Published on Aug 11, 2020 Commentaries 0 Hours ago

‘इमोशनल फर्स्ट एड’ हा मानसिक आरोग्यातील महत्वाचा भाग आहे. लोकांना त्याच्या भावनांबद्दल योग्य मार्गदर्शन मिळावे, यासाठी समाज म्हणून प्रयत्न व्हायला हवेत.

मानसिक प्रथमोपचारांबद्दल जागे होऊया

Source Image: cloudfront.net

आज कोरोनाच्या साथीमध्ये शारीरिक आरोग्याप्रमाणेच मानसिक आरोग्यही धोक्यात आले आहे. आपल्या आसपासच्या अनेकजणांच्या वागण्यामध्ये बदल झालेले आपल्याला दिसताहेत. पण, दुर्दैवाची परिस्थिती अशी की, या सगळ्या वागण्याला ‘मानसिक आजार’ म्हणणे आपण एक समाज म्हणून मान्य करत नाहीत. आपल्याकडील मानसोपचाराबद्दलच्या अढीबद्दल तर बोलायलाच नको. या सर्व परिस्थितीमध्ये मनाबद्दल आणि मनाच्या आरोग्याबद्दल अधिकाधिक सजगपणा वाढावा, यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.

मानसिक आरोग्याबद्दल लोकांमध्ये किती विविध प्रकारचे समज असतात हे समजून घेण्यासाठी आपण काही उदाहरणे पाहुया…

उदाहरण १-सोशल मीडिया वर एका पालकाचा स्टेटस् असतो“मेंटल हेंल्थ इज important”. पण, याच पालकाने त्याच्या १२ वर्षाच्या मुलासाठी ‘आत्मविश्वास आणि पीअरप्रेशर कसं हाताळावं’ या कार्यशाळेसाठी नोंदवलेले नाव रद्द केलं, कारण “अथर्व ची क्लास ची टेस्ट होती”.

उदाहरण २- एका जनरल practitioner ने तिच्या नैराश्य असलेल्या पेशंटला सांगितले “मनोविकारतज्ञाने दिलेली औषधे घेऊ नकोस, त्याचे दुसरे दुष्परिणाम असतात आणि त्या औषधांची सवय लागते”

उदाहरण ३ – आठ वर्षाच्या सियाला तिचेआई-वडील समुपदेशनासाठीघेऊन आले. ते घर बदलणार होते आणि जवळच्याच दुसऱ्या शाळेत सियाला प्रवेश घ्यायचा होता. नवीन शाळा, मैत्रिणी आणि वातावरण याबाबत सिया साशंक होती.त्यासाठी तिच्या मनाची तयारी करावी, यासाठी समुपदेशन उपयुक्त ठरेल असे त्यांना वाटले.

उदाहरण ४- नताशा आणि तिचा पती विवाहापूर्वी समुपदेशनासाठी आले होते. त्यांच्या नात्यात तसे काहीच खटकण्यासारखे नव्हते. पण सुद्रुढ नाते कसे जोपासावे, याविषयी जाणून घेण्याच्या त्यांचा प्रयत्न होता.

वरील मोजक्या प्रसंगांतून आपल्याला मानसोपचाराबद्दलची सद्यस्थिती लक्षात येईल. मानसिकस्वास्थ्यासाठी समाजातील नामवंत व्यक्ती तसेच सर्वसामान्य माणसे सरसावत आहेत, हे नक्कीच प्रशंसनीय आहे. बऱ्याच व्यक्तींचा यातील सहभाग वाढत आहे. पण, अद्यापही बराच दूरचा पल्ला गाठायचा आहे.

मानसिक आजाराचा अभाव म्हणजे आपण मानसिकरित्या सुद्रृढ आहोत, असा नसतो. आपण सारेच जण आयुष्यात कधी न कधी कठीण आव्हानांचा सामना करतो. त्यावेळी कमीत कमी ताण असणे किवा त्या आव्हानांना यशस्वीरित्या पेलवतायेणे, हा मानसिक सुदृढतेची व्याख्या आहे. मानसिक स्व्यास्थ्यामध्ये अभिप्रेत असते तेमानसिक रोगांशी लढणे, त्याचबरोबर परिस्तिथीनुरूप ताण, जसे की नोकरी, नातेसंबंधांशी निगडीत, परीक्षेचा ताण, यांना हाताळणे आणि यापलिकडे जाऊन व्यक्तींच्या भावनिक आणि बौद्धिक क्षमतांचा जास्तीत जास्त विकास करणे.

