Published on Aug 27, 2020 Commentaries 0 Hours ago

पाकिस्तानच्या नवीन नकाशाने काश्मिरी जनतेला कळून चुकले की, गेल्या ७० वर्षांपासून त्यांची दिशाभूल झाली. पाकने आझाद-काश्मीरचे भूत नाचवून फक्त राजकारण साधले.

पाकच्या कागदावरच्या रेघोट्या

Source Image: gumlet.assettype.com

आजपर्यंत पाकिस्तानी सरकार जम्मू-काश्मीरमधील जनतेला भारतापासून स्वतंत्र होण्याची फूस लावत होते. तेथील जनतेला आझादीचे स्वप्न दाखवून, त्यांच्या मनात भारताविरोधी वातावरण तयार करत होते. पण आता पाकिस्तानच्या नवीन नकाशाने काश्मिरी जनतेला कळून चुकले की, गेल्या ७० वर्षांपासून त्यांची दिशाभूल होत होती. पाकिस्तानने आझाद-काश्मीरचे भूत नाचवून फक्त राजकारण साधले, हे काश्मिरींना पुरते कळले आहे.

पाकच्या या नापाक कृत्यामुळे हुर्रियतचे जे फुटीरतावादी नेते आहेत, त्यांची लढाई आता भारतासोबत नसून पाकिस्तानसोबत असेल. पाकिस्तानच्या नवीन नकाशामध्ये जम्मू-काश्मीरला पाकिस्तानमध्ये दाखवून इम्रान खान यांनी सर्वात मोठी चूक केली आहे. आता उलट पाकव्याप्त काश्मीर आणि गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये हुर्रीयतच्या कारवाया वाढू शकतात. त्याचा फायदा भारताला मोठ्या प्रमाणात होऊ शकतो.

पार्श्वभूमी

५ ऑगस्ट २०१९ रोजी भारत सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा प्रदान करणारे कलम ३७० काढल्यापासून पाकिस्तानी सत्ताधीश बैचेन होते. भारताच्या या निर्णयाला विरोध करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेमध्ये जम्मू-काश्मीर हा विषय चर्चिला जावा, यासाठी बरेच प्रयत्न पाकिस्तान आणि चीनने केले. पण आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानप्रेमी देश वगळता इतर कोणीही या विषयावर फारसे बोलले नाही. तसेच संयुक्त राष्ट्र संघटनेच्या अनौपचारिक बैठकीत थोडी फार चर्चा झाली, पण त्यातूनही विशेष काही निष्पन्न झाले नाही. म्हणून पाकिस्तान सरकारने ४ ऑगस्ट २०२० रोजी देशाचा नवीन राजकीय नकाशा प्रसिद्ध केला.

या नकाशामध्ये संपूर्ण जम्मू-काश्मीर आणि लडाखचा भूप्रदेश तसेच गुजरात राज्याचा जुनागढ आणि सर क्रिक खाडी परिसर हा पाकिस्तानी हद्दीत दाखविला आहे. आजपर्यंत पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीर (पी.ओ.के) आणि गिलगिट बल्टिस्तान यांना अधिकृतपणे आपल्या हद्दीत येत असल्याचे सांगितले होते. पण, या नवीन नकाशा मध्ये दाखविलेले जुनागढ आणि सर क्रिक हे भू-प्रदेश नव्या वादाला तोंड फोडेल, की काय हा प्रश्न उपस्थित होत आहे.

पाकचा हा नवीन नकाशा प्रकाशित झाल्यावर पाकिस्तानी परराष्ट्र मंत्री शाह मोहंमद कुरेशी यांनी वक्तव्य केले की, “खूप दिवसांनी पाकिस्तानचे स्वप्न पुर्ण झाले आहे”. आता नकाशा प्रकाशित केल्याने, स्वप्ने कशी पूर्ण होतात हे त्यांनाच माहीत. पण, भारत सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घ्यावे. कारण काही दिवसांपूर्वी नेपाळ कम्युनिस्ट सरकारने पाकिस्तानप्रमाणे नवीन नकाशा प्रकाशित करुन लिम्पियाधुरा, लिपुलेख आणि कालापानी हे भारतीय हद्दीतील भू-प्रदेश नेपाळी नकाशामध्ये दाखवले होते. भारत सरकारने याकडे अद्याप फारसे लक्ष दिलेले नाही.

