Published on Oct 21, 2021 Commentaries 0 Hours ago

आफ्रिकेत प्रभाव निर्माण करण्यासाठी आगामी काळात, उत्तर आफ्रिकेतील पाचही देशांशी भारताने आपले संबंध अधिक विस्तारले पाहिजेत.

उत्तर आफ्रिकेशी भारताची परराष्ट्रमैत्री

मध्यपूर्वेतील देश आणि उत्तर आफ्रिका खंडातील देश यांच्या बाबतीत भारताचे परराष्ट्र धोरण वेगवेगळे राहिले आहे. असे असले तरीही, भारत आणि उत्तर आफ्रिका यांच्यातील संबंध समजून घेण्यात आपण थोडेसे मागे पडतो हे निश्चित. भारतीय परराष्ट्र धोरणातील जुने दस्तऐवज आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातर्फे प्रसिद्ध झालेले साहित्य यांच्या आधारे आपण या लेखातून भारत आणि उत्तर आफ्रिका खंडातील प्रदेशाचा आढावा घेण्याचा प्रयत्न करूया.

भारत आणि उत्तर आफ्रिका खंडातील देशांशी असलेल्या संबंधांमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या सुरुवातीच्या काळातील परराष्ट्र धोरणाचा खूप मोठा प्रभाव आहे. पंडित नेहरूंचा लोकशाहीवादी दृष्टिकोन आणि निर्वसाहतीकरण हा मुद्दा येथे महत्त्वाचा आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर आशिया व आफ्रिका खंडातील अनेक देश साम्राज्यवादी देशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाले, वसाहतींना स्वातंत्र्य मिळाले यालाच निर्वसाहतीकरण असे म्हणतात.

इजिप्त आणि भारत या देशातील मैत्रीपूर्ण संबंध आणखी एका मुद्द्यामुळे वृद्धिंगत झाले तो म्हणजे अलिप्त राष्ट्रांची चळवळ. भारताने ट्युनिशिया आणि अल्जेरिया या देशांच्या स्वातंत्र्याचा नेहमीच पुढाकार केला आहे. लिबियासारख्या देशामध्ये पंडित नेहरू यांची प्रतिमा आदरस्थानी आहे. कारण त्यांचे निर्वसाहतीकरण धोरण त्या देशातील लोकांना सुरुवातीपासून आवडले. सध्याच्या राजकारणातील उत्तर आफ्रिका आणि भारत यांच्यातील वाढत्या संबंधामागे वेगेवेगळे मुद्दे आहेत.

पहिला मुद्दा इजिप्त, मध्य आशियातील राजकारणात सत्ता संघर्ष कमी करून मध्यस्थी करणारा देश म्हणून इजिप्त ओळखला जातो. इजिप्तचे इज्राइल, सौदी अरेबिया, युनायटेड अरब अमिरात या देशांशी असलेले मैत्रीपूर्ण संबंध भारतासाठी महत्त्वाचे ठरू शकतात. कारण भारताला या देशांशी आपले राजनैतिक आणि व्यापारी संबंध वाढवायचे आहेत. आफ्रिकेमध्ये जाण्यासाठी मोरॉक्को आणि अल्जीरिया हे जणू काही प्रवेशद्वारासारखेच काम करतात.

