Published on Dec 30, 2021 Commentaries 0 Hours ago

इतिहासात ‘बॉम्बे’ने आपल्या जागतिक संबंधांमधून समृद्धी मिळविली. आता मुंबईला पुन्हा महान करण्यासाठी या जुन्या दुव्यांचे भांडवल वापरण्याची वेळ आली आहे.

मुंबईचे सामर्थ्य जगाला कळायला हवे

मुंबई हे शहर जगासाठी पूर्वापार ‘भारताचे प्रवेशद्वार’ म्हणून ओळखले जाते. जगातील अनेक प्रभावांचे एकत्रीकरण या शहरात झालेले पाहावयास मिळते. मुंबईच्या उत्तरेस जे दगड सापडले, त्यावरून मुंबईच्या सात बेटांचे अस्तित्व हे अश्म युगापासून होते, असे दिसून येते. सम्राट अशोकाने ख्रिस्तपूर्व तिसऱ्या शतकातील बेटांचा आपल्या साम्राज्यात समावेश केला आणि ही बेटे हिंदू आणि बौद्ध धर्मसंस्कृतीची केंद्र बनली.

बौद्ध भिख्खूंनी कण्हेरी आणि महाकाली लेण्यांचे शिलालेख आणि शिल्पे तयार केली. त्यानंतरच्या काळात या बेटांचे नियंत्रण देशातील काही घराण्यांकडे आणि नंतर पोर्तुगीजांकडे गेले. त्या वेळी जागतिक सत्तांचे राजकारण नुकतेच सुरू झाले होते. पोर्तुगीजांकडून ते ईस्ट इंडिया कंपनीच्या अखत्यारित गेले. त्या दरम्यान १७ व्या शतकात इंग्लंडच्या दुसऱ्या चार्ल्सने ब्रॅगेन्झाच्या कॅथरिनशी विवाह केला होता. या विवाहप्रसंगी मुंबईची बेटे हुंडा म्हणून देण्यात आली. मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर विल्यम हॉर्नबी यांनी घेतलेल्या पुढाकारातून १८ व्या शतकाच्या मध्यावर हे शहर समुद्रामधून भूमीवर आले आणि पुढील काही दशकांत समुद्र व दलदलीमुळे वेगळी झालेली ही बेटे जोडण्यासाठी कॉजवेंचे बांधकाम करण्यात आले.

गेल्या दीडशे वर्षांत मुंबई सातत्याने विकसित होत आहे आणि गेल्या २५ वर्षांमध्ये व्यापार ते सेवा क्षेत्रापर्यंत सर्वच क्षेत्रांमध्ये मुंबईने वेगाने आर्थिक परिवर्तन घडवले आहे. भारताची आर्थिक राजधानी या नात्याने या शहरात अनेक कॉर्पोरेट कंपन्यांची मुख्यालये आहेत. हे शहर परकी गुंतवणूक आणि संयुक्त प्रकल्पांचे प्रमुख स्थान बनले आहे; तसेच मोठ्या भारतीय कंपन्यांचे भांडवल असलेले दोन शेअर बाजार आहेत आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय व्याप्ती असलेल्या लहान उद्योगांचेही माहेरघर आहे.

दक्षिण आशियातील सर्वांत मोठा सांस्कृतिक उद्योग म्हणजेच बॉलिवूड मुंबईतच आहे. बॉलिवूड हा आता सुमारे ४ अब्ज डॉलरची उलाढाल असलेला उद्योग बनला आहे. बॉलिवूडचा मोठा महसूल परदेशातून येतो. देशातील चित्रपटांमधून मिळणारा महसूल २०१७ मध्ये आदल्या वर्षीच्या १२ कोटी ५० लाख डॉलरवरून ३६ कोटी ७० लाख डॉलरवर पोहोचला आहे. उदंड पैसा मिळवून देण्याव्यतिरिक्त हे क्षेत्र सुमारे १० लाख लोकांना रोजगार मिळवून देते. एवढेच नव्हे, तर नव्या बाजारपेठेत शिरकाव करण्याची प्रचंड क्षमता या क्षेत्रामध्ये आहे. (उदा. ‘दंगल’ या चित्रपटाने चीनमध्ये सुमारे २० कोटी डॉलरची कमाई केली.)

