Author : Manoj Joshi

Published on Jun 03, 2021 Commentaries 0 Hours ago

कोरोनाचा विषाणू चीनी प्रयोगशाळेतून बाहेर पडल्याचे सिद्ध झाले, तर त्याचे राजकीय जागतिक पातळीवर परिणाम चीनला भोगावे लागतील.

कोरोनावरून पुन्हा चीन-अमेरिका जुंपणार?

सार्स-को व्ही-२ किंवा कोविड १९ हा विषाणू चीनमधील वुहानच्या प्रयोगशाळेमधून अपघाताने निसटला आहे की झूनॉटिकली तो प्राण्यांपासून माणसांमध्ये संक्रमित झालेला आहे, याबाबत आपल्याला सध्या काहीच माहिती नाही. हा विषाणू प्रयोगशाळेतूनच बाहेर पडला असावा, असा प्राथमिक अंदाज आधी बांधला गेला होता. पण, आता हाच मुद्दा पुन्हा एकदा मुख्य प्रवाहात आलेला आहे.

कोविड १९ या जागतिक महामारीची सुरुवात कुठून झाली? याचा पुढील तपास करण्याची घोषणा गेल्या आठवड्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी केलेली आहे. बायडन यांच्या निवेदनात त्यांनी असे म्हटले आहे की सध्याच्या घडीला या रोगाचे उगमस्थान कोणते, याबाबत अमेरिकन गुप्तचर संघटनेकडे प्रबळ पुरावे उपलब्ध नाहीत. पण, उपलब्ध पुराव्यानुसार हा विषाणू प्रयोगशाळेतून अपघाताने निसटला आणि परिणामी या रोगाचा फैलाव झाला आहे, असे म्हणता येऊ शकेल. बायडन यांनी गुप्तचर संघटना तसेच राष्ट्रीय प्रयोगशाळांना ९० दिवसांमध्ये या प्रकरणाचा तपास करून निश्चित निष्कर्षापर्यंत जाण्यासाठीच्या सूचना दिलेल्या आहेत.

ही एक गंभीर घटना आहे. जर तपासात कोरोनाचा विषाणू चीनी प्रयोगशाळेतून बाहेर पडल्याचे सिद्ध झाले, तर त्याचे राजकीय परिणाम चीनला भोगावे लागतीलच. पण, त्याही सोबत चीनचे जगासोबतचे संबंधही धोक्यात येतील. पण खरे पाहता चीन अशा कोणत्याही विधानाला मान्यता देणार नाही आणि चीनच्या सहकार्याविना हा तपासही पूर्ण होऊ शकणार नाही, हे मात्र सत्य आहे.

३० मार्च रोजी सध्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे व्यवस्थापकीय संचालक टेड्रोस अधनोम घेब्रेयेसस यांनी गेल्यावर्षी डब्ल्यूएचओ आणि चीन यांनी संयुक्तरित्या केलेल्या तपासावर ताशेरे ओढले आहेत. या तपासाअंती डब्ल्यूएचओच्या अहवालात असे म्हटले गेले होते की, प्रयोगशाळेत अपघाताने गळती होऊन हा विषाणू बाहेर पडण्याची शक्यता नगण्य आहे. तर प्राण्यांमधून हा विषाणू माणसांमध्ये संक्रमित होण्याच्या शक्यता सर्वात जास्त आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या विधानाला आधार देणारे ठोस पुरावे मात्र या अहवालामध्ये दिलेले नाहीत. एकूणच या सर्व घटनांमुळे पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा प्रसार कसा झाला ही बाब चर्चेत आलेली आहे.

डॉ. टेड्रोस यांच्या मते ज्या शास्त्रज्ञांच्या चमूने हा अहवाल प्रस्तुत केला त्यांना प्राथमिक माहिती मिळवण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला. डॉ. टेड्रोस यांनी असेही म्हटले आहे की हा अहवाल आणि त्यामध्ये केलेले मूल्यांकन सविस्तर आहे असे मला वाटत नाही. अंतिम निष्कर्ष काढण्यासाठी अधिक सखोल माहिती आणि अभ्यासाची गरज आहे. डॉ. टेड्रोस यांच्यावर चीनबाबत मऊ भूमिका घेण्यासाठी टीका केली जाते. म्हणूनच त्यांच्याकडून असे विधान आल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

अमेरिका, जपान, कॅनडा, डेन्मार्क, नॉर्वे यांसारख्या १३ देशांनी एकत्र येऊन एक संयुक्त निवेदन जारी केले आहे. या निवेदनात मूळ डेटा आणि माहिती यांच्या अभावामुळे डब्ल्यूएचओ आणि चीन यांच्यावर टीका करण्यात आली आहे. तसेच कोविड १९ महामारीच्या उगमाचे सखोल, स्वतंत्र, कोणत्याही दबावाशिवाय अभ्यास, अन्वेषण आणि मूल्यमापन व्हायला हवे, असेही या निवेदनात म्हटले आहे.

