Author : Seema Sirohi

Published on Apr 11, 2019 Commentaries 0 Hours ago

मूलर रिपार्टने ट्रम्पना रशियाशी संगनमत केल्याच्या आरोपातून दोषमुक्त केले. त्यामुळे हा रिपोर्ट अमेरिकेच्या आगामी निवडणुकीच्या दृष्टीने 'फुसका बॉम्ब' ठरला.

अमेरिकेतील म्युलर अहवालचा ‘फुसका बॉम्ब’

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प याच्या विरोधात रशियाशी संगमनत केल्याच्या आरोपावरून जी चौकशी सुरु होती. ही चौकशी करणाऱ्या विशेष सरकारी वकिलांनी ट्रम्प यांना बहुतांश आरोपांमधून मोकळे केले आहे. यामुळे ट्रम्प यांना, त्यांचा राजनैतिक विजय झाल्याचे नक्कीच म्हणता येईल. इतकेच नाही तर आपण  जवळपास सर्वच आरोपांमधून सुटुलो आहोत, असेही ते समजू शकतील अशी परिस्थिती आहे.

ट्रम्प यांची प्रचार मोहीम रशियाच्या अधिकाऱ्यांसोबत हातमिळवणी करून चालवली गेली, याची पुष्टी करणारे कोणतेही पुरावे विशष वकील रॉबर्ट म्युलर यांना आढलले नाहीत. असे असले तरीही २०१६ साली अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत रशियाने हस्तक्षेप केला होता, असे मात्र म्युलर यांनी नमूद केले आहे.

या सगळ्यामुळे डेमोक्रॅट्सना बसलेला धक्का समजण्यासारखा आहे. खरे तर म्युलर यांचे हे निष्कर्ष डेमोक्रॅट्ससाठी ‘फुसका बॉम्ब’च आहे. म्युलर यांच्याकडून २०२० च्या निवडणुकीच्या रणधुमाळीत वापरण्यासाठी ‘ब्रम्हास्त्र’ मिळेल अशी डेमोक्रेट्सना अपेक्षा होती. म्युलर यांचा अहवाल डेमोक्रेट्ससाठी मोठा धक्का आहे, तर त्याचवेळी रिपब्लिकन्ससाठी मात्र हा अहवाल नवी ऊर्जा आहे असे नक्कीच म्हणता येईल.

या अहवालामुळे आतापर्यंत अत्यंत आक्रमकपणा दाखवणारे डेमोक्रॅट्स बचावात्मक पवित्र्यावर गेले आहे. या अहवालातून ट्रम्प यांच्या विरोधातले निष्कर्ष निघतील अशा प्रकारच्या अंदाजांना डेमोक्रॅट्सनी प्रचंड खतपाणी घातले होते. तिथल्या मुख्य प्रसारमाध्यमांनीदेखील डेमोक्रॅट्सच्या तुलनेत कितीतरी अधिक पटीने हा विषय लावून धरला होता. आता आलेला अहवाल पाहता डेमोक्रॅट्सची ही कृती त्यांची मोठी चूक ठरली आहे. कारण अमेरिकी नागरिकांचे लक्ष ट्रम्प यांच्या अहवालाशी संबंधित विषयावरून वळवून इतर मुद्यांकडे वळवण्यावर लक्ष केंद्रीत करण्याची वेळ डेमोक्रेट्सवर आली आहे.

रशियासंदर्भातल्या तपासणीत हस्तक्षेप करून ट्रम्प यांनी न्यायिक प्रक्रियेत अडथळा आणला किंवा नाही याबाबत म्युलर कोणताही स्पष्ट निष्कर्ष मांडू शकलेले नाहीत. ही डेमोक्रॅट्सच्या दृष्टीने आणखी एक निराशाजनक गोष्ट ठरली आहे.

