Author : Nilesh Bane

Published on Jul 19, 2021 Commentaries 0 Hours ago

पंढरीच्या वारीच्या रुपाने गेले सातशे वर्ष आपण ‘ह्युमॅनिटी’चा सोहळा अनुभवतो आहोत. आज गरज आहे ती या सोहळ्याला ‘सॉफ्टपॉवर’ म्हणून पाहण्याची.

पंढरीची वारी ही भारताची ‘सॉफ्टपॉवर’

पंढरपूरची वारी हा फक्त धार्मिक सोहळा नाही. कोणत्याही एका राज्याची, एका पंथाची ही शोभायात्रा नाही. तुम्ही फक्त माणूस असलात, तरी तुम्ही पंढरीच्या वारीचा भाग होऊ शकता. हा माणसांनी, माणसांसाठी चालवलेला माणुसकीचा उत्सव आहे. आज जगभर ‘ह्युमॅनिटी’, ‘सॉफ्टपॉवर’ या शब्दांचा गवगवा वाढतो आहे. वारीच्या रुपाने गेले सातशे वर्ष हा ‘ह्युमॅनिटी’चा सोहळा आपण जगतो आहोत. आज गरज आहे ती याकडे नव्या दृष्टिकोनातून पाहण्याची, वारीच्या सोहळ्याला जगासाठीची ‘सॉफ्टपॉवर’ म्हणून व्यापक करण्याची.

पंढरपूरच्या वारीबद्दल आणि वारकरी संतपरंपरेबद्दल आजवर हजारो लेख, पुस्तके लिहिली गेली आहेत. शेकडो गाणी, चित्रपट, माहितीपट, वेबसाइट्स, सोशल मीडिया पेजेस असे सारे सारे बनले आहे. एवढे सारे होऊनही या वारीबद्दलचे आकर्षण कमी होत नाही. कोरोनासारख्या जीवघेण्या आजाराने अख्ख्या जगाला घाबरवून सोडले. तरी प्रतीकात्मकरित्या का होईना, वारी पंढरीला गेलीच. त्याबद्दल लिहिले, बोलले, पाहिले गेले. साऱ्या जगभरात आज पंढरीच्या वारीबद्दल लोकांचे आकर्षण वाढते आहे. या आकर्षणामागे फक्त हा सोहळा नाही, तर या सोहळ्यामागे असलेला समन्वयाचा, माणूसपणाचा विचार आहे.

हा समन्वयाचा, माणूसपणाचा विचार आज जगासाठी महत्त्वाचा आहे. औद्योगिक क्रांतीनंतर एकसाची होऊ लागलेल्या जगाने निवडलेला जगण्याचा कॉर्पोरेट मार्ग आज पर्यावरणाचे, मानवी नातेसंबंधांचे आणि माणसाच्या आरोग्याचे धिंडवडे उडवतो आहे. अशा वेळी या सगळ्यातून वाट दाखवणाऱ्या सुवर्णमार्गाचा शोध जगभरात सुरू आहे. मग कुणी बुद्धाने सांगितलेला विपश्यनेचा मार्ग शोधतो, तर कोणी योगासने आणि ध्यानाचा. या साऱ्या आत्मशोधाच्या वाटेवर चालणाऱ्यांना, आपण पंढरीची वारी नव्याने सांगितली पाहिजे. ती फक्त आपली आत्मशोधाची वाट न राहता, तो साऱ्या मानवतेचा आनंदमार्ग व्हावा, म्हणून तरी तिला भारताची ‘सॉफ्टपॉवर’ म्हणून जगाला सादर करावे लागेल.

‘सॉफ्टपॉवर’ म्हणजे नक्की काय?

साधारण १९९० च्या सुमारास अमेरिकन राजकीय भाष्यकार जोसेफ नाय यांनी ‘सॉफ्टपॉवर’ हा शब्द पहिल्यांदा वापरला. सॉफ्टपॉवर या विषयावर त्यांनी एक पुस्तकही लिहिले. त्यानंतर जगात ‘सॉफ्टपॉवर’ या संकल्पनेचा खऱ्या अर्थाने वापर सुरु झाला. साधारणतः दुसऱ्या महायुद्धानंतर जगभरात अनेक छोटीमोठी युद्धे झाली. पण, या सगळ्या युद्धानंतर हळूहळू एक समज रूढ होऊ लागला की, फक्त शस्त्रास्त्रांचा वापर करून भूभाग ताब्यात येतो. पण त्यातून आपला प्रभाव वाढविता येत नाही. त्यासाठी त्या देशातील विचारांवर, विचारातून घडणाऱ्या कृतीवर आपला प्रभाव असायला हवा, हे बड्या राष्ट्रांना कळून चुकले. त्यामुळेच १९९० नंतर ‘सॉफ्टपॉवर’ ही संकल्पना रुजण्यास औपचारिकरित्या सुरुवात झाली.