तरीही लोकांना व जगभरातील भांडवल आणि उद्योगांना आकर्षून घेण्याची क्षमता असलेल्या शहरांच्या २०१९ साठीच्या ‘जागतिक सत्ता शहर निर्देशांका’त मुंबईचे स्थान तळाशी आहे.

जगभरातील महापौरांनी दाखवलेला मार्ग

गेल्या काही वर्षांत ‘सिटी डिप्लोमसी’ला वलय प्राप्त झाले आहे. त्यामुळे नव्या शहरी समुदायांमध्ये महत्त्वपूर्ण संबंध प्रस्थापित झाले आहेत. २०१६ मध्ये ६० शहरांमधील महापौर ‘महापौरांच्या जागतिक परिषदे’दरम्यान एकत्र आले. बहुराष्ट्रीय संस्था, नागरी गट आणि औद्योगिक संस्थांशी संबंध बळकट करणे हे त्याचे उद्दिष्ट होते. साथरोगाच्या पार्श्वभूमीर स्थानिक आणि राष्ट्रीय सरकारे केंद्राच्या मदतीसाठी आग्रह धरत असतानाच या ६० शहरांमधील महापौरांनी संसर्गाच्या परिणामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि स्थानिक परिस्थितीच्या बाहेर जाऊन अधिक व्यापक राजकीय कार्यक्रमाच्या माध्यमातून शहरी प्रश्नांचे वेगळ्या पद्धतीने निराकरण करण्यासाठी भेट घेतली.

संकटकाळातही मुलांना शिक्षणसाधनांची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी इंटरनेट हा मानवी हक्कच मानावा, असा आग्रह धरून डिजिटल दरी भरून काढण्याची गरज कोलंबियातील पालमिराचे महापौर ऑस्कर एस्कोबार यांनी अधोरेखित केली. साथरोगपूर्व काळात पालमिरा येथील सुमारे ७० टक्के कुटुंबांची आर्थिक प्राप्ती अनौपचारिक क्षेत्रामधून होत होती. त्यानंतर या शहराने पुनर्उभारणी सुरू केली. त्यासाठी नोंदणी व अभ्यासक्रम सुनिश्चित करून, उद्योगांना पत सुविधा व करलाभ देऊन औपचारिक क्षेत्रात व्यवसाय आणण्यासाठी माहिती संकलन सुरू केले.

मोझाम्बिक देशातील क्विलिमेन शहारेच महापौर मॅन्युएल दा अरौजो यांनी साथरोगादरम्यान आपल्या शहराने शहरी भागातील वाहतुकीला स्थैर्य आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांकडे लक्ष वेधले. साथरोगाच्या काळात शहरामध्ये वाहतुकीसाठी सायकलला प्रोत्साहन दिले. त्यामुळे वाहतुकीचे निर्बंध शिथिल करता आले.

महानगरांविषयी चिंता

मुंबई ही जरी देशाची आर्थिक राजधानी असली, तरी आधुनिक सार्वजनिक वाहतुकीसाठी अपुरी गुंतवणूक, परवडणारी घरे आणि अन्य सुविधांचा अभाव यांमुळे गुरुग्रामसारख्या शहरांना (गुरगाव) कॉर्पोरेट भारताची पसंती मिळाली आहे आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीतही ते पसंतीस उतरले आहे.

वांद्रे-कुर्ला संकुलात २०१५ पासून सिंगापूर आणि दुबईसारख्याच सुविधांच्या धर्तीवर वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र उभारण्याची योजना सुरू आहे; परंतु अहमदाबादमधील ‘गुजरात आंतरराष्ट्रीय वित्त-तंत्रज्ञान शहरा’कडे केंद्राचे अधिक लक्ष आहे. मात्र, त्याच वेळी काही राज्ये गुंतवणुकीची आकर्षक केंद्रे म्हणून उदयास आली आहेत आणि ‘ट्रेडमार्क पेटंट’ कार्यालयासारख्या काही संस्था मुंबईबाहेर स्थलांतरित झाल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय संबंध जोडण्यासाठी मुंबईने प्रयत्न करायला हवेत आणि त्याचे अनेक लाभ मिळवण्यासाठी धोरणात्मक कार्यक्रमांमधून शिकायला हवे. उदाहरणार्थ, मुंबईने कॅनडातील अल्बर्टाकडून शिकायला हवे. या शहराने २०२० मध्ये तंत्रज्ञान व वित्तीय सेवांसारख्या वेगाने वाढणाऱ्या क्षेत्रातील गुंतवणूक मिळवण्यासाठी एका संस्थेची स्थापना केली आहे. अल्बर्टाकडून गुंतवणूक आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय महत्त्व असलेल्या शहरांमध्ये आपले कार्यालय उघडण्यात येते.

