Published on Nov 17, 2020 Commentaries 0 Hours ago

६० टक्के प्रभावी ठरणारी कोविड-१९ लस जरी उपलब्ध झाली, तरी चालेल अशी अपेक्षा होती. फायझरची ही लस ९० टक्के प्रभावी आहे, ही आनंदाची बाब आहे.

फायझरची कोविड लस: काही मुद्दे

अमेरिकेच्या इतिहासात ९ नोव्हेंबर २०२० या दिवसाची नोंद दीर्घ काळ राहील. या दिवशी निर्णायकरीत्या, हे सिद्ध झाले आहे की, आजारपण, आरोग्य आणि वैज्ञानिकांचे कठोर परिश्रम यांचा राजकीय भाषणबाजी आणि टीव्हीवरील प्राइम टाइम वेळापत्रकाशी दूरान्वयाचाही संबंध नसतो. गेले नऊ महिने सार्वजनिक आरोग्याच्या झालेल्या वाताहतीनंतर, आपण सर्वजण ज्या गोष्टीची मोठी प्रतीक्षा करीत आहोत, ती गोष्ट सुपूर्द करण्यास अमेरिका अगदी निकटतम आहे.

९ नोव्हेंबर रोजी, अमेरिकेच्या यंदाच्या, २०२० च्या निवडणुकीच्या अवघ्या आठवड्याभरातच, फायझर आणि बायोएन्टेक यांनी एक जबरदस्त आश्चर्यकारक घोषणा केली, ज्यामुळे विलगीकरणाच्या वातावरणात उत्साहाचे वारे संचारले. या कंपन्यांच्या विद्यमाने तयार करण्यात आलेली कोविड-१९ लस, पार पडलेल्या आधीच्या चाचण्यांच्या आधारे ९० टक्के प्रभावी ठरत असल्याचे सिद्ध झाले आहे.

अमेरिकेतील मातब्बर संसर्गजन्य रोगतज्ज्ञ डॉ. अँथनी फॉशी यांच्या मते, यांतील ९० टक्के हा मुद्दा म्हणजे ‘आश्चर्यकारक’ यश आहे. त्यांना विश्वास वाटतो की, अमेरिकेच्या मॉडर्ना या आणखी एका कंपनीची लसही सकारात्मक परिणाम दाखवून देईल. ज्या दिवशी जगभरात सर्वोच्च संसर्ग ठरलेला एक कोटी रुग्णसंख्येचा टप्पा अमेरिकेने ओलांडला, त्याच दिवशी फायझरने ही घोषणा केली. अमेरिकेत दररोज एक लाखांहून अधिकजणांना कोविड-१९चा संसर्ग होत असून, ही संख्या आजपावेतो सर्वात मोठी आहे. अमेरिकेत दररोज नव्याने संसर्ग होणाऱ्यांची संख्या लवकरच दोन लाखांच्या घरात पोहोचेल, असा इशारा अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्या गटातील वैद्यकीय तज्ज्ञाने दिला आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर, फायझरचा आविष्कार सर्वांसमोर आला आहे.

कोविड-१९ वर जगभरात विविध ठिकाणी सुरू असलेल्या संशोधनांमधील पहिले दैदिप्यमान यश संपादन करणाऱ्या फायझरबद्दल पाच प्रमुख मुद्दे खाली नमूद करीत आहोत.

या संबंधात गेल्या ९ महिन्यांच्या कालावधीतील महत्त्वाच्या तारखा

१७ मार्च: बायोएन्टेक तंत्रज्ञान व्यासपीठाचा उपयोग करून फायझर आणि बायोएन्टेकने कोविड-१९ ची लस विकसित करण्याच्या योजनेची घोषणा केली.

२९ एप्रिल: जर्मनीत लसचाचणीसाठी स्वयंसेवक म्हणून पुढे आलेल्या ४ उमेदवारांवर लशीची चाचणी सुरू झाली. आणखी ५ देशांमध्येही या चाचण्या करण्याचे निश्चित करण्यात आले.

५ मे: चाचण्यांचे क्षेत्र विस्तारून अमेरिकेला त्यात समाविष्ट करण्यात आले.

१ जुलै: लशीच्या चाचणीसाठी स्वयंसेवक असणाऱ्या चारपैकी एकाच्या रोगप्रतिकारक शक्तीत सुधारणा होताना दिसली.

२२ जुलै: ट्रम्प प्रशासनने आणखी ५० कोटी लशींच्या पर्यायासह, १० कोटी लशींचे डोस विकत घेण्यास सहमती दर्शवली.

२७ जुलै: ३० हजार स्वयंसेवकांवर शेवटच्या टप्प्यातील चाचण्या सुरू झाल्या.

८ सप्टेंबर: फायझर आणि बायोएन्टेकसह ९ बड्या औषध कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ग्वाही दिली की, राजकीय अथवा इतर बाह्य घटकांच्या दबावाखाली येऊन लस बनविण्यात घिसाडघाई केली जाणार नाही.