आयुष्याशी जुळवून घेताना, कधी कुशलतेने अभ्यास कसा करावा, कामाची प्रत कशी सुधारावी, खेळताना होणाऱ्या काही चुका कशा सुधाराव्यात किवा पर्फॉर्मन्स कसा विकसित करावा, स्वभावातील काही त्रुटींवर कशी मात करावी आणि आपले अस्तित्व कसे महत्वपूर्ण करावे, या सर्व गोष्टींचा अंतर्भाव मनोस्वास्थ्यात आहे. प्रत्येक व्यक्ती प्रत्येक वेळी खंबीर राहू शकेल, असे नाही. कारण आपल्यावर काही संकटे येत असतात, अशावेळेस तज्ज्ञांचा आधार आणि मदत घेणे हितकारक ठरते.

दुर्दैवाने आपल्या समाजातील बरेचसे घटक मानसिक स्वास्थ्याविषयी उदासीन आहेत. शारीरिक आजारात बऱ्याचअंशी काह्तरी गडबड आहे, एवढे तरी आपल्याला कळते. परंतु मानसिक स्तरांवरील बिघाड समजणे जटील असते. जसे की आपल्या सगळ्यांनाच आयुष्यात कधी न कधी निराश वाटते. परंतु हे नैराश्य जर तीव्र स्वरूपाचे असेल आणि सातत्याने आपल्याला चिकटले असेल तर नक्कीच मानसिक समस्येचे रूप घेते. आजाराचे योग्य निदान करण्यासाठी आपल्याला प्रशिक्षित, अनुभवी व्यक्तीची गरज असते, मानसिक रोगांविषयी बोलताना नैराश्य हा शब्द अनेकांच्या तोंडी बसलेला आहे. पण त्यापलिकडे स्किझोफ्रेनिया, ऑब्सेसिव्ह कम्पल्सिव्ह डिसॉर्डर (ओसीडी) सारखे अजून अनेक आजार आहेत.

निरोगी मानसिकतेचा पाया हा लहानपणापासून रचला जातो. पण समस्या उद्भवल्यावरच लोकं मानसोपचारांकडे येतात. काही वेळा सभोवतालची परिस्थिती पूरक नसते. अशावेळी त्रासात असलेल्या व्यक्तीची प्रतिकारशक्ती वाढवणे हाच उपाय असतो. आपण आर्याचे उदाहरण पाहू. हुशार, चुणचुणीत आर्या तिच्या ट्युशनमध्ये कायम पहिली यायची. पण, एका परीक्षेत तिला अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले आणि तिच्याकडून पैकीच्या पैकी गुणांची अपेक्षा करू पाहणाऱ्या, तिचे सर तिला घालून पाडून बोलू लागले. त्यामुळे आर्याचा खेळकर स्वभाव बदलून, ती केविलवाणी दिसू लागली. ट्युशनच्या परिस्थितीत बदल करणे कठीण आहे, असे लक्षात आल्यावर मी आणि आर्याने तिच्या आत्मविश्वासात सकारात्मक वाढ केली.स्वतःचे वेगळे मापदंड तिने आखले अन सरांशी कसे संभाषण करावे, याची रंगीत तालीम वेगवेगळ्या संवादातून आम्ही केली. ट्युशनचे ते वर्ष आर्याने अलगद पार केले.

आजकाल सामाजमाध्यमांवर सुविचार आणि सकारात्मकतेच्या वचनांचा भडीमार दिसतो. “सायकॉलॉजी सेज…” असे जर तुम्ही आधी जोडले, तर सामान्यजन त्याचे आंधळेपणाने अनुकरण करू लागतात. या संभ्रमातून योग्य व्यक्तींची निवड कशी करावी? माझ्याकढे एकदा एक वडील मुलाला घेऊन आले होते. म्हणाले,मॅडम, माझ्या मुलाचा प्रॉब्लेम मला चांगलाच माहीत आहे. मी स्वत: इंजिनियर आहे. गूगल धुंडाळून आले होते हे ही त्यांनी सांगितले. पण त्या मुलाचा त्रास समजण्यासाठी आवश्यक असणारे ज्ञान हे इंजिनियरिंगच्या अभ्यासक्रमात अंतर्भूत नाही; मानसशास्त्राचे सखोल ज्ञान असलेल्या व्यक्तीचीच त्यासाठी गरज आहे, हे आधी त्यांना पटवून द्यावे लागले.