चीन – डब्ल्यूएचओ यांच्या संयुक्त अहवालला इयूने ‘उपयुक्त पहिली पायरी’ असे म्हटले आहे. पण यासोबतच संबंधित सर्व ठिकाणे, संबंधित सर्व व्यक्ती, प्राणी आणि उपलब्ध पर्यावरणीय माहिती यांचा वेळेत अभ्यास करून डब्ल्यूएचओने या अहवालाचा फॉलोअप करणे गरजेचे आहे, असेही म्हटले आहे.

जर, चीन यात दोषी नसेल तर त्यांनी काही दडवण्याचेही कारण नाही. पण ह्यात ‘वुल्फ वॉरियर’ मोठी भूमिका बजावत आहेत. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लीजियान यांनी असे म्हटले आहे की जर अमेरिकेला पारदर्शक तपास हवा असेल तर त्यांनी फोर्ट डेट्रिक आणि परदेशात स्थित असलेल्या बायोलॅब जगासाठी खुल्या कराव्यात. तसेच कोविड १९ महामारीबाबत बोलताना ते असही म्हणाले की २०१९ या वर्षाच्या मध्यामधे या संबंधीचे संकेत, अहवाल आणि संशोधन जगात वेगवेगळ्या ठिकाणी सापडले आहे. म्हणजेच चीनमधून हा विषाणू संक्रमित न होता, उलट चीन या संक्रमणाचा बळी ठरलेला आहे, हे दाखवण्याकडे लीजियान यांचा रोख होता.

हा विषाणू चीनच्या बाहेरून आल्याचा मुद्दा चीनला पुढे करायचा आहे. ऑक्टोबर २०१९ मध्ये वुहान या शहरात सातव्या आर्मी गेम्सचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी अमेरिकेचे प्रतिनिधीही उपस्थित होते. त्यामुळे हा विषाणू त्यांच्यासोबत आल्याचा चीनचा दावा आहे. या बाबतीत डब्ल्यूएचओ-चीनच्या अहवालात काही विशेष आढळून आलेले नाही.

सद्यस्थितीत याला नवीन काही वळण लागण्याची शक्यता कमी आहे. ट्रम्प प्रशासनाने या विषाणूचा वापर चीनला नामोहरम करण्यासाठी केला. पण हे करताना अमेरिकेमधील परिस्थिती योग्यरित्या हाताळणे मात्र त्यांना जमले नाही. एका अहवालामधून असे दिसून आले की पोम्पेओ यांनी करोना विषाणूच्या उगमाचा शोध घेण्यासाठी एक स्वतंत्र पण गुप्त तपास सुरू केला होता. हा अहवाल अभ्यासल्यानंतर बायडन यांच्या टिमने हा तपास ताबडतोब थांबवला. ट्रम्प प्रशासनाने केलेल्या चुकीत गुंतत न जाता त्यातून योग्य तो बोध घेऊन पुढील पावले उचलण्याकडे बायडन यांचा कल आहे, असे दिसून येते.

बायडन यांनी पदग्रहण करण्याच्या काही दिवस आधी पोम्पेओ यांच्या स्टेट डिपार्टमेंटने अवर्गीकृत गुप्तचर माहितीवर आधारित एक ‘फॅक्ट शिट’ प्रसिद्ध केली. यात २०१९ मध्ये वुहान इंस्टीट्यूट ऑफ वायरोलॉजी मधील आजार, डब्ल्यूआयव्ही मधील संशोधनाचे स्वरूप ( धोकादायक रोगचा विषाणू तयार करण्याचे काम आणि त्यासाठी वापरले गेलेले तंत्रज्ञान) आणि डब्ल्यूआयव्ही मधील गुप्त लष्करी हालचाली या तीन महत्वाच्या मुद्द्यांचा तपास करणे गरजेचे आहे असे मांडलेले आहे.

चीनी वायरोलॉजिस्ट शी झेंगली या वुहान इंस्टीट्यूट ऑफ वायरोलॉजी येथे काम करतात. करोना विषाणूचा वटवाघूळांमुळे फैलाव होतो या त्यांच्या अभ्यासासाठी त्यांना ‘बॅट लेडी’ असे संबोधले जाते. २०२०च्या फेब्रुवारी मध्ये त्यांच्या प्रयोगशाळेत करोनाचा विषाणू तयार केला गेला या आरोपांचे त्यांनी खंडन केले आहे. डब्ल्यूआयव्हीमध्ये मोठ्याप्रमाणावर रोगकारक विषाणू अभ्यासासाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे येथूनच महामारीची सुरुवात झाली आहे असा अंदाज बांधला जात आहे. या प्रयोगशाळेच्या वुहानमधील भौगोलिक स्थानामुळे हा विषाणू तेथून शहरातील लोकांमध्ये पसरला, असे म्हटले जात आहे.