८ नोव्हेंबर: चाचणी निष्कर्षांचे स्वतंत्रपणे विश्लेषण करणाऱ्यांकडून फायझरला माहिती प्राप्त झाली.

९ नोव्हेंबर: चाचणी करण्यात येणाऱ्या ४३ हजारांहून अधिक स्वयंसेवकांमधील, ९४ संसर्गांवर आधारित ही लस ९० टक्के प्रभावी असल्याचे दिसून येत असल्याची घोषणा फायझरने केली.

लशीचे ९०% प्रभावीपण वैज्ञानिकांच्या अपेक्षेपल्याडचे आहे

६० टक्के प्रभावी ठरणारी कोविड-१९ लस जरी उपलब्ध झाली, तरी आपल्याला आनंद होईल, असे फॉशी यांनी या वर्षाच्या सुरुवातीला सांगितले होते. ‘कोविड संदर्भात आपण जे काही करू, त्याचा प्रत्येक गोष्टीवर मोठा परिणाम होईल,’ असे फायझरच्या ताज्या निष्कर्षांनंतर, फॉशी यांनी सूचित केले. ‘माझ्या अपेक्षेहून कितीतरी चांगले’ अशी प्रतिक्रिया ब्राऊन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थचे अधिष्ठाता आशिष के. झा यांनी व्यक्त केली आहे. १ ते १० च्या मोजपट्टीत आपण ‘९.५ आनंदी’ असायला हवे, असेही झा यांनी आपल्या उत्साहाच्या स्तराबाबत सांगितले.

माऊंट सिनाईच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रा. फ्लोरियन क्रामर यांनीही अशीच भावना व्यक्त केली. लस चाचणीत सहभागी झालेले क्रामर म्हणाले, ‘गंभीर आजारापासून ५० टक्के संरक्षण ही एक उत्तम बातमी असेल.’ ९० टक्के प्रभावी असल्याचे जे आता म्हटले जात आहे, ते लक्षणे दिसणाऱ्या संसर्गाबाबत आहे. लक्षणे दिसून येत नाहीत, अशा रुग्ण संसर्गाबाबतही ही टक्केवारी योग्य आहे का, हे अद्याप आपल्याला ठाऊक नाही. संसर्ग कमी करण्याच्या दृष्टीने हे दीर्घ मुदतीत महत्त्वाचे ठरते, मात्र, गंभीर धोका असणाऱ्या रुग्णांना या लसीमुळे संरक्षण मिळेलच, असे नाही.’ बराक ओबामा यांच्या सार्वजनिक आरोग्य संघात काम केलेल्या डॉ. कविता पटेल यांनी ९० टक्के ही टक्केवारी ‘उल्लेखनीय’ असल्याचे म्हटले. पटेल आणि इतर अनेक डॉक्टर यांच्या मते, निष्कर्ष कायम राहिल्यास, फायझरची लस ही गोवरच्या लसीच्या बरोबरीची ठरेल.

आपल्याला अद्याप काय ठाऊक नाही?

आम्हाला अद्याप, अनेक गोष्टी ठाऊक नाहीत. ९० टक्के याचा अर्थ ताप, खोकला आणि सर्दीला प्रतिबंध करू शकतो असा आहे, की ९० टक्के गंभीर आजार, रुग्णालयात दाखल होणे आणि मृत्यू थांबवता येतील, असा आहे?  बायडेन यांच्या कोरोना विषाणू कार्य गटाचे सदस्य डॉ. मायकेल ऑस्टरहोम यांनी लशीसंबंधातील आव्हाने विशद करताना इन्फ्लूएन्झा लशीच्या समांतर वापराचे उदाहरण दिले. ते म्हणाले, ‘आम्हाला याची कल्पना आहे की, इन्फ्लूएन्झाची बाधा झालेल्या रुग्णांमध्ये, ज्यांची अवस्था गंभीर असते, अशा व्यक्ती लशीला प्रतिसाद देतील, याची शक्यता कमी असते,’ युवावर्गाला जसे संरक्षण मिळेल, तसा बचाव वृद्ध व्यक्तींचा होईल का, हे आम्हांला माहीत नाही.

