Author : Abhijit Singh

Published on Apr 15, 2020 Commentaries 0 Hours ago

युद्धनौकांवर सामाजिक अंतर ठेवण्यास पुरेसा वाव नसतो. त्यामुळे संसर्ग झाल्यास नौदलामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाची साथ पसरण्याचा गंभीर धोका आहे.

समुद्रावरही कोरोनाची दहशत

कोरोनाने जसा जमिनीवर हाहाकार माजविला आहे, तसेच समुद्रातही या विषाणूने सारे व्यवहार ठप्प केले आहेत. माणसाच्या इतिहासातील या प्रचंड मोठ्या आपत्तीमुळे अब्जावधींचे आर्थिक नुकसान तर होते आहेच, पण जहाजांवर पसरलेल्या या साथीमुळे समुद्रातही जीवीतहानी होण्याचा धोका संभवतो आहे. भारतासह जगभरातल्या अनेक देशांनी आपल्या नौदलांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच या महामारीशी दोन हात करण्यासाठी लष्करी पद्धतीने उपाययोजनाही आखल्या आहेत.

काही दिवसांपूर्वीच अमेरिकेच्या कमांडिंग अधिकाऱ्यांनी त्यांच्या जहाजावरील कोव्हीड-१९ च्या उद्रेकाला थोपवण्यासाठी मदत हवी असल्याचा, तातडीचा संदेश पाठवला होता. हा संदेश मिळताच, अमेरिकेच्या नौदलाने ‘युएसएस थिओडोर रूझवेल्ट’ या जहाजवाहू नौकेचे स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला. कॅप्टन ब्रेट क्रोझिअर यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना लिहिलेल्या चार पानी पत्रात, संसर्ग झालेल्या सैनिकांचे अलगीकरण आणि क्वारंटाइन करण्याची विनंती केली होती. अमेरिकेच्या नौदलीय अधिकाऱ्यांनी हे चार पानी पत्र ‘असामान्य’ असल्याचे म्हंटले. जहाजावरील फक्त ३६ जणांना या विषाणूचा संसर्ग झाला असला तरीही, क्रोझिअर यांनी जहाजावरील सर्वच्या सर्व म्हणजे ५ हजार जणांची ग्वाम येथील किनारपट्टीवर तपासणी केली जावी, अशी इच्छा व्यक्त केली.

काही दिवसांपूर्वीच ‘युएसएस बॉक्सर’ या लढाऊ जहाजावर देखील कोरोना व्हायरसचा एक रुग्ण आढळल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. यामुळे जहाजावरील ८० वरिष्ठ नौसैनिक आणि अधिकाऱ्यांना एका छोट्याशा खोलीत बंद करण्यात आले होते. सीमेवर लढणाऱ्या या लढाऊ जहाजांवर अशाप्रकारे कोरानाचे संक्रमण वाढत असल्याचे पाहून अमेरिकन नौदल चिंताक्रांत झाले होते. खचाखच भरलेल्या या जहाजावर या साथीचा वेगाने प्रसार होईल, या भीतीने कमांडर्सनी मोठ्या संख्येने जमाव करण्यास बंदी घातली आणि सामाजिक अंतर ठेवण्याचे कठोर शिष्टाचार पाळण्याचे आदेश त्वरित अंमलात आणले.

फक्त अमेरिकन नौदलानेच अशा प्रकारे कठोर प्रतिबंधात्मक उपाययोजना अंमलात आणल्या असे नाही. इतर नौदलांनी देखील आपल्या कार्यपद्धतीत तातडीने बदल केले. त्यांनी जहाजावरील सैनिकांचा बाह्य संपर्क कमी केला. यासाठी घरातून काम करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली. समुद्रावरील विदेशी तैनातीत घट केली आणि विदेशी बंदरांना भेटी देण्याचे प्रमाण देखील कमी केले.