आता ‘सॉफ्टपॉवर’ ही संकल्पना आपण भारताच्या दृष्टिकोनातून पाहू. वेद-बौद्ध-जैन-शीख अशा ज्ञानपरंपरा, समुद्रमार्गे आणि खुष्कीच्या मार्गाने जोडलेले व्यापारी मार्ग या साऱ्यामुळे एक समृद्ध देश असलेल्या भारताची प्रतिमा वसाहतवादाने पुरती बदलली. पाश्चिमात्य आक्रमकांनी हा देश विविधांगांने लुटला. एकीकडे त्यांनी इथली संपत्ती तिकडे नेली, दुसरीकडे या देशाविषयची प्रतिमा देशवासियांच्या आणि जगाच्या नजरेत कशी कमी होईल, याचा त्यांनी जाणीवपूर्वक प्रचार केला. त्यामुळे आपल्या भाषेविषयी, संस्कृतीविषयी विखारी वृत्ती असलेले ‘देशी इंग्रज’ याच देशात जन्माला आले. तसेच जगाच्या नजरेत हा साधू-बैरागी-भिकाऱ्यांचा देश बनला. जगाच्या विचारांवर असलेली भारताची ‘सॉफ्टपॉवर’ पाश्चिमात्य आक्रमकांनी ठरवून संपवली.

पुढे स्वातंत्र्याच्या मागणीचा जोर वाढला आणि जगातील भारताबद्दलची प्रतिमा बदलण्यास नव्याने सुरुवात झाली. भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच जगाला गांधीजी कळले होते. भारताचा स्वातंत्र्यप्राप्तीचा मार्ग वेगळा आहे, हे जगाला कळले होते. तेथून पुन्हा एकदा पाश्चिमात्यांनी काळवंडलेली भारताची प्रतिमा पुन्हा एकदा नव्याने जगापुढे येऊ लागली. स्वातंत्र्योत्तर काळात तर भारताचा जगाशी आणि जगाचा भारताची असलेले नाते विविधांगांने समृद्ध होत गेले. त्यातूनच जगभर योग, आयुर्वेद, भारतीय कुटुंबपद्धती या गोष्टी जगभर पसरल्या.

नव्वदोत्तर जागतिकीकरणाने त्याला आणखीच गती देली. आता या सगळ्यातून जगाची भारताविषयीची मते बदलू लागली आहे. या नव्या प्रतिमेमधून भारताला एक नवी संधी मिळाली आहे. ती म्हणजे आजच्या संकुचित, पर्यावरणविनाशी आणि एकटे पडत चाललेल्या जगाला, नवा विचार देण्याची. हा विचार भारतासाठी नवा नाही, फक्त त्याचे महत्त्व आधी आपल्याला पटवून घ्यावे लागेल आणि मग जगाला पटवून द्यावे लागेल.

विश्वाचे आर्त माझ्या मनी

आज कोरोनामुळे या संकुचिततेचा सर्वत्र अतिरेक झालेला आपल्याला दिसतो आहे. देशादेशातील आणि माणसामाणसांमधल्या भिंती वाढताना दिसत आहेत. जगभरातील मानसशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ आपल्याला धोक्याचे इशारे देताहेत. पर्यावरणाचे अभ्यासक तर ओरडून ओरडून सांगताहेत, की आजची ही जीवनपद्धती आपल्याला विनाशाच्या दरीत लोटणारी आहे. त्यामुळे अधिकाधिक पर्यावरणपूरक (इकोफ्रेंडली), चिरस्थायी (सस्टेनेबल) अशा जीवनपद्धतीची गरज आहे.

पंढरीची वारी याच जीवनपद्धतीची दिशा गेली सातशे वर्ष आपल्याला दाखवते आहे. त्यामुळे आता ‘भूतां परस्परे जडो मैत्र जीवांचे’ म्हणणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानाचा अर्थ जगाला सांगायची वेळ आली आहे. ‘विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकटले’ म्हणणारे संत ज्ञानेश्वर आज जागतिक परिषदांमध्ये चर्चेला असणाऱ्या ‘ग्लोबल ब्रदरहूड’चीच भाषा बोलतात. तसेच ‘जे का रांजले गांजले’ म्हणणारे तुकोबा याच परिषदांमधील ‘बॉटम लाइन अप्रोच’ने जगाच्या उत्थानाचे गणित मांडतात. या संतांनी पंढरीच्या वारीत रुजवलेले हे विचार खऱ्या अर्थाने ‘ग्लोबल’, ‘युनिव्हर्सल’च आहेत. फक्त आपण त्यांना नव्या जगाच्या भाषेत मांडायला हवे.