आमच्याकडे एका विशिष्ट कालावधीत नोंदवली गेलेली माहिती आहे, काही अवधीनंतर लशीपासून मिळणारे संरक्षण सौम्य होते का, याचे स्पष्टीकरण अद्याप मिळालेले नाही. मात्र, वैज्ञानिकांनी हे स्पष्ट केले आहे की, जे अज्ञात आहे, त्याबाबत या टप्प्यावर आमची आशा खच्ची करू नये. ‘वस्तुत: लक्षणे दिसून येणाऱ्या संसर्गात, तटस्थ अँटिबॉडीजना प्रेरित करण्यावर लस बव्हंशी आधारलेली आहे, हे विलक्षण आहे. इतरही अनेक लशीही परिणामकारक ठरतील, असा याचा अर्थ होतो. मॉडर्नाची लस जवळपास सारखीच आहे,’ असे ट्विट क्रामर यांनी केले आहे. फायझरच्या अभ्यासगटातील स्वयंसेवक उमेदवारांमध्ये कोरोना-१९च्या संसर्गाची लक्षणे विकसित झाली तरच कोरोना विषाणूची चाचणी घेण्यात आली, म्हणूनच लसीकरण झालेले लोक, लक्षणे विकसित न करता विषाणू पसरवत आहेत का, याची आपल्याला कल्पना नाही.

९४ संसर्गांवर आधारित निष्कर्ष, १६४ संसर्गापर्यंत अभ्यास सुरू राहील

फायझरचे ९० टक्के प्रभावीपणाचे निष्कर्ष आतापर्यंतच्या ९४ संसर्गांवर आधारित आहेत आणि मूल्यांकनासाठी १६४ संसर्गांपर्यंत हा अभ्यास सुरू राहील. चाचणीत सहभागी झालेले उमेदवार, डॉक्टर किंवा फायझर/ बायोएन्टेक यांपैकी कोणत्या भागधारकाला, खरी लस मिळतेय, की नकली लस टोचली जाते, हे ठाऊक नाही. आत्तापर्यंतची सर्वात चांगली बातमी अशी की- फायझरने स्पष्ट केले की, त्यांच्या लशीबाबत गंभीर सुरक्षिततेबाबतची चिंता करण्याची गरज नाही. हा कल कायम राहो, असेच वैज्ञानिकांना वाटत आहे.

या वर्षाच्या सुरूवातीस, चाचण्या करताना काही सहभागी उमेदवारांची तब्येत बिघडल्याच्या वृत्तानंतर अ‍ॅस्ट्राझेनेका आणि जॉन्सन अँड जॉन्सन या कंपन्यांनी आपल्या लशीसंदर्भातील अभ्यासाला तात्पुरता विराम दिला. अमेरिकी अन्न आणि औषध प्रशासनाकडून (एफडीए) आपत्कालीन वापराच्या अधिकृत परवानगीसाठी अर्ज करण्यापासून आताच्या क्षणापर्यंत, फायझर आणखी तीन बाबींवर योग्यतेचे शिक्कामोर्तब होण्याची प्रतीक्षा करीत आहे: लस दिलेल्या बहुतांश रूग्णांमध्ये ती कार्यक्षम ठरल्याचा पुरावा, हजारो रूग्णांच्या माहितीसह सुरक्षिततेचा पुरावा आणि उत्पादन जे सातत्याने सर्वोच्च गुणवत्तेच्या मानकांवर आधारित उत्पादन. चाचणी झाल्यानंतर सहभागी झालेल्या सदस्यांच्या आरोग्यावर त्याचा काही अनिष्ट परिणाम झाला का, याचा मागोवा पुढील दोन महिने किमान निम्म्या स्वयंसेवकांवर तरी घ्यायला हवा, असा ‘एफडीए’चा नियम आहे.

आपत्कालीन अधिकृत परवानगी म्हणजे नेमके काय?

साधारणपणे, अमेरिकी अन्न व ओषध प्रशासनाला व्यापक प्रमाणात आणि काटेकोर अभ्यासावर आधारित, औषध सुरक्षिततेबाबत ज्याला ते ‘भरीव पुरावे’ असे म्हणतात, त्याची आवश्यकता असते. आपण आता ज्या सार्वजनिक आरोग्याच्या आपत्कालीन परिस्थितीतून जात आहोत, त्यावेळेस मानकांचा स्तर काही प्रमाणात कमी केला जातो, जेणेकरून संभाव्य लाभ हे संभाव्य जोखमींपेक्षा अधिक होऊ शकतील. १२ वर्षांच्या आणि त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींना- ज्यांना हलकी अथवा मध्यम स्वरूपात कोविड-१९ची लागण झाली आहे, व ज्यांना रूग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता नाही, अशा रुग्णांसाठी ‘एफडीए’ने एली लिलीच्या प्रायोगिक औषधाला ९ नोव्हेंबर २०२० रोजी मंजुरी दिली.

हा एकदाच देण्यात येणारा प्रायोगिक उपचार शिरांद्वारे दिला जातो. रीजनरॉन फार्मास्युटिकल्सनेही, अ‍ॅन्टीबॉडी औषधासाठी आपत्कालीन अधिकृत परवानगी देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना कोविड-१९च्या उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्यांना हेच औषध देण्यात आले होते. आतापर्यंत, फक्त गिलियड सायन्सेसच्या ’रेमेडेसिविर’ औषधाला कोविड-१९ वरील उपचारांसाठी संपूर्ण मान्यता देण्यात आली आहे.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.