भारतीय नौदलानेही खबरदारीचा उपाय म्हणून आपले ‘मिलन’ हे नौकासंचलन यापूर्वीच रद्द केले. या विषाणूशी लढण्यासाठी काही क्रमाक्रमाने काही पावले उचलणार असल्याची घोषणा भारतीय नौदलाने केली. भारतीय नौदलाच्या जहाजांना विदेशी किनाऱ्यावरील बंदरांना भेटी देण्याचे प्रमाण कमी करण्याचे, आदेश देण्यात आले आहेत. भारतीय कमांडर्सही ठराविक अंतराने नाविकांची वैद्यकीय चाचणी करून घेण्यासाठी यंत्रणा उभारण्याचा प्रयत्न करत आहेत. याचवेळी युद्धनौकांना रसद पुरवण्यात व्यत्यय येऊ नये आणि संकटकाळी इंधन पुरवठा कायम राखण्यासाठी म्हणून इतर भारतीय नौदलाच्या जहाजांच्या सहाय्याने आंतरराष्ट्रीय जल क्षेत्रात जाऊन या जहाजांना इंधन आणि रसद पुरवठा केला जात आहे. दरम्यान, अगदी आणीबाणीची स्थिती निर्माण झालीच तर त्याची पूर्वतयारी म्हणून मुंबई, विशाखापट्टणम आणि कोची या बंदरांवर क्वारंटाइन सुविधा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

एवढे प्रयत्न असूनही, नौदलामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाची साथ पसरण्याचा गंभीर धोका आहेच. नौदलातील जहाजांचा आकार त्यांच्या गरजेनुसार बनवण्यात आलेला असतो. त्यांचा हा आकार लक्षात घेता अशा प्रकारच्या साथीच्या उद्रेकाला बळी पडण्याची शक्यता अधिक आहे. जहाजांवरील अरुंद मार्ग, छताची कमी उंची आणि बंदिस्त आवार यामुळे युद्धनौकांवर सामाजिक अंतर ठेवण्यास पुरेसा वाव नसतोच. अनेक नौदलीय जहाजांवरील येण्या-जाण्याचा मार्ग अरुंद असतात आणि तेही वरच्या बाजूनेही झाकेलेले असतात.

युद्धनौकांच्या दरवाज्यातून ये-जा करतानाही त्यांची सतत उघडझाप करावी लागते. नौसैनिकांना झोपण्यासाठी दिलेली जागाही आळीपाळीने वापरावी लागते. याला हॉट-बंक म्हणतात, त्यांना याची सवय झालेली असते. अगदी साहित्य ठेवण्यासाठी असलेले लॉकर्स आणि स्टोरेज देखील एकमेकांसोबत शेअर करावी लागतात. जेवणाची व्यवस्थाही मर्यादीत जागेत केलेली असते. इथे नौसैनिकांना स्वतःच पदार्थ वाढून घेऊन खावे लागतात. जेवण ठेवलेले टेबल्सही दाटीवाटीने मांडण्यात आलेले असतात. त्यामुळे अगदी एकमेकांच्याजवळ बसूनच जेवण उरकावे लागते. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग पसरण्याची दाट शक्यता आहे.

पाणबुड्यांना तर याहीपेक्षा कठीण परिस्थितीला तोंड द्यावे लागते. याबाबत फ्रेंच नौदलाचे निवृत्त अॅडमिरल डॉमिनिक सेल्स यांनी गेल्याच आठवड्यात समुद्रात खोलवर जाणाऱ्या आण्विक पाणबुड्यांवर या विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी जागरूक राहण्याची सूचना केली होती. पाण्याखाली चालणारी गस्त ही आठ ते दहा आठवडे सुरु राहते. प्रतिबंधात्मक कार्यवाहीपासून त्यांचे लक्ष विचलित होईल, अशा कुठल्याची घटनांची माहिती या पाणबुड्यांना दिली जात नाही. अगदी फेब्रुवारीच्या शेवटी किंवा मार्चच्या सुरुवातीला (जेव्हा चीन बाहेर या विषाणूचा प्रसार होण्यास सुरुवात झाली) जरी एखादा संसर्गजन्य खलाशी या पाणबुडीवर दाखल झाला असेल तरी, संपूर्ण क्रूवर यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. सेल्स यांनी २००० मध्ये चार फ्रेंच आण्विक पाणबुड्यांचे नेतृत्व केलेले आहे. त्यामुळे त्यांना परिस्थतीचे गांभीर्य चांगलेच ओळखता येते.

