Author : Anchal Vohra

Published on Mar 17, 2021 Commentaries 0 Hours ago

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी अमेरिका-इराक संघर्ष संपविण्याकडे वाटचाल करताच, सामाजिक असंतोष संपविण्यासाठी झालेली पोप यांची ही इराकभेट महत्त्वाची आहे.

पोप यांच्या इराकभेटीचे फलित

रोमन कॅथलिक चर्चचे प्रमुख पोप फ्रान्सिस यांनी नुकतीच इराकला ऐतिहासिक भेट दिली. या वेळी पोप यांनी इराकमधील शिया पंथीयांचे धर्मगुरू अयातुल्ला सिस्तानी यांची भेट घेतली. ती अत्यंत प्रतीकात्मक समजली जाते; तसेच त्यांनी इराकमधील प्राचीन उर या शहरालाही भेट दिली. हे शहर एकेश्वरवादी ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या प्रेषित अब्राहमचे जन्मस्थान आहे. आपल्या तीन दिवसांच्या छोट्या दौऱ्यात पोप यांनी मोसूलमधील एका चर्चमध्ये जमलेल्या जनसमुदायाला उद्देशून भाषण केले. मोसूल ही एकेकाळी ‘इस्लामिक स्टेट’ (आयएस) ची इराकमधील राजधानी होती.

या भाषणादरम्यान पोप म्हणाले, ‘नागरीकरणाचे केंद्रस्थान असलेल्या या देशाला इतक्या आत्यंतिक वेदनेतून जावे लागणे, हा किती क्रूरपणा आहे. अनेक प्राचीन धर्मस्थळे उद्ध्वस्त करण्यात आली आणि हजारो मुस्लिम, ख्रिश्चन, याझिदी आणि अन्य धर्मियांना सक्तीने स्थलांतर करावे लागले अथवा ते मारले गेले. ’

दहशतवादी संघटनेकडून चर्चचे रूपांतर तुरुंगात करण्यात आले. जे कोणी दहशतवाद्याविरोधात बोलेल अथवा त्यांचे नियम मोडेल, त्यांना या तुरुंगात बंदिवान करण्यात आले. तुरुंगात टाकलेले बहुतांश नागरिक अल्पसंख्याक गटातील होते. मोसूलवर पुन्हा ताबा मिळवण्याच्या इराकी लष्कराच्या प्रयत्नांना साथ देण्यासाठी अमेरिकेच्या नेतृत्वाखालील फौजांनी नंतर हा चर्च बॉम्बफेक करून उद्ध्वस्त केला.

इराकमधील ‘निनेव्ह प्लेन्स’ या भागात मोठ्या संख्येने राहणारे कॅल्डिअन ख्रिश्चन हे ‘इस्लामिक स्टेट’च्या दहशतवाद्यांचे प्रमुख लक्ष्य होते. ‘आयएस’च्या दहशतवाद्यांनी ख्रिश्चनांची धर्मस्थळे उद्ध्वस्त केली, उमद्या-कार्यक्षम पुरुषांना ठार केले आणि ख्रिश्चन मुलींचे अपहरण केले. त्यांनी धार्मिक पुतळ्यांचा शिरच्छेद केला आणि मुस्लिम अल्पसंख्य व ख्रिश्चनांपेक्षाही आपण श्रेष्ठ असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला.

हजारो ख्रिश्चन ‘आयएस’च्या पंजातून सुटका करून घेत पळून गेले आणि जे तेथेच राहिले किंवा परतले त्यांना आपली घरे आणि मालमत्ता गमवाव्या लागल्या. सर्व अल्पसंख्याकांना इस्लाम धर्म स्वीकारायला भाग पाडण्यात आले किंवा मग फासावर लटकाविण्यात आले. सीरियामधील बागौझ येथे २०१८ मध्ये झालेल्या धुमश्चक्रीत आयएसचा संपूर्ण पराभव होईपर्यंत दहशतवाद्यांनी याझिदी पुरुषांना कायमचे जायबंदी केले होते आणि याझिदी स्त्रियांचे लैंगिक शोषण करणे सुरू ठेवले होते.

दहशतवाद्यांनी २०१४ मध्ये मोसूलमधील ३९ भारतीय कामगारांचे अपहरण केले होते आणि दिवंगत माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या सर्वांना मोसूल शहराच्या बाहेरच्या बाजूला बादूश तुरुंगात त्यांना कैद केले होते. मात्र, २०१६ मध्ये मी घेतलेल्या शोधानुसार भारतीय कामगार या तुरुंगात त्या वेळी नव्हते. हा तुरुंग नंतर एक तर ‘आयएस’च्या दहशतवाद्यांनी किंवा आघाडीच्या फौजांनी केलेल्या बॉम्बहल्ल्यात जमीनदोस्त करण्यात आला होता. या बॉम्बहल्ल्यात या तुरुंगात असलेले अनेक शिया कैदी आणि कदाचित भारतीयही ठार झाले होते.

सामाजिक असंतोषाचा अध्याय संपवण्याचे उद्दिष्ट ठेवून कॅथलिक पोप इराकच्या दौऱ्यावर गेले होते. तेही अमेरिकेचे नवे अध्यक्ष जो बायडन यांनी अमेरिकेकडून इराकसह अन्य देशांशी सुरू असलेले संघर्ष कायमचे थांबविण्यात येत असल्याचे आश्वासन दिले होते, त्यानंतरच.

