Author : Khalid Shah

Published on Mar 03, 2019 Commentaries 0 Hours ago

जम्मू-काश्मीरने शेकडो गायक, डॉक्टर्स, इंजिनीअर्स, सैनिक, आयएएस आणि आयपीएस अधिकारी दिले आहेत. मग, आज बंदूकधारी मनुष्य ही काश्मीरची प्रतिमा का बनवली जातेय? 

काश्मीरचे चित्र असे का रंगवले जातेय?

एखादी व्यक्ती प्रशिक्षण घेऊन किंवा आपल्या शारीरिक सामर्थ्याच्या जोरावर ‘सुसाईड बॉम्बर’ होत नसते. आपल्या शरीरावर बॉम्ब बांधून घेऊन बेछूट दहशतवाद पसरविणाऱ्या माणसांचा ‘ब्रेनवॉश’ केला जातो आणि आपण करत असलेल्या कृत्यावर त्याचा ठाम विश्वास असावा लागतो.

पुलवामा हल्ल्यात झालेला नरसंहाराने देशातील प्रत्येक नागरिकाच्या मनावर खोल वार केला आहे. राजकीय पातळीवर पाकिस्ताना प्रत्युत्तर देण्याचे नियोजन सुरू असतानाच, काश्मीर खोऱ्याबाहेर राहणाऱ्या काश्मिरी लोकांवरील हल्ल्याच्या काही घटना घडल्या. या घटनांमुळे सामान्य काश्मिरी लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सामान्य भारतीय लोकांच्या मनावर पुलवामा हल्ल्याचा घाव एवढा खोलवर बसला आहे की, त्यांना संतापाच्या भरात काश्मिरी आणि हल्ल्यासाठी जबाबदार असलेले दहशतवादी यांच्याच फरक करता येत नाही आहे. दहशदवादाचा शिकार झालेल्याच्या मनावर असा परिणाम होतो आणि सद्सदविवेकाचा अशा वेळी बळी जातो.

ज्याअर्थी अशा प्रकारचे सुसाईड बॉम्बर देशात आहेत, यावरून असे म्हणता येते की, अशा आत्मघातकी मोहिमांसाठी तरुणांना चिथावणी देणारेही लोक आहेत. देशाच्या सुरक्षेसाठी फक्त लष्कर पुरेसे नाही. दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या या मानसशास्त्रीय घटकांकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. लष्करी यंत्रणा फक्त या लढाईच्या परिस्थितीत, दहशतवादाच्या हिंसक घटकांचे आणि त्यांच्यामुळे संभव धोक्यांचे निराकरण करतात आणि शांतता राखण्याचा प्रयत्न करतात. पण दुसऱ्या बाजूला या अतिरिक्त सुरक्षेमुळे या यंत्रणांबद्दलच आकस निर्माण होऊ लागतो.

काश्मीरची कथा ही एक भयानक कथा आहे. एका बाजूला, काश्मिरी लोकांचा गट आहे जे म्हणतात की, “आम्ही सर्व बुरहाण वाणी आहोत” आणि दुसरीकडे देशात असा एक गट तयार होत आहे, जे म्हणत आहेत की, “ते सर्व (काश्मिरी) दहशतवादी आहेत.” दोन्ही बाजू एकमेकांवर अवलंबून आहेत. या दोन विरोधी टोकाच्या भूमिकांमुळे ही समस्या समजून घेऊन, त्यावर तोडगा काढताना अवघड झाले आहे. ‘आझादी’ विचारधारेच्या प्रतिनिधींनी असा विचार निर्माण केला आहे, ज्यामुळे जगाला वाटावे की प्रत्येक काश्मिरी हा भारताबरोबर युद्ध करीत आहे. उजव्या विचारसरणीतून एकच मुद्दा ताणून असे चित्रण केले जाते की, प्रत्येक काश्मिरी हा “राष्ट्रद्रोही” आहे.

या  राजकीय विभाजनाच्या दुसऱ्या बाजूचे अतिरेकी, या दहशतवाद्यांकडे काश्मीरमधील “चे गव्हेरा” असल्याच्या दिखावा करतात. त्यांच्या हिंसाचाराच्या या निर्दयी चेहऱ्याचे ते समर्थन करतात.