तसेच आजपर्यंत पी.ओ.के आणि गिलगिट बाल्टीस्तानच्या पुढे आपला हक्क न सांगणाऱ्या आणि जम्मू काश्मीरला “भारतव्याप्त काश्मीर” (IOK) म्हणणाऱ्या पाकिस्तानने आता नवीन शब्दप्रयोग “भारत अनधिकृत व्याप्त जम्मु काश्मीर” (IIOJK) असे करायला सुरुवात केली आहे. पाकिस्तानने हे पाऊल अचानक का उचलले यामागे बीजिंगची फूस असू शकते. कारण भारताला दक्षिण आशियाई राजकारणात गुंतवण्याचे चीनी धोरण काही प्रमाणात यशस्वी ठरत आहे. म्हणून आजच्या घडीला भारताशेजारील राष्ट्रे चीनसोबत उभे राहून भारतविरोधी आघाडी उभी करत आहेत. नेपाळ आणि पाकिस्तानने सुरु केलेल्या कागदी युद्धाचा अंत तेथील राजवट संपुष्टात आल्यावरच होईल, असे दिसते.

सियाचीनची डोकेदुखी

पाकिस्तानने प्रकाशित केलेल्या नवीन नकाशामध्ये सियाचीनसहित संपूर्ण जम्मू-काश्मीरवर आपला हक्क सांगितला आहे. यामध्ये चीनसोबत कोणतीही सीमा दाखविली नाही. त्या ठिकाणी “अपरिभाषित” हा शब्दप्रयोग केला आहे. म्हणजे चीनसोबत खुली सीमा ठेवण्याचा आणि येणाऱ्या काळात “चायना-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर” (CPEC) चा संपूर्ण परिसर चीनच्या प्रत्यक्ष नियंत्रणाखाली देण्याचा पाकिस्तानचा मनसुबा यातून दिसून येतो. तसेच सामरिकदृष्ट्या महत्वाचा समजला जाणारा, सियाचीन परिसर भारत आणि पाकिस्तानसाठी १९८० पासुन डोकेदुखी ठरत आहे.

या सियाचीन क्षेत्रामध्ये आतापर्यंत दोन्ही देशाचे २७०० जवान हिमस्खलन, ऑक्सिजनची कमतरता, उच्च प्रदेशीय गंभीर आजार आणि अतिथंड तापमानामुळे मृत्यू पावले आहेत. तसेच अमेरिकेतील दक्षिण आशियाचे तज्ज्ञ स्टिफन कोहेन यांनी तर सियाचीनबाबत “एका कंगव्यासाठी दोन टकल्यांची लढाई” असे वक्तव्य केले आहे. एकंदरीत त्याठिकाणी पैसा आणि सैन्याची हानी होते, असे मत बऱ्याच तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. तरीही इतका कळवळा इम्रान खान यांना सियाचीन बाबत का आहे, हे येणारी वेळच सांगेल.

