Author : Nilesh Bane

Published on Jan 15, 2019 Commentaries 0 Hours ago

मानवी अस्तित्वाच्या आधीपासून असलेली, सुमारे साडेसहा कोटी वर्षे जुनी मुंबईतील गिल्बर्ट हिल नष्ट होऊ नये म्हणून नवे धोरण आणि भूगोलाकडे पाहायची नवी दृष्टी हवी.

गिल्बर्ट हिल : मानवी इतिहासाचा बट्ट्याबोळ

पृथ्वीवर माणसाचा जन्म सव्वा कोटी वर्षापूर्वी झाला असे म्हणतात. पण या आदिमानवाच्याही आधीपासून अस्तित्वात असलेली एक टेकडी मुंबईच्या काँक्रिटच्या जंगलात आजही आपले अस्तित्व टिकवून आहे, यावर किती जणांचा विश्वास बसेल? सुमारे साडेसहा कोटी वर्ष जुनी आणि कॉलम्नर बेसॉल्ट दगडांनी बनलेली, अंधेरी येथील गिल्बर्ट हिल ही संपूर्ण मानवी उत्क्रांतीची प्रत्यक्ष साक्षीदार आहे. कॉलमनर बेसॉल्टपासून बनलेल्या जगात फक्त तीन टेकड्या असून, गिल्बर्ट हिल त्यापैकी एक आहे.

अंधेरी रेल्वे स्टेशनला उतरून, पश्चिमेला बाहेर पडले की १०-१५ मिनिटाच्या अंतरावर, नवरंग सिनेमा, भवन्स महाविद्यालयाच्या परिसरात ही गिल्बर्ट हिल आहे. ज्वालामुखीच्या उत्पातातून निर्माण झालेल्या बेसॉल्टच्या दगडापासून ही टेकडी अस्तित्वात आली. मेझॉइक कालखंडात सुमारे साडेसहा कोटी वर्षांपूर्वी या टेकडीची निर्मिती झाली, असे अभ्यासकांनी सिद्ध केले आहे. या टेकडीची उंची सुमारे २२५ फूट असून सरळसोट कॉलमच्या स्वरूपातली ही टेकडी म्हणजे खरंच एक आश्चर्य आहे. कारण बरेचदा लाव्हारसाच्या उद्रेकातून अनेक ठिकाणी अशा लहान-मोठ्या टेकड्या, डोंगर तयार झाले आहेत. यातून बेसॉल्टचे जे थर तयार होतात ते आडव्या स्वरूपात असतात. गिल्बर्ट हिल मात्र याला मात्र त्याला अपवाद आहे.

इथे बेसॉल्टचे थर हे एकाला एक बिलगून असे उभ्या खांबांनी बनले आहेत. चौकोनी, आयताकार आकाराचे हे स्तंभ कॉलम्नर बेसॉल्ट या नावाने ओळखले जातात. जगभरात अशा प्रकारच्या केवळ एक तीन टेकड्या आहेत. त्यातल्या दोन अमेरिकेत कॅलिफोर्निया आणि वाइओमिंग इथे आहेत. ‘डेविल्स पोस्टपाइल’ आणि ‘डेविल्स टॉवर’ या नावाने या टेकड्या ओळखल्या जातात. तिसरी टेकडी म्हणजे आपली अंधेरी इथली गिल्बर्ट हिल. यामुळेच या टेकडीचं महत्त्व ओळखून १९५२ मध्ये केंद्र सरकारतर्फे वन कायद्यांतर्गत गिल्बर्ट हिलला राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित केले गेले. २००७ मध्ये या टेकडीला हेरिटेजचा दर्जा मिळाला आहे.