नौदलाच्या संचलनाच्या पलीकडे अगदी व्यापारी जहाजे आणि सागरी मालवाहतूक क्षेत्रालाही या विषाणूमुळे जोराचा फटका बसतो आहे. व्यापारी जहाजांच्या व्यवसायाला सध्या अपरिमित नुकसान सोसावे लागत आहे. गेल्या दशकभरात कधीही इतक्या मोठ्या प्रमाणातील नुकसान पाहायला मिळाले नव्हते. या महामारीमुळे त्यांची असुरक्षितता उघड झाली आहे. जानेवारी पासून अनेक बंदरावरील व्यापारी जहाजांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. यामध्ये युरोप आणि चीन मधील जहाजांचा देखील समावेश आहे. शांघाई आणि यांग्शांग येथील व्यापारी जहाजांच्यासंख्येत पाचपट घट झाली आहे. जगभरातील इतर महत्वाच्या बंदरावरील चित्रही फारसे वेगळे नाही. या बंदरावरील अधिकाऱ्यांनी चीनहून येणाऱ्या किंवा चीनमार्गे येणाऱ्या व्यापारी जहाजांना चौदा दिवसांचा अलगीकरण कालावधी दिला आहे. लक्षणीय प्रमाणात कारखाने बंद पडल्याने मालवाहतूक क्षेत्राला देखील मोठा फटका बसला आहे.

समुद्रातील नेहमीच्या व्यापारी मार्गावरून जाणाऱ्या जहाजांची संख्या कमी झाल्याचे दिसत आहे. युरोप-आशिया आणि अमेरिका- आशिया पॅसिफिक या मार्गावरील अनेक वाहतूक सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे वाहतुकीच्या क्षमतेत प्रचंड मोठी घट झाली आहे. डॅनिशचे मोठे समुद्री व्यापारी मार्स्क यांनी गेल्याच आठवड्यात या विषाणूच्या प्रसाराने मिळकतीवर गंभीर दुष्परिणाम होणार असल्याचा इशारा दिला होता. व्यापारी जहाजे आणि बंदरांशी मोठ्या प्रमाणात संपर्क येत असल्याने वाहतूक कंपन्यांनी युरोप-आशिया मार्गावरील वाहतुकीचे प्रमाण कमी केले आहे. परंतु, अधिकाऱ्यांच्या मते, चीनहून ये-जा करणाऱ्या जहाजांच्या संख्येत घट झाल्याने त्याचा मोठा आर्थिक फटका बसणार आहे.

कोव्हीड-१९ चा जहाजबांधणी उद्योगावर काय परिणाम होणार आहेत याची पुरेशी दाखल घेतली गेली नसली तरी हा मुद्दाही तितकाच महत्वाचा आहे. नौदलातील आणि आरमारातील जहाजबांधणीच्या कामाची गती धिमी झाल्याचे वृत्त आहे. इंजिनियर आणि कामगारांच्या आजारी पडण्याचे प्रमाण देखील लक्षणीय आहे. अनेक जहाजबांधणी उद्योगांनी या विषाणूच्या प्रसारामुळे आपत्तीजनक परिस्थिती घोषित केली आहे.

आपापल्या कंत्राटदारांकडे त्यांनी माल वितरणाच्या तारखा बदलून देण्याची मागणी केली आहे. फिंकटेंटीअरी सारख्या इटालियन जहाजबांधणी कंपनीने तात्पुरत्या कालावधीसाठी कामकाजच स्थगित केले आहे. मोठा कर्मचारी वर्ग आणि अपुऱ्या साधन पुरवठ्यामुळे जहाजबांधणी उद्योगांनी आपल्या कामाचे नियोजन बदलण्याचा आणि वितरणाच्या तारखा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

काही जणांना सध्याची मंदी ही तात्कालिक स्वरुपाची असेल आणि पुढील दोन महिन्यात ड्राय बल्क, टँकर आणि कंटेनरच्या व्यापारात पुन्हा पूर्वीसारखे सामान्य दिवस येतील अशी आशा आहे. गेल्या काही आठवड्यांत टँकरचे दर घसरले आहेत. यामध्ये विषाणूच्या प्रसाराचा जितका वाटा आहे, तितकाच वाटा तेल किमतीतील स्पर्धेचाही आहे. यामुळे सागरी बाजारपेठेत प्रचंड तूट निर्माण झाली आहे. तरीही हे समुद्री वीर आशावादी राहण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत, ते देखील पुढे फार काही अघटीत घटना घडणार नाहीत एवढीच आशा ठेवू शकतात.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.