Author : Nadine Bader

Published on Aug 25, 2020 Commentaries 0 Hours ago

भयाचे राजकारण कसे असते, त्यात सामान्य माणसे कशी अडकतात आणि यातून लोकांना सावध करण्याचे प्रयत्न अनेकदा कसे विफल ठरतात, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.

भय इथले संपत (का) नाही?

Source Image: researchcentre.trtworld.com

गेले पाच-सहा महिने जगातील प्रत्येकजण कोरोनाच्या भीतीने ग्रासलेला आहे. कोरोनाचा मृत्यूदर कमी असला तरी, त्यामुळे होणाऱ्या सामाजिक धक्क्यामुळे प्रत्येकजण मनातून हादरलेला आहे. कोरोना या आजारापेक्षाही त्याच्यामुळे निर्माण होणाऱ्या सामाजिक असुरक्षिततेची भीती, आज सर्वत्र व्यापून राहिलेली आहे. भीती ही माणसाची आदिम आणि अत्यंत प्रबळ अशी भावना आहे. त्यामुळे भीतीचा वापर करून अनेकजण आपला फायदा करून घेत असतात. राजकारण, समाजकारणही त्यातून सुटलेले नाही. या भीतीच्या राजकारणाचे गणित अमेरिकेत आणि भारताच्या संदर्भात कसे गुरफटलेले आहे, ते समजून घेणे आज महत्त्वाचे ठरले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यक्षीय कारकीर्दीवर प्रकाशझोत टाकणारे एक उत्तम पुस्तक बॉब वुडवर्ड यांनी लिहिले आहे. त्या पुस्तकाचे नाव आहे FEAR. वुडवर्ड म्हणजे प्रचंड गाजलेल्या वॉटरगेट प्रकरणात अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांचे पितळ उघडे पाडून, त्यांना राजीनामा द्यायला भाग पाडणारे ‘द वॉशिंग्टन पोस्ट’चे पत्रकार. त्यांनी निक्सननंतरच्या जवळपास सगळ्याच राष्ट्राध्यक्षांच्या कारकिर्दीवर पुस्तकं लिहिली. ट्रम्प यांच्या पहिल्या निवडणुकीपासून ते २०१९ पर्यंतच्या कारकिर्दीला पुस्तकबध्द करताना त्यांनी समर्पक शीर्षक दिले… FEAR म्हणजेच भीती, भय!! अमेरिकन मनात सतत कशाची ना कशाची भीती घालत राहून, राजकीय सत्ता मिळवलेल्या ट्रम्प यांच्या विधिनिषेधशून्य कारकिर्दीचा हा अत्यंत कठोर दस्तावेज आहे. जाणकार वाचकांनी नक्की वाचावे असे हे पुस्तक आहे.

या पुस्तकाच्या निमित्ताने अमेरिकेत, भारतात आणि जगभर सुरू असलेल्या राजकारणाची आठवण येणे साहजिक आहे. अमेरिकेतील सत्ताकारणाची कार्यपद्धती पाहताना भारतातील राजकारणाची सतत आठवण येत राहते. या दोन्ही सत्तामध्ये एक साम्य आहे. दोन्ही ठिकाणी कशा ना कशाचे भय नागरिकांना घालून, या दोन्ही सत्ता टिकलेल्या आहेत. अमेरिकेत हे भय तिथल्या बहुसंख्य श्वेतवर्णीयांना घातले जाते आणि भारतात बहुसंख्य हिंदूंना! बहुसंख्यांना अल्पसंख्यापासून असलेल्या भीतीची सतत आठवण करून देत, या दोन्ही सत्ता टिकून आहेत.

पण, ह्या भयाच्या खोट्या, भ्रामक कारस्थानापासून सर्वसामान्य लोकांनी दूर जावे आणि कुठल्याही प्रचारीय सापळ्यात न अडकता आपला स्वतंत्र विचार करावा, असा प्रयत्न दोन्ही देशांतील विवेकी मंडळी करत असतात. भयाचे हे राजकारण कसे असते, त्यात सामान्य माणसे कशी अडकत जातात आणि अनेकदा यातून लोकांना सावध करण्याचे विवेकवादी प्रयत्न कसे विफल ठरतात, हे समजून घेणे नागरिक म्हणून महत्त्वाचे आहे. तसेच धोरणकर्त्यांनाही त्याची जाणीव असणे, लोकहिताचे आहे.