महाअधिवक्ता (अॅटर्नी जनरल) विलीयम बार यांनी या अहवालासंदर्भात चार पानांचा सारांश मांडला आहे. त्यात ते म्हणतात की “राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुन्हा केला आहे, असा कोणताही निष्कर्ष या अहवालात मांडलेला नसला, तरी या अहवालाने त्याना दोषमुक्तही केलेले नाही”. बार यांच्या या वक्तव्यातून या संपूर्ण प्रक्रियेत म्युलर यांचा दृष्टिकोन काय राहीला असेल, याचा अंदाज बांधता येऊ शकेल.

सद्यस्थिती अशी आहे की, यापुढची चौकशी करायची किंवा नाही यासंदर्भात द्विधा मनस्थिती आहे. एखादा दरवाजा उघडला तरी गोंधळ नाही तरी अडचण अशी परिस्थिती डेमोक्रॅट्सची झाली आहे. राजकीय लाभ मिळवण्याच्या हेतूने डेमोक्रॅट्सनी हा दरवाजा पूर्ण उघडावा की नाही हा प्रश्न आहे. महत्वाचे म्हणजे या अहवालाचा आधार घेत ट्रम्प यांनी “आपण पूर्णतः दोषमुक्त झालो आहोत” असं एका ट्विटर संदेशाद्वारे जाहीर करून टाकले आहे. अर्थात ही बाब आश्चर्य वाटण्यासारखी नाहीच. उलट त्यांनी चलखीने खेळी केल्याचे म्हणता येईल. कारण त्यांचे समर्थक आणि वॉशिंगटन डी.सी. पासून दूरवर राहणारे असंख्य नागरिक, ज्यांच्यासाठी दोन वर्षांपूर्वीच्या निवडणूकीत काय आणि कसले संगमनत झाले होते यापेक्षा, वादळ आणि पुरामुळे उद्भवणाऱ्या समस्या जास्त महत्त्वाच्या आहेत.

सद्यस्थिती पाहता ट्रम्प या जंजाळातून बाहेर पडले आहेत असे म्हणता येईल का? राजकीयदृष्ट्या विचार केला तर ट्रम्प यांची सुटका झाल्यातच जमा आहे. ट्रम्प यांच्यावर असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची संसदीय चौकशी व्हायला हवी यासाठी नागरिकांचा पाठिंबा मिळवणे आता डेमोक्रॅट्ससाठी सोपे असणार नाही. मूळात रोजगारासंदर्भातल्या एका प्रकरणात न्यायपालिकेच्या समितीकडून याआधीपासूनच चौकशी सुरु आहे. त्यामुळे आजची परिस्थिती लक्षात घेऊन पक्षाने इतर मुद्यांवर आपली पडक घट्ट करत वाटचाल करायला हवी असा सल्ला डेमोक्रॅट्सच्या अनेक हितचिंतक सल्लागारांनीही दिला आहे.

राष्ट्राध्यक्षपदासाठीच्या प्रचार मोहीमेदरम्यान ट्रम्प यांच्या प्रचार मोहिमेची धुरा सांभाळणारे आणि रशियाच्या अधिकारी यांच्यात अनेकदा संपर्क झाल्याची माहिती उलब्धत होती. महत्वाचे म्हणजे ही माहिती ट्रम्प यांनी स्वतःच दिली आहे. हा असे असतानाही ही संपूर्ण प्रक्रिया संगनमताने झाली होती असे म्युलर यांना का वाटले नाही याविषयी आता अनेक तज्ञ चर्चा आणि वादविवाद करत बसतील. १९ वकील, एफबीआयचे ४० एजंट, २८०० सहकर्मचारी, जवळपास ५०० शोध परवाने / सर्च वॉरेंट, संभाषणांच्या टेप मिळाव्यात यासाठीच्या ३० विनंत्या आणि ५०० साक्षीदारांच्या मुलाखती इतका मोठा फौजफाटा असूनही राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूकीत ट्रम्प आणि रशियाचे संगमनत होते असे का सिद्ध होऊ शकले नाही, असा प्रश्नही अनेक तज्ज्ञ विचारतीलच.