यश आणि अपयश

चिंतेच्या विषयांवर धोरणात्मक संस्थांच्या माध्यमातून लक्ष देण्याचा प्रयत्न करायला हवा. २०२० च्या डिसेंबर महिन्यात मुंबई हे ‘सी ४०’ कार्यक्रमाचा एक भाग बनली. ‘सी ४०’ हे हवामान बदलविषयक आव्हानांचा सामना करण्याचा निश्चय केलेल्या शहरांचे एक जागतिक जाळे आहे. महाराष्ट्र राज्याने २०१७ मध्ये राज्यस्तरीय हवामान बदल कृती धोरणाचा मसुदा तयार केला आणि त्या दृष्टीने मुंबई हा असुरक्षित जिल्हा जाहीर केला. चालू दशकाच्या अखेरीपर्यंत महाराष्ट्रातील शहरांमध्ये टोकाच्या हवामान बदलासंबंधातील घटनांमध्ये २२ टक्के ते ३२ टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे.

हवामानविषयक प्रकल्पांना अर्थपुरवठा करण्यामध्ये ज्या शहर आणि स्थानिक सरकारांना अडथळा येत आहे, त्यांच्या मदतीसाठी २०२० च्या सप्टेंबर महिन्यात ‘सिटी क्लायमेट फिनॅन्स गॅप फंडा’चीस्थापना करण्यात आली. या संस्थेकडून हवामानविषयक गुंतवणूक आणि कार्यक्रमांच्या प्राधान्यकर्मासाठी आणि तयारीसाठी स्थानिक नेत्यांना तंत्रज्ञान आणि सेवा यांसाठी सुरुवातीच्या टप्प्यातच मदत करते. पूर्वतयारीला चालना देणे, दर्जा वाढवणे आणि सर्व काही बँकेच्या नियमांत बसू शकेल असे या मदतीमागचे उद्दिष्ट असते.

झोपडपट्टी विकासासाठी आंतरराष्ट्रीय भागीदारी असलेल्या ‘शहर आघाडी’सारख्या राज्य सरकारे व स्थानिक सरकारांचा समावेश असलेल्या बहुपक्षीय संस्थांशी मुंबईने आपले संबंध वाढवायला हवेत. ‘धारावी पुनर्विकास प्रकल्प’गेल्या १५ वर्षांपासून सुरू आहे. या भागात कोविड-१९ साथरोगाचा ज्या वेगाने संसर्ग झाला, त्यातून स्वच्छता आणि आरोग्य सुविधा यांचा येथे किती मोठा अभाव आहे, हे अधोरेखित झाले आणि त्यातून त्याची पुनर्बांधणी करण्याच्या मागणीने जोर धरला आहे.

मुंबई आणि शांघाय या शहरांनी २०१४ मध्ये माहिती तंत्रज्ञान आणि पर्यटन या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढविण्यासाठी करार झाला. तरीही अद्याप दोन्ही शहरांच्या महापालिका मंडळांमध्ये संयुक्त प्रकल्पांनी अद्याप गती घेतलेली नाही. मात्र, जर्मनीतील स्टुटगार्ट हे शहर मुंबईची ‘सिस्टर सिटी’ असली, तरीही आशियातील शहरांच्या भागीदारीतून अधिक लाभ मिळू शकतो. कारण त्यांमध्ये बऱ्याच अंशी समानता असते.

गुंतवणूक व तंत्रज्ञान मिळवण्यासाठी; तसेच सांस्कृतिक समज वाढविण्यासाठी अन्य शहरांमधील धोरणात्मक संबंध आणि आर्थिक दुवे अधिक उपकारक असतात. या परिश्रमांमध्ये दक्षिण मुंबई खूप मोठी भूमिका बजावू शकते. कारण येथे ४० पेक्षा अधिक देशांचे दूतावास आहेत. इतिहासामध्ये ‘बॉम्बे’ने जगाशी असलेल्या दुव्यांच्या माध्यमातून समृद्धी प्राप्त केली. आता मुंबईला पुन्हा महान करण्यासाठी या जुन्या दुव्यांचे भांडवल वापरण्याची हीच वेळ आहे.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.