Published on Oct 21, 2019 Commentaries 0 Hours ago

गरिबांचे जीवन सुधारण्यासाठी मुख्यतः बर्याोच वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये अनेक छोटे छोटे बदल करणे आवश्यक आहे, हा नोबेल विजेत्यांचा विचार महत्त्वाचा आहे.

नोबेल विजेते बॅनर्जींचा ‘छोटा’ विचार!

भारतात जन्मलेल्या अभिजीत बॅनर्जी यांना नुकतेच अर्थशास्त्र विषयातील नोबेल पारितोषिक मिळाले. बॅनर्जी यांच्याप्रमाणेच बंगाली असलेले अमर्त्य सेन यांना १९९८ मध्ये अर्थशास्त्रातच नोबेल पारितोषिक मिळाले होते. बॅनर्जी आणि सेन, हे दोघेही भारताबाहेर राहत असले तरी त्यांच्या अभ्यासाचे लक्ष भारतावर केंद्रित आहे, त्यामुळे ते वारंवार भारतात येत असतात. बॅनर्जी आणि त्यांची पत्नी एस्थर दुफ्लो हे दोघेMIT (मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) मध्ये प्राध्यापक आहेत. तिसरे नोबेल विजेते प्राध्यापक मायकेल क्रेमर हे हार्वर्ड विद्यापीठात शिकवतात.

“गरिबीशी लढण्याची आपली क्षमता पुष्कळ सुधारली आहे” असे सिद्ध करणाऱ्या त्यांच्या संशोधनासाठी या तिघांना या वर्षीचे नोबेल पारितोषिक देण्यात आले आहे,असे रॉयल स्वीडिश अकादमीचे म्हणणे होते. सध्या‘विकासाचे अर्थशास्त्र’ या विषयाने नोबेल पारितोषिक समितीचे लक्ष वेधून घेतले आहे. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, अर्थशास्त्राच्या विविध शाखा आहेत, परंतु मानवाची परिस्थिती सुधारणे आणि त्याला दारिद्र्यातून मुक्त करणे, हा आजदेखील महत्वाचा मुद्दा आहे.

जागतिक पातळीवर दारिद्र्याचे प्रमाण कमी झाले असले, तरी दारिद्र्याखाली जगणाऱ्या लोकांची संख्या (जागतिक बँकेच्या अहवालानुसार)२००५ पर्यंत १.४ अब्ज होती. जगातील एकूण गरीब जनतेपैकी २६ कोटी ७ लाख लोक भारतात आहेत. त्यामुळेच बॅनर्जी आणि दुफ्लो यांनी दारिद्र्याची खरी कारणे शोधण्यासाठी आपला बराच वेळ भारतात तळागाळातील स्तरावरील प्रयोग करण्यात गुंतवला.

विकासाचे अर्थशास्त्र हे दशकांपासून सिद्धांत आणि मॅक्रो स्तरावरील अर्थशास्त्रावर आधारित होते. रोस्तोव यांच्या ‘टेक ऑफ’ सिद्धांतापासून ते हर्षमन यांच्या ‘संतुलित आणि असंतुलित वाढीच्या’ सिद्धांताच्या अनुसार विकास म्हणजे अविकसित अर्थव्यवस्थांमध्ये मोठा बदल घडण्याची प्रक्रिया. अभिजीत बॅनर्जी आणि एस्थर दुफ्लो यांनी मात्र दारिद्र्याशी दोन हात करायला एक नवा मार्ग निवडला आहे, तो मार्ग म्हणजे गरीब आणि त्यांचे निर्णय यांस विकास प्रक्रियेचा महत्वपूर्ण भाग बनवणे. कोणत्या प्रकारच्या धोरणांचा गरिबी आणि त्यासंबंधित परिणामांवर काय फरक पडू शकतो हे शोधून काढण्यासाठी त्यांनी प्रथम गरिबी आणि गरिबीची कारणे शोधून काढण्यासाठी खोलवर अभ्यास केला.

वर नमूद केल्याप्रमाणे, २० वर्षांपूर्वीविकाससंबंधितअभ्यासात अर्थशास्त्रीय सिद्धांतांवर बरीच भर देण्यात यायचीआणि मॅक्रो अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून प्रश्न उपस्थित केले जायचे. या दोन नोबेल पारितोषिक विजेत्यांनी विकासाच्या या मोठ्या प्रश्नांची फोड केली आणि वैद्यकीय चाचण्या करणाऱ्या शास्त्रज्ञांप्रमाणे त्यांचा अभ्यास केला. उदाहरणार्थ, त्यांना असे आढळले की भारतात अध्यापनाच्या अशा पद्धती आहेत ज्या विद्यार्थ्यांच्या गरजांसाठी अपुऱ्या आहेत. कमी गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवणी दिल्याने त्या विद्यार्थ्यांच्या कामगिरीत सकारात्मक सुधारणा होतात, असे त्यांच्या लक्षात आले. ५० लाखांहून अधिक मुलांना अशा शिकवण्यांचा फायदा झाला आहे, कारण गरिबांकडे पुस्तके असली तरी त्यांच्याकडे त्यातून शिकण्याची क्षमता नसते. तसेच, त्यांनी राज्य सरकारांना प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेत अधिकाधिक सार्वजनिक गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. नोबेल समितीने विकास अर्थशास्त्राच्या जुन्या पद्धतींवर ‘प्रयोग-आधारित पध्दती’च्या मदतीने कसा प्रकाश टाकला, हे नमूद केले.