मानसिक स्वास्थ्य या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींनी पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे जाऊन, आयुष्याकडे डोळसपणे पाहणे गरजेचे आहे, त्याचबरोबर वैयाक्तिक भावना, काही गोष्टींबद्दलचे पूर्वग्रह सोडून काम केले पाहिजे. गूगलवरून लक्षणे शोधून आपण योग्य निदनापर्यंत येऊ शकत नाही. जसे की अस्वस्थता हे ‘एडीएचडी’चे लक्षण समजले जाते. पण ‘एडीएचडी’च्या व्यतिरिक्त कदाचित ऑटीजम, चिंता, मूड डिसऑर्डर, शारीरिक तक्रारी यापैकी कशामुळेही उद्भवलेला असू शकतो.

शालेय शिक्षणात मागे पडणाऱ्या विध्यार्थ्याला बौद्धिक क्षमता कमी असणे, लर्निंग डीसएबीलीटी, कौटुंबिक तणाव, पीयर-प्रेशर, एकाग्रतेचा अभाव, चिंता यापैकी कोणतीही किवा एकापेक्षा जास्त समस्या असू शकतात. “एकदा नाही, दहादा लिहुन बघ, कसे येत नाही?” हे सूत्र अशा ठिकाणी फोल ठरते. योग्य कारण शोधणे आणि त्यानुसार समस्येचे निराकरण करणे, हे प्रशिक्षित व्यक्तीच हाताळू शकते.

प्रशिक्षित मानसोपचार तज्ज्ञाला मानवी मेंदू आणि मज्जासंस्था, वातावरण व त्यातील बदलांचा होणारा परिणाम. त्याला दिले गेलेला प्रतिसाद, शारीरिक आणि मानसिक विकासातील विविध टप्पे यांचे ज्ञान आवश्यक आहे. तसेच, विविध उपचारपद्धतील विविध विचारप्रवाह, त्यांची बलस्थाने आणि त्रुटी यांचे उत्तम ज्ञान असायला हवे.

कोणतीही एका विशिष्ट पद्धतीची उपचारपद्धती वापरताना, जर इतर विचारपद्धतींविषयी आपण अनभिज्ञ असू तर उपयोग शून्य आहे. समुपदेशनाच्या काही विशिष्ट उपचार पद्धती किवा ‘स्कूल्स ऑफ थेरपी’ आहेत, जसे कीरॅशनलइमोटीव बिहेवियर थेरपी, कॉगनीटीव बिहेवियर थेरपी, इएमडीआर, एनएलपी इत्यादी. परंतु एकाच प्रकारची थेरपी वापरणे, म्हणजे सगळ्या रोगांवर एकच औषध देण्यासारखे आहे. आपल्याकडे आलेल्या व्यक्तीच्या गरजेनुसार आपण लवचिकपणे योग्य उपचार पद्धतीनिवडली पाहिजे.

एकदा एका पाच वर्षाच्या मुलीला ‘प्ले सेशन’साठी आणले गेले. तिला प्रचंड राग यायचा, अशी आईची तक्रार होती. राग आल्यावर ती समोरच्याला मारायची, चावायची. तिच्याशी बोलताना माझ्या लक्षात आले की, ती नीटसे बोलूशकत नाही. तिच्या भावना ती नीट मांडू शकत नव्हती. तिला ‘प्ले सेशन’च्या बरोबरीने स्पीच थेरपिस्टकडेही पाठवले आणि तिच्या वागणुकीत सुधारणा झाली.

सध्या समुपदेशनाचे प्रशिक्षण देणारे अनेक वर्ग चालतात. दोन महिन्याच्या प्रशिक्षणानंतर आपण खरेच लोकांसाठी काम करू शकतो का? तर प्रॉब्लेम असलेला जाणवणे इथपर्यंत आपल्याला समजू शकते. मग आपण अशा व्यक्तीला योग्य मानसोपचारतज्ज्ञाकडे पाठवू शकतो. आपल्या ज्ञानाचा उपयोग थोडाफार स्वत: साठी आणि इतरांसाठी प्राथमिक उपचार स्वरुपात करू शकतो. या उपचार पध्दतीत दुहेरी भूमिका किवा नाते वर्ज्य आहे. जसे की शिक्षकाने आपल्याच विद्यार्थांचे समुपदेशन करू नये. पालक स्वत:च्या मुलाचा समुपदेशक (जरी तो मानसोपचारतज्ज्ञ असला तरी) असू शकतनाही.

