Published on Mar 05, 2020 Commentaries 0 Hours ago

फक्त चीनलाच नाही तर, जगातील बहुतांश लोकसंख्येला कोरोना व्हायरसपासून मोठा धोका आहे, यात शंकाच नाही. भारतीय उपखंडाला याचा मोठा फटका बसेल.

कोरोना उद्रेकाने उपखंडाला धक्का

जीवघेण्या करोना व्हायरसच्या उद्रेकाने चीनमध्ये गेल्या दोन महिन्यापासून उच्छाद मांडला आहे. गेल्या वर्षीच्या डिसेंबर मध्ये चीनच्या वूहान शहरातून या विषाणूच्या प्रसाराला सुरुवात झाली. परंतु, आजघडीला जगभरातील अनेक शहरात याचा वेगाने प्रसार होते आहे. भारत, जर्मनी, अमेरिका आणि युनायटेड किंगडम या देशांत तर यापूर्वीच या रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. पण, यांसह २७ राष्ट्रांत या रोगाचा प्रसार झाला असल्याचे एका अहवालाद्वारे जाहीर करण्यात आले आहे. एकट्या चीनमध्येच कोरोना व्हायरसने ११०० लोकांचा बळी घेतला असून, तब्बल ३७ हजार नागरिकांना याची लागण झाली आहे.

चीन प्रामुख्याने संपूर्ण जगाशी जोडला गेलेला आहे. मानवी संपर्काद्वारे या रोगाचा प्रसार होण्याची सर्वाधिक शक्यता आहे. या रोगामुळे चीन आणि उर्वरित जगाशी त्याच्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय आणि अगदी सामरिक संबंधावर देखील नकारात्मक परिणाम होत आहे.  त्यामुळे संपूर्ण जगापासून चीन थोडा अलिप्त झाला आहे.

वूहान प्रांतात जेंव्हा या प्रकारचा पहिला रुग्ण आढळून आला, तेंव्हाच चीनी सरकारने तातडीने पावले उचलली असती तर, चीन आणि जगाच्या इतर भागातही या विषाणूमुळे जो अनर्थ ओढवला आहे तो कदाचित ओढवला नसता. वूहानमध्ये या रोगाची साथ पसरल्याचे ज्या डॉक्टरने सरकारच्या निदर्शनास आणून दिले, तो डॉक्टर देखील याच विषाणूचा बळी ठरला.

कोरोना व्हायरसमुळे जी धोक्याची घंटा वाजते आहे, ती ध्यानात घेऊन अगदी जागतिक आरोग्य संघटनेनेदेखील टोकाची भूमिका घेत आंतरराष्ट्रीय पातळीवर सार्वजनिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली. नुकतेच जागतिक आरोग्य संघटनेने असेही जाहीर केले आहे की, जगभरात कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण अनेक पटींनी वाढू शकते.

२००२-०३ मध्ये चीनमध्ये सार्सच्या साथीने ७७४ जणांचा मृत्यू झाला होता. कोरोना व्हायरससारखाच हाआणखी एक आजार. परंतु, यावेळी करोना व्हायरसने मात्र हे रेकॉर्डदेखील मोडीत काढले आहे. आत्तापर्यंत या व्हायरसने ८०० पेक्षा जास्त लोकांचा बळी घेतला आहे. कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळवण्यासाठी चीनच्या हुबेई प्रांताची राजधानी असलेले वूहान शहराचा संपर्क बंद करण्यात आला आहे. हुबेई प्रांतातील ५६ दशलक्ष नागरिकांना अक्षरश: बंदिस्त ठेवण्यात आले आहे.

भारत, जर्मनी, इंडोनेशिया, अमेरिकासारखे अनेक देश चीनमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी हवाई मार्गाचा वापर करत आहेत. चीनमधून हवाई मार्गे आपल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी भारताने मालदीवलाही मदत केली. पाकिस्तानचे नागरिक देखील चीनमध्ये अडकले आहेत. मानवतावादी भूमिकेतून  भारताने पाकिस्तानला देखील मदत करण्याची तयारी दाखवली. पण, त्या देशाकडून अद्याप काहीही प्रतिसाद मिळालेला नाही.