बहुसंख्यांना भीती घालत केलेला प्रचार हा काही आजकालचा नाही. भारतात जर संविधानसभेने बनवले गेलेले संविधान स्वीकारले गेले, तर या देशातला हिंदू धर्म अडचणीत येईल असा दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने १९५० साली केला होता. त्याहीआधी १९३९ मध्ये भारतात हिंदू आणि मुसलमान अशी दोन राष्ट्रे राहतात आणि स्वतंत्र होऊ घातलेल्या देशात जर त्या दोघांना एकत्र रहावे लागले तर हिंदू कमजोर ठरतील आणि म्हणून हिंदूंना स्वतंत्र देश हवा, अशी मांडणी हिंदू महासभेच्या अधिवेशनात विनायक दामोदर सावरकरांनी केली होती. पण, या प्रचाराला चोख उत्तर देणारा आणि हिंदू धर्माच्या उदारमतवादी, सहिष्णू, मध्यममार्गी मुख्य प्रवाहावर तेव्हा गांधीजींचा प्रभाव होता.

गांधी स्वतःला जाहीरपणे ‘सनातनी हिंदू’ म्हणवून घ्यायचे. गांधी सामाजिक आयुष्यात धर्माला सहिष्णू आचरणाचा एक भाग बनवत होते आणि वैयक्तिक आयुष्यातील इतर धार्मिक आचरणांना सामाजिक, राजकीय आयुष्यात आणत नव्हते. त्यामुळे त्या गांधी युगात ‘हिंदू’ना कधी असुरक्षित वाटले नाही. तो वाढू लागला साधारण ऐंशीच्या दशकाच्या शेवटी शेवटी. आधी शिखांमधल्या काहींची खलिस्तानची बंडखोर मागणी झाली. नंतर रामजन्मभूमी आंदोलन झाले. त्यानंतर हिंदूना सतत असुरक्षित असल्याचे दाखविण्याचा प्रचार भारतीय राजकारणाचा भाग बनला.

गेल्या सहा वर्षात भाजपच्या सत्ता असताना या साऱ्याबाबत अनेक ठिकाणी लिहिले, बोलले गेले आहे. त्यामुळे हे काही नवे नाही. भाजपचे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हे यश आहे की हिंदू समाजाच्या एका मोठ्या वर्गाला – सर्व जातींमध्ये असणाऱ्या या वर्गाला – असे खरंच वाटत आहे की, हिंदू धर्म हा धोक्यात आला आहे आणि तो वाचवण्याचे काम नरेंद्र मोदी, भाजपा आणि संघ करत आहेत. हा धर्म कुणापासून धोक्यात आलाय? तर याला तीन प्रमुख उत्तरे आहेत. मुस्लिमांपासून, ख्रिश्चन मिशन-यांपासून आणि या दोघांना पाठीशी घालणा-या तथाकथित काँग्रेसपासून. या तिघांबद्दलची भीती वेगवेगळ्या पद्धतीने प्रसारित करून आपली खुंटी बळकट करण्याचे राजकारण देशात होत आले आहे.

या प्रचाराला बळकट करणाऱ्या, मजबुती देणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. सततचा सार्वत्रिक-टीव्ही ते सोशल मीडियावरचा- प्रचार… ज्याला प्रोपगंडा म्हणतात, तो या सगळ्यात आघाडीवर राहिला. ‘अमुक एका देशात तिथले लोक अमुक टक्के होते, पण मुसलमान त्या देशात गेल्यापासून पन्नास वर्षात, साठ वर्षात ते बहुसंख्य झाले. अमुक एका देशात ख्रिश्चनांनी तिथल्या धर्माच्या प्रार्थनास्थळांना उद्ध्वस्त करून आपली चर्चेस बांधली’ हा एक प्रचाराचा भाग असतो. तसेच, भारतात मुसलमानांना समान नागरी कायदा लागू केला पाहिजे, नाहीतर चार बायका वगैरे करून त्यांना अनेक मुले होतात हा दुसरा भाग असतो. हे सगळे इतकी वर्षं सुरू राहिले कारण काँग्रेसची सत्ता होती आणि ते या सगळ्याला ताकद देत होते, सोनिया गांधी या ख्रिश्चन असल्यामुळे त्या हिंदूविरोधी आहेत आणि नेहरू खानदान हे मूळ मुस्लिम आहे, हाही त्या प्रचारव्यूहाचा एक भाग आहे.