पुलवामा हल्ल्याच्या उत्तरार्धात या दोन विरोधी विचारांचे परिणाम लगेच दिसून आले. काश्मीरमधील समस्येच्या फक्त एका दृष्टिकोनाकडे लक्ष केंद्रित केले गेले. बुरहाण वाणीसारख्या लोकांना काश्मीरमध्ये प्रतिष्ठेचे स्थान मिळाल्याने, काश्मीर आणि काश्मीरमधील लोकांबद्दलची प्रतिमा जगाच्या दृष्टिकोनात दुषित झाली आहे. आज कदाचित संतप्त जमावाच्या दृष्टीत प्रत्येक काश्मिरी नागरिक हा पुलवामा हल्ल्यातील ‘सुसाईड बॉम्बर’ सारखाच आहे. पण सत्य हे खूप वेगळे आहे. सर्व काश्मीरींना अशा एकाच पट्टीने कसे पाहता येईल?

कदाचित हीच वेळ आहे विचारण्याची की, ३०० स्थानिक काश्मिरी दहशतवादी हे देशभरातील चर्चांचा आणि चिंतेचा विषय कसे काय बनले? ७० लाख लोकसंख्येच्या प्रदेशात ही ३०० लोक किंवा त्यांचे ३००० किंवा ३०००० समर्थक सर्व काश्मिरींना दहशतवादाच्या लेबलखाली ढकलण्यास कारणीभूत कसे ठरू शकतात?  आपल्या देशातील वृत्त माध्यमें आणि बहुसंख्य निर्माते काश्मीरच्या कथेने नेहमीच पछाडलेले का असतात? आणि काश्मिरची कथा ही या दहशतवाद्यांपुरतीच मर्यादित का आहे? जर ती खरंच काश्मीरची कथा आहे, तर ही कथा फक्त एकच बाजू का प्रदर्शित करते ?

पुलवामा हल्ल्यानंतर काहीच दिवसानंतर, २५०० काश्मिरी नागरिक काश्मीरच्या बोचणाऱ्या थंडीत सैन्यात भरती होण्यासाठी रांगेत उभे राहिले. दुर्दैवाने, हा जमाव लोकांचे किंवा मीडियाचे लक्ष वेधून घेण्यात अपयशी ठरला. काश्मीरमधील ही २५०० माणसे आणि इतर हजारो माणसे जी विविध सुरक्षा दलांमध्ये कार्यरत आहेत, ती काश्मीरचा चेहरा बनण्यास पात्र नाहीत का? फक्त कट्टरतावादी चेहराच का लोकांपुढे आणला जातो?

हजारो काश्मिरी स्वतः दहशतवाद्यांच्या गोळीबाराचे आणि क्रूर हल्ल्यांचे बळी पडले आहेत. काश्मीर कथेची ही दुसरी बाजू लोकांच्या विस्मरणात गेली आहे. दुसऱ्या बाजूला काश्मीरमधील विविध कथांचा एकच निष्कर्ष निघतो की सुरक्षा दल हे सर्व काश्मिरींना ठार मारण्यासाठी तैनात करण्यात आले आहेत. पण, सत्य खूपच वेगळे आहे. २०११ मध्ये, ‘टाइम्स ऑफ इंडिया’ या वृत्तपत्रात प्रकाशित करण्यात आलेल्या एका वृत्तानुसार, राज्यातील उपलब्ध माहितीच्या आधारावर काश्मीरमध्ये १,००,००० नागरीक ठार झाले हा दावा नाकारला गेला. या वृत्तात प्रकाशित केलेल्या आकडेवारीनुसार, १९९० पासून, सर्वाधिक मृत व्यक्तींमध्ये (२१३२३) दहशतवादी/ दुसऱ्या देशातील घुसखोरांचा समावेश होता. त्यानांतर दहशतवाद्यांनी ठार केलेल्या नागरिकांचा (१३२२६) समावेश होता. सुरक्षा दलाच्या मृत्युमुखी पडलेल्या ५३६९ सैनिकात, १५०० जम्मू आणि काश्मीर पोलिसांचा देखील समावेश होता. ३६४२ नागरीक हे सुरक्षा दलांच्या कारवाईत मारले गेले. उदाहरणार्थ, गाव कडाल हत्याकांड; २००८ आणि २०१० मध्ये झालेल्या निदर्शकांना ठार मारले गेले.