खरं तर, पाच लाख चौरस फूटांवर पसरलेले आपले अख्खे दख्खनचे पठार (डेक्कन प्लॅटू) हे ज्वालामुखीतून बाहेर पडलेला लाव्हारस शांत होऊन बनले आहे. पण कॉलम्नर बेसॉल्टची ही रचना फारच दुर्मिळ अशी मानली जाते. कॉलम्नर बेसॉल्टच्या या विशिष्ट रचनेला लॅकॉलिथ असे म्हणतात. या लॅकॉलिथचा शोध लावणाऱ्या अमेरिकन भूवैकज्ञानिक ग्रोव्ह कार्ल गिल्बर्ट यांच्या नावावरून या टेकडीला आज गिल्बर्ट हिल म्हणून ओळखले जाते, असा एक मतप्रवाह आहे. तर दुसऱ्या प्रवाहाच्या मते, उंधेरी तालुक्याचा तत्कालिन विभागीय इंग्रज अधिकारी असलेल्या गिल्बर्ट नावाच्या इंग्रज अधिकाऱ्याच्या नावावरून हे नाव पडले आहे. काहीही असले तरी भूशास्त्राच्या जगातील अमुल्य असा हा कोट्यवधी वर्षांचा इतिहास आजही गिल्बर्ट हिलने आपल्या अंगाखांद्यावर जपून ठेवला आहे, हे मात्र कोणालाच नाकारता येणार नाही.

या टेकडीवर दोन मंदिरे आहेत. एक मारुतीचे तर दुसरे गावदेवी दुर्गादेवीचे. तिथपर्यंत जाण्यासाठी पायऱ्या असून, दरवर्षात टेकडीवर चैत्र आणि आश्विन महिन्यात उत्सवही होतात. शेकडो वर्षांपूर्वी या भागात घनदाट जंगल होते. अगदी अलिकडच्या काळात, म्हणजे ६०-७० वर्षांपूर्वी या टेकडीभोवती मोकळी जागा आणि झाडे होती, अशी साक्ष इथली ज्येष्ठ मंडळी देतात. तसेच ५० ते ६० एकर एवढ्या विस्तीर्ण भागात ही टेकडी पसरली होती, असेही सांगितले जाते. पण, आज चहुबाजुंनी इमारती आणि झोपड्यांनी ही टेकडी वेढलेली आहे. वारंवार होणाऱ्या अतिक्रमणामुळे ही टेकडी दिवसेंदिवस छोटी होत गेली आहे. आज जेमतेम सात-आठ किलोमीटर एवढाच या टेकडीचा व्यास उरला आहे. वर टेकडीचा विस्तार निमुळता होत जाऊन साधारणतः आठ ते दहा हजार चौरस फूटपर्यंत हा शेंड्याचा भाग उरला आहे.

कीकडे अमेरिकेतील दोन्ही टेकड्या आजा पर्यटनस्थळ म्हणून मोठ्या होत आहेत. पृथ्वीवरचा दुर्मिळ ठेवा म्हणून अमेरिकेत या टेकड्या जपण्यात येत आहेत. दरवर्षी लक्षावधी लोक या पर्यटनस्थळांना भेट देत आहेत. तर दुसरीकडे भारतातील गिल्बर्ट हिल मात्र अस्तित्वाची लढाई लढते आहे. काही वर्षांपूर्वी एका स्थानिक बिल्डरने ही टेकडी उध्वस्त करण्याचे नियोजन केले होते, असेही उल्लेख सापडतात. पण, गावदेवीवर लोकांची श्रद्धा असल्याने, लोकांनी देवीचे मंदिर वाचावे म्हणून ही टेकडी उध्वस्त होण्यापासून वाचविली. आज ही गावदेवी मंदिर आणि गिल्बर्ट हिल हे एक समीकरण झाले आहे, ते यामुळेच.

आज या टेकडीवर असलेल्या या मंदिरामुळे किमान टेकडीचा वरील भाग सुशोभित आणि पर्यटकांना बोलावणारा आहे. पण या टेकडीकडे जाण्याचा मार्ग हा अत्यंत अरुंद आणि झोपड्यांनी वेढलेला आहे. हेरिटेज नियमाप्रमाणे या टेकडीच्या भोवताली किमान १०० मी.ची जागा मोकळी असली पाहिजे. पण आज अगदी या टेकडीला लागून झोपड्या वसल्या आहेत. त्यामुळे या दुर्मिळ भौगोलिक वारशाची हानी होत आहे. एकतर या वारशाबद्दल सामान्य माणासाला फारशी माहिती नाही. दुसरे असे की माहिती असली तरी, मुंबईकराला स्वतःच्या चरितार्थापलिकडे बघण्याची फुरसत नाही. यामुळे काही चळवळे अभ्यासक, इतिहासप्रेमी आणि मंदिरातील भाविक हे सोडून कोणालाही गिल्बर्ट हिलचे काय होणार याबद्दल काहीही पडलेले नाही.