पोप फ्रान्सिस यांच्या इराक भेटीमुळे ‘आयएस’च्या विचारांनी भारलेल्या आणि ख्रिश्चनांना शत्रू समजणाऱ्या लोकांच्या मनावर निश्चितच परिणाम होऊ शकतो, असा दावा तज्ज्ञांनी केला आहे. इराणसमवेत पुन्हा एकदा अणूकरार करण्याची तयारी बायडन यांनी जाहीररीत्या दर्शवल्यानंतर पोप यांचा इराक दौरा पार पडला आहे. इराकमध्ये असलेले अमेरिकी सैन्य आणि अमेरिकनांना हुसकावून लावण्याची मनीषा असलेले लष्करी शिक्षण घेतलेले इराक सरकारचे समर्थन लाभलेले नागरिक यांच्यात शांतता निर्माण होण्याच्या दृष्टीने हे पहिले चिन्ह असल्याचे अनेकांना वाटते.

तथापि, इराकमधील ख्रिश्चन आणि मुस्लिमांमध्ये ‘आयएस’च्या दहशतवाद्यांमुळे घबराट निर्माण झाली आहे. इराक आणि सीरियामध्ये विशेषतः मोसूलजवळच्या सीमेवरील वाळवंटी प्रदेशात आयएसचे हल्ले मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. या दहशतवादी संघटनेच्या म्होरक्याला यमसदनी धाडले गेले असले, तरीही त्याचे विचार आजही कायम आहेत. ‘आयएस’चे अनेक दहशतवादी हेतूपुरस्सर लपून बसले आहेत, त्यांना पुन्हा गट स्थापन करायचा आहे आणि एक दिवस पुन्हा एकदा एक संघटना म्हणून सक्रिय व्हायचे आहे. असे सांगतात, की सुमारे १० हजार ते १५ हजार दहशतवादी या प्रदेशात आजही विखुरलेले आहेत आणि अमेरिकेने ३० ते ५० कोटी डॉलरचा निधी राखून ठेवला आहे.

‘आयएस’च्या अलीकडील हल्ल्यांमधून या संघटनेची जास्तीतजास्त नुकसान करण्याची आणि समाजामध्ये दुहीची बिजे रोवण्याची क्षमता दिसून येते. गेल्याच महिन्यात बगदादच्या गजबजलेल्या बाजारात ‘आयएस’च्या आत्मघातकी दहशतवाद्यांनी तेथील दुकानदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला आणि नंतर आत्मघातकी स्फोट केला. त्यानंतर ‘आयएस’ने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आणि हा हल्ला इराकच्या सुरक्षा दलाला आणि शिया नागरिकांना लक्ष्य करून करण्यात आला होता, असा दावा केला.

सध्याच्या इराकने ‘एडी’च्या पहिल्या शतकात ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. आता इराकच्या नकाशातून ख्रिश्चनांना पुसून टाकण्याची ‘आयएस’ची इच्छा आहे. त्यामुळेच जे ख्रिश्चन इराकमध्येच राहिले किंवा जे तेथे परतले, त्यांच्यासाठी या संघटनेचे पुनरुज्जीवन ही कायमस्वरूपी भीतीच ठरली आहे. पोप यांनी दिलेला शांतीचा संदेश शाश्वत राहील आणि तो ‘आयएस’चा प्रभाव व मूल्य क्षीण करील, असे या ख्रिश्चनांना वाटत आहे. पण ते केवळ एक दिवास्वप्नच ठरू शकते.

पोप फ्रान्सिस यांनी सन २०१९ मध्ये संयुक्त अरब अमिरातीला भेट दिली आणि कैरो येथील अल अझहर मशिदीच्या प्रमुख इमामांची भेट घेतली होती. हे इमाम जगातील सर्वांत वरिष्ठ सुन्नी इमामांपैकी एक आहेत. त्यांनी इमामांसमवेत एका शांतता करारावर सही केली. या कराराचे नाव ‘मानवतेचा दस्तऐवज.’  धर्माच्या नावाखाली द्वेष, हिंसाचार, कट्टरवाद आणि अंध धर्मांधता यांचा अंत व्हावा, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले. आपल्या इराकभेटीदरम्यान त्यांनी आपल्या विश्वासाचा पुनरुच्चार केला. ‘भ्रातृहत्येपेक्षा बंधुत्वभाव अधिक टिकावू आहे, द्वेषापेक्षा आशा अधिक शक्तिशाली आहे आणि युद्धापेक्षा शांतता अधिक ताकदवान आहे,’ असे ते या वेळी म्हणाले होते.

पोप यांचे वरच्या स्तराशी कितीही संबंध असले, तरीही त्यांचा प्रभाव आणि आवाहन यांना मर्यादा आहेत. त्यांनी कदाचित या प्रदेशातील मुस्लिमांच्या हृदयाची तार छेडली असेल, त्यांना मवाळ बनवले असेल. तरीही ‘आयएस’ची पाळेमुळे उखडून संपविणे त्यांना शक्य नाही.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.