२०२०च्या मे महिन्यात वॉशिंग्टन पोस्टच्या सत्य पडताळणी करणार्‍या टीमने हे घोषित केले आहे की सर्व वैज्ञानिक पुराव्यांचा नीट अभ्यास करता हे निदर्शनास आले आहे की या विषाणूचा उगम निसर्गात झालेला आहे. चीन- डब्ल्यूएचओच्या अहवालातही असे म्हटले गेले आहे की हा विषाणू प्रयोगशाळेतून निसटण्याची शक्यता कमी आहे. २०२०मध्ये ट्रम्प यांनी घेतलेली भूमिका पाहता प्रयोगशाळेची शक्यता कमी मानली गेली. पण हा विषाणू झूनोटीकली तयार झाल्याचेही पुरावे उपलब्ध नाहीत.

२०२० या वर्षामध्येच हा विषाणू प्रयोगशाळेत निर्माण केला गेल्याचे अनेक सिद्धान्त मांडण्यात आले. या वर्षीच्या मे महिन्यात निकोलास वेड यांनी बुलेटीन ऑफ अटॉमिक सायंटिस्टमध्ये लिहीलेल्या प्रबंधात काही महत्वाचे मुद्दे मांडले आहेत त्यामुळे हा विषाणू प्रयोगशाळेतून निसटल्याच्या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आले आहे. निकोलास वेड यांच्या म्हणण्यानुसार ही परिस्थिती अत्यंत गुंतागुंतीची आहे. त्यामुळे मूळ निष्कर्षामध्ये त्यांनी असे लिहिले आहे की हे प्रकरण फक्त चीनी अधिकार्‍यांपुरते मर्यादित न राहता अमेरिकेचाही यात काही सहभाग आहे का? हे तपासणे गरजेचे आहे.

शी यांचे करोना विषाणूवरील संशोधन हे यूएस नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ हेल्थद्वारे अनुदानित आहे, याकडे चीन किंवा अमेरिका लक्ष देण्यास तयार नाही, असे मत वेड यांनी मांडले आहे. तसेच त्यांनी प्रसारमाध्यमांनाही यात दोष दिलेला आहे. यासोबतच त्यांनी ‘गेन ऑफ फंकशन’ संशोधनाचा मुद्दाही मांडलेला आहे. यानुसार चीन, अमेरिका आणि युरोपमधील देश त्यांच्या प्रयोगशाळांमध्ये अत्यंत धोकादायक विषाणू तयार करतात. हे विषाणू निसर्गात सापडणार्‍या विषाणूंपेक्षा अधिक धोकादायक असतात. यावर निर्बंध आणले तर भविष्यात त्याचा फायदाच होणार आहे.

वेड यांचा लेख प्रसिद्ध झाल्यानंतरच्या पुढच्याच आठवड्यात कॉंग्रेससमोर बोलताना नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ एलर्जि अँड इन्फेक्शीअस डिसीजचे संचालक डॉ. अॅंथनी फाउसि यांनी एनआयएचने डब्ल्यूआयव्हीमधील कोणत्याही संशोधनासाठी आर्थिक मदत केलेली नाही हे स्पष्टपणे मांडले आहे. अशा प्रकारच्या संशोधनांना २०१४ मध्ये ओबामा प्रशासनाने बंदी घातलेली आहे. पण डब्ल्यूआयव्ही दिली गेलेली आर्थिक मदत एकोहेल्थ अलायांस या एनजीओ मार्फत अप्रत्यक्षपणे दिली गेली नाही ही बाब मात्र यातून सिद्ध होत नाही.

प्रयोगशाळेतील अपघातात विषाणू निसटण्याचा सिद्धान्त आणि त्याचे झूनोटिकल स्पीलओवर अजूनही व्यवहार्य असल्यामुळे या प्रकरणात नव्याने चौकशी व्हावी, असे पत्र अव्वल एपीडेमोलॉजिस्ट आणि बायोलॉजिस्टच्या टीमने १४ मे रोजी जर्नल सायन्स मध्ये प्रसिद्ध केले आहे. डब्ल्यूएचओ-चीनच्या अहवालात प्रयोगशाळेतील अपघातात विषाणू निसटण्याचा मुद्दा वरवर हाताळला गेला आहे असेही त्यांचे म्हणणे आहे.

सर्वात महत्वाचे म्हणजे या विषाणूचे उगमस्थान आणि तो प्रयोगशाळेतून कसा सुटला हे दोन्ही समजून घेण्यासाठी चीनमधल्या परिस्थितीचा अभ्यास करावा लागेल. अर्थात याला चीनकडून नाकारले जाण्याची शक्यता अधिक आहे. जर असे काही झाले असेल तर चीनच्या अधिकार्‍यांनी योग्य ती काळजी घेऊन संसर्ग रोखण्याचे सर्व नियम पाळले असतील, इतकीच आशा आपण ठेऊ शकतो. यात जगातील सर्व शास्त्रज्ञांनी एकत्र येऊन ‘गेन ऑफ फंकशन’ वर बंदी घातली तर त्याचा जगाला फायदाच होईल.

सध्याची राजकीय परिस्थिती पाहता हा वाद इतक्या लवकर शमेल, असे वाटत नाही. पण जर यात काही नवीन घडामोडी घडल्या आणि गोष्टी पुढे आल्या तर त्याचे परिणाम भीषण असतील हे मात्र खरे.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.