या आकडेवारीमुळे काश्मीरमध्ये भारत-विरोधी मत निर्माण होते, पण दुर्दैवाने सरकारला, सुरक्षा दलांना किंवा मीडियाला हे वास्तव सर्वासमोर आणून त्याविरुद्ध आंदोलन करण्याची गरज वाटली नाही. खोट्या शब्दांनी सत्याची जागा घेतली आहे आणि ज्वलंत विचारांनी समजूतदारपणा आणि विवेकाची जागा घेतली आहे. टीआरपीच्या स्पर्धेत धावणाऱ्या राष्ट्रीय मीडियाने – लिबरल आणि जिंगोईस्ट या दोन्ही प्रकारच्या मीडियाने – काश्मीर कथेतून हा ओंगळवाणा प्रकार उभारला आहे. बहुतेक काश्मिरी तज्ज्ञांच्या अज्ञानामुळे आणि पूर्वाग्रहांमुळे या अशा प्रकारच्या मीडियाने वास्तविकतेवर आधारित ज्ञानावर विजय मिळवला आहे.

आज भारताच्या जनमानसात, काश्मिरी व्यक्ती म्हंटलं की बुरहाण वाणी, कट्टरतावाद, दहशतवाद, सीमापल्याडचा दहशतवाद, सुसाईड बॉम्बिंग आणि “राष्ट्रद्रोही” जनतेचे पीक जिथे उगवते तो प्रदेश या गोष्टी आठवतात, परंतु कोणालाच ते १३००० काश्मिरी आठवत नाहीत जे त्याच दहशतवादाचे बळी आहेत ज्यामुळे भारतातील लोक त्रस्त आहेत.

दुसऱ्या बाजूला, प्रत्येक काश्मिरी व्यक्तीचा ब्रेनवॉश करण्यात येतो की त्यांनी विश्वास ठेवावा की ” ते (सुरक्षा दल आणि भारत सरकार) आपल्याला सर्वांना ठार मारणार आहेत.”  काश्मिरी जनतेला आपल्या स्वतःच्याच प्रदेशात ज्या क्रूर हिंसाचाराचा सामना करावा लागत आहे, त्याबद्दल कोणी राजकारणी, आंदोलक किंवा एक विवेकी नागरिक पुढे येण्यास तयार नाही. १५ वर्षाच्या फरदीन खंडाय याला ‘फिदाइन’ बनण्यापासून कोणीही रोखू इच्छित नाही. बंदुकांच्या वापराबद्दल कोणीच आवाज उठवत नाही. हिंसाचाराच्या होत असलेल्या गौरवाचे कोणीही खंडन करत नाही.

बुरहाण वाणी आणि झाकीर मुसासारखे काश्मीरचा चेहरा म्हणून काश्मीरवर लादले जात आहेत. जम्मू  काश्मीर राज्याने देशाला शेकडो गायक, डॉक्टर्स, इंजिनीअर्स, सैनिक, आयएएस आणि आयपीएस अधिकारी दिले आहेत. तसेच बॉलीवूड अभिनेते, खेळाडू, वैज्ञानिक, कादंबरीकार, चित्रपट निर्माते, अभ्यासक, रेडिओ जॉकी, फॅशन डिजाइनर आणि मॉडेल्स काश्मीरमधून आले आहेत. मग आज बंदूकधारी मनुष्य ही काश्मीरची एकमात्र प्रतिमा कशी काय बनली? जनमानसात काश्मिरी नागरिक हा फक्त एकच महत्वाकांक्षा बाळगून असतो, असे का दाखविले जातेय? काश्मीरचे हे असे चित्रण करण्यास कोण जबाबदार आहे?

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.