जगभरातील मानवतेच्या भौतिक आणि मानसिक विकासासाठी २०१५ मध्ये संयुक्त राष्ट्रांनी (युनायटेड नेशन्स) १७ चिरस्थायी विकासाची ध्येये (सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स-एसडीजीज) ठरवली. २०३० पर्यंत ही ध्येये साध्य करण्यासाठी जगभरातील सर्व देशांनी आपले कार्यक्रम आखावेत असे त्याचे नियोजन आहे. ही ध्येये नीट पाहिली तर कळते की, पंढरपूरच्या वारीचा विचार यातील अनेक ध्येयांच्या दिशेने केलेले अखंड प्रवास आहे. यातील अनेक ध्येये तर वारीमध्ये प्रत्यक्षात साध्य होताना पाहता येतात. एसडीजीमधील शेवटचे आणि महत्त्वाचे ध्येय आहे, ‘पार्टनरशिप फॉर द गोल्स’. शेवटी वारी वारी म्हणजे तरी काय, एका ध्येयाकडे सर्वांनी मिळून केलेला प्रवासच आहे की.

आज भारताने स्वतःच्या ‘सॉफ्टपॉवर’ या सामर्थ्याचा खऱ्या अर्थाने विचार करण्यास सुरुवात केली आहे. जगभरातील भारतीय दूतावास आणि भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेसारख्या ( Indian Council For Cultural Relations) संस्था भारताचा, भारतीयत्वाचा विचार काय आहे, हे जगाला पटवून देण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करत असतात. पंढरीच्या वारीचे महत्त्व या संस्थांच्या माध्यमातून विविध देशांपर्यंत, तेथील स्थानिक भाषांमधून पोहचण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.

सध्या संस्कृत-पाली भाषा, रामायण-महाभारतसारखी काव्ये, योग-विपश्यनेसारख्या ध्यानपद्धती, भरतनाट्यम-कथकसारख्या नृत्यपरंपरा, चित्रशिल्पे, खाद्यसंस्कृती अशा माध्यमातून जगाला भारताची ओळख पटवून देण्यासाठी वेगाने प्रयत्न होत आहे. या साऱ्यासोबत पंढरीच्या वारीमागचा विचार आणि या वारीची खरीखुरी ओळख जगाला पटवून दिली तर, माऊलींनी मांडलेली ‘हे विश्वची माझे घर’ ही संकल्पना खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात यायला मदत होईल.

एक तरी वारी (नव्याने) अनुभवावी

राज्यशास्त्राच्या अभ्यासकांच्या मते, १९व्या आणि २०व्या शतकात देशात जो सामाजिक, राजकीय विचार दृढ होत गेला, ज्या विचारांनी देशात आधुनिकतेची आणि पुरोगामित्वाची पायाभरणी केली, त्याची नाळ भक्तीपरंपरेत सापडते. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक या भागात वारकरी संत आणि पंढरीच्या वारीचा प्रभाव फार मोठा आहे. या सगळ्याचा जो काही अभ्यास झाला आहे, तो मराठीतून झाला आहे. जे काही साहित्य इंग्रजीमध्ये उपलब्ध आहे, ते मराठीतून इंग्रजी केलेले भाषांतर आहे किंवा विदेशी (विशेषतः पाश्चिमात्य) अभ्यासकांनी मांडलेले आहे. त्यामुळे भारतीय अभ्यासकांनी आता याकडे नव्याने लक्ष देण्याची मोठी गरज आहे.

माऊलींच्या पसायदानाचा अर्थ जरी आपण जगाला विविध भाषांमधून सांगू शकलो, तरी एक मोठे काम होईल. पण त्यासाठी वारीचा आणि वारकरी पंरपंरांकडे नव्याने पाहायला लागेल. नामदेव महाराज पंजाबपर्यंत (आजच्या पाकिस्तानापर्यंत) वारीचा, समतेचा विचार घेऊन गेले. तिथल्या मातीत तो रुजला, पुढे शीख विचाराच्या रुपात तो तिथे उगवला आणि जगभर पसरला. नामदेवांप्रमाणेच आपल्या मातीत अनेक संतांनी हा विचार वेगवेगळ्या पद्धतीने रुजवला आहे. एकनाथ-जनाई-चोखोबा-निळोबांनंतर आजही ही परंपरा संपलेली नाही.

या पंरपेरेच्या पालख्या खांद्यावर घेऊन लक्षावधी पावले दरवर्षी पंढरीच्या दिशेने चालत आहेत. पंढरीची वारी गेली शेकडो वर्षे निघते आहे. या वारीबद्दल बोलताना मनात भक्तीभाव दाटून येतो, कानात टाळ वाजतात, आतआत कुठे तरी वीणा झंकारू लागले. हे सारे खरे असले तरी हा फक्त सोहळा नाही. हा एक विचार आहे. या सोहळ्याकडे आता फक्त धर्म, श्रद्धा या दृष्टिने न पाहता त्याकडे सामाजिक, जागतिक दृष्टिकोनातून पाहण्यास सुरुवात करुया. चंद्रभागेच्या वाळवंटात मांडलेला समतेचा, मानवतेचा खेळ आपण कॉलेरेडो-मिसिसिपीच्या खोऱ्यापर्यंत पोहचवूया.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.