हा प्रचाराचा स्वीकार करणारे, स्वीकारणारे हिंदू सर्व जातीय, सर्व वर्गीय आहेत. हा कोणी भ्रम करून घ्यायला नको की फक्त उच्च वर्णीय किंवा गरीब लोकंच ह्यावर विश्वास ठेवतात. उच्चवर्गीय सोसायट्यांच्या व्हॉट्सअप ग्रुप्सवर जेव्हा या मुद्द्यांवरून वितंडवाद होतात तेव्हा या मंडळींनी साधन संपत्तीला समंजसतेची, सहचार्याची आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अभ्यासपूर्ण माहितीची जोड दिलेली नाही, ही गोष्ट लक्षात येते. निव्वळ उच्चवर्णीयच नाही तर ओबीसी, हिंदू दलितांमधला, आदिवासींमधला मोठा वर्गसुद्धा या चर्चा हमरीतुमरीवर येऊन करताना आपण बघतो. या सगळ्याचा अर्थ इतकाच आहे की, हिंदू धर्मातल्या एका मोठ्या वर्गाने धर्माच्या बद्दलच्या या प्रचाराच्या मा-याला खरे मानले आहे आणि त्याबद्दल तो अतिसंवेदनशील बनला आहे.

भाजपने किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मिळवलेले हे अभूतपूर्व यश आहे, हे त्यांच्या विरोधकांनीसुद्धा मान्य केले पाहिजे. आज धार्मिक वादांच्या ह्या चर्चा ‘हिंदू आता कुठे जागा होतोय’ असं म्हणत चालतात. तश्या त्या चालणारच. पण, या चर्चा समाजाच्या समोर सतत आणून, त्यावर सातत्याने वाद निर्माण करून, घडवून आणून सर्वसामान्य हिंदू माणसाला खरोखरच ‘हिंदू खतरे में हैं’ यावर भरवसा ठेवायला तशी प्रचारी स्थिती निर्माण करण्यात संघाने यश मिळवलेले आहे हे नक्की.

या प्रचारातला फोलपणा उघडा पाडून, तर्कबुद्धीने खरे आणि खोटे यातला फरक दाखवून देऊन हिंदू समाजाला वस्तुस्थितीच्या जवळ न्यायचे प्रयत्नसुद्धा होत आहेत. अनेक संघटना, संस्था, व्यक्ती हे प्रयत्न यथाशक्ती करत आहेत. पण त्याला नगण्य म्हणावे असं यशही मिळत नाहीये. आज ही स्थिती आहे की, हिंदू मुस्लिम संबंधांच्या कोणत्याही मुद्द्यावर, वादाच्या कोणत्याही घटनेवर जर आपण वस्तुस्थिती मांडायला गेलो, तर ‘हिंदू खतरे में हैं’ चे समर्थक ती ऐकूनसुद्धा घ्यायला तयार नसतात. मग तो भारत-पाकिस्तान फाळणीचा मुद्दा असो किंवा रामजन्मभूमीचा.

अगदी भारतीय मुसलमानांनी मागच्या पंचवीस वर्षात काँग्रेसपासून फारकत घेतलेली आहे आणि ते ठिकठिकाणी स्थानिक प्रादेशिक पक्षांना मदत करतात, ही वस्तुस्थितीसुद्धा लोक मान्य करत नाहीत. जिथे मुस्लिम लोकसंख्या लक्षणीय आहे आणि जिथला मुस्लिम एकतठ्ठा मतदान करतो, अशा उत्तर प्रदेश, बिहार, बंगाल इथून काँग्रेसचे पतन होऊन काळ लोटला आहे, कर्नाटक, राजस्थान, महाराष्ट्र, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब अशा राज्यांत काँग्रेसला सत्ता मिळालेली आहे, हे दाखवून दिलेलं लोकांना मान्य होत नाही. याचा अर्थ हिंदू आणि इतर धर्मीय यांच्या संबंधांमध्ये भाजप आणि संघाचा जो दृष्टिकोन आहे, तो लोकांनी मनोमन स्वीकारला आहे असा होतो.  इथेच ‘हिंदू खतरे में हैं’ या भययुक्त प्रचाराच्या दुसऱ्या बाजूला माझ्या मते महत्त्व आहे.