अर्थात एफबीआयचे माजी संचालक असलेल्या म्युलर यांनी या दोन वर्षांच्या चौकशीदरम्यान ट्रम्प यांच्या महत्वाच्या सल्लागारांसह एकूण ३४ जणांना आणि तीन कंपन्याना मात्र दोषी मानले आहे.

जे लोक हे संपूर्ण प्रकरण अगदी वरवर किंवा दूरवरून पाहत आहेत, तसेच ज्या रुढीवादी डेमोक्रॅट्सनी ट्रम्प यांनाच मत दिले आहे, त्यांच्यादृष्टीने या सगळ्या घडामोडींवरून सुरु असलेले वादविवाद म्हणजे नुसत्या बौद्धिक तर्कवितर्काच्या चर्चा आहेत. खरे तर त्यांच्यादृष्टीने पाहायला गेले तर, राष्ट्राध्यक्षपदासाठीच्या निवडणूक प्रचारात कोणतेही संगमनत नव्हते… ही बाब ट्रम्प ज्या सातत्याने एखादा मंत्र जपल्यासारखे म्हणत होते, तीच बाब माध्यमांमध्ये आज सर्वत्र ठळक बातमी झाली आहे, आणि ट्रम्प यांच्यावरच्या संकटाचे ढग हवेत विरून गेले आहेत.

ट्रम्प यांना दोषी सिद्ध करण्यात व्यवस्थेला अपयश आल्यामुळे डेमोक्रॅट्समध्ये काहिसा असंतोष असल्याचे नाकारता येणार नाही. खरे तर याच गोष्टीमुळे मागच्या नोव्हेंबर महिन्याच्या काळात प्रतिनिधीगृहावर नियंत्रण मिळवणे डेमोक्रॅट्सना शक्य झाले होते. प्रतिनिधीगृहातल्या युवा डेमोक्रॅट्सनी तर महाभियोग चालवण्यावरही चर्चा केली होती. मात्र म्युलर यांचा अहवाल सादर झाल्यानंतरची परिस्थिती पाहता, महाभियोग चालवण्यासाठी प्रयत्न करता येतील असे वाटत नाही. अनुभवी आणि वास्तवाचे भान असलेल्या राजकीय नेत्या आणि प्रतिनिधीगृहाच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांनी तर आपल्या सहकारी गटाला सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे.

पेलोसी यांनी अलिकडेच असे वक्तव्य केले होते की, “आपण महाभियोग चालविण्याच्या बाजूच्या नाही, कारण ट्रम्प यांची तेवढी पत नाही”. मात्र त्याचवेळी पेलोसी यांनी असेही म्हटले होते की, जर का महाभियोग चालविण्यासाठी द्विपक्षीय समर्थन मिळत असेल, तर मात्र आपण आपल्या मताचा फेरविचार करू. मात्र प्रत्यक्षात असे द्विपक्षीय समर्थन मिळण्याची शक्यता जवळपास नाही.

अलिकडच्या दिवसांमध्ये रिपब्लिकन पक्षावर टिका करणाऱ्यांची संख्या सातत्याने कमी होताना दिसते आहे. आणि परिस्थिती अशीच राहिली तर रिपब्लिकन पक्षावर जे अजूनही टीका करत आहेत ते मोठ्या नैराश्यात जाण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत आपल्या पक्षातल्या सहकाऱ्यांना एकत्र बांधून ठेवणे आणि पक्षांतर्गत असलेले वाद संपुष्टात आणणे ही पोलेसी यांच्यासमोरची मोठी समस्या ठरू शकते. सोमाली वंशाच्या मुस्लिम असलेल्या अमेरिकी काँग्रेसच्या सदस्या इलिहान ओमर यांनी केलेल्या धर्मविरोधी वक्तव्यावरून अलिकडेच जो गदारोळ झाला होता, त्या गदारोळातून पक्षामध्ये धर्म, वंश, लिंग आणि वय या मुंद्यांवर कशाप्रकारची दुही निर्माण झाली आहे हे दिसून येते. त्यामुळेच तर डेमोक्रॅट्स हे इस्राईल आणि ज्यूंचे विरोधक आहेत असा आरोप करण्याची संधी ट्रम्प यांनी साधली आहे.