‘फ्रँकोफोन आफ्रिका’ ही संकल्पना येथे समजून घ्यायला हवी. आफ्रिकेतील बऱ्याच देशांमध्ये फ्रान्सच्या वसाहती असल्यामुळे फ्रेंचांचा प्रभाव येथे अधिक जाणवतो. मोरक्कोच्या माध्यमातून या सर्व देशांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणे भारताला शक्य होऊ शकते. भारताने युरोपियन युनियनशी चांगले संबंध ठेवले आहेत, त्याचाच फायदा घेऊन उत्तर आफ्रिकेतील देश, युरोपियन युनियन आणि भारत एकत्र येऊन दहशतवाद, स्थलांतरितांचे प्रश्न, हवामान बदलांचे प्रश्न यावर चांगले काम करू शकतात.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युगांडातील संसदेत २०१८ साली केलेल्या भाषणात भारत आणि उत्तर आफ्रिका यांच्यातील संबंधांविषयी बरेच संकेत मिळतात. भारतातर्फे उत्तर आफ्रिकेमध्ये नवनवीन रोजगाराच्या संधी निर्माण करणे, तरुणांना प्रोत्साहित करणे, त्यांच्यासाठी व्यवसायाच्या नवीन संधी निर्माण करणे, कृषीआधारीत तंत्रज्ञानाची निर्मिती करणे, पर्यावरण बदल, दहशतवाद यांसारख्या मुद्द्यांवर एकत्र काम करणे हा भारताचा स्पष्ट उद्देश असणार आहे. भारताला संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत कायम सदस्यत्व मिळण्यासाठी उत्तर आफ्रिकन देशांचा पाठिंबा मिळणे हा सुद्धा महत्त्वाचा हेतू आहे.

भागिदारी

भारत आणि उत्तर आफ्रिका यांच्यातील संबंध कसे असू शकतात याची चार गटात विभागणी करता येईल. पहिला आर्थिक घटक : पेट्रोलियम पदार्थ, यंत्रसामुग्री, विद्युत उपकरणे, औषधे या गोष्टींमध्ये भारत आणि उत्तर आफ्रिकन देश जुने व्यापारी मित्र आहेत. वर उल्लेख केलेल्या वस्तूंचा आयात व निर्यात दोन्ही प्रकारचा व्यापार होतो. फॉस्फेट या रसायनाचा व्यापार आफ्रिकन देशांसाठी महत्त्वाचा आहे. जमिनीची सुपिकता वाढविण्यासाठी याचा उपयोग केला जातो. अल्जीरिया ट्युनिशिया आणि मोरॉक्को या देशातून निर्यात केलेले फास्फेट मोठ्या प्रमाणावर वापरले जाते व भारताच्या एकूण गरजेपैकी आयातीपैकी पन्नास टक्के आयात याच देशांतून होते.

२०१९ चा व्यापाराचा लेखाजोखा पाहिल्यास भारत आणि या प्रदेशातील व्यापार एकूण १८ बिलियन अमेरिकन डॉलर्स एवढा मूल्याचा झाला. मात्र संयुक्त अरब अमिरातीशी झालेला व्यापार सुमारे ६० बिलियन अमेरिकन डॉलर्स एवढा होता. म्हणजेच व्यापार वाढवायला खूपच मोठी संधी उपलब्ध आहे.

दुसरा मुद्दा येतो तो दहशतवाद निवारणाचा. दहशतवाद हा कोणा एका देशाला भेडसावणारा प्रश्न नसून तो जागतिक प्रश्न आहे व त्यामुळे सर्व देशांनी एकत्र येऊन त्याचा सामना करायला हवा. म्हणूनच भारत आणि इजिप्त या दोन देशांमध्ये संयुक्त युद्ध सराव होत असतो. भारताकडून ईजिप्तच्या सैन्यासाठी चिलखती गाड्या सुद्धा बनवल्या जातात.

२०२१ मध्ये अल्जेरिया या देशाशी भारताने संबंध अधिक मजबूत करायला सुरुवात केली. भूमध्य समुद्राच्या जवळ असलेल्या अल्जेरिया प्रदेशात संयुक्त नौदल कवायती करून भारताने या प्रदेशांमध्ये असलेले आपले हितसंबंध वाढवण्यास सुरुवात केली आहे. याच बरोबर मोरॉक्को या तिसऱ्या देशाबरोबर देखील भारताने दहशतवादी कारवायांच्या संदर्भात महत्वाची भागिदारी करण्याबाबत बोलणी केली आहेत. याची जरी सुरुवात असली तरी तो शुभ संकेत मानायला हवा.