माणसाच्या इतिहासाची साक्ष देणारा हा  ठेवा जतन करण्यासाठी, तसंच सभोवताली अक्राळविक्राळ पद्धतीने वाढणारे बांधकाम रोखले जावे यासाठी या टेकडीभोवती संरक्षक भिंत बांधण्याची मागणी कित्येक वर्ष होत आहे. त्यासाठी टेकडीवरील गावदेवी दुर्गा देवस्थान ट्रस्टही प्रयत्न करते आहे. परंतु काही किरकोळ कामे सोडल्यास, टेकडीच्या सरंक्षणाची मागणी अद्यापही लाल फितीच्या कारभारात तशीच पडून आहे. महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाने या टेकडीची योग्य दखल घेतलेली नाही. जर ही टेकडी किती महत्वाची आहे, हे या संस्थांना पटले तर टेकडीची निगा राखणे आणि ती पुढील पिढ्यांकडे सुरक्षित सोपविणे शक्य होईल. शैक्षणिक आणि संशोधन संस्थांच्या मदतीने अशा जागांचा विकास कसा करायचा याबद्दल आखणी केल्यास पर्यटनाला चालना मिळू शकेल.

शालेय, महाविद्यालयीन पातळीवर आपल्याला भूगोलात बेसॉल्ट दगडांचा उल्लेख येता. पृथ्वीची निर्मिती, दगडांचे प्रकार हेही अभ्यासले जातात. पण बंद वर्गखोलीमध्ये आणि पुस्तकातील रटाळ चित्रांमध्ये दिसणारे दगड प्रत्यक्षात आपल्या आसपास आहेत, हे शिकविलेही जात नाही. मुंबईतल्याही शाळा-महाविद्यालयांमध्ये गिल्बर्ट हिलबद्दल आणि तिच्या महत्वाबद्दल फारसे काही सांगितले जात नाही. विद्यार्थ्यांच्या सहली इथे फारशा येत नाहीत. जोपर्यंत या मौल्यवान ठेव्याची माहितीच आपण करून घेतली नाही, तर तो जपण्याची समृद्ध करण्याची प्रेरणा कुठून मिळणार?

नाही म्हणायला, ‘वक्त’, ‘शोले’ आणि ‘स्लमडॉग मिलेनिअर’सारख्या अनेक चित्रपटांचे शूटिंग या परिसरात झाले आहे. पण सिनेमामध्ये दिसले म्हणून सर्वच स्थळाचे भाग्य उजळत नाही. गिल्बर्ट हिललाही अद्याप ग्लॅमरचा स्पर्श झालेला नाही. त्यामुळे आजही या टेकडीची निगा कोणी राखायची याबद्दल प्रश्नचिन्हच आहे.

आपल्याकडे अशा पद्धतीच्या भूशास्त्रीय वास्तुवैभवाची जपणूक करण्यासाठी ठोस अशा धोरणांची गरज आहे. जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया (जीएसआय) ने अशा प्रकारच्या वास्तुंची यादी करून, त्यांच्या संरक्षणासाठी नियमावली तयार करायला हवी. स्थानिक प्रशासन आणि राज्य सरकार यांना सोबत घेऊन हे नियम पाळले जातील याची काळजी घ्यायला हवी.

जोपर्यंत एखादी गोष्ट आपल्याला सहज उपलब्ध असते, त्याची किंमत आपल्याला कळत नाही. असेच काहिसे आज गिल्बर्ट हिलचे झाले आहे. उद्या काळाच्या ओघात हे आदिकालीन पाषाणखंड नष्ट झाले तर पुढली पिढी आपल्याला कधीच माफ करणार नाही. म्हणून या दगडांची वेदना प्रत्येकाने समजून घ्यायला हवी. हे दगड नसून हा या आपल्या भूगोलाचा इतिहास आहे हे आपण स्वतःला आणि सरकारलाही पटवून द्यायला हवे.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.