२०२० मध्ये होणाऱ्या निवडणूका जिंकायच्या असतील तर वैचारीक पातळीवर भरकटून चालणारे नाही याची डेमोक्रॅट्सना जाणीव आहे. त्या ही पलिकडे जाऊन आता डेमोक्रॅट्सना ज्या म्युलर यांच्याकडून अपेक्षा होत्या, त्या खऱ्या न ठरल्याच्या वास्तवाचे भान ठेवावे लागेल. आणि त्या अनुषंगानेच म्युलर यांच्या अहवालाचा नकारात्मक प्रभाव पडू नये यासाठी नव्या रणणीती आखाव्या लागतील.

न्याय प्रक्रिया प्रभावीत करण्याच्या उद्देशाने अडथळा निर्माण केल्याच्या आरोपातून म्युलर यांनी ट्रम्प यांना दोषमुक्त केलेले नाही. त्यामुळेच तर जनहित लक्षात घेऊन म्युलर यांचा अहवाल सार्वजनिक केला जावा अशी मागणी डेमोक्रॅट्स करत आहेत. या अहवालातून ट्रम्प यांच्या विरोधातली चौकशी अधिक पुढे नेण्यासाठी पुरेसे पुरावे हाती लागू शकतात अशी आशा डेमोक्रॅट्सना आहे. त्यासाठीच तर हा अहवाल सार्वजनिक व्हावा या मागणीवर डेमोक्रॅट्स अधिक जोर देत आहेत.

महत्वाचे म्हणजे ट्रम्प यांच्याविरोधात इतर घटनांशी संबंधित १५ हून अधिक न्यायिक चौकशादेखील सुरु आहेत. आर्थिक गैरव्यवहार, उद्घाटनांच्या कार्यक्रमासाठी गोळा केलेल्या निधीचा बेकायदेशीर वापर, कर घोटाळा तसेच ट्रम्प हॉटेलसह इतर व्यवसायांना लाभ होईल अशा तऱ्हेच्या कृती या आरोपांवरून ट्रम्प यांच्याविरोधात या चौकशा सुरू आहेत.

या सगळ्याचा अर्थ असाच की खरे तर ट्रम्प यांच्यासमोर अजुनही कायदेशीर अडचणी आहेत. मात्र अशा स्थितीतही २०२० साली होणाऱ्या निवडणूकीसाठी ट्रम्प यांना समर्थन देणारे आहेत. ट्रम्प यांच्यावरच्या कोणत्याही आरोपांमुळे या समर्थकांचे मतपरिवर्तन होईल अशी शक्यता फारच कमी आहे. महत्वाचे म्हणजे दुसऱ्या बाजुला जे ट्रम्प यांचा विरोध करत आहेत, ते देखील चौकशीचा निकाल काहीही आला तरीही ट्रम्प यांचा विरोधच करत आहेत.

आता यापुढे तर रिपब्लिकन पक्षाशी संबंधित अधिकाधिक एकत्र येऊ लागतील. याचाच अर्थ असा की जे ट्रम्प यांचा विरोध करण्याचा विचार करत आहेत, त्यांच्यासाठी असा विचार म्हणजे आपल्या राजकीय कारकीर्दीच्या अस्तावर स्वतःच मोहोर उमटवण्यासारखे आहे.

अशाही स्थितीत खरा लढा हा मतदान केंद्रातच होईल याची म्युलर यांनी दिलेली शाश्वती महत्वाची बाब आहे. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांची आजवरची धोरणात्मक पातळीवरची वाटचाल पाहिली, तर ट्रम्प यांच्याविरुद्धचा लढा प्रत्यक्ष मतदानाच्या निकालातून जिंकण्यासाठी प्रयत्न करणे, डेमोक्रॅट्ससाठी जास्त उपयुक्त ठरू शकेल.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.