तिसरा मुद्दा, भारताने उत्तर आफ्रिकन प्रदेशातील देशांना केलेली वैद्यकीय आर्थिक आणि कृषी क्षेत्रातील मदत हा आहे. गद्दाफीच्या पराभवानंतर लिबियामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी व स्थैर्य आणण्यासाठी भारताने एक दशलक्ष अमेरिकन डॉलरसे अर्थसहाय्य केले होते.

कोविड-१९ आजारावरील लसीचे डोस भारताने वॅक्सीन मैत्री कार्यक्रमांतर्गत आफ्रिकेतील देशांना दिले. लिबियासारख्या देशात भारतीय कामगारांना देखील सन्मानजनक वागणूक मिळते. तेथे भारतीय कामगार कुशल अशा वैद्यकीय क्षेत्रात सुद्धा कार्यरत आहे. याच बरोबर भारताने उत्तर अमेरिका खंडातील देशांमध्ये विविध कार्यक्रमांतर्गत शैक्षणिक सवलती आणि शिष्यवृत्ती यांचे वाटप केले आहे. तेथील विद्यार्थी शिक्षणासाठी भारतात सुद्धा येतात.

शेवटचा मुद्दा भारताची सॉफ्टपॉवर. त्यातही विशेषतः बॉलीवूड! बॉलिवूडचे गारुड उत्तर आफ्रिकन देशांवरही आहे. अल्जेरिया सारख्या देशांनी हिंदी भाषेतील चित्रपटांचा प्रभाव पाहता बॉलीवूडवर माहितीपट सुद्धा बनवले आहेत. इजिप्त, मोरॉक्को या देशांमध्ये शाहरुख खान, ऐश्वर्या राय यांसारख्या भारतीय सिनेतारकांचा मोठा चाहता वर्ग अस्तित्वात आहे. एकूण भारत आणि उत्तर अमेरिका खंडातील देशांमध्ये संबंध दृढ होण्याच्या दृष्टीने वातावरण अनुकूल आहे, त्याचा वेग जरी कमी असला तरी प्रयत्न सुरू झाले आहेत.

भविष्यातील संधी समजून घेताना

येणाऱ्या काळात भारताने उत्तर आफ्रिका खंडातील पाच देश आणि स्वतःचा फायदा होईल अशा पद्धतीने भागीदारी करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ भारतीय पर्यटक जगभरात जातात २०१९ चा पर्यटकांचा अंदाज असे सांगतो की २७ दशलक्ष भारतीयांनी परदेशात प्रवासाचा अनुभव घेतला. ट्युनिशिया आणि अल्जेरिया या देशात भारतीय पर्यटक गेल्याची फारशी नोंद आढळत नाही. इजिप्त आणि मोरॉक्को या देशात २०१८ मध्ये सव्वा लाख आणि २०१९ मध्ये वीस हजार भारतीय पर्यटक म्हणून गेले.

लिबिया मधील अस्थिरता पाहता तेथे पर्यटनाची शक्यता नव्हती. एकंदरीत परदेशी पर्यटक म्हणून गेलेल्या भारतीयांपैकी ०.५ टक्के पर्यटक उत्तर आफ्रिका खंडात गेले. यावरून हेच स्पष्ट सिद्ध होते की करोना महामारी टळल्यानंतर भारतीय लोकांसाठी पर्यटन हे महत्त्वाचे क्षेत्र ठरणार आहे.