पण, पालक, शिक्षक, डॉक्टर, समाजसेवक, व्यवस्थापक,विद्यार्थी , स्वयंसेवक, इत्यादी व्यक्ती संकटग्रस्त व्यक्तींचे म्हणणे ऐकून घेऊन, त्यांना ‘इमोशनल फर्स्ट एड’ किवा भावनिक प्रथमोपचार देऊन मानसिक आरोग्याच्या प्रक्रियेचा एक महत्वाचा भाग ठरू शकतात. अनेक संस्था ग्रामीण भागात प्राथमिक उपचार या विषयासाठी जनजागृतीचे मोलाचे काम करत आहेत; पीडित आणि  आणि उपचारतज्ज्ञ यांच्यातील हे महत्वाचे दुवे आहेत.

मानसोपचारतज्ज्ञने आपले काम आपल्याकडे येणाऱ्या लोकांना कितपत उपयुक्त पडतेय याचा आढावा घेणे आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्तीला शंभर टक्के ठणठ्णीत व्हायचे अस.ते परंतु काही वेळा परिस्थिती अशी असते की, आहे त्यापेक्षा स्तिथी बिघडू नये किवा पूर्वी इतका भयंकर त्रास होऊ नये, हेच ध्येय ठेवावे लागते. काही वेळा आयुष्भर ठराविक औषधे सातत्याने चालू ठेवणे अपरिहार्य असते. अशावेळी, ग्रासित व्यक्तीशी संबंधित असलेल्या नातेवाईकांचे सहकार्य अपेक्षित असते. जसे की चाळीशीतील एक आई बाबा त्यांच्या १२ वर्षाच्या मुलाला घेऊन आले. वडिलांना स्वत:ला प्रचंड राग यायचा;अधे मधे रागावरचा ताबा सुटायचा. मी वडिलांना सुचवले की त्यांच्या अनियंत्रित रागावर थोडे काम करावे लागेल. ते म्हणाले की मी ४४ वर्षांचा आहे, माझ्यासाठी आता बदलणे शक्य नाही. मुलाने आमच्याबरोबर जुळवून घ्यायला हवे. वडिलांना समज द्यावी लागली की त्यांनी सहकार्य केले नाही तर मुलाच्या त्यांच्याबरोबरील वागण्यात मी काही बदल करू शकत नाही.

एक १६ वर्षांची मुलगी आई वडिलांबरोबर आली होती. ही खोटे बोलायची, घरातून पैसे चोरायची, जीव द्यायच्या धमक्या द्यायची आणि त्यात तिला काही वावगे आहे असा अजिबात वाटत नव्हते. पण या मुलीची न खंत न खेद वृत्ती आणि अविचारी, तत्काळ कृतिशीलता यावर काम केले गेले आणि तिच्या  वागण्यात पूर्ण नाही पण बराच फरक पडला. या सुनियोजित उपचार क्रमात तिच्या आई वडिलांचे सहकार्यही तितकेच मोलाचे होते.

आपल्यापैकी कोणीच परिपूर्ण नाही. परंतु दांडगा अभ्यास, प्रामाणिक प्रयत्न, त्रासात असलेल्या व्यक्तीविषयी आस्था, या पलीकडे जाऊनही एखाद्या केसमध्ये सुधारणा होत नसेल, तर दुसऱ्या योग्य व्यक्तीकडे शिफारस करावी किवा आपल्या उपचार पद्धतीबद्दल अनुभवी व्यक्तींकडून मार्गदर्शन घ्यावे. चुकीचे उपचार चुकीच्या औषध देण्याइतकेच नुकसानकारक ठरू शकते.

नागरिकांचे मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी काही धोरणात्मक उपाय योजना पुढील प्रमाणे आपण विचारात घेऊ शकतो. सरकारने सुरुवातीची पावले त्यादृष्टीने उचललीच आहेत पण अजून काही ठोस उपाय योजना राबवल्या जाणे आवश्यक आहे. मानसिक अस्वस्थ्याकडे झुकणाऱ्या लोकांसाठी लक्षपूर्वक नियंत्रण आणि त्वरित उपचार या अत्यंत महत्वाच्या बाबी आहेत. अशा मानासिक्तांचा शोध घेण्यासाठी की जे पुढे जाऊन आजार स्वरुपात बळावू शकतात किवा कार्यक्षमतेवर परिणाम करू शकतात, काही प्राथमिक चाचणी पद्धती वापरणे, खूपच मदतीचे ठरू शकते.