सर्वसामान्य हिंदूंना जेव्हा वस्तुस्थिती दाखवून दिल्यानंतरही, आपली मते बदलावीशी वाटत नसतील तेव्हा ते खरोखरच धोक्यात सापडलेले आहेत हे जाणवते. उदाहरणार्थ, हिंदू मुस्लिम वादाच्या घटना, त्या संबंधातल्या हिंसेच्या घटना मागच्या सहा वर्षांत देशात ज्या प्रमाणात वाढल्या, तितक्या त्या कधीच वाढल्या नव्हत्या ही आकडेवारी सामान्य हिंदू नाकारतो. हिंसेच्या घटना वाढलेल्या समाजात आर्थिक अस्थिरता यायला सुरुवात होते ही मूलभूत आर्थिक मांडणी सामान्य हिंदू नाकारतो. निवडणुकांच्या तोंडावर हिंदू-मुस्लिम, भारत-पाकिस्तान वाद उकरून काढले जातात, हे सामान्य हिंदुला समजते तरीही वळत नाही!

इतकेच नाही तर, देशातली बेरोजगारी हा आता जगाच्या चिंतेचा विषय झालेला आहे आणि बेरोजगारीत हिंदू धर्मीयच जास्त आहेत ही साधी मांडणी सामान्य हिंदू नाकारू लागला आहे. जर लोकांना हाताला रोजगार मिळाला नाही तर त्यांचे भविष्य अंधारात सापडेल, हिंदूंना रोजगार मिळत नाही म्हणून त्यांचं भविष्य धोक्यात येईल इतका साधा तार्किक विचार सामान्य हिंदू करत नाही. कोणी त्याच्यासमोर मांडला तरी तो मान्य करत नाही. मांडणारा नातेवाईक असला, हिंदूच असला, सज्जन असला तरी तो मान्य होत नाही.  

हिंदू धर्म द्वेष नाही तर प्रेम शिकवतो. हिंदू धर्म सहिष्णुता आणि चिकित्सा या पायांवर उभा आहे. हिंदू ही ओळख हिंसेशी, अत्याचारांशी, खोटेपणाशी, दांभिकतेशी जोडलेली नाही, उलट या अवगुणाच्या विरोधात ठाम भूमिका घेऊन उभी राहिलेली आहे. हिंदू माणसांना सामावून घेतो. अस्पृश्यता आणि जातीयता या दोन अवगुणाना धर्मात राहून ठाम, निर्णायक विरोध करण्याची स्पेस हिंदू धर्मात आहे. हे सगळं हिंदूंचे वैभव आहे. आजची हिंदूंची राजकीय ओळख ही नेमकी या वैभवाच्या, सनातन मानवी मूल्यांच्या विरोधात आहे. नवी आक्रमक, त्वेषपूर्ण हिंदू ही ओळख हिंदूंच्या परंपरेच्या विरोधात आहे. पण ही ओळख पुसून टाकण्याचा आणि हिंदूंना नागरिक असण्यापेक्षा राजकीय द्वेषपूर्ण झुंडीत त्यांचं रूपांतर करण्याचा हा धूर्त डाव गंभीर आहे. भीतीच्या या राजकारणाने देशात वर्चस्व प्रस्थापित केले असून, विरोधी पक्षही त्यापुढे नामोहरम झालेले आहेत.

जे भारतात होतेय, तेच अमेरिकेतही घडतेय. किंबहुना जगभरातील अनेक देशांमध्ये हे बहुसंख्य-अल्पसंख्यांचे भयाचे राजकारण सध्या टिपेला पोहचलेले आहे. जागतिकीकरणाचे फायदे हवेत, पण त्यासोबत येणारी विविधता, सर्वसमावेशकता नको असे काहीसे विचित्र घडते आहे. हे सारे टिकून आहे, कारण लोकांना अद्यापही स्वतःच्या अस्तित्वाची भीती वाटते आहे. ही भीती जोपर्यंत कायम राहील, तोपर्यंत खरेच हिंदू असोत किंवा श्वेतवर्णीय अमेरिकन, ते स्वतःला असुरक्षितच मानत राहतील.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.