दुर्दैवाने पाकिस्तानप्रमाणेच नेपाळने देखील चीनमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांची सुटका करण्यात थोडाही रस दाखवलेला नाही. चीनमध्ये अडकलेलेया देशांतील नागरिक अक्षरश: रडकुंडीस आले आहेत.  असे असले तरी दररोज अनेक नेपाळी नागरिक चीनमधून मायदेशी परतत आहेत. चीन मधून परतणाऱ्या या नागरिकांवर नेपाळ सरकारने कसलीही बंधने लादलेली नाहीत. काठमांडू येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर या नागरिकांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी एकही आरोग्य तपासणी पथक कार्यरत नाही. काठमांडू ते चीन दरम्यान, विमानसेवा देणाऱ्या,एअर चायना, चायना साउदर्न, चायना इस्टर्न, सिचुआन एअरलाइन्स, कॅथी ड्रॅगन आणि तिबेट एअरलाइन्स अशा सहाचीनी कंपन्या आहेत.

चीनी नागरिक आणि चीनमध्ये राहणारे इतर देशांचे नागरिक चीन सोडून नेपाळमध्ये येत आहेत. पण, त्यांच्यावर नजर ठेवण्यास नेपाळ सरकार अजिबात उत्सुक नाही. चीन आणि नेपाळ दरम्यान उत्तरेला १४०० किमी लांबीची सामायिक सीमा आहे. त्यामुळे अनेक चीनी नागरिक वेगवेगळ्या मार्गाने नेपाळमध्ये प्रवेश करू शकतात.

तर दुसरीकडे हॉंगकॉंग या चीनचाच एक भाग असणाऱ्या प्रांतात मात्र, चायनीज कोरोना व्हायरसच्या दुष्परिणामांपासून आपल्या नागरिकांना वाचवण्यासाठी, सीमापार रेल्वे मार्ग, आणि चीनच्या मुख्य भूमीतून प्रवास करणाऱ्या सर्व सेवा बंद करण्यात आल्या आहेत. हे पुरेसे न वाटल्याने, कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी त्यांनी चीन मधून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला किमान दोन आठवडे सक्तीने अलग ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

त्याचप्रमाणे भारताने देखील, या व्हायरसच्या प्रसार होऊ नये यासाठी खबरदारीची उपाययोजना म्हणून, चीनी प्रवाशांना आणि चीनमध्ये राहणाऱ्या परदेशी नागरिकांना इ-व्हिजा देण्याचे काम तात्पुरत्या काळासाठी थांबवले आहे. नेपाळ आणि भारत यांच्यातीलसीमा पाहता, उत्तर प्रदेश सरकार देखील नेपाळसीमेलगतच्या पिलभीत, लाखीमपूर खेरी, बहारीच, श्रावस्ती, बलरामपुर, सिद्धार्थनगर आणि महाराजगानू जिल्ह्यात खबरदारीच्या दृष्टीने या आजारा बाबत जागरूकता  मोहीम राबवत आहे. उत्तरप्रदेश आणि नेपाळ दरम्यान ५७९ किमी लांबीची सीमा असल्याने सरकारने घेतलेली ही खबरदारी वाखाणण्याजोगी आहे.

उत्तरप्रदेश मधील आरोग्य पथके, १९ हजार सीमा दल चौकीच्या मदतीने भारत-नेपाळ सिमेवर लक्ष ठेवून आहेत. विशेषतः चीनशी संबंध असणाऱ्या आणि नेपाळ मधून वैध मार्गाने भारतात येणाऱ्या नागरिकांवर हे पथक विशेष लक्ष ठेवून आहे.  राज्यातील या एसएसबी चेक पोस्टवर आत्तापर्यंत, ताप, खोकला, श्वासोश्वासात अडथळे आणि जडपणा अशी लक्षणे जाणवत होती अशाजवळपास ३५हजार व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. परंतु, बिहार सरकारने मात्र याबाबत कोणतीही उपाययोजना आखलेली नाही. या राज्याची सीमा देखील नेपाळच्या सीमेला लागूनच आहे.

कोरोना व्हायरसचा चीनच्या अर्थव्यवस्थेवर देखील फारच वाईट परिणाम होत आहेत. बीजिंग आणि शांघाय सारख्या शहरातील दुकाने आणि रेस्टॉरंट पूर्णतः बंद आहेत. वाहतूक व्यवस्थातर अगदीच ठप्प झाली आहे. चीनहून बाहेरच्या देशांत जाणारी विमान वाहतूक देखील बंद आहे. चीनच्या शेअर मार्केटने अधिकतम नीचांकी पातळी गाठली आहे.अनेक ग्राहकसेवा उत्पादन उद्योगांवर नामुष्कीजनक वेळ आली आहे.