उदाहरणार्थ प्राथमिक स्वरूपातले सात-आठ प्रश्न जे व्यक्तीच्या सामाजिक, मानसिक, शारीरिक किवा विकासातील ठळक त्रुटींवर प्रकाश टाकतील. थोड्या मोठ्या मुलांसाठी आटोपशीर प्रश्नावली जी त्यांचा अभ्यासातील अडथळे, भावनिक कोंडी किवा होऊ घातलेला मानसिक आजार अधोरेखित करू शकेल. अशी विशिष्ट प्राथमिक प्रश्नावली कामकाजाच्या ठिकाणी सर्वसाधारण वैद्यकीय चाचणीबरोबर नियमित वापरली गेली, तर सेवेत असलेल्या प्रौढ व्यक्तींसाठी उपयुक्त ठरणार आहे. पण या निकषावर व्यक्तिला सेवेत ठेवायचे  किंवा नाही हे ठरवले जाणे चुकीचे ठरेल.

अशा व्यक्तींना आपण विशिष्ट वर्गात ढकलू शकत नाही कारण ही प्राथमिक चाचणी शक्यता जोखून बघण्यासाठी आहे. त्यानंतर प्रशिक्षित मानसोपचारतज्ज्ञाकडे पाठवण्यासाठी, किवा मदतीची हाक समजणे यासाठी उपयुक्त ठरू शकते. परंतु याचा वापर ‘लेबलिंग’ साठी करू नये. ‘स्क्रीनिंग’ चा उद्देश हा कधीच निदान हा नसून प्राथमिक स्वरुपाची माहिती मिळवणे हा असावा.

ज्या व्यक्तींच्या साथीला आयुष्यभर असे आजार चिकटलेले आहेत, त्यांच्या उत्तम निगराणीसाठी घरात सेवा देणाऱ्या व्यक्ती तयार करणे आणि त्यासाठीत्या व्यक्तींना विशेष प्रशिक्षण अपेक्षित आहे. मानसिक आजारांनी ग्रस्त असलेल्या व्यक्तीच्या ‘caregivers’ ना याची घोर चिंता असते की, आपल्यामागे मुलाची काळजी कोण घेणार? प्रत्येक कुटुंब आर्थिकदृष्ट्या एवढे सक्षम असेलच असे नाही की खाजगी संस्थेमध्ये राहण्याची पुढची सोय केली जाईल. सरकारने अशा निवासी केंद्रांची संख्या वाढवता येईल, का याविषयी विचार करण्याची गरज आहे.

मानसिक रुग्णांची संख्या आणि या क्षेत्रात सेवा पुरवणाऱ्यांचे प्रमाण याचे गुणोत्तर लक्षात घेता, ‘इमोशनल फर्स्ट एड’ आणि मदत पुरवणारे त्यासाठी स्वयंसेवक किवा वस्तीपातळीवर काम करणाऱ्या लोकांचे मदतगट स्थापन केले पाहिजेत. या लोकांच्या प्रशिक्षणासाठी एक परिपूर्ण असा अभ्यासक्रम आखला पाहिजे. बऱ्याचशा संस्थांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या मानसिक स्वस्थ्याविषयीच्या गरजा लक्षात घेता सल्लागार नेमले आहेत. सरकारी कार्यालये सुद्धा असे सल्लागार नेमू शकतात.

मानसशास्त्र हे फक्त मानसिक आजारांपुरते सिमित नाही. सामाजिक मानसशास्त्र ही एक स्वतंत्र शाखा आहे ज्याचा धोरणात्मक उपयोग करून सक्षम, जबाबदार व निकोप समाजनिर्मिती नक्कीच करू शकतो. जर शासनाने मनावर घेतले तर हा एक महत्वाकांशी प्रकल्प ठरू शकतो. आयुष्याच्या प्रवासात प्रत्येक पावलावर आपण सक्षम असूच असे नाही. मन अस्वस्थ्याकडे झुकतेय असे वाटताच, लवकरात लवकर प्रशिक्षित अनुभवी मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार घेऊन, पुढील वाटचाल आनंदाने करावी हाच राजमार्ग आहे.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.