Author : Nadine Bader

Published on Oct 06, 2020 Commentaries 0 Hours ago

नव्वदच्या दशकानंतर उदारीकरण आणि खासगीकरणातून आलेल्या प्रचंड पैशामुळे इथला मध्यमवर्ग सहआस्तित्वाच्या मूल्यव्यवस्थेपासून आणि संयत राजकारणापासून दुरावत गेला.

नेता कुणाला म्हणावे?

आजघडीला जगभरातील जनतेपुढे हा यक्षप्रश्न उभा आहे की, नेता कुणाला म्हणावे? जगभरातील आजच्या नेत्यांची नावे डोळ्यापुढे आणली की, या प्रश्नाचे गांभीर्य अधिकच तीव्र होते. आपण भारतापुढता विचार केला तर, अगदी स्थानिक गल्लीतल्या पोस्टरबाज नेत्यापासून, दिल्लीतल्या व्हीव्हीआयपी नेत्यांपर्यंचा कोणताही नेता आपल्याला ‘आपला’ वाटत नाही. तो सज्जन, पापभिरू, आपल्यासारखा वागणारा, साधेपणा जपणारा आणि त्याहूनही मुख्य म्हणजे खरे बोलणारा आपल्या डोळ्यापुढे येतच नाही. या सगळ्यात नक्की दोष कोणाचा, नेत्यांचा की आपला?

उदाहरणार्थ राहुल गांधींबाबत बोलू. “राहुल गांधी हा माणूस म्हणून चांगला आहे पण राजकारणात हा चांगुलपणा उपयोगी ठरत नसतो, हे त्यांना कळत नाही”, हे वाक्य राहुल यांचे तमाम विरोधक आणि अनेक समर्थक सर्रास बोलत असतात. त्यांना हे बोलणे राजकीयदृष्ट्या व्यावहारीक वाटते. असेलही. पण हे राहुल गांधींचे दौर्बल्य नसून, हे आपल्या सर्वांचे चरित्र आहे, असे वाटते.

आपण हे ठरवूनच टाकले आहे की, राजकारणात चांगला माणूस नको! राजकारणी हे खोटारडे, क्रूर असले पाहिजेत आणि विरोधकांना येनकेन प्रकारे नष्ट करणारे असले पाहिजेत, असे आपल्यापैकी बहुतांशी लोकांना वाटते. हे असे वाटणे आपल्याबद्दल, आपल्या ढोंगीपणाबद्दल, आपल्या बदललेल्या आवडी निवडींचे प्रतिबिंब आहे. 

आपल्याला ढोंगी, खोटारडे, बदमाश लोक राजकारणी म्हणून हवे असतात. आपल्याला माहिती असते की, हे असे लोक शक्य असलेले सर्व गैरप्रकार करतात आणि तरीही ते आपल्याला आपले नेते म्हणून हवे असतात. जो ढोंगी नाही, सरळ मनाचा आहे, सज्जन आहे, वाह्यात बोलत नाही, समाजात तेढ निर्माण व्हावी असे वागत नाही तो मग आपल्याला पोरकट, भंपक वगैरे वाटत असतो.

यात इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की राजकारणी हे सगळे बदमाशच असतात, ही भावना इथल्या मध्यमवर्गात ऐंशीच्या दशकात बळावायला सुरुवात झाली. राजकारण हे काही सज्जनांचे क्षेत्र नाही, इथे चापलूसच हवे असे प्रामुख्याने इथल्या मध्यमवर्गाला वाटू लागले. राजीव गांधी हा ऐंशीनंतरच्या मध्यमवर्गाचा पहिला हिरो होता कारण तो तोवर साचेबद्ध झालेल्या इतर राजकारण्यासारखा नव्हता. म्हणून मध्यमवर्गाला तो आपला वाटत होता. याचे कारण तोपर्यंत या वर्गावर स्वातंत्र्य चळवळीतून आलेल्या मूल्यांचा पगडा होता.

मध्यमवर्गात असलेली ही मूल्य प्रामुख्याने सहकार्य, सहअस्तित्व, सहानुभूती आणि संयतपणा याबद्दल होती. एकमेकाला मदत करणे, दोन वेगवेगळ्या समुदायांनी एकमेकांसोबत राहणे, गरीब, दुबळ्या, दलित, आदिवासी, अल्पसंख्य वर्गाबद्दल सहानुभूती असणे आणि उन्माद नसणे ही ती मूल्य होती. यांना अधूनमधून तडा जायचा, नाही असे नाही. पण, एकंदरीत सगळे आलबेल होते, उत्तम होते असे नाही. पण, समाजाची मुख्य धार ही समंजसपणा ही होती, अर्वाच्यता नव्हती.

१९९० नंतर उदारीकरण आणि खासगीकरणातून आलेल्या प्रचंड पैशामध्ये इथला मध्यमवर्ग या मूल्यव्यवस्थेपासून दुरावला. यात आलेल्या पैशाबद्दल दुःख नाही. दोष त्या संपत्तीला नाही. पण त्या नादात झडत गेलेल्या मूल्य व्यवस्थेला आहे. ती खंगत गेली आणि आजकाल तर ती चेष्टेचा विषय झाली.

