काही दिवसांच्या फरकाने उत्तर व दक्षिण कोरियाने अणूचाचण्या घडवून आणल्याने कोरियन उपखंडात तणावाचे वातावरण आहे. उत्तर कोरियाकडून वारंवार चिथावणी दिल्या गेल्याच्या पार्श्वभूमीवर दक्षिण कोरियाने आठवडाभरात अणूचाचण्या घडवून आणल्याने या प्रदेशातील सुरक्षेवर पडलेला ताण पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
गेला काही काळ उत्तर कोरिया वेगवेगळ्या आघाड्यांवर व्यस्त होता. पण आधी बंद झालेली अणूकेंद्रे काही आठवड्यांपूर्वी पुन्हा चालू करण्यात आल्याचे वृत्त आहे. याच दरम्यान क्रूझ मिसाईलची चाचणी करण्यात आली आहे तर चाचणी करण्यात आलेले बॅलिस्टिक मिसाईल जपानच्या समुद्रात पडल्याची माहिती आहे. खरेतर अशी कारस्थाने करून बायडन प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याचा उत्तर कोरियाचा हा प्रयत्न आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
उत्तर कोरियाच्या यांगब्यान अणू प्रकल्पात संशयास्पद हालचाली घडून येत असल्याची माहिती ऑगस्ट अखेरीस इंटरनॅशनल अटोमिक एनर्जी एजन्सीकडून नोंदवण्यात आली आहे. अमेरिका व ट्रम्प प्रशासनाशी किम जोंग ऊन हे वचनबद्ध आहेत हे दाखवण्यासाठी उत्तर कोरियाच्या अण्वस्त्र कार्यक्रमाचा दीर्घकाळ आधार असलेला यांगब्यान प्रकल्प २०१८ साली तात्पुरता बंद करण्यात आला होता. प्लुटोनियम व ट्रिटीयम हे दोन्ही घटक अत्याधुनिक थर्मोन्युक्लियर शस्त्रास्त्रांच्या निर्मितीसाठी अत्यावश्यक आहेत. हे घटक मिळवण्यासाठी हा प्रकल्प उत्तर कोरियासाठी एकमेव स्त्रोत आहे.
हा प्रकल्प पुन्हा कार्यरत झाल्यानंतर अल्पावधीतच उत्तर कोरियाच्या संरक्षण व्यवस्थेने नव्या क्रूझ मिसाईलची यशस्वी चाचणी घडवून आणल्याची माहिती राष्ट्रीय प्रसारमाध्यमांकडून प्रसारित करण्यात आली. हे क्षेपणास्त्र एक सामरिक शस्त्र आहे तर आण्विक सक्षमीकरणासाठी यांगब्यान हा प्रकल्प महत्त्वाचा आहे असेही त्यात सांगितले गेले आहे. वाढत्या शस्त्रास्त्रांसह हे भांडखोर राष्ट्र पुढील काळात अमेरिका, जपान आणि दक्षिण कोरियासाठी डोकेदुखी ठरणार आहे.
क्रूझ मिसाईलच्या पाठोपाठ उत्तर कोरियाने बॅलिस्टीक मिसाईलचे प्रक्षेपण रेल्वेआधारित मिसाईल लाँचरवरून करण्यात आले आहे. हे मिसाईल जपानच्या समुद्रात पडल्याने संपूर्ण प्रदेशात सतर्कतेचे व तणावाचे वातावरण आहे. क्षेपणास्त्र प्रक्षेपण व वितरण प्रणालीमध्ये वैविध्य आणून उत्तर कोरिया शस्त्रागार आणि संरक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्याचा प्रयत्न करत आहे. जर असे असेल तर अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या लष्कर व गुप्तचर यंत्रणांना उत्तर कोरियाच्या रेल्वे पायाभूत सुविधांचा शोध घ्यावा लागेल आणि आणीबाणीच्या परिस्थितीत या वितरण प्रणालींना लक्ष्य करावे लागेल. या सर्व खटाटोपात अमेरिका व दक्षिण कोरियाच्या व्यवस्थांवर मोठा ताण येणार आहे.
