताना, चीनच्या निवेदनात असे म्हटले आहे की, ‘नवीन युगातील एक मैत्रीपूर्ण शेजारी आणि सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदार म्हणून, चीन राष्ट्रीय स्थिरता राखण्याकरता रशियाला पाठिंबा देतो.’ परंतु अशा देशाबरोबर दीर्घकालीन आर्थिक आणि राजकीय संबंधांबद्दल चीनमध्ये चिंता वाढायला हवी, जो अनिश्चितपणे एका कड्याच्या टोकावर आहे. चिनी गुंतवणूकदार रशियात गुंतण्यास प्रतिकार करण्याची शक्यता जास्त आहे. या विद्रोहाच्या आधीच चीन हा रशियासोबतच्या आर्थिक संबंधांच्या भवितव्याबाबत सावध होत असल्याची चिन्हे होती.

रशियातील राजकीय अस्थिरता ही भारताला अगदीच नकोय, जेव्हा भारत आपल्या सीमेवर आणि पलीकडे असलेल्या चीनचा सामना करण्याचा प्रयत्न करत आहे.

रशियात घडणाऱ्या घटनांकडे भारताचेही बारीक लक्ष राहील. युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाल्यापासून रशिया आणि पाश्चिमात्य देशांसोबतच्या संबंधांमध्ये समतोल राखण्याचा प्रयत्न भारत करत आहे. भारताकडे रशियाची मशागत करण्याची भक्कम कारणे असली तरी व्लादिमीर पुतिन ज्या निवडी करीत आहेत ते या संबंधांच्या भविष्याकरता चांगले संकेत देत नाहीत. रशियातील राजकीय अस्थिरता ही भारताला अगदीच नकोय, जेव्हा भारत आपल्या सीमेवर आणि पलीकडे असलेल्या चीनचा सामना करण्याचा प्रयत्न करत आहे. आधीच, युक्रेन विरूद्ध रशियाच्या युद्धाने भारताचा महत्त्वाच्या शस्त्रास्त्रांचा पुरवठा खंडित झाला आहे, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर अस्थिरता आहे, अशा वेळी भारताच्या कार्य सज्जतेला यामुळे आव्हान निर्माण झाले आहे. भारताने फार पूर्वीपासून सुरू केलेल्या संरक्षण विविधीकरणाच्या प्रक्रियेला यामुळे गती मिळाली आहे. परंतु संरक्षण संबंधांच्या पलीकडे, भारताला युरोप आणि आशियामध्ये स्थिर शक्ती संतुलनासाठी स्थिर, व्यवहार्य रशियाची गरज आहे. पुतीन यांच्या निर्णयक्षमतेने रशियन असुरक्षा उघड होत असल्याने ही शक्यता दिवसेंदिवस धूसर होत आहे. पुतीन घाईघाईने कुठलाच बदल करणार नाहीत, पण त्यांनी निर्माण केलेल्या अशांततेचे दीर्घकालीन परिणाम केवळ रशियावरच नाही तर त्याच्या मित्र आणि शत्रू राष्ट्रांवरही होतील.

हे भाष्य मूलतः एनडीटीव्ही येथे प्रकाशित झाले आहे.

हे लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.