‘गरिबीचे अर्थशास्त्र’ (Poor Economics) या त्यांच्या पुस्तकाचा सारांश पुस्तकाच्या प्रस्तावनेतील एका वाक्यात आहे: “आपण गरिबांना फक्त एक व्यंगचित्रातील पात्र म्हणून न पाहता, त्यांच्या आयुष्यातील गुंतागुंत आणि समृद्धी समजून घेण्यासाठी वेळ दिला पाहिजे.” या पुस्तकात दररोज २ डॉलर्सपेक्षा कमी पैशांवर उदरनिर्वाह करणाऱ्या भारतीय लोकांच्या निर्णयांचे वर्णन आणि विश्लेषण केले आहे.

या विश्लेषणाला वास्तविक खूप अर्थ आहे. उदाहरण म्हणजे, गरीब कुटुंबाने शिक्षणासाठी असलेलेआपले कौटुंबिक बजेट एकाच मुलावर खर्च करणे स्वाभाविक आहे, त्यांना अशी आशा असते की, तो मुलगा माध्यमिक शाळेत आणि मग पुढे महाविद्यालयात जाईल.ते इतर मुलांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष देत नाहीत कारण त्यांना असे वाटते की किमान एक मूल त्याचे ध्येय गाठण्याऐवजी कुटुंबाचे शैक्षणिक बजेट सर्व मुलांमध्ये विभागणे संसाधनांचा अपव्यय ठरेल. परंतु पालकांना शिक्षणाचे महत्व पटवून देणे महत्वाचे आहे आणि त्याचा गावातील शाळा चालवण्यात मोठा परिणाम होत आहे. यामुळे त्यांच्या शैक्षणिक निवडी बदलण्याची शक्यता असते. त्यांचे योगदान ओळखून नोबेल अकादमीने वक्तव्य केले की, “त्यांच्या प्रयोगात्मक संशोधन पद्धती आता संपूर्णपणे विकास अर्थशास्त्रावर अधिराज्य गाजवतात.”

गरिबीची समस्या सोडविण्यासाठी गरीब लोकांच्या निर्णयांकडे लक्ष देणे महत्वाचे आहे, जसे दुफ्लो यांनी हल्लीच वक्तव्य केले की: “गरीब लोक हे एक तर पूर्णपणे मूर्ख, हताश, आळशी किंवा उद्योजक असावेत, असं आपण मानतो. परंतु, आपण समस्येचे एकमेकांशी जोडलेले खोल, मूळ समजण्याचा प्रयत्न करीत नाही.तर आम्ही आमच्या संशोधनात एखाद्या विशिष्ट समस्येचं कारण समजून घेण्यासाठी ती समस्या एक एक करून उलगडायचा प्रयत्न करतो. काय चालतं , काय चालत नाही आणि का, हे शोधून काढतो.”

बॅनर्जी आणि दुफ्लो यांच्या कामाची एक टीका म्हणजे, एखादे धोरण बदलणे आणि त्यांच्या प्राप्त ज्ञानानुसार बदलांची अंमलबजावणी करणे किती कठीण आहे, याची जाणीव त्यांना नाही. त्यांचा असा विश्वास आहे की मोठे बदल सफल ठरतातच असे नाही आणि पुढील मार्ग ” मोठ्या विचाराचा” नसून लहान विचारात आहे. ज्याप्रकारे त्यांनी राहुल गांधींना ‘न्याय’ (NYAY) योजनेबद्दल सल्ला दिला की, गरिबांना दरमहा ६००० ऐवजी २५०० रुपये दिले पाहिजेत.

गरिबांचे जीवन सुधारण्यासाठी मुख्यतः बर्याबच वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये अनेक छोटे छोटे बदल करणे आवश्यक आहे, असे बदल ज्यासाठी राजकीय लढाया किंवा नाटकीयरित्या वित्तपुरवठा करणाऱ्या संरचना बदलण्याची आवश्यकता लागणार नाही. असे हे दोन नोबेल पुरस्कार विजेते मूलतः आणि पूर्णतः ‘छोटा विचार करणारे विचारवंत आहेत’!

हे लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.

Author

Jayshree Sengupta

Jayshree Sengupta

Jayshree Sengupta was a Senior Fellow (Associate) with ORF's Economy and Growth Programme. Her work focuses on the Indian economy and development, regional cooperation related ...

Read More +