तक्ता : उत्तर कोरियाने घडवून आणलेल्या चाचण्या व क्षेपणास्त्रांची यादी
दिनांक |
चाचण्या |
ऑक्टोबर २०२० |
नव्या व सुधारित ह्वासोंग बॅलिस्टीक मिसाईल आणि पाणबुडीवरून प्रक्षेपित करता येणाऱ्या नव्या बॅलिस्टीक मिसाईलचे मिलेटरी परेडमध्ये दर्शन |
मार्च २५,२०२१ |
उत्तर कोरियाकडून अद्ययावत केएन-२३ कमी पल्ल्याच्या दोन बॅलिस्टीक मिसाईल्सची चाचणी व प्रक्षेपण करण्यात आले. या मिसाईलवर असलेल्या २.५ लाईव वॉरहेडने लक्ष्याचा अचूक वेध घेतला. |
११ आणि १२ सप्टेंबर २०२१ |
नवीन लांब पल्ल्याच्या क्रूझ मिसाईलची चाचणी करण्यात आली. १,५०० किलोमीटरचा टप्पा गाठणाऱ्या या मिसाईलला स्ट्रॅटेजिक शस्त्रांचा दर्जा देण्यात आला आहे. |
१५ सप्टेंबर २०२१ |
रेल्वे प्रणालीवर आधारित नव्या बॅलिस्टीक मिसाईल्सचे प्रक्षेपण करण्यात आले. हे मिसाईल जपानच्या विशेष आर्थिक क्षेत्रात पडले. |
स्त्रोत – फोर्बस्
या सर्वातून एकच प्रश्न निर्माण होतो – हे सर्व कशासाठी ?
२०१८-१९ मध्ये राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी झालेल्या वाटाघाटीत अपयश आल्यानंतर आपल्या लष्कराचे आधुनिकीकरण करण्याची योजना उत्तर कोरियाने स्पष्ट केली होती. २०१९ मध्ये किम जाँग ऊन यांनी क्षेपणास्त्र चाचणीवरील स्थगिती उठवली. २०२० च्या ऑक्टोबरमध्ये रात्रीच्यावेळी झालेल्या लष्करी परेडमध्ये अपेक्षेहूनही मोठ्या इंटर काँटीनेंटल बॅलिस्टीक मिसाईलचे प्रदर्शन करण्यात आले. पुढे उत्तर कोरियाने पाणबुडीवरुन लाँच करण्यात आलेल्या बॅलिस्टीक मिसाईलचे जगाला दर्शन घडवले. यावर सेऊलसह संपूर्ण जगभरातून मोठ्याप्रमाणावर टीका करण्यात आली.
या टीकेला उत्तर देताना उत्तर कोरिया शस्त्रास्त्र उत्पादन आणि आधुनिकीकरणाच्या वाटेवर पुढे चालत राहील असे किम यांनी सांगितले होते. ही बाब नक्कीच चिंताजनक आहे. यावर्षी पक्षाच्या आठव्या काँग्रेसच्या निमित्ताने प्याँगयाँग नेतृत्वाने सामरिक अण्वस्त्र तसेच वाढलेली उपग्रह क्षमता यांच्या जोरावर मोर्चेबांधणी केली आहे.
स्पष्ट उद्दिष्टे
किम जाँग ऊन हे अमेरिकेशी बोलण्यास तयार आहेत हे उत्तर कोरियाच्या चिथावणीवरून स्पष्ट दिसून येत आहे. कृत्रिम संकट निर्माण करणे, विरोधीपक्षाला चर्चेसाठी परावृत्त करणे, त्यातून काही सवलती मिळवणे व पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती करणे ही उत्तर कोरियाची जुनीच युक्ती किम पुन्हा वापरत आहेत. यांगब्यॉन कार्यान्वित करणे, राष्ट्राच्या अण्वस्त्र शक्तीचे प्रदर्शन करणे, यावरून राष्ट्राध्यक्ष बायडन यांच्यावर दबाव आणण्याचे प्रयत्न चालू आहेत.
असे करून २०१९ स्टॉकहोमध्ये खंडीत झालेल्या अमेरिका – उत्तर कोरिया चर्चेला पुन्हा सुरूवात करण्याचा किम यांचा मानस आहे. या सर्वांचा दीर्घकालीन अभ्यास करणाऱ्या तज्ञांचे असे मत आहे की २०१६ व २०१७ मध्ये अशाचप्रकारे क्षेपणास्त्रांची चाचणी घडवून आणल्यानंतर उत्तर कोरियावर संयुक्त राष्ट्रांनी निर्बंध लादले होते, या आर्थिक दबावापासून मुक्त होण्यासाठी आता उत्तर कोरिया प्रयत्न करत आहे.