झारखंडमधली एक महिला २ किलो तांदूळ विकत आणू शकली नाही, अखे अन्नान्न करून मेली याबद्दल आता इथल्या एका मोठ्या वर्गाला काहीच वाटत नाही. ज्यांच्याकडे काही नाही, दैन्य आहे, दारिद्रय आहे त्यांच्याबद्दल किमान सहानुभूती असावी, हा मूलभूत मानवी विचार गळून पडलेला आहे. हजारो किलोमीटर तळपत्या उन्हात डांबर आणि सिमेंटच्या रस्त्यावरून लाखो मजूर चालत गेले, याबद्दल आपला समाज निबर झालेला आहे. तुम्ही तुमच्या अवतीभोवती असे अनेक लोक लॉकडाऊन च्या सुरुवातीच्या काळात पाहिले असतील की, जे ‘या मजुरांनी कशाला चालत जायचे? आहे तिथे रहायचे ना?’ असा उफराटा प्रश्न विचारत होते. हे कशाचे लक्षण आहे?

हे सारासार विवेक गमावून बसलेली एक झुंड इथल्या समाजात तयार झाल्याचे लक्षण आहे. याच झुंडीतल्या अनेकांना मग ते नेते आवडत नाहीत, जे गरीब, मजूर, शेतकरी, कष्टकरी, दलित, दुबळे यांचे प्रश्न सतत उचलत राहतात. त्यांच्या हक्कांसाठी आंदोलन करतात, संप करतात आणि मोर्चे काढतात. हे असे नेते, हे असे सामाजिक कार्यकर्ते या झुंडीसाठी टिंगलीचा विषय बनतात. आणि त्यांच्या या संघर्षाला नौटंकी म्हणून हिणवले जाते.

राहुल गांधींनी जेव्हा दीड कोटी लोकांच्या नोक-या गेल्या, असंघटित वर्गाला नुकसान सोसावे लागले, करोडो लोक शिक्षण आणि आरोग्य व्यवस्थेतून आता बाहेर फेकले जातील हे आणि यासारखे मुद्दे उचलले तेव्हा म्हणूनच त्यांची चेष्टाचा केली गेली. भाजपने एक पेड टीम उभी करून त्यांची चेष्टा करणे, हा राजकारणाचा भाग झाला. तो विकृत असला तरी, त्याकडे राजकारण म्हणून बघता येते. पण आपल्या घरात, आपल्या सोफ्यावर बसून जेव्हा राहुल गांधींच्या ट्विटवर, व्हिडीओवर खात्या पित्या घरातली माणसं वाह्यात कॉमेंट करतात, व्हॉट्सअप ग्रुपवर अश्लाघ्य मेसेज फॉरवर्ड करतात, तेव्हा हा समाजातला मोठा वर्ग कसा गंडलाय हे लक्षात येते.

अशा वर्गाला मग हाथरसच्या पीडित मुलीच्या घरी न जाता, डिझायनर कपडे घालून निर्मनुष्य बोगद्यात (रेकॉर्ड व्हिडिओ बघून उद्दीपित होणाऱ्या प्रेक्षकांसाठी) हात हलवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरो वाटतात. हे जे वाटणे आहे, नायक असणे आहे ते असंवेदनशीलतेच्या पायावर उभे आहे, याची जाणीव त्या वर्गाला नाही. हा वर्ग असा बेभान झालाय, याचा अंदाज असल्यामुळे दलित पीडितांच्या दुःखावर आपल्या संवेदना प्रकट करण्यापेक्षा प्रचाराचा उत्सव सुरू ठेवणे मोदींना शक्य होते.

साम्यवादी विचारांत नेतृत्वाबद्दलचा महत्त्वाचा सिध्दांत आहे. ‘लोक नेता घडवतात.’ people makes leader. संस्कृतमध्ये ‘यथा राजा तथा प्रजा’ म्हणतात. मोदी तसे आहेत कारण त्यांचा पाठीराखा वर्ग तसा आहे. १३८ कोटींच्या देशात आणि त्यातल्या साधारण ४५ कोटींच्या मध्यमवर्गात साधारण ३२ ते ३५ कोटी लोक असे असणे, निवडणुकीच्या राजकारणात पुरेसे असते. बाकी मतांची बेगमी ही जात, स्थानिक बलशाली नेता, आघाड्या आणि concentrated campaigns म्हणजे विशिष्ट वर्गासाठी केंद्रित प्रचार यांच्या माध्यमातून करता येते.

नेता कुणाला म्हणावे? जो तमाम लोकांच्या दु:खाशी स्वतःला जोडून घेतो. त्यांच्या प्रश्नांना आपले प्रश्न म्हणतो आणि त्यांच्या अश्रूंना मोकळी वाट करून देण्यासाठी त्यांना जवळ घेतो. हे असे वागणे म्हणजे पोरकट असेल, धूर्त राजकारणी होण्यासाठी उपयोगी नसेल तर चूक त्या नेत्याची नाही. आपली आहे. विचार त्या नेत्याने नाही. आपण करायचा आहे. बदलायचे त्या नेत्याने नाही. आपण स्वतःला बदलायचे आहे. कारण लक्षात ठेवा. अश्रू, वेदना ही कुणा एका वर्गाची जहागीरदारी नाही. कधी ना कधी आपल्याही वाट्याला ते येणार आहेत. आणि त्यावेळी उत्सवात मग्न असलेला नेता थोपटायला येणार नाही. मदतीला येणार नाही. तेव्हाच्या त्या असहाय्यतेच्या भयाण पोकळीत हरवून जायचे नसेल तर ज्या नेत्यांचे वेदनांशी नाते आहे आणि संकटाच्या वेळी जो सर्वात आधी धावून येतो असा नेता शोधा!

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.