बँकातील रोख रकमेचा तुटवडा भरून काढण्यासाठी चीनी सरकारने आपल्या अर्थव्यवस्थेत २२ अब्ज डॉलर्सची भर घातली आहे. शिवाय, कोरोना व्हायरसच्या आजाराचा सामना करण्यासाठी चीन सरकारने अतिरिक्त १० अब्ज डॉलर्सची तरतूद केली आहे. तरी, आशिया इकॉनॉमिस्टच्या प्रमुख पँथीऑन मक्रोइकॉनॉमिक्स फ्रेया बिमिष यांच्या अंदाजानुसार २०१९ च्या तुलनेत यावर्षी चीनची अर्थव्यवस्था २ टक्के दराने खालावेल.

रुसुवागढी-केरुंग येथून नेपाल आणि चीन दरम्यान चालणारा व्यापार कोरोनाव्हायरसमुळे पूर्णतः बंद आहे. चालू आर्थिक वर्षातील पहिल्या पाच महिन्यात नेपाळहून चीनला केली जाणारी निर्यात ही ८८.६ अब्ज इतकी होती. तर चीनहून नेपाळला होणारी निर्यात ही ८६३ दशलक्ष इतकी होती. नेपाळहून चीनला पाठवल्या जाणाऱ्या मालात प्रामुख्याने हस्तकला वस्तूंचा समावेश होतो. परंतु, चीनहून आयात केल्या जाणाऱ्या वास्तूंच्या यादीत कपडे, चप्पल, रासायनिक खते, इलेक्ट्रिक वस्तू. मशिनरी, पाईप्स, कच्चे रेशीम, टेलीकम्युनिकेशनची साधने आणि दूरदर्शनसंच अशा अनेक वस्तूंचा समावेश होतो. चीनकडून होणारा पुरवठा बंद झाल्याने नेपाळच्या बाजारपेठेतील आल्याचा दर ३००रु. ते ६००रु. किलो झाला आहे.

हॉंगकॉंगमध्ये तर अगदी टॉयलेट पेपर आणि औषधी उत्पादनांचाही तुटवडा निर्माण झाला आहे. आवश्यक घटकांचा पुरवठा होत नसल्याने दक्षिण कोरियातील अनेक कार कंपन्यांवरव्यवसाय बंद करण्याची वेळ आली आहे.आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत क्रुडऑइलच्या दरात २०% ची घसरण झाली असून सध्या प्रती बॅरेल ५५ $ असा दर आहे. त्याचप्रमाणे आशियामध्ये द्रवरूप नैसर्गिक वायूच्या किमती देखील ३ $/mmBtu पर्यंत घसरल्या आहेत.  भारताला जोपर्यंत  क्रूड ऑईल आणि द्रवरूप नैसर्गिक वायू स्वस्त दरात भेटेल तोपर्यंत सध्याची अर्थव्यवस्थेतील तुट भरून काढण्यास मदत होईल.  शिवाय, या विकसित परिस्थितीचा ग्राहकांना देखील फायदा मिळेल.

फक्त चीनलाच नाही तर, जगातील बहुतांश लोकसंख्येला कोरोना व्हायरसपासून मोठा धोका आहे, यात शंकाच नाही. जागतिक आरोग्य संघटना आणि यासारख्या इतरही संघटनांनी, फक्त चीनमध्येच सार्स-कोरोना सारखे जीवघेणे साथीचे रोग का निर्माण होतात याचा खोलात जाऊन शोध घेतला पाहिजे. एखादा विशिष्ट पदार्थ खाल्ल्याने जर अशा समस्या उद्भवत असतील तर, असे पदार्थ टाळले पाहिजेत. शिवाय, नागरिकांमध्ये त्याबाबत आवश्यक ती जागृती देखील घडवून आणली पाहिजे.  कोरोना व्हायरसमुळे पसरलेली साथ ही एक जागतिक समस्या आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी अधिक वेळ न दवडता जागतिक समुदायाने पुढाकार घेतला पाहिजे. याकडे थोडेसेही दुर्लक्ष झाल्यास अजून मोठी आपत्ती ओढवू शकते.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.