उत्तर कोरियाची अर्थव्यवस्था मोठ्याप्रमाणावर चीनवर अवलंबून आहे. कोविड १९ च्या महामारीमध्ये किम यांना देशाच्या सीमा बंद कराव्या लागल्या, परिणामी व्यापारात मोठी घट झाली. देशाला पुन्हा पूर्व पदावर आणायचे असेल तर आर्थिक निर्बंधातून सूट मिळवणे व अण्वस्त्र खरेदीला चालना देणे आवश्यक आहे. त्यासाठी बायडन यांच्याशी वाटाघाटी गरजेच्या आहेत.
चर्चेसाठी तयार असलेल्या उत्तर कोरियाकडे राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी दुर्लक्ष केले तर किम हे अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा विकास व चाचण्या सुरु ठेवण्याची भिती आहे. ऑक्टोबर २०२० च्या परेड दरम्यान अमेरिकेवर थेट हल्ला करण्याची क्षमता असलेल्या २०१७ ह्वासाँग मिसाईलच्या नव्या व सुधारित आवृत्तीचे दर्शन झाले. अशाप्रकारे, उत्तर कोरियाकडे अमेरिकेवर हल्ला करण्याची क्षमता असणे अमेरिकेला कधीच मान्य होणार नाही.
बायडन यांनी वाटाघाटीची तयारी दाखवली असली तरी बायडन यांच्या विशेष प्रतिनिधीस भेटण्यास प्याँगयांगने नकार दिला आहे. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी असलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर किम व त्यांचे सर्वोच्च अधिकारी थेट बायडन यांच्याशी चर्चा करू इच्छितात, अशी अटकळ बांधली जात आहे.
बायडन यांचा याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बघता दोन्ही देशातील दरी वाढण्याची चिन्हं आहेत. जरी प्रोटोकॉलने या बाबी सोडवण्याचा प्रयत्न झाला तरी इतर मुद्दे तसेच ज्वलंत राहणार आहेत. उत्तर कोरियाचे संपूर्ण निःशस्त्रीकरण घडवून आणण्याचा जरी अमेरिकेचा मनसुबा असला तरी कोणत्याही प्रकारे माघार घेण्याची उत्तर कोरियाची तयारी नाही. या अण्वस्त्रांच्या सहाय्याने कोरियन उपखंडात अमेरिकेचा थेट हस्तक्षेप रोखणे व अमेरिकेशी बरोबरीने चर्चा करण्याची संधी किम यांना मिळू शकते, हे ते उत्तमरित्या जाणतात.
इथे अमेरिकेकडे कोणतीही विशेष संधी नाही. अमेरिका जरी पूर्ण निःशस्त्रीकरणाचा आग्रह धरत असली तरी बायडन यांच्या टीमला शस्त्र नियंत्रण करारावर बोलणी टप्याटप्याने चालू ठेवता येतील. याद्वारे याँगब्यांग नष्ट करणे व नव्या शस्त्रास्त्रांची निर्मिती व चाचण्यांवर स्थगिती आणण्यासाठी स्पष्ट कालमर्यादा उत्तर कोरियावर लादता येईल. एकदा अमेरिका आणि दक्षिण कोरिया सारख्या सहयोगी राष्ट्रांनी याची पडताळणी केली की, प्याँगयांगला या निर्बंधातून मुक्त करून आर्थिक गुंतवणूक करण्यास परवानगी दिली जाऊ शकते. भूतकाळात उत्तर कोरियाने कोणत्याही प्रकारे सहकार्य न केल्याने ही बाब पूर्णत्वास जाईल असे वाटत नाही.
परिणामी, बायडन प्रशासनाला मायदेशी मोठ्या टीकेला सामोरे जावे लागणार आहे. उत्तर कोरियाची अण्विक स्थिती न बदलता त्याचा अमेरिका व तिच्या मित्रराष्ट्रांना असलेला धोका कमी करण्यात जर बायडन यांना यश आले तर ट्रम्प यांना जे साधले नाही ते करुन दाखवल्याचे श्रेय बायडन यांना मिळेल. जागतिक सुरक्षेचा विचार करता, बायडन योग्य ती पावले उचलतील इतकीच अपेक्षा करता येऊ शकते.
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.