हवामान बदल हा असाच एक मुद्दा भारत आणि उत्तर अमेरिका आणि एकत्रपणे येऊन काम करण्यासाठी महत्त्वाचा आहे. भारतासह या सर्वच देशांना हवामान बदलाच्या लहरीपणाचा फटका बसलेला आहे. कमी होत जाणारे उत्पादन, पाण्याची कमतरता, किनारपट्टीच्या भागाकडून अंतर्गत प्रदेशात होणारे स्थलांतर, वाढते तापमान या एक किंवा सर्व घटकांचा आर्थिक उलाढालीवर आणि वृद्धीवर अप्रत्यक्षपणे मोठा प्रभाव पडत असतो. यासंबंधात आफ्रिकेतील देशाला परवडेल अशी पर्यावरणस्नेही तंत्रज्ञानाची निर्मिती करून भारत येथे आपला ठसा उमटवू शकतो आणि संसाधनाचा अतिवापर टाळण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे आहे.

दहशतवादाशी मुकाबला करणे हा भविष्यकालीन अजेंडा असला पाहिजे. २०१४ नंतर काश्मीर वगळता भारतामध्ये कोणताही मोठा दहशतवादी हल्ला झालेला नाही. काश्मीरमधील घुसखोरी सुद्धा भारताने यशस्वीरीत्या हाताळली आहे. हा भारताचा अनुभव उत्तर आफ्रिकन देशांसाठी महत्त्वाचा ठरू शकतो. तेथील भौगोलिक आणि लोकसंख्येची स्थिती एकदा लक्षात आली तर भारताकडून मिळालेले धडे तेथे वापरता येऊ शकतात. मोरक्को या देशाच्या बाबतीत परिस्थिती उलट आहे. या देशाने मोठ्या प्रमाणावरील दहशतवादी कारवाया त्यांना आळा घालण्याचा पराक्रम करून दाखवला आहे. हे अनुभव भारताला फायदेशीर ठरू शकतात.

अखेरीस भारत आणि उत्तर आफ्रिकन देशांनी एकत्र येण्यासाठी आपापसातील हवाई संपर्क सुद्धा वाढवला पाहिजे. उत्तर आफ्रिका खंडातून भारताच्या मुख्य शहरांमध्ये कोणतीही थेट विमानसेवा उपलब्ध नाही. एक वा दोन थांबे असलेली विमानसेवा उपलब्ध असली तरी त्यासाठी वीस तासाचा अवधी लागतो व ती फार महागडी पडते. साधारण एका वेळचे प्रवास भाडे सुमारे एक हजार अमेरिकन डॉलर इतके भरते. याचे प्रमुख कारण या प्रवासी मार्गांना मागणी नसल्यामुळे येथे महाग विमानसेवा आहे. एकदा का दोन्ही देशातील व्यवसाय सुरू झाले, व्यापार-उदीम वाढू लागला की प्रवासाची गरज वाढेल आणि विमान कंपन्यांना सुद्धा ज्यादा संधी उपलब्ध होऊ शकते.

थोडक्यात

भारत आणि उत्तर आफ्रिका खंडातील देशांचे संबंध ऐतिहासिक आहेत पण संयुक्त अरब अमिराती आणि सौदी अरेबिया यांच्यासारखे ते घनिष्ठ नाहीत. व्यापार, संरक्षण, दहशतवाद टाळण्याचे सहकार्य या माध्यमातून हे संबंध दृढ होऊ शकतात. त्याच बरोबर भारत तुलनात्मक दृष्ट्या गरीब आफ्रिकेतील देशांसाठी व्यापाराची निर्मिती करणारा, रोजगाराची निर्मिती करणारा, पर्यटनाच्या संधी निर्माण करणारा आणि पर्यावरणस्नेही शाश्वत विकास करण्यासाठी प्रयत्नशील असलेला हक्काचा भागीदार म्हणून आपले स्थान बळकट करू शकतो. आफ्रिकेत आपला प्रभाव निर्माण करण्यासाठी आगामी काळात उत्तर आफ्रिका खंडातील पाचही देशांशी भारताने आपले संबंध अधिक विस्तारले पाहिजेत.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.

Author

Mohammed Sinan Siyech

Mohammed Sinan Siyech

Mohammed Sinan Siyech is a Non – Resident Associate Fellow working with Professor Harsh Pant in the Strategic Studies Programme. He will be working on ...

Read More +