जुनागड आणि सर क्रिकचा नवा अध्याय

१९४७ नंतर जुनागढ संस्थानचा तिसरा नवाब सर मुहंम्मद महाभत खान आणि त्याचा महत्वकांक्षी दिवाण शाहनवाझ भुट्टो (पाकिस्तानी माजी प्रधानमंत्री बेनझिर भुट्टो यांचे आजोबा) यांनी पाकिस्तानमध्ये सामील होण्यासाठी १५ ऑगस्ट १९४७ रोजी Instrument of Accession वर स्वाक्षऱ्या केल्या. पण तेथील बहुसंख्य हिंदू जनतेने नवाबाच्या या निर्णयाचा मोठ्या प्रमाणात विरोध केला होता. हा सर्व विरोध दडपण्यासाठी बॅरिस्टर जिना यांनी नवाबाला २५ हजार सैन्य आणि ८ करोड रुपये दिले होते. पण वेळीच सरदार वल्लभभाई पटेल यांनी वी.पी.मेनन यांच्याद्वारे संपुर्ण जुनागडची नाकेबंदी करून नवाबाला पळून जाण्यास भाग पाडले. त्यामुळे विनासैन्य कारवाईद्वारे जुनागड भारतात सामील झाले. त्यावेळी जराही विलंब जुनागडच्या बाबतीत झाला असता तर संयुक्त राष्ट्र संघाच्या विचारधीन हा विषय प्रलंबित पडला असता. त्यावेळी पाकिस्तान एकाच वेळी काश्मीर आणि जुनागड हे विषय हाताळू शकत नव्हते म्हणून तेव्हा हा विषय चर्चेविना मागे राहिला. पण आज चीन पी.ओ.के. आणि लडाखमध्ये उपस्थित आहे म्हणून ही नवीन आघाडी पाकिस्तानने उघडली आहे.

तसेच जुनागड संस्थानच्या जवळ असलेले गोंडल हे गाव बॅ. मोहंम्मद अली जिना‌ यांचे मुळ गाव आहे. त्यामुळे जुनागडच्या निमित्ताने जिनांचे स्वप्न पूर्ण करण्याचा इम्रान खानचा विचार दिसतोय. तसेच सर क्रिक खाडीची (भारतीय नाव – बाणगंगा) सीमा १९५४ पर्यंत खुली होती त्यावेळी मानवी तस्करी, ड्रग तस्करी मोठ्या प्रमाणात सुरु होती. १९६५ च्या युध्दात पाकिस्तानने या ठिकाणी हल्ला करून हा परिसर ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला पण त्यात ते यशस्वी होऊ शकले नाही. त्यानंतर १९९९ च्या कारगिल युध्दानंतर पाकिस्तान नौदलाचे अटलांटिक-९१ ब्रिगेट विमान सर क्रिकच्या हवाई क्षेत्रात आल्यावर भारतीय वायुदलाच्या मिग-२१ ने त्याला पाडले त्यात पाकिस्तानचे १७ अधिकारी मारले गेले. त्याचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तान नेहमी सर क्रिकचा विषय पुढे करत असतो. पण त्यात ते यशस्वी होत नाही.

सध्या जुनागडच्या या परिसरात United Nations Convention on the Law of the Sea (UNCLOS) च्या थालवेग प्रीन्सिपल नुसार प्रवाहानुसार बदलती सीमा निश्चित केली आहे. तरीही अधूनमधून पाकिस्तान या भागात दखल देत असतोच. ही खाडी मासेमारीसाठी मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे आणि त्याठिकाणी शेल ऑईल, हायड्रोकार्बनचे प्रचंड साठे असल्याने हा भू- प्रदेश पाकिस्तान सहजासहजी गमावणार नाही.

एकंदरीत पाकिस्तानचा हा नवा नकाशा आणि चीनची त्यांना असलेली फूस पाहता, भविष्यात हे प्रकरण पुन्हा डोके वर काढल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे या आघाडीवर भारताने सदैव सज्ज राहून, वेळोवेळी पाकिस्तानची नांगी ठेचायलाच हवी. तसेच याबदद्ल आंतरराष्ट्रीय आघाडीवर आपली बाजू खणखणीतपणे मांडत राहणे अत्यावश्यक आहे. शेवटी कागदी नकाशावर रेषा मारून राजकीय भूगोल बदलत नसतो, तो स्वतःच्या सामर्थ्यावर टिकवावा लागतो.

(विलास कुमावत हे जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील ‘डिफेन्स अँड स्ट्रॅटेजिक स्टडीज’ येथे ज्युनिय रिसर्च फेलो आहेत.)

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.